पप्पा लंबा असंल; पता नही ! (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 17 सप्टेंबर 2017

‘माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते,’ असा वापरून वापरून गुळगुळीत झालेला एक ‘सुविचार’ माणसं एकमेकांना अधूनमधून ऐकवत असतात. मात्र, काही काही माणसांच्या आणि परिस्थितीच्याही बाबतीत तो अत्यंत टोकदारपणे लागू पडतो. लहान मुलांच्या संगोपनाबाबत अनेक पालकांचं असंच काहीसं होतं बऱ्याचदा. काही लहानग्यांच्या वडिलांना पोटापाण्यासाठी दूरदेशी जावं लागतं...काही चिमुकल्यांच्या आईला दूर राहून बारा-चौदा तास नोकरी करावी लागते. एकमेकांना एकमेकांचा सहवास हवा तसा आणि हवा तेवढा मिळतच नाही. मग उमलायच्या वयातच लहान मुलांमध्ये काही वर्तनविसंगती त्यांच्याही नकळत निर्माण होतात.

‘माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते,’ असा वापरून वापरून गुळगुळीत झालेला एक ‘सुविचार’ माणसं एकमेकांना अधूनमधून ऐकवत असतात. मात्र, काही काही माणसांच्या आणि परिस्थितीच्याही बाबतीत तो अत्यंत टोकदारपणे लागू पडतो. लहान मुलांच्या संगोपनाबाबत अनेक पालकांचं असंच काहीसं होतं बऱ्याचदा. काही लहानग्यांच्या वडिलांना पोटापाण्यासाठी दूरदेशी जावं लागतं...काही चिमुकल्यांच्या आईला दूर राहून बारा-चौदा तास नोकरी करावी लागते. एकमेकांना एकमेकांचा सहवास हवा तसा आणि हवा तेवढा मिळतच नाही. मग उमलायच्या वयातच लहान मुलांमध्ये काही वर्तनविसंगती त्यांच्याही नकळत निर्माण होतात. त्या वर्तनविसंगती आहेत, हे त्या छोट्या जिवांना ठाऊकही नसतं. यात चुकतं कुणाचं, दोष कुणाचा?

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकमध्ये दोन कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’मध्ये झाला. कार्यक्रम म्हणजे हत्येचा निषेध आणि आदरांजली. गौरीच्या वडिलांना मी एक-दोन वेळा भेटलो होतो. पी. लंकेश. ते केवळ पत्रकार नव्हते, तर लेखक, नाटककार, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक वगैरे बरंच काही होते. विशेष म्हणजे, लढाऊ होते. दीपिका पदुकोनला त्यांनीच पहिल्यांदा चित्रपटात घेतलं होतं. हे सगळेच्या सगळे गुण आणि लढाया गौरीमध्ये उतरल्या होत्या. तिच्या हत्येनं देश हादरून गेला. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या हत्यांनंतरही तसंच झालं होतं. आपला देश, समाज खूप लवकर हादरतो आणि शांतही होतो. चौघांपैकी एकाचेही हल्लेखोर सापडलेले नाहीत. ‘यानंतर नंबर कुणाचा?’ अशीही चर्चा शोकसभेपूर्वी निघालेल्या मोर्चात होती. तरुणाईचा सहभाग आणि हत्येबद्दल तिच्या चेहऱ्यावर चमकणारा संताप हेही या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मोर्चा काही प्रश्‍न घेऊन आला होता. या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार, कोण देणार हाही एक प्रश्न आहे. गौरीच्या हत्येनंतरही असेच प्रश्न निर्माण झाले आहेत.

मोर्चा संपल्यानंतर गंगापूर रोडवरच्या ‘प्रमोद महाजन बागे’त गेलो. बऱ्याच वर्षांपूर्वी उभारलेली ही बाग पाहायची होती. मोर्चात आणि शोकसभेत निर्माण झालेला ताण थोडा कमी होईल असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही. बागेतल्या एका बाकड्यावर थोडा वेळ बसलो. पावसामुळं बाग हिरवीगार झालीय. मुलं इकडं-तिकडं खेळताहेत. पालक त्यांच्या मागं धावताहेत. घसरगुंडी, सी-सॉ वगैरे बरंच काही सुरू होतं. मुलं धावताहेत. लपाछपीचा खेळ खेळताहेत. काही पालक मुलांना, तर काही मुलंही आपल्या पालकांना हुडकताहेत. एक सुंदर, अवखळ असं दृश्‍य तयार झालं होतं. थोड्याच वेळात एक माता तिच्या अडीच-तीन वर्षांच्या मुलासोबत धावतच आली. माझ्याच बाकावर बसली. आमच्या दोघांच्या मध्ये मुलगा. मुलगा एकसारखा बोलत होता. प्रश्न विचारत होता. आई उत्तरं देता देता बेजार होत होती. प्रश्नोत्तरं ऐकताना खूप बरं वाटत होतं. लहान मुलांचा प्रत्येक प्रश्न नवं ज्ञान जन्माला घालत असतो आणि जुन्या ज्ञानाला हलवून जागा करत असतो.

बाकावर बसलेला पोरगा आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला ः ‘‘मम्मा, इस गार्डन का क्‍या नाम है...?’’
आई ः ‘‘बेटा, प्रमोद महाजन गार्डन.’’
तो ः ‘‘याने की...कौन है प्रमोद महाजन?’’
आई ः ‘‘बेटा, वो लीडर थे.’’
तो ः ‘‘ये झोपाळा किस ने बनाया है?’’
आई ः ‘‘कॉर्पोरेशन ने.’’
तो ः ‘‘यह क्‍या होता है?’’
आई ः ‘‘हां बेटा, कॉर्पोरेशन होता है...’’
तो ः ‘‘ये जो हमने बर्डस देखे, वो रात को कहाँ जाते है...?’’
आई ः ‘‘इधर ही रहते है...पेड पे...ऑन ट्री बेटा.’’
तो ः ‘‘इनका होम नहीं क्‍या है...?’’
सवाल-जबाब सुरू असतानाच त्या आईनं पर्समधून काहीतरी खाऊ काढला. पोराच्या हातात दिला. ‘नीट खायचं. काही सांडायचं नाही,’ असं बजावत पाण्याची बाटलीही दिली. आता तो मांडी घालून बसला. मी थोडं बाजूला सरकून त्याला जागा दिली. सहजच प्रश्‍न विचारला ः ‘‘बेटा, तेरा नाम क्‍या है?’’
मोठ्या खुशीत तो म्हणाला ः ‘‘साहिल नाम है मेरा.’’
मी ः ‘‘खूपच छान. शाळेत जातो का?’’
तो ः ‘‘छोटा हूँ ना...अब जल्दी बडा हो कर जाऊंगा.’’
मी ः ‘‘बेटा, तेरे पिताजी क्‍या करते है?’’
या प्रश्‍नावर मात्र तो थोडा बावरला. आईकडं एकटक बघू लागला. हातातला खाऊ तोंडात ठेवत म्हणाला ः ‘‘वो फॉरेन में है...है ना मम्मा?’’
उत्तराचा शेवट आईला प्रश्न विचारण्यात झाला, तसं आई म्हणाली ः ‘‘दुबईला असतात याचे पप्पा.’’
मग मी साहिललाच फोकस करून विचारलं ः ‘‘बेटा, तू गेला होतास का दुबईला?’’
तो ः ‘‘नहीं गया. वो आया था एक बार. मैं बहोत छोटा था ना मम्मा?’’
आई ः ‘‘हो बेटा. याचे वडील इथं आले ना त्या वेळी हा दोन वर्षांचा होता.’’
मी त्याला आणखी एक प्रश्न विचारला तसा ते चिंताग्रस्त झाला. मी विचारलं तसा तो काहीतरी आठवायला लागला. तोंडात घातलेला घास त्यानं मोठ्या ऐटीत गिळला, पाणी प्यायला आणि थेट माझ्याकडं वळून म्हणाला ः ‘‘याद नहीं आता. लेकिन वो लंबा है...मम्मा बताती है...है ना मम्मा?’’

मम्मी ः ‘‘त्याचं काय आहे, की आपले वडील कसे आहेत, हे याला काही आठवत नाही. मीच त्याला सांगितलंय, की तुझे पप्पा उंच आहेत. गोरटे आहेत वगैरे...’’
मी ः ‘‘समजा, त्याचे पप्पा अचानक आले तर हा ओळखू शकेल त्यांना किंवा त्याचे वडील ओळखू शकतील याला?’’
मुलाला बहुतेक प्रश्‍न कळला नसावा; पण आईला तो कळला असावा. ती थोडं मोकळं होत म्हणाली ः ‘‘काय आहे, इथं काही काम नाही मिळालं म्हणून कुणाच्या तरी ओळखीनं ते दुबईला गेलेत. वर्कर आहेत एका संस्थेत. एकदा आले होते हा जन्माला आल्यावर; पण नंतर नाही. पोराला मी रोज त्यांच्याविषयी सांगते. त्यांना ‘लवकर या’ म्हणते; पण ते काही जमंल असं वाटत नाही. एकतर मी त्यांना ‘दुबईला जाऊ नका’, असं म्हणाले होते. आम्हाला ते तिकडं नेऊ शकत नाहीत. ते तिथं टेम्पररी. स्वतःच कुठंतरी राहतात. आम्हाला कुठं ठेवणार? मी म्हणतेय, असं ताटातूट करून जगायला नको. ताटातूट खूप दुःख देते. आता पोराचंच बघा ना...त्याला त्याचा पप्पा भेटत नाही. पप्पाविषयी काही सांगता येत नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणं हे चुकून समोरासमोर आले तर कुणीच कुणाला ओळखणार नाही. अल्ला लवकरात लवकर आम्हाला एकत्र ठेवू दे...’’

आई बोलून थांबली. आवराआवर करू लागली. पाण्याची बाटली आणि उरलासुरला खाऊ तिनं पर्समध्ये ठेवला. ती उठत असतानाच मी म्हणालो ः ‘‘कुटुंब एकत्र राहण्याचा खूप आनंद असतो ना? साहिलच्या पप्पांप्रमाणंच माझेही वडील खूप दिवसांनी आम्हाला भेटायला यायचे. माझे वडील मिल्ट्रीत होते. ’’
आई ः ‘‘हा तर सारखी आठवण काढतोय...एकदा तर त्यानं मला विचारलं होतं, ‘पप्पा कौन होता है... ?’ बाई गं, रडून रडून माझे डोळे सुजले होते.’’

आईचं उत्तर ऐकून खूप खूप वाईट वाटायला लागलं. माझ्याशेजारी एक कुटुंब आहे. त्यातली आई आपलं बाळ सहा महिन्यांचं असल्यापासून पाळणाघरात ठेवतेय. पोराच्या जन्माच्या वेळीच तिचा नवरा वारला. कुटुंबात ती एकटीच असते. सहा वाजता बाळाला घेऊन ती घर सोडते. नाशिकपासून शंभरेक किलोमीटरवर नोकरीसाठी जाते. रात्री साडेआठला बाळ घेऊन परततेय. तिचं बाळही आता तीन वर्षांचं झालंय. जवळच्या शाळेत प्ले ग्रुपमध्ये जातंय. अंगणवाडी चालवणारीच त्याला सोडते, परत आणते. प्ले ग्रुपमधल्या शिक्षिकेनं एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना आपापल्या आईची माहिती सांगण्याविषयी विचारलं, तर या मुलानं पाळणाघर चालवणाऱ्या महिलेची माहिती सांगितली. तिनं ही गोष्ट पोराच्या आईला सांगितली. आई खूपच रडायला लागली. त्याला छातीशी कवटाळून ‘मी तुझी आई आहे...माझी माहिती सांगत जा,’ असं म्हणाली. तिच्या या भावना पोराला समजल्या की नाहीत कुणास ठाऊक? कोणत्या तरी उत्सवाच्या वेळी आमच्या बागेत, आमच्या म्हणजे आमच्या घराजवळच्या महापालिकेच्या बागेत, बच्चेकंपनीसाठी ठेवलेल्या स्पर्धेत ती आली होती. स्वतःच ती ही माहिती देत होती. हसत आणि रडत ती सांगत होती.
आणखी एक ः जे पालक मुलांना कमीत कमी वेळ देतात ते त्यांचे जास्तीत जास्त लाड करतात. बक्षिसं, खेळणी अजून काय काय देतात. त्यांच्या मनात एक अपराधीपणाची भावना असते. कमी वेळ देण्यातून ती तयार झालेली असते. ‘अभ्यास कर, खाऊ देते’, ‘होमवर्क कर, बक्षीस देते’, ‘खेळायला जा, मॉलमध्ये नेते,’ ‘अमुक अमुक कर, तमुक तमुक देते किंवा देतो,’ असं वातावरण असतं. पोरगा कसाही वागला तरी हे त्याचं कौतुक केलं जातं. एकदा असाच मॉलमध्ये काउंटरवर होतो. माझ्या मागं एक महिला वस्तूंनी भरलेली ट्रॉली घेऊन उभी होती. तिचा मुलगा अजून काय काय खरेदी करत होता. ट्रॉलीमध्ये भरत होता. ही मोठा आवाज काढत म्हणाली ः ‘जल्दी आ बेटा... कम अर्ली माय डिअर...’ यावर पोरगा चिडून ओरडला ः ‘चूप बे साली, क्‍यूँ बार बार चिल्ला रही है...? तू घर चल... तुझे ना गोली मारकर भून के रखता हूँ...’
मुलाचं उत्तर ऐकून काउंटरवरच्या रांगेतल्या बहुतेकांना धक्का बसला आणि हसूही आलं; पण तीनेक वर्षांच्या मुलाचं हे हिंसक बोलणं कुणालाच रुचलं नसावं.
मग ही आई थोड्या पडत्या आवाजात म्हणाली ः ‘‘ओके बेटा, टेक युवर ओन टाइम...आय विल वेट फार यू...बहोत प्यारा बच्चा है मेरा...’’

शेवटच्या तीन-चार शब्दांत तिनंच आपल्या पोराला सर्टिफिकेट दिलं होतं. ज्या वयात पालकांकडून भरपूर वेळ पोरांना मिळायला हवा, तो मिळाला नाही की पोरं कसंही वागतात; पण हे कुणी मुद्दाम करत नाहीय. नव्या व्यवस्थेनं पहिला कुटुंबाचा, मग नात्याचा आणि उबेचाही संकोच केलाय. प्रत्येक जण आपापल्या बिंदूवर बरोबर आहे. मग चुकतं कोण? ‘माझा वडील लंबा असेल’, असा अंदाज करणारा, आईची माहिती सांगा म्हटल्यावर अंगणवाडीच्या बाईंची माहिती सांगणारा, की मॉलमध्ये गर्दीत थांबून ‘चूप बे साली, तुझे भूनकर रखूँगा’ असं आईला म्हणणारा...?

Web Title: uttam kamble write article in saptarang