भारताशी जोडलेलं जमिनीखालचं ब्रायटन

ब्रायटनच्या रस्त्यांवर अनेक लोक आपले छोटेछोटे स्टॉल्स व टपऱ्या टाकून अनेकविध प्रकारच्या वैध व अवैध वस्तू राजरोस विकताना दिसतात.
Braitan road
Braitan roadsakal

- वैभव वाळुंज

ब्रायटनच्या रस्त्यांवर अनेक लोक आपले छोटेछोटे स्टॉल्स व टपऱ्या टाकून अनेकविध प्रकारच्या वैध व अवैध वस्तू राजरोस विकताना दिसतात. अनेक ठिकाणी या जागांना आजही नॉर्थ स्ट्रीट बाजार अशी भारतीय पठडीची नावे आहेत.

बेकायदेशीर व्यापार हा सुरुवातीपासूनच समुद्रकिनाऱ्यावरील अनेक शहरांचा व गावांचा उत्पन्नाचा मुख्य मार्ग राहिला आहे; पण बरेचदा हा व्यवसाय फक्त टोळी किंवा हिंसा घडवून आणणाऱ्या गुन्हेगारांचीच मक्तेदारी असावी, असा आपला समज असतो.

बरेचदा नागरिकांच्या रोजच्या राहणीमानाच्या गरजा त्यांना एखादी गोष्ट अवैधपणे घेण्यासाठी भाग पाडतात. इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर असणाऱ्या अनेक लहान-मोठ्या गावांची हीच गोष्ट आहे. विशेषतः येथील बंदरे असणारी लहान-मोठी शहरे भारताशी अवैध व्यापाराने जोडली गेली होती. त्याच्या अवशेषांचा व इतिहासाचा धुंडाळा आपल्याला अजूनही या शहरांमध्ये शाबूत असलेल्या ठिकाणांवरून लावता येतो.

भारतात ब्रिटिश साम्राज्य आले. त्यानंतर भारतात घेतली जाणारी अनेक पिके व खाण्यापिण्याच्या गोष्टी मोठमोठ्या कंपन्यांमार्फत इंग्लंडच्या बाजारामध्ये विकल्या जाऊ लागल्या. भारतातील स्थानिक शेतकऱ्यांकडून स्वस्तात खरेदी करून, त्याच गोष्टी इंग्रज सरकारच्या करामुळे महाग किमतीत विकल्या जात.

व्हिक्टोरियन काळातील अनेक स्थानिक नाविक सैनिकांना व खलाशांना याचा जाच वाटे. औद्योगिक क्रांतीमुळे भारतात नव्याने सुरू झालेल्या ब्रिटिशराज व तेथील लहानसहान गोष्टींचं मध्यमवर्गाला आकर्षण होतं. ‘इंडियन स्टाईल’ हा शब्दप्रयोग कपडे, वास्तुशास्त्र, संगीत, राहणीमान, साहित्य, धर्म या सर्व बाबतींमध्ये रुळला होता.

सर चार्ल्स विल्कीन याने भाषांतरित केलेल्या भगवद्गीतेच्या शेकडो प्रती सन १७९५ मध्ये इंग्लंडमध्ये हातोहात विकल्या गेल्या होत्या, यावरून ब्रिटिशांना आलेल्या इंडोमेनिया अर्थात भारताविषयीच्या अवाजवी प्रेमाची व्याप्ती कळावी. अर्थातच यात ब्रिटनच्या वाढत्या साम्राज्याच्या कौतुकाचा भाग जास्त होता. १८०३ मध्ये ब्रिटिशांनी दिल्ली काबीज केल्यानंतर लोकांच्या भारतप्रेमाचा विस्फोट झाल्याचं इतिहासकार नोंदवतात.

ब्रिटनचा तत्कालीन राजकवी रॉबर्ट साऊदी आणि नंतरच्या काळात भारतीयांचा आवडता झालेला शेली अशा कवींनी भारतातील धर्म, राहणीमान आणि जीवनशैली याच्याविषयी अनेक कविता केल्या होत्या. त्यामध्ये भारतातून मिळणाऱ्या लहानसहान गोष्टींचा तपशीलवार उल्लेख असे. आपल्या दिवाणखान्यात अशा गोष्टी असणे ब्रिटनमध्ये लौकिकाचे समजले जाई; पण वाढत्या करामुळे लोकांना या गोष्टी विकत घेणे अवघड जात होते.

मात्र दक्षिण किनाऱ्यावरील ब्रायटनमधील गावकऱ्यांनी यावर हुकमी मार्ग शोधला तो म्हणजे भारतातून खरेदी करून आल्यानंतर इंग्लंडमधील तपासणी अधिकाऱ्यांना टाळून त्या वस्तू अवैधपणे थेट लोकांना विकणे. सुरुवातीपासूनच इंग्रजांच्या नाविक दलामध्ये स्थानिकांचा मोठा भरणा होता.

त्यांना येथील भूगोलाची माहिती होती म्हणून त्यांनी भारतातून आणलेली चहा, मसाले, तलम कपड्यांची जहाजे बंदरात न उतरवता रोटिंगडीनसारख्या लहान गावांमध्ये उतरवायला सुरुवात केली. अशा ठिकाणी खणलेल्या गुहा व बोगद्यांमधून माल मुख्य शहरांमध्ये पोहोचवला जात असे.

व्हिक्टोरिया साम्राज्यातील भरगच्च करांमधून सुटका मिळवण्याचा हा राजमार्ग बनला. या व्यापारात असणाऱ्या प्रचंड पैशांमुळे अनेक तस्करांनी मोठमोठ्या शहरांमधून आपला मुक्काम या लहानशा गावाकडे वळवला. आपल्या सोयीनुसार त्यांनी अनेक ठिकाणी माल लपवण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी अनेक ठिकाणी बोगदे खणले.

यातील काही बोगदे अजूनही पर्यटकांना पाहता येतात, स्थानिक नगरपालिकेने या बोगद्यांची जपणूक करून त्यांना पर्यटनस्थळाचे स्वरूप दिले आहे. या ठिकाणी जाण्यासाठी वर्षातील काहीच दिवस हे बोगदे उघडले जातात व त्यासाठी भरमसाट तिकीटआकारणी केली जाते. हे तस्कर एकेकाळी ज्या ठिकाणी जमत, त्या ठिकाणच्या पबला आजही त्यांच्या आठवणीत ‘द स्मगलर्स’ असं नाव आहे.

अर्थातच हा आणलेला माल लोकांपर्यंत विकायचा कसा? सुरुवातीला किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना भारतावरून आणलेले सामान स्वस्तात विकण्याचा प्रयत्न करणारे खलाशी व सामान विक्रेते यांच्यावर पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली. त्यावर उपाय म्हणून पोलिसांचा ससेमिरा टाळत ब्रायटन शहरामध्ये असणाऱ्या लहानशा गल्लीबोळांमध्ये या तस्करांची दुकाने भरत.

अनेक मौल्यवान गोष्टी हातोहात बाजारपेठेच्या निम्म्या किमतीत विकल्या जात. शनिवारी व रविवारी भरणारे हे छुपे बाजार लोकांच्या पसंतीस उतरले. कालांतराने यावर पोलिसांच्या धाडी पडल्या तसेच वेगवेगळ्या कारणांनी व्यापारही मंदावला; मात्र हे बाजार इतके प्रसिद्ध झाले होते, की आता अवैधपणे चालण्याऐवजी ते स्थानिक सरकारच्या परवानगीसह चालू लागले.

येथील नागरिकांच्या गरजा आणि इतिहास लक्षात घेता महानगरपालिकेनेही या दुकानांवर कर लावला नाही. म्हणूनच आजही दर्शनी वारी ब्रायटनच्या रस्त्यांवर अनेक लोक आपले छोटेछोटे स्टॉल्स व टपऱ्या टाकून अनेकविध प्रकारच्या वैध व अवैध वस्तू राजरोस विकताना दिसतात. अनेक ठिकाणी या जागांना आजही नॉर्थ स्ट्रीट बाजार अशी भारतीय पठडीची नावे आहेत.

त्यात भारतीय देवदेवतांचे पुतळे, भारतातील प्रसिद्ध ठिकाणांच्या प्रतिकृती, भारताविषयीचे तेच अवाजवी उथळ प्रेम आणि गैरसमज अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतात; पण ते काहीही असो, त्यांच्याकडे मिळणाऱ्या स्वस्त व अनोख्या वस्तू येथील गावांची एक वेगळी ओळख बनले आहेत. डिसेंबर महिन्यातील रविवारी येथे सर्वजण खलाशी व तस्करांचा पोशाख घालून शहरभर फिरत असतात. आपल्या गावाला तस्करांचा इतिहास आहे हे येथील लोक अभिमानाने सांगताना दिसतात.

व्हिक्टोरिया साम्राज्यातील भरगच्च करांमधून सुटका मिळवण्यासाठी दक्षिण किनाऱ्यावरील ब्रायटनमधील गावकऱ्यांनी हुकमी मार्ग शोधला. भारतातून खरेदी करून आणलेल्या वस्तू इंग्लंडमधील तपासणी अधिकाऱ्यांना टाळून त्या अवैधपणे थेट लोकांना विकणे.

भारतातून आणलेली चहा, मसाले, तलम कपड्यांची जहाजे बंदरात न उतरवता रोटिंगडीनसारख्या लहान गावांमध्ये उतरवायला सुरुवात केली. अशा ठिकाणी खणलेल्या गुहा व बोगद्यांमधून माल मुख्य शहरांमध्ये पोहोचवला जात असे. यातील काही बोगदे अजूनही पर्यटकांना पाहता येतात. स्थानिक नगरपालिकेने या बोगद्यांची जपणूक करून त्यांना पर्यटनस्थळाचे स्वरूप दिले आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये युके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com