मन उधाण वाऱ्याचे... 

मन उधाण वाऱ्याचे... 

नमस्कार, सर्व वाचकमित्रांना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 
या नव्या वर्षी या पाक्षिक सदरातून तुमच्याशी गप्पा मारायला मिळणार आहेत ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. होय, गप्पाच म्हणू या. कारण, लॉकडाऊनच्या काळात आपुलकीच्या माणसांपासून दूर राहून गप्पांचा फड जमवण्याची जी काही उणीव भासली आहे, ती मिळेल त्या माध्यमातून या वर्षात भरून काढायचीच हाच माझा एकमेव संकल्प आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

त्यातून दुधात केशर म्हणावं तसा सदराचा विषयही माझ्या, अं ह...माझ्याच नव्हे तर, आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व तो म्हणजे मराठी गाणी. मराठी माणूस खाणं, गाणं आणि स्मरणरंजन यांत मनापासून रमतो.स्मरणरंजनात रमण्याच्या या वृत्तीमुळेच कदाचित ‘आमच्या काळी काय सांगू म्हाराजा...’ वगैरे आलं असणार.

नवीन मराठी गाण्यांत ‘ती बात’ नाही असंही कधी कधी पुटपुटलं जात असावं तेही याच कारणानं. व्यक्तिश: माझं मत थोडंसं वेगळं आहे, म्हणूनच एक गीतकार म्हणून नव्हे, मराठी सिनेमा-इंडस्ट्रीचा प्रचंड अभिमान बाळगणारा एक छोटा कलाकार म्हणूनही नव्हे, तर एकूणच संगीतावर, गाण्यांवर, त्याहून जास्त मराठी गाण्यांवर आणि त्याहूनही जास्त त्यातल्या शब्दांवर नितांत प्रेम करणारा सामान्य श्रोता म्हणून मी या सदरातून आपल्यासमवेत उजळणी करणार आहे सन २००० नंतरच्या उत्तमोत्तम गाण्यांची, ‘आमच्या काळ’च्या गाण्यांची नव्हे, तर ‘आपल्या काळ’च्या गाण्यांची. त्या गाण्यांच्या चालींचं, गायकांच्या गायकीचं अप्रूप तर आहेच; पण आपण त्या गाण्यांचे मनोहारी रंग गीतलेखनाच्या लोलकातून पाहणार आहोत. आपल्यातल्या रसज्ञ श्रोत्याला, वाचकाला सविनय प्रणाम करून सुरुवात करतो...आशीर्वाद असू द्या!

एखादं गाणं आपल्याला का आवडतं याचं अचूक कारण सांगता येईलच असं नाही. आपण म्हणताना नेहमी ‘ते गाणं कमाल आहे, सॉल्लिड आहे’ असंच म्हणतो. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘लूपवालं गाणं आहे यार’ असं काहीसं. थोडासा विचार केला तर अमुक एक गाणं आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुणाला ती चाल पटकन गळ्यावर चढणारी वाटते, कुणाला ते गाणं आवडत्या कलाकारांवर चित्रित झालंय त्यामुळे भावतं, कुणाला ते गाणं कुणासोबत पहिल्यांदा ऐकलं किंवा ते गाणं ऐकल्या ऐकल्या कुणाची आठवण आली त्यामुळे आपलंसं वाटतं. कधी त्या गाण्याचा इंट्रो-पीसच इतका सुंदर वाजतो की माणूस नकळत खेचला जातो आणि कधी त्या गाण्याची पहिली ओळच इतकी भिडणारी असते, इतकी आतून आलेली असते की ते गाणं जणू काही आपल्यासाठीच लिहिलं गेलं आहे याची मनाला खूण पटते. ही खूण पटल्यानंतर मात्र जगात कुणी कुणी उरत नाही. आपण, आपलं मन आणि आपल्या मनाचं ते गाणं!

मन उधाण वाऱ्याचे...

माझा मित्र गुरू ठाकूर याच्या लेखणीतून उतरलेलं नितांतसुंदर गीत म्हणजे ‘मन उधाण वाऱ्याचे...’ 

कवी आणि गीतकार यांच्यात काय फरक आहे, असा प्रश्न नेहमीच केला जातो आणि त्याला उत्तर एकच आहे व ते म्हणजे ‘या दोघांमध्ये अजिबात फरक नाही किंवा असता कामाच नये.’ सिनेमाच्या प्रसंगानुरूप गाणं लिहितानाही त्यात काव्य असल्याशिवाय ते शब्द सहसा भिडतच नाहीत. कथेला अनुसरून तर लिहायचंच; पण त्याच वेळी कथेच्या कक्षेच्या बाहेर, कुठल्या तरी अनाम प्रतलावरदेखील ते गीत श्रोत्याला, वाचकाला तीच जिवंत अनुभूती देईल अशी तारेवरची कसरत गीतकार करत असतो. त्यातून हे तर ‘मनाबद्दलचं’ गाणं! कितीही नाही म्हटलं तरी यात फिलॉसॉफी डोकावण्याची शक्यता...अशा प्रकारची गाणी लिहिताना नकळत उपदेशाचे डोस ठासून भरलेल्या ओळी येण्याचा धोका असतोच आणि उपदेश आला रे आला की सुजाण रसिक गाण्यातून लगेच बाजूला होतो. ‘तू मला काही शिकवायला जाऊ नकोस’ या विचारात ‘तू आणि मी’ हे द्वैत एकदा का प्रकटलं की गाण्याशी तद्रूप होणं बाजूला पडतं. अर्थात्, इतका सगळा विचार करून कुणी गीत लिहायला बसत नाही; पण सिद्धहस्त लेखणी कलाकारापेक्षा त्याच्यातल्या माणसावर प्रसन्न असते. ती त्याचं अंतर्मन जाणूनच झरते, अगदी मनाबद्दल व्यक्त होतानाही.

‘मन’ या विषयावर उत्तमोत्तम कविता, गाणी आपण ऐकली, वाचली आहेत. ‘मन वढाय वढाय’, ‘मन मनास उमगत नाही’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘माझिया मना जरा थांब ना...’ अशी एक ना दोन, शेकडो दर्जेदार उदाहरणं.

एकीकडे पूर्वसुरींच्या हातून घडलेल्या बावनकशी दागिन्यांचं ‘चांगल्या अर्थी’ ओझं, तर दुसरीकडे त्या विषयावर लिहायची अदम्य ऊर्मी...ही दुहेरी जबाबदारी सांभाळून आणि तरीही माध्यमाचं बंधन स्वीकारून उन्मुक्त व्यक्त होणं ही खायची बाब नाही. 

अशा वेळी गीतकार - स्वत:तला प्रोफेशनल कलाकार बाजूला ठेवून - आतल्या माणसाकडेच वळणार यात संशय नाही. ‘इतरांनी त्यांच्या मनाबद्दल सांगितलं, आता मी माझं सांगतो’ हीच ती जन्मप्रामाणिक पाऊलवाट जी लीलया हजारो, लाखो मनांना  जाऊन मिळते. 

कसं आहे गुरूचं मन?
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते

म्हणाल तर हा स्वानुभव, म्हणाल तर हे प्रत्येकाचं स्वत:बद्दलचं मत. यातल्या अनेक ओळींत, सहज न जाणवणारा सुंदर विरोधाभास आहे. नात्यांच्या ‘बंधनात’ मोहरणारं हे मन आहे. एकाच श्वासात कधी उधाण अभिव्यक्त होणारं आहे, तर कधी गूज जपणारं आहे. बेभान, अनावर आहे. पुढच्याच वळणावर गहिवर आहे. गंमत म्हणजे ‘स्वगत’ लिहिल्यासारख्या या गीतात ‘अरेच्चा, हे असं कसं?’ हे कुतूहल मुद्दाम असं व्यक्त  केलेलं नाही.

कारण, शेवटी हा प्रश्न तरी विचारायचा कुणाला? मनालाच!
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधि एकटेच झुरते
सावरते, बावरते, जडते, अडखळते का पडते?
कधि आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होउन पाण्यावरती फिरते
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

प्राणांची पर्वा न करता एखाद्या योद्ध्यासारखं हे मन स्वत:ला कधी स्वप्नांच्या चक्रव्यूहात झोकून् देतं, तर कधी युद्धविरामानंतर आपल्याच राहुटीत (अंतर्मनात?) जखमी होऊन, खर्ची पडलेल्या स्वप्नांचा विचार करत एकटंच झुरतं. स्वत:च बावरतं, स्वत:च सावरतं, अडखळतं, पडतं; पण पुनःपुन्हा जडतं. मनाची ही लवचीकता, ही विजिगीषु वृत्ती दाखवताना गुरूनं कडव्याच्या अखेरीस कंस पूर्ण करत मन पुन्हा आभाळाकडे नेलं आहे. जिथे चाल उंचावर जाते, तिथं विचारपण जायला हवेत हे भान गीतकाराला असल्याची ही निजखूण. 

प्रत्येक गाण्यात गीतकारामधला ‘कवी’ अनेक ठिकाणी स्वत:ची सही करत असतो, म्हणतात. खूप वेळा गाणं वरवर ऐकताना आपलं ‘मन’ त्याची नोंद घ्यायला विसरतं; पण थोडंसं लक्ष दिलं तर गीतकाराची ती ‘सही’ आपल्याला दिसतेच दिसते. माझ्याकडे गुरूची ‘सही’ आहे.

रुणझुणते, गुणगुणते, कधि गुंतते, हरवते
कधि गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते?
कधि मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते?
भाबडे तरी भासांच्या मागुन पळते

रुणझुण, गुणगुण असे शब्द अक्षरांची वारंवारिता वापरून एक आनंददायी नाद निर्माण करण्यासाठी गीतांत अनेकदा योजिले जातात; पण गीतकारामधला कवी त्या योजनेच्या पल्याड जातो. मी वर म्हटल्याप्रमाणे, गुरूनं सर्वत्र एक सुंदर विरोधाभास अधोरेखित केला आहे. रुणझुणणं हे नेणिवेतलं, तर गुणगुणणं हे जाणिवेतलं. ‘मन’ हा गाण्याचा कर्ता ठेवून अज्ञाताचा ठाव घेतानाच गुरूनं ‘डोळ्यांच्या डोहाचा’, ‘मोहाच्या क्षणांचा’ उल्लेख करत 

आपल्या-तुपल्यासारख्या सामान्य माणसांचं अंतरंगही कवेत घेतलं आहे. बरेचदा असं गाणं वृत्तान्तात्मक होण्याची दाट शक्यता असते. अशा गाण्यांची फलश्रुती अवलंबून असते ती शेवटी गीतकाराचं ‘म्हणणं’ काय आहे यावर. म्हणूनच मनाच्या सर्व लहरींचा मागोवा घेतल्यानंतर जेव्हा ‘जाणतं असूनही शेवटी भाबडंच’ हे वर्तुळ पूर्ण होतं तेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येक मनाला उधाण येतंच यात नवल नाही. ‘हे गाणं माझं आहे’ आणि ‘हे माझं गाणं आहे’ या दोन ओळींमध्ये फार मोठं अंतर आहे. हे अंतर त्याच्याही नकळत पार करणाऱ्या गीतकाराची ही कमाल आहे.

अर्थातच अजय-अतुल यांचं संगीत आणि गायक शंकर महादेवन यांनी चढवलेला कळस निर्विवादच आहे; पण ती वीण उलगडण्याचा प्रयत्न करणं ही माझी प्राज्ञाच नाही आणि हे सदर गीतकारांना वाहिलेलं आहे. या गाण्याबद्दल मी गुरूला फोन केला तेव्हा तो म्हणाला : ‘‘सिनेमासाठी लिहिलेलं हे पहिलंच गाणं, ज्यानं मला गीतकार म्हणून ओळख दिली. मी गाणी लिहीन, असं मला कधी वाटलंही नव्हतं.’’

खरंय! अभिनय, संवादलेखन अशा अनेक क्षेत्रांत फकिरी करत असताना अचानक एखाद्या वेगळ्याच दिशेनं अलगद हात पकडला आणि मराठी गीतांच्या सोनेरी क्षितिजाकडे एक अस्सल, मनस्वी वाटचाल सुरू झाली. पहिलंच गाणं लिहिलं आणि काय लिहिलंय यार! ‘मन उधाण वाऱ्याचे...’
माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर
कर का मनका डार दे, मन का मनका फेर। 
- संत कबीर
(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)

(वाचकहो, तुमचे अभिप्राय जरूर कळवा आणि सन २००० नंतरच्या अमुक एका गाण्याबद्दल लिहिलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर मेलवर, सोशल मीडियाच्या माझ्या अकाउंटवर हक्कानं सांगा...
 Fb. : @vaibhavjoshiofficial
 Insta. : @vaibhavjosheeofficial

वैभव जोशी
Vaibhav.joshee@writer.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com