लग्न करायचंय, खड्डा खोदायचं काम द्या! (उत्तम कांबळे)

लग्न करायचंय, खड्डा खोदायचं काम द्या! (उत्तम कांबळे)

परिस्थिती जशी आहे, तशीच समोरच्यापुढं मांडली तर काम मार्गी लागतंच असं नाही, असा अनुभव अनेकांना येतो. मग काही ‘अतिहुशार’ माणसं वेगळे मार्ग वापरून आपण जे आहोत, जसे आहोत, त्याविषयीची वस्तुस्थिती झाकून ठेवतात आणि आहे त्या स्थितीपेक्षा ‘भारी’ असल्याचं म्हणा किंवा त्या वेळच्या परिस्थितीची जी काही गरज असेल तसं भासवून आपलं काम मार्गी लावून घेतात. असं करून ते स्वतःची तर फसवणूक करत असतातच; पण समोरच्याचीही ती घोर फसवणूक असते. लग्न जमण्याच्या-जमविण्याच्या क्षेत्रात असा अनुभव अनेकांना येणं हे काही नवीन नाही. यावर उपाय काय?

दहा नोव्हेंबरच्या पहाटे पाचला ठरल्याप्रमाणे आलोक फिरायला जाण्यासाठी शिवाजी विद्यापीठात पोचला. याही वेळेला चालणाऱ्यांची प्रचंड गर्दी. विद्यापीठाबाहेर दोन्ही बाजूंना वाहनांची भली मोठी रांग. याही वेळेला स्वागतासाठी मोर होते आणि दिवसाचा प्रारंभ सुखद व्हावा म्हणून की काय केकावत होते. कोकिळाचं गुंजन होतं. जागे होऊ पाहणाऱ्या अन्य पक्ष्यांचे आवाजही होते. मागच्या वेळेला मी आलो तेव्हा पाणी शुद्ध करण्याच्या प्रकल्पाला इथं सुरवात झाली होती. बाहेरून बंद केलेल्या बाटल्यांतून पाणी विकत घेण्याऐवजी आपणच तसं पाणी बनवावं, मोठ्या प्रमाणात बनवावं म्हणून हा प्रकल्प सुरू झाला होता. पहाटेच तो सुरू होता. शुद्ध केलेलं पाणी मोठमोठ्या जारांमध्ये भरलं जात होतं. वेगवेगळ्या विभागांत त्यांच्या मागणीनुसार ते पोचवलं जाणार होतं. एकदम शुद्ध पाणी. बाजारात विकल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा कितीतरी सरस आणि विद्यापीठाची लाखो रुपयांची बचत करणारं.

फिरून चहासाठी म्हणून गेस्ट हाउसला आलो. तिथं सहाय्यक रजिस्ट्रार शिंदे आमची वाट पाहत होते. विद्यापीठात बिगारी काम मागण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा विषय बोलता बोलता शिंदे यांनी काढला. हा तरुण कोल्हापुरातच चांगल्या स्थितीत असलेल्या खासगी संस्थेत नोकरी करत होता. पगारही चांगला होता. स्थैर्यही होतं. या तरुणानं तिथं विश्‍वासार्हता सिद्ध करून चांगली प्रतिमा तयार केली होती. शिंदे या दुकानात अधूनमधून जायचे. स्वाभाविकच दोघांची ओळख झाली होती. पुढं काही दिवसांनी विद्यापीठात कंत्राटावर बिगाऱ्यांची म्हणजे खड्डा खोदणाऱ्या मजुरांची भरती सुरू झाली. मुलाखती सुरू झाल्या, तर हा तरुण मुलाखतीसाठी शिंदे यांच्यासमोर हजर झाला. एक तर तो पदवीधर होता. खासगीत का असेना; पण चांगल्या नोकरीत होता. चांगला पगारही होता. असं सगळं असताना बिगारी म्हणजे अंगमेहनतीच्या कामासाठीचा आणि तोही कंत्राटदाराचा मजूर होण्यासाठी का आला, हा प्रश्‍न शिंदे यांच्यासमोर निर्माण झाला. मुलाखत घेताना त्यांनी तो उपस्थितही केला. चांगली नोकरी सोडून बिगारी होण्यासाठी कशाला येतोयस, या प्रश्‍नावर त्यानं दिलेलं उत्तर मोठं चमत्कारिक, चक्रावून टाकणारं आणि एक सामाजिक प्रश्‍न उपस्थित करणारं होतं.

तर हा तरुण म्हणाला ः ‘‘मला ठाऊक आहे सगळं. व्हाइट-कॉलर जॉब सोडून खड्डे खोदायला यायचं आहे. हे कामही फार दिवस चालणार नाहीय. लवकर संपेल ते. शिवाय पगाराची कल्पनाही आहेच मला; पण तरीही हे काम मला स्वीकारायचं आहे. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. काहीही करून विद्यापीठातलं हे मजुरीचं का असेना; पण मला काम द्या.’’

बिगारी होण्यानं आयुष्याचा प्रश्न कसा काय सुटणार, असा एक नवा प्रश्‍न मुलाखत घेणाऱ्यासमोर निर्माण झाला. त्याचं उत्तरही तरुणानं देऊन टाकलं. तो म्हणाला ः ‘‘मला लग्न करायचं आहे. घरच्यांचाही आग्रह आहे. मुली पाहायला सुरवात केलीय. खूप मुली पाहिल्या. मुली पसंतही होत्या. अडचण एकच आहे, की मी पाहिलेल्या कोणत्याही मुलीला खासगीत काम करणारा नवरा नको आहे. सरकारी नोकरीतला पाहिजे. मला सरकारी नोकरी नाही, हे कळलं की स्थळ तुटतं. खूप मोठी अडचण झालीय. सरकारी नोकरी काही मिळत नाही आणि लग्न काही होत नाही. विद्यापीठ सरकारीच आहे. तिथं कसलंही काम मिळालं तरी सरकारी क्षेत्रातच ते असणार आहे. जोवर काम असेल तेवढ्यात लग्न करून मोकळा होईन. पुढचं पुढं बघता येईल; पण पाच-सहा महिने काम मिळालं तरी तेवढ्यात हा प्रश्‍न निपटता येईल.’’

मुलाखत घेणारे सगळेच आश्‍चर्यचकित झाले. लग्नासाठी या तरुणानं आखलेली व्यूहरचना कुणालाही पटणारी नव्हती. शिवाय खड्डे खोदण्याचं कामही त्याला जमणार नव्हतं. मुलाखत घेऊन गेलेला तरुण जुन्याच संस्थेत काम करतोय. त्याच्या मालकानं त्याला पुन्हा नेमताना किंवा त्याची नोकरी कायम ठेवताना खळखळ केली नाही, हेही विशेषच म्हणावं लागेल.

एकूणच, समाजात सरकारी नोकरी करणाऱ्या नवऱ्याचं महत्त्व अजून काही कमी झालेलं नाही. सरकारी नोकरालाच समाजात प्रतिष्ठा असते, ही एक भ्रामक कल्पना आहे. प्रतिष्ठा ही कोणत्या नोकरीवर अवलंबून नसते, तर ती स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. निपाणीत एकजण पिठाची गिरणी चालवत लेखक बनला होता. चंद्रपूरमध्ये बॅंकेत वॉचमन असणारा मोठा कार्यकर्ता आहे. उरुळीकांचनमध्ये शिपाई असणारा पारध्याचा पोरगा मोठा लेखक बनू पाहत आहे. नाशिकमध्ये एक पोस्टमन मोठा प्रतिष्ठित नागरिक आहे. सांगलीत पेढीवर काम करणारा असाच लोकप्रिय आहे. नांदगावात वीटभट्टीवरचा मजूर नगराध्यक्ष झाला होता, तर चित्रपटगृहात बॅटरीवाला असणारा आमदार झाला होता. सबब, माणूस कर्तृत्ववान आहे की नाही हे महत्त्वाचं. शेती करणाऱ्या तरुणांची लग्नं होतानाही अशाच अडचणी येतात. लग्न कुणी कुणाशी करायचं हा व्यक्तिगत प्रश्न आहे, ज्याच्या-त्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे; पण या सगळ्यातून काही प्रश्न तयार होतात. जसा या तरुणाचा प्रश्न तयार झालाय.
हे लिहीत असतानाच आणखी एक आठवलं. अवतारसिंगनं एक अशीच आठवण सांगितली. काही वर्षांपूर्वी सातपूरमध्ये एक तरुण रस्त्यावर छत्री उलटी करून तीत रुमाल, नॅपकिन ठेवून ते विकायचा. पोटापाण्यापुरतं कमावायचा; पण या व्यवसायामुळं त्याला लग्नासाठी मुली मिळेनात. वय वाढत बत्तिशीवर गेलं. शेवटी त्यानं एक कल्पना लढवली. एका मोठ्या कंपनीत मशिन पुसायचं, झाडू मारायचं काम त्याला मिळालं. ‘मी आता मोठ्या कंपनीत आहे,’ असं सांगून त्यानं स्वतःचं लग्न जमवलं. लग्नानंतर आठच दिवसांनी तो पुन्हा सातपूरमध्ये छत्री उलटी करून रुमाल विकायला लागला.

नोकरदार पोरांनीही अलीकडं नोकरी करणाऱ्या, उच्चविद्याविभूषित असणाऱ्या मुलींनाच पत्नी म्हणून प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे. हाही त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. ‘अमुक व्यक्तीनं अमुक व्यक्तीशीच लग्न करावं,’ असा काही कुठं कुणाला कायदा करता येत नाही; पण समाजात तयार झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लबाड मार्गाचा अवलंब करणारेही वाढत आहेत. माझ्या आणखी एका मित्रानं आपली मुलगी मुंबईतल्या पोस्ट खात्यात नोकरी करणाऱ्याला दिली. लग्नापूर्वी या मुलाची माहितीही घेतली. सगळ्यांनी सांगितलं, की मुलगा पोस्टातच आहे. सरकारी जावई मिळणार या कल्पनेनं गावाकडचा हा निरक्षर मित्र प्रचंड आनंदी झाला होता. भावी जावयाची खोलवर चौकशी त्यानं केली नाही. लग्न आपल्या गावातच लावून दिलं. निरक्षर बापाच्या अल्पशिक्षित गुणी मुलीला सरकारी जावई मिळाला म्हणून सगळं गावच खूश होतं. लग्नानंतर दोनच महिन्यांनी जावयाची नोकरी गेली. कारण, तो हंगामी नोकरीत होता. दिवाळीच्या काळात कामाचा ताण वाढतो म्हणून त्याला तीन-चार महिन्यांसाठी रोजंदारीवर नेमलं गेलं होतं. सासऱ्यावर, पत्नीवर आकाशच कोसळलं होतं. कुणीतरी म्हणालं ः ‘‘जावयाविरुद्ध पोलिसांत जा, कोर्टात जा;’’ पण मित्र म्हणाला ः ‘‘जाऊन काय सांगणार? शेवटी, नशिबाचा खेळ कुणाला चुकलाय का?’’ मुलीचं वाईट व्हायला नको म्हणून झोपडपट्टीतल्या जावयाला त्यानं गावाकडं बोलावून घेतलं. राहायला जागा दिली. जावई आणि त्याची पत्नी दोघंही शेतमजुरीसाठी जातात. पोस्टात बिगाऱ्याचं काम करताना त्याला रोज तीनशे रुपये मिळायचे. गावाकडं द्राक्षाच्या मळ्यावर चारशे रुपये मिळतात. पत्नी व तो गेला की तिलाही तेवढेच. मित्रानं एक धडा घेतला. ‘स्थळ ठरवताना, सरकारी जावई शोधताना काळजी घेत जा,’ असा उपदेश करत तो फिरतोय. या गोष्टीला आता त्यानं ‘सामाजिक कार्य’ असं नाव दिलं आहे.

आपली विवाहसंस्था सध्या एका नाजूक अवस्थेतून जात आहे. ती भविष्यात कोणतं रूप घेणार आणि तिचे काय परिणाम होणार, याविषयी भाकीत करता येऊ नये, अशी स्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com