esakal | आभास हा...

बोलून बातमी शोधा

Ashwini Shende
आभास हा...
sakal_logo
By
वैभव जोशी Vaibhav.joshee@writer.com

‘तुला काय वाटतं, तू कसं लिहितोस?’’ पार्ल्याच्या ‘बझ इन’ स्टुडिओत तिनं माझ्यावर डोळे रोखत विचारलं.

‘मला वाटतं, मी ‘कसंबसं’ लिहितो,’’ मी काहीतरी जोक मारायचा प्रयत्न केला.

शांतता.

‘मला विचारणार नाहीस, मी कसं लिहिते?’’ पुन्हा थेट सवाल.

‘कसं लिहितेस तू?’’ हताश मी.

आणि मानेला झटका देऊन, केसांतून हात फिरवत, पुन्हा डोळे रोखत उत्तर आलं : ‘‘मी ना? मी ‘फ्रेश’ लिहिते!’’

अश्विनी शेंडे-बागवाडकर. साधारणपणे ८-१० वर्षांपूर्वीचा हा संवाद. मला निरुत्तर करणारा. गीतलेखनाला ‘फ्रेश’ असं विशेषण असू शकतं हे तोपर्यंत मला माहीतही नव्हतं.

‘हे म्हणजे ‘मी ‘देखणं लोणचं’ किंवा ‘सुरीली फिश करी’ बनवते’ असं म्हटल्यासारखं झालं,’’ मी स्वत:शीच पुटपुटल्याचं मला आठवतंय. मात्र, त्यानंतर जेव्हा जेव्हा मी तिची गाणी ऐकली तेव्हा तेव्हा मला ते ‘फ्रेश’ आठवत राहिलं हे खरं. त्यातलंच एक, अश्विनीच्या आयुष्यातलं पहिलंवहिलं गाणं ‘आभास हा...’!

कधी दूर दूर, कधी तू समोर,

मन हरवते आज का

का हे कसे होते असे ही आस लागे जीवा

कसा सावरू मी, आवरू गं मी स्वत:

दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा

छळतो तुला, छळतो मला

आभास हा, आभास हा...

प्रेम आहे की नाही या सीमारेषेवरची हजारो गाणी आजवर येऊन गेली आहेत. त्यामुळे असं गाणं लिहिताना गीतकाराला अनवट वाटेनं जाण्याचा प्रचंड मोह होऊ शकतो. आजवर कधीच न आलेली एखादी कल्पना आपण आपल्या गाण्यातून चितारावी अशी ऊर्मी दाटून येऊ शकते आणि इथंच ते गाणं कमर्शियल सिनेमाचं गाणं होता होता राहून जाऊ शकतं.

सामान्य रसिकश्रोत्यासाठी ते कारण नसताना गूढ होऊ शकतं. म्हणूनच हा मोह, हे दडपण सरळ सरळ झुगारून अश्विनी जेव्हा सिनेमाच्या कथेला आणि प्रसंगाला बांधील राहते तेव्हा कौतुक वाटतं.

आयुष्यातलं लिहिलं जाणारं पहिलं गाणं, त्यातून मुखड्याची चाल आधीच तयार, त्यातून मुखड्याच्या पहिल्या चारही ओळींची चाल प्रश्नार्थक आणि शेवटी त्याचं उत्तर असं संगीतकार नीलेश मोहरीरनं घातलेलं अवघड कोडं. अशा क्षणी फार आव आणून लिहायला गेली असती तर अश्विनी कदाचित फसली असती; पण तिच्या आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं तिनं भावनांशी प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारला आणि या युगुलगीताच्या निमित्तानं एक सुरेल संवादाचा नजराणा पेश झाला.

क्षणात सारे उधाण वारे झुळुक होऊन जाती

कधी दूर तूही, कधी जवळ वाटे,

पण काहीच ना ये हाती

‘उधाण वारे झुळुक होऊन जाती’ ही मला या गाण्यातली सर्वात जास्त आवडलेली ओळ. सहसा प्रेमाचा प्रवास हा ‘कळीचं फूल होणं’, ‘तरंगाची लाट होणं’, ‘वाऱ्याचं वादळ होणं’ असा पुढं पुढं जाणारा मांडला जातो; पण म्हटलं तर आश्वासक आणि म्हटलं तर आभासी प्रेम अधोरेखित करताना अश्विनी उधाण वाऱ्याची झुळुक करते आणि दुसऱ्या ओळीत त्या कल्पनेला आणखी पूर्णत्व देताना आपल्या समोर वाळू निसटलेली रिती ओंजळ धरते.

मी अशीच हासते, उगीच लाजते,

पुन्हा तुला आठवते

मग मिटून डोळे तुला पाहते,

तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा

दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा

छळतो तुला, छळतो मला

काही ओळी जशा केवळ गायिकेच्या ओठी शोभतात तशा स्त्री-गीतकाराच्याच लेखणीला शोभतात. (जाता जाता : महिला-कवींना जसं ‘कवयित्री’ असं सुंदर, खास त्यांचं असं संबोधन आहे, तसं महिला-गीतकारांसाठीही असायला हवं). असंच हासणं, विनाकारण लाजणं, डोळे मिटून प्रियकराला पाहणं आणि त्याच्यासाठी सजणं हे इतकं स्त्रीसुलभ, सहजसोप्पं आणि प्रामाणिक आहे की, मला नाही वाटत, कुठल्या पुरुष-गीतकाराला हे सुचलं असतं! आणि सुचलं असतं तरी शोभलं असतं की नाही कोण जाणे!

मनात माझ्या हजार शंका,

तुला मी जाणू कसा रे

तू असाच आहेस, तसाच नाहीस,

आहेस खरा कसा रे

तू इथेच बस ना, हळूच हस ना,

अशीच हवी मला तू

पण माहीत नाही मलाही,

अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे, नवी वाटे ही हवा

दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा

छळतो तुला, छळतो मला

मुखड्याची चाल नीलेशनं आधी दिली होती; पण गाण्याची कडवी लिहिताना शब्द आधी लिहिले गेले. यासाठी गीतकाराला संगीताचा कान असावा लागतो. मुखड्यातला ताल आपल्यात रुजवून, भिनवून घ्यावा लागतो. हे सगळं अश्विनीकडे होतं म्हणूनच पहिल्या गाण्यापासूनच तिचं नीलेशशी अप्रतिम ट्यूनिंग जुळलं आणि ‘यंदा कर्तव्य आहे’ या सिनेमातून ‘आभास हा..’ हे गाणं आपल्या भेटीला आलं. राहुल वैद्य आणि वैशालीचा आवाज, विशेषत: मुखड्यात वैशालीची एंट्री हा माझ्यासाठी गाण्याचा आणखी एक ‘हाय पॉइंट’ आहे.

मराठी गाण्यांची भाषा आणि बोली भाषा यांत खूप अंतर आहे असं आपण नेहमीच म्हणतो. आपण जसं बोलतो तशी गाणी लिहिली गेली (आणि त्यातही काही सुंदर कविकल्पना जपल्या गेल्या) तर लोकांना ती आणखी जवळची वाटू शकतात हा एक वेगळा आणि चांगल्या चर्चेचा मुद्दा आहे. मात्र, गद्य-पद्यच्या सीमारेषेवर असलेली ‘तू इथेच बस ना, हळूच हस ना’सारखी ओळ या गोड गाण्यात, पाण्यात साखर विरघळावी, तशी विरघळून जाते हे खरं!

लेखातल्या गाण्याचे मूळ शब्द हे शक्यतो गीतकाराकडूनच मागवायचे या नियमानुसार मी अश्विनीला फोन केला तर ती म्हणाली :

‘तू या गाण्यावर लिहिणार आहेस?!’

‘हो’

‘का??’

‘कारण, मला ते गाणं आजही ‘फ्रेश’ वाटतं!’

चला, ऐकू या!

(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)