घामाच्या इतिहासात दरवळणारं स्मृतिमंदिर (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

त्यागाचं, चारित्र्याचं आणि लोकसेवेचं एक अत्युच्च उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. ‘माणसाचा, समाजाचा आणि देशाचा विकास फक्त आणि फक्त घामातून म्हणजे कष्टाच्या घामातूनच होतो,’ हा सिद्धान्त भाऊरावांनी खरा करून दाखवला. रयत शिक्षण संस्थेचा पाया घालणाऱ्या भाऊरावांचं स्मृतिमंदिर कुंभोज इथं उभं राहत आहे. ‘रयत’च्या सेवकांच्या खिशाला जबरदस्तीनं कात्री न लावता समाज आणि शासन यांच्या सहभागातून आणि आपल्याकडं असलेल्या घामाच्या खजिन्यातून हे स्मृतिमंदिर उभारण्यात आलं आहे. लवकरच त्याचं उद्‌घाटन होईल आणि महाराष्ट्रातल्या काही सुंदर स्मारकांच्या माळेत हेही स्मारक चमकायला लागेल.

त्यागाचं, चारित्र्याचं आणि लोकसेवेचं एक अत्युच्च उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. ‘माणसाचा, समाजाचा आणि देशाचा विकास फक्त आणि फक्त घामातून म्हणजे कष्टाच्या घामातूनच होतो,’ हा सिद्धान्त भाऊरावांनी खरा करून दाखवला. रयत शिक्षण संस्थेचा पाया घालणाऱ्या भाऊरावांचं स्मृतिमंदिर कुंभोज इथं उभं राहत आहे. ‘रयत’च्या सेवकांच्या खिशाला जबरदस्तीनं कात्री न लावता समाज आणि शासन यांच्या सहभागातून आणि आपल्याकडं असलेल्या घामाच्या खजिन्यातून हे स्मृतिमंदिर उभारण्यात आलं आहे. लवकरच त्याचं उद्‌घाटन होईल आणि महाराष्ट्रातल्या काही सुंदर स्मारकांच्या माळेत हेही स्मारक चमकायला लागेल.

चार नोव्हेंबरला कुंभोज इथल्या ‘बाहुबली गुरुकुला’चा ८३ वा वर्धापनदिन करून शेजारीच उभ्या राहत असलेल्या ‘कर्मवीर भाऊराव पाटील स्मारका’ला भेट देण्याचा बेत आखत होतो. हे गुरुकुल देशातल्या एका श्रेष्ठ गुरुकुलांपैकी एक आणि श्रेष्ठ मुनी समंतभद्र महाराज यांच्या जणू काही शैक्षणिक तपश्‍चर्येतून आकाराला आलेलं आहे. शिक्षण ऑनलाइन होत असल्याच्या काळातही या संस्थेनं धावते-पळते आणि गरीब विद्यार्थी आपल्या गुरुकुलात टिकवून ठेवले आहेत. एकूणच ‘बाहुबली’ या नावानं ओळखला जाणारा हा परिसर कुटुंबासह सहल काढून पाहण्यासारखा आहे. शिक्षणाचा हा डोलारा अहोरात्र कसा फुलत असतो, हेही पाहण्यासारखं आहे. ‘उद्योगपती बापूसाहेब पाटील यांच्या ग्रंथप्रकाशनानंतर आपण भाऊरावांचे स्मृतिमंदिर पाहायला जाऊ या,’ असं रावसाहेब पाटील म्हणाले. मी लागलीच ‘हो’ म्हणालो. समारंभानंतर तातडीनं जेवण घेतलं. पिझ्झा-बर्गरच्या काळातही जैन समाजानं पिवळाधमक झुणका आणि गव्हाची हुग्गी टिकवून ठेवली आहे. या दोन गोष्टी म्हणजे आहारातलं एक वैभवच आहे. अर्थात, त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर पश्‍चिम महाराष्ट्रातच जावं लागेल. ‘व्हडी हुग्गी’ म्हणजे खिरीवर दे दणका असा वाढपी आवाज देतो तेव्हा होणारा आनंद तर अवर्णनीय असतो. कुंभोज सोडताना बापूसाहेबांना शुभेच्छा दिल्या. समुद्राचं खारं पाणी गोड करण्यात त्यांना सार्वत्रिक यश येवो, अशा त्या शुभेच्छा होत्या.
स्मारकाकडं म्हणजे अर्थातच स्मृतिमंदिराकडं जाताना भाऊरावांचं कर्तृत्व सातत्यानं आठवत होतं. कर्तृत्वानं कर्मवीर होणारे लोक आपल्याकडं फारच दुर्मिळ आहेत. त्यांपैकी कर्मवीर भाऊराव पाटील हे एक. शंभर वर्षांपूर्वी शैक्षणिक क्रांती आणि सामाजिक क्रांती घडवण्यासाठी, निरक्षरतेनं कुरूप बनलेला समाज सुरूप करण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून एक तरुण पुढं येतो, १९१९ मध्ये कऱ्हाड तालुक्‍यातल्या काले या गावी ‘रयत शिक्षण संस्थे’ची स्थापना करतो, १९२४ मध्ये एका दलित मुलाला घेऊन वसतिगृहाची स्थापना करतो आणि ‘स्वावलंबी शिक्षण’ हे बोधवाक्‍य घेऊन वडाच्या झाडाप्रमाणे विस्तारत जातो. या तरुणाचं नाव भाऊराव पाटील. खरोखरच असंख्य पारंब्या, असंख्य फांद्या, असंख्य पानं आणि दीर्घायुष्य म्हणजे वडाचं झाड. बोधचिन्हाप्रमाणेच रयत शिक्षण संस्था वाढत गेली. शंभर वर्षांनंतर तिचा विस्तार पाहिला की भाऊरावांचं कार्य एखाद्या दंतकथेप्रमाणं वाटायला लागतं. होय, दंतकथाच. कारण ४१ महाविद्यालयं, ४३९ हायस्कूल, २७ वसतिगृहं, १६० उच्च माध्यमिक विद्यालयं, १७ शेती-महाविद्यालयं, ५ तंत्र-विद्यालयं, ५ इंग्लिश माध्यमाच्या शाळा, ८ डी. एड. महाविद्यालयं, ४५ प्राथमिक व पूर्वप्राथमिक शाळा, ६८ वसतिगृहं या मुला-मुलींसाठी, ८ आश्रमशाळा, ५८ आयटीआय व इतर, एकूण शाखा ६७९. एकूण विद्यार्थी सुमारे साडेचार लाख. सेवक ः १६ हजार ९४८. एवढा भव्य पसारा घेऊन ‘रयत’ देशातली एक मोठी संस्था ठरली. विश्‍वास, गुणवत्ता, संस्कार आणि विस्तार आदी सर्वच बाबतींत मोठी. खरं सांगायचं तर म्हणूनच ती दंतकथा ठरली. लोककथा ठरली. एका ध्येयवेड्या माणसाच्या स्वप्नातून, कष्टातून, घामातून आणि ‘सारा समाज साक्षर करणार’ या ध्यासातून हा सारा चमत्कार घडलाय. बदलत्या काळात नोटांच्या बॅगा घेऊन प्रवेश देणारे शिक्षणसम्राट चौकाचौकात भेटतात; पण कर्मवीरांचं महान कार्य पाहता हे सारे झुरळासारखे, सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे वाटायला लागतात. पैसा नव्हे, तर घाम पाहून भाऊराव विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेमहाराज यांच्या पाठिंब्यातून रयत शिक्षण संस्था वाढत राहिली. १९३३ मध्ये गांधीजींनी पहिली पाचशे रुपयांची ग्रॅंट या संस्थेला दिली आणि त्यानंतर गावंच्या गावं, फाटकी-तुटकी माणसं, शेतकरी असे अनेक घटक मदतीसाठी धावले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी स्वतःला मिळालेले ऐंशी तोळे दागिने तर मोडलेच; शिवाय वसतिगृहाची पोरं जगवण्यासाठी मंगळसूत्रही मोडलं. विशेष म्हणजे, भाऊराव आणि लक्ष्मीबाई या दोघांचा जन्मही कुंभोजमध्येच झालाय आणि याच गावाजवळ पाच एकर जागेत स्मारकाच्या रूपानं एक संस्कारपीठ किंवा घामपीठ उभं राहणार आहे. स्मारकात भाऊराव आणि लक्ष्मीबाईंचा एक पुतळा वगळता बाकी सारी जागा शिक्षणानं व्यापली आहे. पुतळ्याच्या समोरच एक स्मृतिउद्यान उभं राहिलं आहे. त्यात औषधी वनस्पती आहेत. कुणालाही आपल्या नातेवाइकांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये देऊन तिथं झाड लावता येईल. झाडाचं संगोपन स्मृतिमंदिर करणार आहे. खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी-तंत्रज्ञानाचा प्रसार, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, विद्यार्थी-विकास, माहिती व प्रयोगकेंद्र, संस्थेतल्या सेवकांसाठी संस्कार आणि सेवाभाव प्रशिक्षणकेंद्र, परिसराची गरज ओळखून अभ्यासक्रम, महिलांसाठी औद्योगिक प्रशिक्षणकेंद्र, नापासांची शाळा, व्याख्यानमाला आदी अनेक उपक्रम म्हणजे भाऊरावांचं स्मरण असणार आहे. अशा प्रकारचं स्मरणकेंद्रही दुर्मिळच म्हणावं लागेल. या स्मृतिमंदिरासाठी आतापर्यंत अनेकांनी देणग्या दिल्या आहेत. त्या पैशाच्या, कल्पनेच्या आणि सेवांच्याही देणग्या आहेत. निवृत्त प्रा. सुभाष मसुरगे यांनी निवृत्तीनंतर तहहयात इथं मोफत कष्ट करण्याचं ठरवलं आहे. अनेक जण स्वखुशीनं रांगेत आहेत.

भाऊरावांच्या यशाचं रहस्य काय, असा प्रश्‍न नवी पिढी विचारेलही कदाचित. कष्टाचा घाम, त्याग, समाजसेवा, पारदर्शी कारभार आदी काही गुणांवर ही संस्था रुजली आणि वडाप्रमाणेच संस्थेची मुळं खोल आणि दूरवर पसरली. कष्ट आणि ज्ञान याची खूप सुंदर जोड त्यांनी घातली. ‘माणसाचा, समाजाचा आणि देशाचा विकास फक्त आणि फक्त घामातून म्हणजे कष्टाच्या घामातूनच होतो,’ हा सिद्धान्त त्यांनी खरा करून दाखवला. घामात भिजलेल्या आणि सुगंधित झालेल्या अनेक पिढ्या त्यांनी तयार केल्या. सार्वजनिक जीवनात कठोर विश्‍वस्त म्हणून कसं वागता येतं, याचा धडा त्यांनी गांधीजींप्रमाणेच घालून दिला. परदेशात शिक्षणासाठी फक्त एकाच मुलाला संधी देण्याची शक्‍यता निर्माण झाली तेव्हा गांधीजींनी स्वतःच्या मुलाला डावलून दुसऱ्या मुलाला संधी दिली. समाजातल्या शेकडो गरजूंसाठी नोकऱ्या देणाऱ्या भाऊरावांनी आपल्या मुलाला त्यांच्या अनुपस्थितीत दिलेली नोकरी सोडायला लावली. त्यागाचं, चारित्र्याचं आणि लोकसेवेचं एक अत्युच्च उदाहरण म्हणजे भाऊराव होते.
तसं पाहता स्मृतिमंदिराला छोटी जागा आहे. त्यात भाऊरावांनी वापरलेल्या काही वस्तू आहेत. त्यांना मिळालेले काही मान-सन्मान आहेत. तत्त्वज्ञानाचा अर्क वाटावीत अशी काही निवडक पत्रं भिंतीवर लटकली आहेत. काही दुर्मिळ छायाचित्रं आहेत. एवढ्या आटोपशीर; पण महत्त्वाच्या गोष्टींतून भाऊरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेता येतो. ‘मजुरांच्या मुलांसाठी शाळा काढा’, असं एक पत्र भाऊरावांना एक सहकारमहर्षी रत्नाप्पा कुंभार यांनी लिहिलं आहे. ‘लहानपणी बालगुन्हेगार ठरणाऱ्या किंवा कोणत्या तरी कारणांनी अनाथ ठरणाऱ्या, कोर्टाच्या दारात राहून बालसुधारालयात जाणाऱ्या सगळ्या मुलांना माझ्याकडं पाठवा. मी त्यांना शिकवेन. माणूस म्हणून घडवेन,’ असं एक पत्र प्रमिलाताई गाडगीळ यांना लिहिलेलं आहे. ‘रयत’च्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून भाऊरावांना एक मोटार भेट दिली होती. तिचा फोटोही संग्रहालयात आहे; पण ‘या मोटारीचा खर्च संस्थेनं करू नये, तसंच हा खर्च मी स्वतःही करू शकत नाही; सबब मोटार परत घ्यावी...मी आजारी असतो...शारीरिक त्रास सहन होईल; पण हा मानसिक त्रास मला कदापि सहन होणार नाही,’ असं एक पत्र भिंतीवर आहे. आजचा काळ नजरेसमोर आणून हे पत्र वाचायला हवं. सार्वजनिक संस्थांचे, सहकारी संस्थांचे आणि शासनाचे पदाधिकारी व अधिकारी शासकीय वाहनांचा उपयोग स्वतःच्या कुटुंबासाठी कसा खुलेआम करतात,
अधिकाऱ्यांच्या बच्चेकंपनीला शाळेला पोचवण्यासाठी कोणत्या गाड्या असतात आणि मंत्र्यांचे गणगोत कुणाच्या गाड्यांमधून कसे फिरतात, हेही नजरेसमोर आणलं की भाऊरावांनी म्हणजे अण्णांनी केलेल्या त्यागाचं आणि कमावलेल्या चारित्र्याचं महत्त्व कळायला लागतं. त्यांनी उभा केलेला विधायक कार्याचा डोंगर दंतकथा कसा वाटायला लागतो, याचं कोडं उलगडायला लागते. मोतीलाल बालमुकुंद मुथा यांनी भाऊरावांना जागा घेण्यासाठी तीनशे रुपये दिले होते. भाऊरावांनी जागा घेतली. पुन्हा ती घरगुती कारणासाठी विकली. पैसे खर्च केले. पुढं काही दिवसांनी तीनशे रुपये २६ जानेवारी १९५४ या मंगलदिनी परत करण्याचा निर्णय घेतला. २६ जानेवारीला त्यांनी मंगलदिन का म्हटलं आहे, हे वेगळं कथन करण्याची आवश्‍यकता नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ‘आप्पासाहेब या आपल्या मुलानं रयत शिक्षण संस्थेतली नोकरी सोडून स्वावलंबी व्हावं,’ असा सल्ला देणारं पत्रही इथं आहे. हे पत्र म्हणजे एखादा माणूस संस्थेसाठी, समाजासाठी, चारित्र्यासाठी त्यागाचं कोणतं टोक गाठू शकतो, याचा पुरावा आहे. अशा अनेक पत्रांनी एक दालन भरलेलं आहे. लक्ष्मीबाई टिळकांची जशी ‘स्मृतिचित्रं’ तशी भाऊरावांची ही संस्कारपत्रं, विचारपत्रं, तत्त्वज्ञानपत्रं आणि म्हटलंच तर त्यागपत्रं आहेत. स्मृतिमंदिरात सहज एक चक्कर टाकली, की आपण अंधारातून उजेडात गेल्यासारखं वाटतं. आपलं उत्तरायण सुरू होतं. एका मोठ्या उत्तुंग कालखंडाच्या सावलीत गेल्यासारखं वाटतं. ज्याला जमेल त्यानं हा अनुभव घ्यायलाच हवा.

रयत शिक्षण संस्थेनं सेवकांच्या खिशाला जबरदस्तीनं कात्री न लावता समाज आणि शासन यांच्या सहभागातून आणि आपल्याकडं असलेल्या घामाच्या खजिन्यातून स्मृतिमंदिर तयार केलं आहे. लवकरच त्याचं उद्‌घाटन होईल आणि महाराष्ट्रातल्या काही सुंदर स्मारकांच्या माळेत हेही स्मारक चमकायला लागेल. ‘कष्टातून आणि घामातूनच स्वतःला आणि समाजाला घडवता येतं,’ असा संदेश हे स्मारक देत राहील. स्मारकातून बाहेर पडायला पाय तयार नव्हते. तिथले सेवक मोठ्या प्रेमानं सारं काही दाखवत होते. झाडापासून इमारतीपर्यंत, मातीपासून पुतळ्यापर्यंत आणि इतिहासापासून वर्तमानापर्यंत...

Web Title: uttam kamble write article in saptarang