इतिहास बनला ‘ज्ञानोदय’ (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 18 जून 2017

‘महाराष्ट्राचा दीड-दोनशे वर्षांचा इतिहास लिहायचा असेल तर ‘ज्ञानोदय’शिवाय दुसरं साधन नाही,’ असं सार्थ वर्णन ज्येष्ठ विचारवंत गं. बा. सरदार यांनी ‘ज्ञानोदय’ या नियतकालिकाचं केलं होतं. रेव्हरंड हेन्‍री बॅलन्टाईन यांनी ‘ज्ञानोदय’ची मुहूर्तमेढ रोवली. ता. २० जून १८४२ ला पहिला अंक निघाला. नगरमध्ये बीजारोपण झालेल्या ‘ज्ञानोदय’ला येत्या २० जून रोजी १७५ वर्षं पूर्ण होत आहेत. एक मुक्त माणूस, स्वातंत्र्य-समता-बंधुता यांची कवचकुंडलं लाभणारा समाज, ज्ञानाचं स्वागत करणारा, तंत्रज्ञानाला सामोरा जाणारा समाज निर्माण व्हावा, अशी ‘ज्ञानोदय’ची भूमिका होती.

‘महाराष्ट्राचा दीड-दोनशे वर्षांचा इतिहास लिहायचा असेल तर ‘ज्ञानोदय’शिवाय दुसरं साधन नाही,’ असं सार्थ वर्णन ज्येष्ठ विचारवंत गं. बा. सरदार यांनी ‘ज्ञानोदय’ या नियतकालिकाचं केलं होतं. रेव्हरंड हेन्‍री बॅलन्टाईन यांनी ‘ज्ञानोदय’ची मुहूर्तमेढ रोवली. ता. २० जून १८४२ ला पहिला अंक निघाला. नगरमध्ये बीजारोपण झालेल्या ‘ज्ञानोदय’ला येत्या २० जून रोजी १७५ वर्षं पूर्ण होत आहेत. एक मुक्त माणूस, स्वातंत्र्य-समता-बंधुता यांची कवचकुंडलं लाभणारा समाज, ज्ञानाचं स्वागत करणारा, तंत्रज्ञानाला सामोरा जाणारा समाज निर्माण व्हावा, अशी ‘ज्ञानोदय’ची भूमिका होती.

कोणताही इतिहास लिहिण्यासाठी वेगवेगळी साधनं वापरली जातात. मौखिक परंपरेपासून, निसर्गातल्या खाणाखुणांपासून, शिल्पापासून, वस्तू आणि अक्षरांपासून डोंगर आणि मातीपर्यंत अनेक साधनं असतात. या सगळ्यात भर टाकणारं एक विधान प्रसिद्ध विचारवंत गं. बा. सरदार यांनी केलं आहे, ते म्हणजे सन १८०० नंतरच्या महाराष्ट्राचा दीड-दोनशे वर्षांचा इतिहास लिहायचा असेल तर ‘ज्ञानोदय’शिवाय दुसरं साधन नाही. अर्थात, इतिहास म्हणजे केवळ लढाया, शस्त्रांचा खडखडाट, तांबडे-पांढरे झेंडे, मुडद्यांच्या राशी नव्हेत. मानवी जीवनाच्या म्हणजेच त्याच्या समग्र वाटचालीचा सम्यकपणे घेतलेला एक्‍स-रे म्हणजे इतिहास असतो. अर्थात, आपल्याकडं तो अभावानंच असतो. बहुतेक वेळा आपला इतिहास जो कुणी लिहिणारा असतो, त्याच्या चष्म्याचा रंग घेऊन अवतरत असतो. स्वाभाविकच तो रंगाढंगात अडकून कलहाचं साधन ठरतो. मग कुठून तरी भावना-श्रद्धा येते, ती इतिहासाच्या मानगुटीवर बसते. ‘मीच इतिहास, मीच वर्तमान, मीच साक्ष आणि मीच पुरावा’ म्हणते. बस्स, श्रद्धावगळता सगळ्या गोष्टींना आव्हान देता येतं.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे ‘ज्ञानोदय’ची १७५ वर्षं. या कार्यक्रमाला जाण्याचं ठरवलं. सरदार यांच्या विधानाची खूप मदत झाली. ‘ज्ञानोदय’विषयी आणि ‘ज्ञानोदय’चं मूळ अंक जसे मिळतील तसे वाचू लागलो. जणू काही लॉटरीच लागली होती. १९९७ मध्ये ‘‘ज्ञानोदया’च्या पानातून महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा मागोवा’ हा प्रा. सुधीर शर्मा आणि विजया पुणेकर यांनी संपादित केलेला एक ग्रंथ हाती पडला. इतिहासाचा एक पट नजरेसमोर उभा राहू लागला. ‘ज्ञानोदय’चं एकेक पान सोपान होऊन इतिहासाकडं नेऊ लागलं. भारतात अमेरिकेतून आलेल्या मिशनऱ्यांनी ‘ज्ञानोदय’ची कल्पना अमलात आणायचं ठरवलं. अर्थात, सातासमुद्राहून आलेले हे मिशनरी धर्मप्रसारासाठीही आले होते आणि सुधारणांसाठीही. प्रेमावर उभा राहिलेला येशूचा धर्म त्यांच्याबरोबर होता. अत्युच्च सेवा करण्याचं बळ त्यांच्याकडं होतं. साधनंही होती.

सन १८०० चं शतक म्हणजे ज्ञान, विज्ञान, धर्मसुधारणा, धर्मचिकित्सा यांचा काळ होता. जगभर हा काळ पसरला होता. भारतही त्याला अपवाद नव्हता. मिशनरी येण्यापूर्वीही भारतात सामाजिक सुधारणांसाठीचे प्रयत्न सुरूच होते. शिक्षणक्षेत्रातल्या हालचाली वाढल्या होत्या. अशा परिस्थितीत रेव्हरंड हेन्‍री बॅलन्टाईन यांनी ‘ज्ञानोदय’ची मुहूर्तमेढ रोवली. २० जून १८४२ ला पहिला अंक निघाला. बॅलन्टाईन, ह्यूम, पाळे ते सावरकर, मॅकनिकल, एडवर्डस, रेव्हरंड नारायण वामन टिळक, देवदत्त नारायण टिळक यांच्यासारखे अनेक संपादक ‘ज्ञानोदय’ला लाभले. तत्त्वज्ञान, इतिहास, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र आदी अनेक विषयांत ते पारंगत होते. आपलं  सगळं ज्ञान, कौशल्य पणाला लावून बातम्या, लेख यांच्यापलीकडं जाऊन त्यांनी इथल्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सुधारणा आदींना हात घातला. अमेरिका, युरोपमध्ये सुरू झालेली लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, न्याय आदी प्रवाह भारतातल्या मातीत रुजवण्याचे आणि त्यासाठी या मातीचाच गंध वापरण्याचे त्यांनी ठरवले. ‘ज्ञानोदय’ म्हणजे समग्र मानवी जीवनाचा जणू काही आरसा ठरला. ‘ज्ञानोदय’नं नुसतंच प्रतिबिंब टिपलं नाही, तर टिपलेलं प्रतिबिंब कुरूप असेल तर ते सुरूप करण्याचा प्रयत्न केला. समकालीन विधायक, परिवर्तनवादी चळवळींना सक्रिय पाठिंबा दिला. त्यापैकी महात्मा फुले एक. ‘ज्ञानोदय’ म्हणजे जणू काही फुले यांच्या कार्याचा प्रवक्ता, समर्थक झाला होता. फुले यांच्या कार्यासाठी, मुक्तानं लिहिलेल्या निबंधासाठी, शैक्षणिक क्रांतीसाठी बहुतेक सगळी पानं ‘ज्ञानोदय’नं खर्च केली आहेत. सगळ्याच क्षेत्रांतला हा ‘ज्ञानोदय’ होता. तो व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा अधिक सक्षम करण्यासाठी, तिचं व्याकरण संकलित करण्यासाठी मिशनऱ्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. केवळ मराठीच्या प्रेमापोटी महाराष्ट्रातच कायमस्वरूपी स्थायिक झालेले मिशनरीही होते. ‘ज्ञानोदय’नं ख्रिस्ती धर्मात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला. खरंतर ‘प्रोटेस्टंट’ परंपरा होती. धर्माच्या नावानं चालणाऱ्या अनिष्ट गोष्टींना त्यानं विरोध केला. सती असेल, बालविवाह असेल, विधवांचा प्रश्‍न असेल, जादूटोणा, चमत्कार असेल अशी धर्मावर आणि श्रद्धांवर साचलेली अनेक आवरणं उसवून सच्चा श्रद्धांना श्‍वास घेण्याची मोकळीक करून दिली. विशेष म्हणजे, इथल्या स्वातंत्र्यचळवळींना पाठिंबा दिला. लोकमान्य टिळकांची होमरूल चळवळ असेल किंवा त्यांच्या पुत्रानं म्हणजे श्रीधरपंत यांनी डॉ. आंबेडकरांच्या मदतीनं सुरू केलेली समताचळवळ असेल, राष्ट्रीय सभा असेल किंवा महात्मा गांधी यांची चळवळ असेल या सगळ्यांनाच ‘ज्ञानोदय’नं मुक्तहस्ते पाठिंबा दिला. ख्रिस्तीसुद्धा हिंदुस्थानी आहेत, हेही ते पुनःपुन्हा ठणकावून सांगत राहिले.
गांधीजींना सामाजिक कार्याच्या प्रेरणा कुठं आणि कशा मिळाल्या, यावर आजही वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा चालते. येत्या ऑक्‍टोबरपासून गांधीजींची १५० वी जयंती सुरू होणार असल्यानं आणखी चर्चा होईल; पण सरदार यांनी म्हटल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत मिशनऱ्यांचं काम पाहून गांधीजी खूप प्रभावित झाले. त्यांच्या कार्याच्या प्रेरणा इथंच सुरू होतात. त्या इतक्‍या प्रबळ होतात, की ख्रिस्ती होण्याचा विचार ते व्यक्त करतात. पुढं पुढं ‘धर्म बदलण्याऐवजी आहोत त्या धर्मात सुधारणा करून तो चांगला बनवावा,’ असं ते ठरवतात.

‘ब्रिटिश हे ख्रिस्ती होते आणि त्यांनी केलेलं कृत्य योग्यच आहे,’ असं धार्मिक नजरेतून ‘ज्ञानोदय’नं कधी पाहिलं नाही. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर त्यानं खूप टीका केली आणि  त्या अधिकाऱ्याला ‘माणसं मारणारा महात्मा अशी पदवी द्यावी,’ असा उपरोधही केला. स्वातंत्र्यासाठीच्या सगळ्या लढायांमध्ये ‘ज्ञानोदय’ही विधायक भूमिका घेऊन उभा होता. अनेकदा लंडनच्या दरबाराला याचा त्रास व्हायचा; पण ‘ज्ञानोदय’नं त्याचा विचार केला नाही. एक मुक्त माणूस, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची कवचकुंडलं लाभणारा समाज, ज्ञानाचं स्वागत करणारा, तंत्रज्ञानाला सामोरा जाणारा समाज ‘ज्ञानोदय’ पाहत होतं. या बाबींच्या आड येणाऱ्या बहुतेक गोष्टींना ते विरोध करत होतं. महाराष्ट्रात त्यानं इंग्लिश भाषा लादण्याचा कधी प्रयत्न केला नाही. उलट, महाविद्यालयीन शिक्षण मराठीतूनच द्यावं म्हणजे देशी भाषेतून द्यावं, असा आग्रह धरला. ‘इंग्लिश हा एक विषय असावा, सगळंच इंग्लिशमध्ये असू नये,’ अशी भूमिका मांडली. आपले कथित देशीवादी आज जे बोलतात ते १७५ वर्षांपूर्वी ‘ज्ञानोदय’ बोलत होता. प्लेग, पटकी या रोगानं माणसं मरू नयेत म्हणत गावोगावी लस पोचवण्यास ‘ज्ञानोदय’ प्रोत्साहन देत होतं.

काळ बदलला तशा भारतीय माध्यमांच्या भूमिका बदलत गेल्या. स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्यासाठी संघर्ष बनलेली माध्यमं विचारपत्र, बातमीपत्र असा प्रवास करत व्यवसायापर्यंत पोचली; पण ‘ज्ञानोदय’नं समग्र समाजपरिवर्तन, प्रबोधन, शिक्षण ही मूल्यं व्रत म्हणून वापरली. त्यात काही तडजोड केली नाही. दुर्दैवानं सगळ्या समाजासाठी असलेला ‘ज्ञानोदय’ पुढं पुढं एका विशिष्ट समूहाचा ‘ज्ञानोदय’ बनला हा भाग वेगळा; पण याही समाजानं १७५ वर्षं अथक आणि अखंडपणे प्रकाशनाची ही परंपरा टिकवून ठेवली. या गोष्टीला खूप महत्त्व आहे. जागतिकीकरणाच्या काळात माध्यमं ही व्यवसाय, भांडवल किंवा गुंतवणूक झाली. ‘ज्ञानोदय’ मात्र आपल्या अंगा-खांद्यावर, पानापानावर परिवर्तनाच्या, इतिहासाच्या खुणा मिरवत राहिला. महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात ‘सरवडे’सारख्या छोट्याशा गावात राहून मुकुंदराव पाटील या सत्यशोधकी नेत्यानं सतत ५० वर्षं ‘दिनमित्र’ हे साप्ताहिक चालवलं. एकाच संपादकानं ५० वर्षं साप्ताहिक चालवण्याचा विक्रम झाला होता. ‘ज्ञानोदय’चं तसंच झालं आहे. त्याचं बीजारोपण नगरमध्येच झालं होतं. एकेकाळी सर्व पुरोगामी, क्रांतिकारी, डाव्या विचारांचं माहेरघर असणारं नगरही ‘ज्ञानोदय’च्या निमित्तानं विचारक्षेत्रात अजरामर होतं आहे. किती छान!

Web Title: uttam kamble write article in saptarang