कधी तू...

काही काही गाणी ऐकताना किंवा विशेषत: त्या गाण्यांबद्दल आसुसून लिहिताना तत्सम काही गाणी आठवत राहतात.
Shrirang Godbole
Shrirang GodboleSakal

कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू चमचम करणारी चांदण्यात

काही काही गाणी ऐकताना किंवा विशेषत: त्या गाण्यांबद्दल आसुसून लिहिताना तत्सम काही गाणी आठवत राहतात. अनेक चित्रपटांत येणारे एकसारखे प्रसंग किंवा भावना हे त्यामागचं एक कारण असावं. उदाहरणार्थ : आत्ता या गाण्याकडे बघताना, मला माझी आवडती आणखी दोन गाणी आठवत आहेत. त्यातलं एक म्हणजे, जावेद अख्तरसाहेबांनी लिहिलेलं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ आणि दुसरं गाणं म्हणजे मला प्राणप्रिय असलेली आरती प्रभूंची कविता ‘तू तेव्हा तशी...’

आपल्या प्रिय व्यक्तीचं वर्णन करणारी गीतं लिहिणं हे जास्त जोखमीचं असतं. एकाच वेळी ते वर्णन ‘नाकी-डोळी नीटस’ इतकं गद्यही नको असतं आणि अतिलांगुलचालन करणारंही नको असतं. मग याचा सुवर्णमध्य गाठणारं गाणं कसं असतं? तर ते रंगादादानं, म्हणजेच श्रीरंग गोडबोले यांनी, लिहिलेल्या ‘कधी तू...’सारखं असतं.

काही गाण्यांचे शब्द आधी तयार असतात, तर काहींची चाल. मात्र, काही गाणी गीतकार-संगीतकार एकत्र बसून चर्चा करता करताच जन्माला येतात. हे गाणं त्या पठडीतलं असणार हे नक्की. सुरुवातीच्या दोन ओळी नायक/गायक खालच्या स्वरात गुणगुणतो आहे. जवळपास दोघांनाच ऐकू जातील असं म्हटल्यासारख्या या ओळी. आपण तिचं असं वर्णन करू लागल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल असा अंदाज घेत घेत मुखडा सुरू होतो आणि तिला ते आवडतंय असं जाणवताच भावनांचा हिंदोळा उंच उंच जातो. आता तिच्याबद्दल तिला किती किती आणि काय काय सांगू असं होऊन जातं.

कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा

बिजलीची नक्षी अंबरात

सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा

चिंब पावसाची ओली रात

शेकडो गाठी-भेटींमधून, साध्या सरळ मैत्रीचा पुनरुच्चार करता करताच, तिच्या आणि आपल्याही नकळत टिपलेली तिची हजारो प्रतिबिंबं आता फेर धरून नाचू लागतात. तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू अमुक क्षणी अशी रिमझिमली होतीस, तमुक क्षणी तशी उसळली होतीस असे एक ना दोन हजार क्षण क्षणात एकत्र येतात आणि तिच्या रूपात साकार होतात. गंमत म्हणजे फक्त उपमांनी आणि विशेषणांनी अशा वर्णनाला पूर्णत्व येत नाही.

त्यासाठी ‘लाखो तारका असूनही चमचम करणारी ‘तू’ होतीस’ असं सांगता यावं लागतं. सहज निघून जाणाऱ्या या ओळीत रंगादादानं ही कमाल केलीय हे एका ऐकण्यात/वाचनात लक्षात येत नाही.

कधी तू अंग अंग मोहरणारी

आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात

कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत

पुढची ही दोन्ही कडवी माझ्या दृष्टीनं गाणं, गीतलेखन कळसाला नेतात. बरेचदा आकर्षक मुखडा झाल्यानंतर कडवी केवळ उपचार म्हणून येताना दिसतात; पण इथे बरोब्बर उलट झालेलं आहे आणि ते प्रचंड सुखावह आहे. गीतकार म्हणून उत्तम मुखडा लिहिल्यानंतर कडव्यांमध्ये कवी डोकावतो, नव्हे गळाभेट घेतो. एका क्षणी तिला जंगलातली रातराणी म्हणून दुसऱ्या क्षणी हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत पाहणं म्हणजे जणू काही अमर्याद क्षितिजाकडून सूक्ष्मात येणं. तू माझं संपूर्ण जीवन व्यापलं आहेस हे इतक्या कमी आणि देखण्या शब्दात सांगितलं आहे की या ओळींना तीट लावायला हात पुढं होतो.

जरी तू कळले तरी ना कळणारे

दिसले तरी ना दिसणारे

विरणारे मृगजळ एक क्षणात

तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत

या कडव्यात गीतकार ‘कधी’ या शब्दाचा हात सोडून देतो. आपल्या हातून एक सुंदर गाणं लिहून होत आलंय हे माहीत असतानाही तेच तेच करत राहण्याचा मोह टाळतो. हा खरा सच्चा कलाकाराचा सेल्फी! अशाश्वत मृगजळाची उपमा देत उंच गेलेला हा हिंदोळा अधांतरी थांबतो, नायिकेसारखाच प्रत्येक श्रोत्याचा प्राण कंठाशी येतो आणि मग सावकाश डोळ्यातल्या शाश्वत डोहाच्या काठाशी येऊन स्थिरावतो.

संगीतकाराच्या मनात नक्की कुठल्या धाटणीची चाल आहे, संगीतसंयोजन आहे, हे गीतकाराला माहीत असेल तर किती अव्वल दर्जाची निर्मिती होऊ शकते याचं हे अप्रतिम उदाहरण आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या गाजलेल्या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं. दोघांनाही हे गाणं फार शोभून दिसलं आहे. जणू काही त्यांच्यावर असं गाणं चित्रित होणं हे विधिलिखित होतं. विशेषत: गाण्यातल्या प्रेयसीचं सगळंच्या सगळं वर्णन मुक्ताला सोळा आणे लागू पडतं.

‘दर्जेदार शब्द, उत्तम कविकल्पना आणि सुमधुर संगीत असलेली गाणी आजकाल ऐकायलाच मिळत नाहीत,’ अशी तक्रार असेल तर संगीतकार अविनाश-विश्वजित आणि गीतकार श्रीरंग गोडबोले यांचं हृषिकेश रानडेच्या प्रांजळ आवाजातलं हे गाणं ऐका. बरं, ‘अशी गाणी आली तरी लोकप्रिय होत नाहीत,’ अशी तक्रार असेल तर या गाण्याला मिळालेले कोट्यवधी हिट्स बघा आणि तिथपर्यंत गेलातच तर हे गाणं आणखी एकदा ऐका, पाहा.

मला नेहमी असं वाटतं की कवी जेव्हा जेव्हा प्रेयसीचं वर्णन करतो तेव्हा तेव्हा ते केवळ दैहिक वर्णन नसतं. बहुतांश वेळा कवितेत प्रेयसी शोधण्यापेक्षा तो प्रेयसीत कविता पाहत असतो.

आरती प्रभू म्हणतात तसं :

तू हिर्वी कच्ची

तू पोक्त सच्ची

तू खट्टीमिठ्ठी ओठांची...

कवी आणि कवितेचं प्रेम संयमाच्या कोंदणातच शोभून दिसतं.

मला सांगा सुख म्हणजे ‘वेगळं’ काय असतं!

(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com