esakal | जीव रंगला...

बोलून बातमी शोधा

‘जोगवा’मध्ये मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये. }

गोष्टी गाण्यांच्या
सध्या दरवर्षी मराठी सिनेसंगीतात साधारणतः तीनशेहून अधिक गाणी येतात. त्यात सर्वांत मोठा वाटा असतो तो प्रेमगीतांचा. गेली काही वर्षं एका पुरस्कार समितीत मी परीक्षक म्हणून काम बघत असल्यानं ही सर्वच गाणी निगुतीनं ऐकली जातात.

जीव रंगला...
sakal_logo
By
वैभव जोशी Vaibhav.joshee@gmail.com

सध्या दरवर्षी मराठी सिनेसंगीतात साधारणतः तीनशेहून अधिक गाणी येतात. त्यात सर्वांत मोठा वाटा असतो तो प्रेमगीतांचा. गेली काही वर्षं एका पुरस्कार समितीत मी परीक्षक म्हणून काम बघत असल्यानं ही सर्वच गाणी निगुतीनं ऐकली जातात. या गाण्यांपैकी काहींच्या चाली उत्तम असतात, काहींचं ध्वनिसंयोजन, गायन, तर काहींचे शब्द. काही गाण्यांमध्ये तर एकाहून अधिक गोष्टी उत्तम उतरलेल्या असतात. साहजिकच ही गाणी आपलं लक्ष वेधून घेतात, आयुष्याच्या प्रवासात थोडं अंतर आपल्यासोबत चालतात, आपला प्रवास सुकर करतात आणि मग एके दिवशी कुठल्या तरी वळणावर अलगद हात सोडवून घेतात. मात्र, दर काही वर्षांनी एखादं गाणं असं येतं, की ज्यातली एक अन् एक गोष्ट जमून आलेली असते. असं गाणं मनाच्या आतल्या कप्प्यात कायमचं जाऊन बसतं. यानंतरचा कुठलाच प्रवास आपण अशा गाण्याशिवाय करू शकत नाही. कारण, त्या गाण्याशी आपला जीव लागलेला असतो.

जीव रंगला दंगला गुंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

सिनेमातल्या प्रेमगीतांमध्ये तेच ते शब्द येणं बरेचदा अपरिहार्य असतं. अशा वेळी महत्त्वाचं ठरतं की ते उतरतायत कोणत्या लेखणीतून! सगळ्यांकडे तीच सुई आणि तोच धागा असूनही कुणी फार तर रफू करू शकतो आणि कुणी लीलया कशिदा विणून जातं. पहिल्या ओळीत अक्षरांच्या वारंवारितेत आपण गुंतायला लागतो आणि क्षणार्धात आपल्याला त्या नक्षीतलं सौंदर्य जाणवायला लागतं. खरं तर प्रेमात पडल्यानंतर कुणाचा तरी ध्यास लागणं हे ओघानं येणारच; पण या गाण्यातलं प्रेम इतर प्रेमगीतांपेक्षा वेगळं आहे हे लक्षात येतं, जेव्हा ध्यास ‘लाभला’ कानावर पडतं.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

एखाद्याचा नुसता ध्यास ‘लाभला’ म्हणून जे लोक जगण्याचा सोहळा करू शकतात, त्यांचं प्रेम किती उच्च पातळीवरचं असेल! फार कमी प्रेमगीतांमध्ये भावनेचा हिंदोळा इतक्या कमी वेळात प्रेमाकडून उंच समर्पणाकडे जातो. आस, ध्यास, श्वास असे शब्द कितीतरी गाण्यांमध्ये ऐकायला-वाचायला मिळतात; पण आपल्या जिवलगाला ‘गहिवरला’ श्वास किती जण म्हणू शकतात? अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ती वीण आपल्या डोळ्यांदेखत गर्भरेशमी होऊन जाते.

पैलतीरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

आशंका आणि आश्वस्तता यांच्या हिंदोळ्यावरची दोलायमान मनःस्थिती सांगणारे शब्द फार लोभस उतरले आहेत. म्हणाल तर, त्यात खात्री आहे आणि म्हणाल तर, त्यात प्रश्नचिन्हही आहे. पैलतीरा नेशिल(ना?), साथ मला देशिल(ना?), कारण शेवटी तूच माझं काळीज आहेस असा हवाला दिला/मागितला जातो. या जगात शेवटपर्यंत साथ फक्त काळीजच देतं हे त्रिकालाबाधित सत्य; पण ते ठासून न सांगता हळुवारपणे आपल्या जिवलगालाच काळीज म्हणून वचनात बांधून घेतलं जातं. ‘सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू’ या ओळीत वरकरणी यमकांचं सौंदर्य दिसतं; पण त्याहून सुंदर त्याला एक आतला पदर आहे. भरती, नभ आणि धरती या तिपेडी धाग्यांत हलकेच चंद्राला ओवून संजयजींनी एक विलक्षण परिणाम साधला आहे. माझ्यासाठी तू पुनवंचा चांद, तुझ्या-माझ्या ओढीमुळे नभ धरतीला आलं, पर्यायाने चांद धरतीला आला, आता (सुखाला) जगावेगळी भरती आल्याशिवाय राहील काय, असा एकाच ओळीत उलट प्रवाससुद्धा मांडला जातो. ‘उत्तम विणकर तो, ज्यानं विणलेल्या नक्षीची मागची बाजू जरी पाहिली तरी गुंता न दिसता एक वेगळी नक्षी दिसते,’ असं म्हणायचं झालं तर त्याचं हे अप्रतिम उदाहरण.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खुळं आभाळ ढगाळ, त्याला रूढींचा इटाळ,
माझ्या लाख सजणा ही काकणांची तोड माळ तू

जन्मापासून ज्या मनावरचं मळभ हटलेलं नाहीये, त्या मनाला गोंजारताना माझ्या ‘लाख’ सजणा ही हाक सगळ्याच ढगाळलेल्या मनांना मुळापासून हलवून टाकते. गीतकारांना गाणं लिहिताना अनेक विशेषणं भुरळ घालत असतात. आपलं गाणं वेगळं दिसावं, उठून दिसावं म्हणून त्या क्षणी बळी पडायलाही होतं; पण त्या मोहक गुंत्यातून संजयजी अलगद आपला पाय काढून घेतात. बुद्धीपेक्षा काळजाचं म्हणणं ऐकत ‘लाख’ सजणा लिहितात.
काही गाणी चालींवर लिहिली जातात, काहींच्या शब्दांना चाल दिली जाते. या गाण्याची एक ओळ आधी तयार होती आणि मग चाल झाल्यावर उरलेल्या ओळी लिहिल्या गेल्या हे ऐकल्यावर विश्वास बसत नाही. कारण, या उंची कशिद्यात अवघडलेल्या हातांनी घातलेला एकही टाका नाहीये. दैवी प्रतिभेचे कलाकार एकत्र आल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो हे आपल्याला माहीत असावं म्हणून सांगतो,

चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू

यातली पहिली ओळ आधी लिहिलेली होती, ज्यावरून अजय-अतुल यांनी एक अप्रतिम चाल तयार केली. गाण्यात मध्यात येणाऱ्या या ओळींनी अजय–अतुल यांना प्रारंभाकडे कसं नेलं असेल? या कडव्यातली दुसरी ओळ तर रेकॉर्डिंग सुरू झालेलं असताना, संजयजींनी स्टुडिओत पोहोचताना, टॅक्सीत बसून फोनवर सांगितली आहे. भर गर्दीत असताना ‘रुजव्याची माती’ कसं सुचतं? या प्रश्नांची उत्तर कुणाकडेच नाहीत आणि तेच बरं. कारण,  हे गाणं ‘जादू’ करतं, हातचलाखी नाही.

राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवल्या गेलेल्या ‘जोगवा’ चित्रपटातलं हे सर्वांगसुंदर गाणं पडद्यावर विणताना दिग्दर्शक राजीव पाटील आणि छायाचित्रकार संजय जाधव यांनी कळस गाठला आहे. हरिहरनजी आणि श्रेया घोषाल यांच्या मखमली आवाजातलं हे गाणं पहिल्या स्वरापासून आपल्या मनावर प्रेमाची, मायेची, वात्सल्याची ऊब पांघरतं. अशी काही गाणी ऐकताना डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टींनाही ‘स्पर्श’ असतो ही सतत जाणवत राहतं. 
एकेक सूर, एकेक शब्द हळूहळू मनात झिरपत जातो...अगदी आतल्या कप्प्यापर्यंत. संजयजी, काय लिहिलंय, सर! लहान तोंडी मोठा घास; पण शेवटी इतकंच म्हणतो,

खुळं काळिज हे माझं, दिलं ‘शब्दांना’ आंदण
अशा ‘शाईनं’ ‘रेखिन’ माझ्या जल्माचं गोंदण

सलाम!
(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)
वाचकहो, तुमचे अभिप्राय जरूर कळवा आणि सन २००० नंतरच्या अमुक एका गाण्याबद्दल लिहिलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर हक्कानं सांगा... 

Edited By - Prashant Patil