फोटोत पोर चांगलीच दिसते! (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

त्याच्या दुकानाकडं पाठ फिरवून आम्ही निघालो. अलीकडं हुड्याचं रूप बदललंय. तो नोटेतून बाहेर पडलाय आणि वस्तूत घुसलाय. ‘कायद्यानं हुंड्याला बंदी आहे,’ हे कुणीच लक्षात घेताना दिसत नाही. बहुतेक वेळा पोरीचा बापच लग्न लावून देतो. लग्नाचा खर्च स्वतःच उचलतो. कारण, तशी परंपराच निर्माण झाली आहे. ‘लग्न दोघांचं असतं, तेव्हा खर्चही दोघांनी उचलायला हवा,’ असा विचार सार्वत्रिक होत नाहीय. हुंडा दिला काय, दागिने दिले काय, लग्न लावून दिलं काय... सगळ्यांचा अर्थ एकच. ‘संस्कार’ समजल्या जाणाऱ्या विवाहातही भांडवलशाही अशी मुक्त खेळत असते.

त्याच्या दुकानाकडं पाठ फिरवून आम्ही निघालो. अलीकडं हुड्याचं रूप बदललंय. तो नोटेतून बाहेर पडलाय आणि वस्तूत घुसलाय. ‘कायद्यानं हुंड्याला बंदी आहे,’ हे कुणीच लक्षात घेताना दिसत नाही. बहुतेक वेळा पोरीचा बापच लग्न लावून देतो. लग्नाचा खर्च स्वतःच उचलतो. कारण, तशी परंपराच निर्माण झाली आहे. ‘लग्न दोघांचं असतं, तेव्हा खर्चही दोघांनी उचलायला हवा,’ असा विचार सार्वत्रिक होत नाहीय. हुंडा दिला काय, दागिने दिले काय, लग्न लावून दिलं काय... सगळ्यांचा अर्थ एकच. ‘संस्कार’ समजल्या जाणाऱ्या विवाहातही भांडवलशाही अशी मुक्त खेळत असते. हुंड्यासाठी पैसे जमा करता यावेत म्हणून हजारभर किलोमीटरवरच्या गरिबाला शहराकडं पळायला लावते... रात्रभर जागून चहा विकायला लावते... आणखीही बरंच काय काय...

नाशिक ते औरंगाबाद किंवा नाशिक ते नांदूरमार्गे नगर असा प्रवास करायचा असल्यास पुढील काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. १) आपण वाहन कितीही काळजीपूर्वक चालवलं तरी ते खोल आणि रुंद खड्ड्यातच जाणार, २) आपल्या वाहनाचं नुकसान होणार, ३) वाहनाचा टायर फुटणार किंवा पंक्‍चर होणार, ४) शॉक-ॲब्सॉर्बर खराब होणार, ५) अपघाताची शक्‍यता वाढणार आणि ६) आपण आपल्या ठिकाणी वेळेत पोचणार नाही. कॉरिडॉर, एक्‍स्प्रेस हायवे आणि बुलेट ट्रेन यांच्यावरून सुरू असलेल्या गदारोळात या आणि अशा अन्य काही रस्त्यांकडं कुणाचंच लक्ष नाही. ‘खड्डे दाखवून पैसे मिळवा’ म्हणणाऱ्यांचंही नाही. नगरमध्ये जवळपास दरडोई एक छोटा-मोठा नेता असताना आणि मराठवाड्यानं पाच-सहा वेळा मुख्यमंत्रिपद मिळवूनही या रस्त्यांचा जीर्णोद्धार काही होत नाहीय. असो. वरच्या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनच मीही नांदूरमार्गे नगरला माझ्या मुलाचा मित्र मोहसीनच्या स्वागतसमारंभासाठी निघालो होतो. गृहीत न धरलेली आणखी एक गोष्ट प्रवासात उघड झाली आणि ती म्हणजे, खड्ड्यात घुसणाऱ्या किंवा खड्ड्यावरून उडणाऱ्या गाडीमुळं आपल्या हाडांचा सांगाडाही सैल होणार होता. खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पुन्हा दुसऱ्या एका खड्ड्यातच जाणं, असं समीकरण तयार झालं होतं. शेवटी नगर चार-पाच किलोमीटरवर असताना रात्री साडेनऊच्या सुमाराला गाडीचा पुढचा टायर फुटलाच. नवा टायर फुटला. मग अंधारातच कशीतरी स्टेपनी बसवली. तिच्यातलीही हवा कमी झाली होती. रात्री अकरानंतर खूप प्रयत्न करून नवा टायर खरेदी केला. तो बारा-एकच्या सुमाराला बसवला. परतीच्या प्रवासात शिंदे-पळसे गावाजवळ पोचलो तेव्हा पहाटेचे साडेचार वाजले होते. हायवेच्या डाव्या बाजूला चहाचा एक गाडा पाहून आनंद वाटला. चहासाठी आम्ही थांबलो. चहावाल्यानं अगदी अलीकडं म्हणजे दोनच दिवसांपूर्वी हा गाडा सुरू केला होता. रात्रभर तो सुरू असतो; पण त्या दिवशी मात्र आम्ही त्याचे दुसरेच ग्राहक होतो. संपूर्ण रात्रीत एकजणच चहा पिऊन गेला होता. आम्हाला पाहून त्याला खूपच आनंद झाला असावा. हसतमुखानं त्यानं आमचं स्वागत केलं आणि चहाच्या तयारीला लागला.

आम्ही त्याला ‘तू कोणत्या गावचा?’ असं विचारलं तर त्यानं लांबलचक कथाच सांगितली. त्याची स्वतःची कथा. अर्थात महामार्ग अशा कथांनी भरलेला असतो. धावणाऱ्या वाहनांकडं आणि चकाकणाऱ्या रस्त्याकडं या कथा पाहत असतात. प्रत्येकाची कथा वेगळी असते.

...तर हा विक्रेता नांदेड जिल्ह्यातनं आलेला. नाशिकमध्ये छोट्या-मोठ्या उद्योगात जम बसवायचा म्हणून त्यानं गावातलं किडूकमिडूक विकून लाखभर रुपये जमा केले होते. एक छोटा मुलगा, पत्नी आणि स्वतः असं कुटुंब घेऊन त्यानं जगण्यासाठी खेळ मांडायला, फासे टाकायला सुरवात केली. बिगारी, भाजीविक्री, छोटी नोकरी असं बरंच काही केलं होतं; पण खेळ काही रंगला नाही आणि फासे उलटेच पडत गेले. शेवटी, नव्या महामार्गावर त्यानं दोनशे-तीनशे फूट एवढी जमीन - जी रस्त्यालाच लागून आहे - ती भाड्यानं घेतली. वीज, पाणी अशी कोणतीच सुविधा तिथं नाहीय. तरीही अनामत रक्कम वेगळी आणि भाडं मासिक सहा हजार म्हणजे रोज दोनशे रुपये. फक्त पत्रा मारायला परवानगी होती. दिवसभर शेडमध्ये आणि रात्री रस्त्यावर चहा-फराळ विकायचं त्यानं ठरवलं. तीन-चार टेबलं, खुर्च्या, भांडी, कच्चा माल घेऊन तो व्यवसायासाठी उभा राहिला. तो महाराष्ट्रीयच आहे; त्यामुळं ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ असं गाणं म्हणत त्याच्याविरुद्ध कुणी आंदोलन करण्याची शक्‍यता नाही, ही त्यातल्या त्यात जमेची गोष्ट. दुकान चालवण्यासाठी रोजचा स्थिर खर्च आहे सहाशे रुपये; पण त्याला दोन दिवसांत सहाशे रुपये कधी मिळालेच नाहीत. तो, त्याची पत्नी आणि मुलगा यांनी प्रत्येकी आठ आठ तास याप्रमाणे दिवसाचे तीन तुकडे करून काम सुरू केलंय; पण अजून एकाचाही रोजगार निघालेला नाही. टोलनाका तसंच मोठा पूल सुरू झाला की ग्राहक वाढतील, यावर त्याचा विश्वास आहे.

त्याच्या विश्वासाला पाठिंबा देत आणि चहाचा घोट घेत मी त्याला एक प्रश्न विचारला ः ‘‘नांदेड जिल्हा सोडून एवढ्या लांब कसा काय आलास?’’
यावर तो म्हणाला ः ‘‘काय करणार? पोरीचं लग्नाचं वय झालंय.’’
मी म्हणालो ः ‘‘म्हणजे लग्नाचा आणि स्थलांतर करण्याचा संबंध काय?’’
‘‘आता कसं सांगायचं?’’ असं म्हणत त्यानं गॅस विझविला आणि आपल्या प्रश्‍नाचा गॅस पेटवत म्हणाला ः ‘‘अहो, आमच्या भागात हुंड्याबिगर पोरीचं लग्नच होत नाही. महागाईमुळं हुंड्याचा रेट वाढलाय. गुरं वळणारा पोरगाही पन्नास हजारांच्या पुढं हुंडा घेतोय. नोकरदार, जमीनदार, शिकला-सवरलेला किती घेत असंल, याचा विचार तुम्हीच करा. मलाही माझ्या पोरीच्या हुंड्यासाठी पैसा जमवायचा आहे. गाव सोडल्याबिगर ते घडणार नव्हतं. पोरगी अकरावीत गेल्यापासून लगीन जवळजवळ येतंय, असं वाटतंय. दांडगा घोर लागलाय. स्थळ कोणतं मिळंल आणि हुंडा कोणती उडी घेईल काही कळत नाही. बाप असल्यामुळं मी सावध झालो. पोरगी आणखी थोडी बुकं शिकली की हुंडा थोडा कमी-जास्त होतो. तो चुकत नाही, हा भाग वेगळा. तिचं शिक्षण तोडलं नाही. तिला गावाकडंच एका कॉलेजात गुंतवलंय आणि आम्ही सगळे इकडं आलोय. तिकडं वारंवार जाता येत नाही. मोबाईलवर ख्यालीखुशाली कळते. पोरानं तर तिचा फोटोच फोनमध्ये फिट केलाय. आता हे हॉटेल चाललं नाही ना तर खूप वंगाळ होणार आहे. पैसा सगळा मोडून टाकलाय आणि इथं गल्ल्यात काही जमा होत नाही.’’

मी त्याला धीर देत म्हणालो ः ‘‘मुलींसाठी आता शासनाच्या खूप सवलती आहेत. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अशी घोषणा आहे.’’
तो म्हणाला ः ‘‘आता हे बघा. जाहिरातीतल्या फोटोत कोणतीही पोरगी चांगलीच दिसते; पण ही मानेवर बसलेली, आपली पोरगी म्हणून जन्माला आलेली पोरगी सांभाळणं खूप कठीण. अशी बघता बघता वाढंल आणि हुंड्याचा राक्षस उभा राहील. शेवटी पैशाचं नाटक काही कुणाला करता येत नाही.’’
बोलता बोलता आम्ही तिघांनी म्हणजे नागार्जुन, आबा आणि मी पुन्हा चहाची ऑर्डर दिली. त्याला थोडं बरं वाटलं. एका प्लास्टिकच्या बरणीत त्यानं वेगवेगळ्या सिगारेटीही विक्रीसाठी ठेवल्या होत्या. हसतच त्यानं विचारलं ः ‘‘सिगारेट देऊ का साहेब?’’ मी ‘नको’ म्हणताच त्यानं एक सुविचार सांगितला ः ‘सिगारेट ओढूच नये. ती वाईटच असते. गिऱ्हाइकाची सोय व्हावी म्हणून मला ती ठेवावी लागते. मला तर स्वतःला सुपारीचंही व्यसन नाही. पोरीच्या बापाला व्यसन नाही परवडत. पै पै करून हुंडा जमवायचा. माझ्यासमोर एकच प्रश्‍न उभा असतो आणि तो म्हणजे हुंडा.’
मी आणखी एक वाक्‍य उच्चारलं आणि ते म्हणजे, ‘कायद्यानं हुंडाबंदी आहे.’ लागलीच त्यानं ते वाक्‍य दूर कुठं तरी अंधारात किंवा पहाटेच्या गारठ्यानं थंड झालेल्या रानात फेकून दिलं. पुन्हा एकदा त्यानं गॅस बंद केला. म्हणाला ः ‘‘कायद्याला कोण जुमानतंय का आपल्याकडं? खोल डोळ्यांचा माणूस आणि कायद्यात काय फरक आहे? शिकलेली, शहाणी माणसं तर हुंडा घेतातच. त्यांचं बघून अडाणीही घेतात.’’

आता आम्हाला निघायला हवं होतं. पुन्हा एकदा येण्याचं निमंत्रण देत तो म्हणाला ः ‘‘इकडची माणसं खूप चांगली आहेत. मदत करतात. एकानं तर सांगितलं, की ‘तुझ्या पोरीचं लग्न आम्ही इकडं लावू, चांगलं स्थळ बघू, अगदी छत्रपती (मराठा) पोरगा बघू...’ आनंद वाटला; पण हुंडा सुटणार नाही, हेही खरंच आहे.’’

त्याच्या दुकानाकडं पाठ फिरवून आम्ही निघालो. अलीकडं हुड्यांचं रूप बदललंय. तो नोटेतून बाहेर पडलाय आणि वस्तूत घुसलाय. बहुतेक वेळा पोरीचा बापच लग्न लावून देतो. लग्नाचा खर्च तो स्वतःच उचलतो. कारण, तशी परंपराच निर्माण झाली आहे. ‘लग्न दोघांचं असतं, तेव्हा खर्चही दोघांनी उचलावा,’ असा विचार सार्वत्रिक होत नाहीय. हुंडा दिला काय, दागिने दिले काय, लग्न लावून दिलं काय... सगळ्याचा अर्थ एकच. संस्कार असणाऱ्या विवाहात भांडवलशाही अशी मुक्त खेळत असते...हुंड्यासाठी पैसे जमा करता यावेत म्हणून हजारभर किलोमीटरवरच्या गरिबाला शहराकडं पळायला लावते...रात्रभर जागून चहा विकायला लावते...खरंच त्याचं काय होईल हा एक प्रश्‍नही आमच्या गाडीबरोबरच धावत होता.

Web Title: uttam kamble write article in saptarang