जातीयतेविरोधात लढाईची स्मृतिस्थळे

अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये सामाजिक व जातीविरोधी चळवळींना सुरुवात झाल्यामुळे या दोन प्रांतांच्या संबंधाने इंग्लंडमध्ये सामाजिक विकास झाला होता.
rajaram mohan rai statue in england
rajaram mohan rai statue in englandsakal

- वैभव वाळुंज

अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये सामाजिक व जातीविरोधी चळवळींना सुरुवात झाल्यामुळे या दोन प्रांतांच्या संबंधाने इंग्लंडमध्ये सामाजिक विकास झाला होता. त्याचे प्रतिबिंब आजही बऱ्याच ठिकाणी इंग्लंडमध्ये दिसून येते. याचाच एक भाग म्हणजे इंग्लंडच्या ब्रिस्टॉल शहरात राजा राममोहन रॉय यांनी केलेले काम आणि इथल्या मुख्य चौकाच्या जवळ उभारलेला त्यांचा पुतळा होय.

जातीय अत्याचारांच्या बाबतीत आपण दुर्गम गावांची किंवा आडखेड्यांची नावं ऐकतो. युरोप आणि अमेरिकेमध्येही जातीय आधारावर केले जाणारे भेदाभेद आताशा उजेडात येत आहेत. अमेरिका आणि इतर देशांशी तुलनात्मक अर्थाने पाहायचं झालं तर इंग्लंडमध्ये याविषयी जागृती व्हायला सुरुवात फारच लवकर झाली होती, असं म्हणावं लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घरासंबंधी आणि स्मारकाविषयीची माहिती सर्वसामान्य जनांमध्ये रूढ आहे. या शहरात विविध ठिकाणी पसरलेल्या त्यांच्या स्मृतिस्थळांमध्ये दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांची स्मृतिस्थळे ही जातीविरोधी लढाई पुढे नेण्याची मैदाने बनली आहेत. मात्र त्याचसोबत इंग्लंडमध्ये जाती व्यवस्थेशी संबंधित सुधारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजसुधारकांच्या स्मृती वेगवेगळ्या शहरांमध्ये विखुरलेल्या आहेत.

भारतातील अनेक नेत्यांचा आणि त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुधारणांचा संबंध इंग्लंडशी फारच लवकरच्या काळात आला. साम्राज्यवादामुळे जशा इंग्लंडमधील अनेक गोष्टी भारतात पोहोचल्या त्याच पद्धतीने वसाहतींमधील अनेक गोष्टीही साम्राज्याचे केंद्र असणाऱ्या इंग्लंडमध्ये जात होत्या.

त्याशिवाय इंग्लंडने राबवलेल्या साम्राज्यवादाचा एक भाग हा वसाहतींमध्ये सामाजिक पातळीवरही बदल घडवून आणणं या उद्देशाने राबवला गेला होता. यामुळे भारतातील अनेक सामाजिक रूढी आणि परंपरा इंग्लंडमध्ये जाऊन पोहोचल्या अन् त्याचे चांगले-वाईट परिणाम भारत आणि इंग्लंडमधील एकूण समाजमनावर झाले.

इंग्लंडमध्ये त्या काळी सुरू असलेल्या धर्म सुधारणा चळवळींच्या प्रेरणेने हिंदू धर्मांतर्गत आणि क्वचित धर्माबाहेर पडून एक नवा पंथ तयार करून आधुनिक विचारांचा प्रसार करण्याचं काम जातीविरुद्ध लढणाऱ्या सुरुवातीच्या काळातील अनेक नेत्यांनी केलं होतं. याचाच एक भाग म्हणून राजा राममोहन रॉय हे ब्रिस्टॉल या शहरामध्ये युनिटेरियन ख्रिश्चन संप्रदायाच्या अभ्यासासाठी आणि आपल्या मित्रमंडळींना भेटण्यासाठी आले होते.

यावेळी त्यांचा दत्तक मुलगा राजाराम हाही त्यांच्यासोबत होता. या वेळी त्यांनी ब्राह्मो समाजाच्या कामासंबंधी प्रेरणा घेतली असावी आणि त्यातून बंगालमध्ये धार्मिक चळवळी उभारल्या असाव्यात. फक्त धार्मिक बाबतीतच नाही तर राजकीय बाबतीतही त्यांनी आपलं योगदान दिलं. भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड बेंटिक याच्या बरोबरीने संसदेमध्ये सती व्यवस्था बंद व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

या सर्व घडामोडींच्या दरम्यान त्यांचं वास्तव्य बराच काळ ब्रिस्टॉल शहरामध्ये राहिलं. या शहरांमध्ये तंबाखूचे अनेक व्यापारी तसेच वसाहतवादी लोकांचा मोठा भरणा होता. गुलामांचे अनेक मोठ मोठे व्यापारी या शहरांमध्ये राहत. कदाचित यातील काही व्यक्तींच्या सहभागातून वसाहतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा करण्यामध्ये नेत्यांना मोठी मदत झाली.

लॅन्ट कार्पेंटर हे ब्रिस्टॉलमध्ये राहणाऱ्या धार्मिक गृहस्थांपैकी एक होते आणि राजा राममोहन रॉय यांचे जवळचे मित्र होते. भारतातील विविध सामाजिक सुधारणांच्या संबंधाने ख्रिश्चन धर्माच्या तत्त्वांना भारतीय मुलामा देऊन कशा प्रकारे अनिष्ट रूढींशी लढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. नंतरच्या काळात आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यात ते आजारी पडले.

इंग्लंडमध्ये तेव्हा आणि काही प्रमाणात आताही मोठ्या प्रमाणात पसरत असणाऱ्या मेंदुज्वराची लागण त्यांना झाली. त्यामुळे इंग्लंडमध्ये असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या शहरामध्ये त्यांनी केलेल्या वास्तव्याचा आणि त्यांच्या कामाचा मान राखून इथल्या नगरपालिकेने तसेच विविध मित्रमंडळींनी त्यांच्या स्मृती जपून ठेवण्याचा प्रयत्न केला. हिंदू पद्धतीप्रमाणे त्यांच्या शरीराला अग्नी देण्यात येणार होता; परंतु तत्कालीन इंग्लंडमध्ये शरीरावर दाहसंस्कार करणं शक्य नव्हतं.

तसेच ख्रिश्चन नसल्यामुळे त्यांना ख्रिस्ती दफनभूमीदेखील उपलब्ध झाली नाही. म्हणूनच ब्रिस्टॉल या शहराच्या पश्चिम भागामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले व नंतर याच भागात त्यांच्या स्मृतीनिमित्त स्मारकाचीही उभारणी करण्यात आली. हिंदू मंदिराप्रमाणे उभारलेल्या या स्मारकाचे बांधकाम ब्रायटन शहरातील छत्रीपेक्षा फार सुबक पद्धतीने केलेलं आहे.

यासोबतच रॉय यांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या कॉलेज ग्रीन या भागामध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांचे विविध राजकीय नेत्यांशी आणि ब्रिटनमधील तत्कालीन सत्ताधारी वर्गांशी असलेले संबंध लक्षात घेता इथल्या नगरपालिकेमध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळाही ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी भेट दिल्यानंतर अनेक भारतीय आणि बंगाली नागरिक याच्या आसपास गर्दी करताना दिसतात.

इंग्लंडमधील प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्मृतिस्थळे आणि वस्तुसंग्रहालये असतात. त्याच धर्तीवर इथल्या संग्रहालयामध्ये रॉय यांचं एक चित्र ठेवण्यात आलं आहे. मात्र ब्राह्मो समाज या संस्थेला मात्र भारतात आणि परदेशीही घरघर लागली आहे.

शिलाँगसारख्या भारतातील अनेक शहरांमध्ये एकेकाळी दबदबा असणाऱ्या ब्राह्मो समाजाची आताची कामे फक्त शहरभर पसरलेल्या रॉय यांची स्मृती आणि पुतळे जपण्याच्या कामी उरली आहेत, असं दिसतं. सध्या इथल्या पुतळ्यांची देखभालही भारतीयच करत आहेत. मात्र त्या तुलनेत येथे धार्मिक चळवळींमध्ये सहभागातून सामाजिक सुधारणा करण्याची कास धरणाऱ्या मराठी समाजसुधारकांची तेवढीही बूज राखली गेली नाही.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील हॅरिस मँचेस्टर नावाच्या सनातनी कॉलेजमध्ये धर्मशिक्षणासाठी गेलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी रॉय यांचाच वारसा पुढे नेत धार्मिक शिक्षणातून जातीअंताच्या चळवळीत योगदान दिलं. तत्कालीन वातावरणामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये आल्यानंतर कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असे याचा विस्तृत लेखाजोखा मांडला आहे.

त्यांच्या कॉलेजने आपल्या परिसरात भेट देणाऱ्या रवींद्रनाथ टागोर आणि येथे शिकवणाऱ्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती काही प्रमाणात जपल्या असल्या तरी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वारशाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलं आहे.

लंडनमध्ये जातीविरोधी काम करणाऱ्या दुसऱ्या एका मध्ययुगीन समाजसुधारकांची स्मृती आढळते ते म्हणजे महात्मा बसवेश्वर. बाराव्या शतकात त्या काळाच्या दृष्टीने तुलनेने पुरोगामी विचार मांडणाऱ्या बसवेश्वर यांचा इंग्लंडशी प्रत्यक्ष संबंध नव्हता. मात्र, इथे राहणाऱ्या लिंगायत आणि कन्नड समाजाने आपल्या स्मृती जपण्यासाठी व सामाजिक भेटीचे ठिकाण म्हणून बसवेश्वरांचा पुतळा उभारला आहे. या कामी कर्नाटक सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

इथं वेळोवेळी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. लंडनमधल्या मोक्याच्या ठिकाणी आंबेडकर हाऊस विकत घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारने वाढती भूमिका घेऊन या स्मृतिस्थळामध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची सोय करावी अशी मागणी लंडनमधील अनेक आंबेडकरी आणि बुद्धिस्ट संघटनांनी केली आहे. जागतिक पातळीवर आपल्या नेत्याचा वारसा पुढे नेण्याची संधी सरकार कशी पार पाडते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com