ससेक्सचे सुतार

शेती करणाऱ्या समूहांच्या व त्यावर आधारलेल्या व्यवसायांच्या आपापल्या ठिकाणच्या अनोख्या परंपरा आणि पद्धती असतात.
Carpenter Work
Carpenter WorkSakal

- वैभव वाळुंज

ससेक्समध्ये आता शेती आधुनिक झाली असली, तरी अगदी युद्धपूर्व काळापर्यंत पारंपरिक पद्धतच वापरली जायची. त्या पद्धतीची जपणूक करण्याचं काम काही विरळ्या शेतकऱ्यांनी केलं आहे. लॉवल त्यापैकी एक...

शेती करणाऱ्या समूहांच्या व त्यावर आधारलेल्या व्यवसायांच्या आपापल्या ठिकाणच्या अनोख्या परंपरा आणि पद्धती असतात. माणसांनी वसाहत बनवल्यानंतर प्रत्येक ठिकाणी शेती करण्याची वेगवेगळी तंत्रे आत्मसात केली गेली. ससेक्स प्रांताच्या गावांमध्ये फिरत असताना मला शेतीशी निगडित अनेक गोष्टींना जाणून घेता आलं.

इथेच उन्हाळ्यात सुतारकाम शिकवणाऱ्या लॉवल याच्याशी माझी ओळख झाली. केंब्रिज विद्यापीठातून मध्ययुगीन इतिहासात पदवीधर असलेला लॉवल सध्या आपल्या संशोधनातून विसावा घेऊन लाकुडकाम शिकण्यात व शिकवण्यात रमला आहे. अनोळखी लोकांना तो स्वतःची ओळख फक्त ‘मी सुतार आहे’ एवढीच करून देतो.

लहान गावांमध्ये फिरत असताना त्याच्या छोटेखानी दुकानात माझी त्याच्याशी भेट झाली. इथल्या गावांमध्ये फिरण्याचा फायदा म्हणजे युरोपातील शहरी किंवा अगदी लंडन भागातील आपल्या कामाशी काम ठेवणाऱ्या मितभाषी लोकांशी संपर्क होतो. रस्त्यात सहज एकमेकांना नमस्कार घातला की किमान पाचेक मिनिटांचं संभाषण होतंच. त्याच्याशी बोलताना मला इथल्या सुतारकामासंबंधी बरीच माहिती मिळाली.

ससेक्समध्ये आता शेती आधुनिक झाली असली, तरी अगदी युद्धपूर्व काळापर्यंत शेतीसाठी पारंपरिक पद्धतच वापरली जायची. या पारंपरिक पद्धतीची जपणूक करण्याचं काम काही विरळ्या शेतकऱ्यांनी केलं आहे. लॉवलचं कुटुंब त्यापैकी एक.

आपल्याकडे जसे बैल शेतीच्या सर्व कामांमध्ये सर्रास वापरले जातात, तसं ससेक्स भागात शेतीची कामे मुख्यत्वे घोड्याकरवी केली जात. अजूनही कित्येक शेतात काही तुरळक कामांसाठी घोड्यांचा वापर केला जातो. वाहतुकीसाठी घोडागाड्या आणि त्याचेच खटारे प्रसिद्ध होते. गावांनिशी या गाड्या-खटारे बनवणारे सुतार असत. सध्या उपलब्ध असणाऱ्या सामुग्री आणि ऐतिहासिक साधनांच्या आधारे या भागातलं सुतारकाम पुष्कळ पुढारलेलं असल्याचं दिसतं.

आपल्याकडे कुंभार जसे चाक फिरवत त्या धर्तीवर सुतारांकडे वस्तू फिरवण्याची गिरकी असे. काम करताना हातानं वा पायांनी दाब देऊन पट्ट्यांद्वारे गिरक्या फिरवल्या जात. आजच्या काळातील लेथ किंवा टर्निंग मशिन्सचा शोध यातूनच लागल्याचं सांगितलं जातं.

शेतातील माल वेळेत वाहून नेण्यासाठी आणि तो माल महत्त्वाच्या व्यापारी शहरात पोचवण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या असत. प्रत्येक शेताची व शेतकऱ्याची गरज आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्यानं त्यानुसार विविध आकार, वजन आणि रंगांमध्ये खटारगाड्या बनत. सुतारांना एकेक गाडी बनवण्यासाठी प्रचंड कालावधी लागत असे. म्हणून इंग्लंडमध्ये सुतारकाम प्रचंड नफा करून देणारा आणि सन्माननीय उद्योगव्यवसाय बनला.

कमी वेळात जास्त काम करण्याची तंत्रे शेतीची गरज बनली. तुलनात्मक विचार केला असता, गवत कापण्यासाठी आपल्याकडे वापरला जाणारा अर्धाकृती विळा विचारात घ्या. अनेक युरोपीय देशांत हाच विळा शेतीच्या कामी वापरला जाई; पण ससेक्स भागात झालेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर इथं हातभर लांब, पातळ पाते असलेला लांबसडक निमुळता विळा वापरला जाऊ लागला. याने दुखापतीची शक्यता जास्त असली, तरी कामाचा उरक प्रचंड वाढला.

सुरुवातीच्या काळात कला आणि नंतरच्या काळात व्यापार-व्यवसाय म्हणून पाहिला गेल्यानं सुतारकामाचा विकास जातीयतेच्या नव्हे, तर तंत्राच्या माध्यमातून होऊ लागला. भारतीय गावांसारखे सुतार गावकीचे चाकर नसत; तसेच त्यांना बलुतेदारीच्या क्रयवस्तू दृष्टीनंही पाहिलं जात नव्हतं. सुतारांची स्वतःची काम करण्याची वर्कशॉप्स / कार्यशाळा असत ज्यात शेतकऱ्यांची मुले लाकुडकाम शिकायला येत.

अनेकदा मोठ्या इस्टेटच्या शेतकऱ्यांच्या शेतात तात्पुरत्या कार्यशाळा बनवल्या जात. त्यांना कंत्राटी पद्धतीनं काम दिलं जाई. नंतरच्या काळात प्रसिद्ध सुतारांच्या स्वतःच्या कंपन्या तयार झाल्या. या कंपन्यांमध्ये उत्तमोत्तम खटारे बनवण्याची स्पर्धा सुरू झाली. औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुतारकाम अजून महत्त्वाचं बनलं. कामातली क्लिष्टता वाढू लागली.

या सुतारांनी कमी वेळेत जास्त खटारे बनवण्याची तंत्रे विकसित केली. गाड्यांच्या सुट्या भागांची चित्रं काढून वेगवेगळ्या लाकडांपासून वेगवेगळे सुटे भाग बनवले जाऊ लागले. नंतरच्या काळात गाड्यांची संख्या वाढल्यावर गाड्यांना परवाना आणि पासिंग क्रमांक दिले जाऊ लागले.

याचा परिणाम शेतीतही झाला. आपल्याकडे किर्लोस्कर यांनी लोखंडी फाळ अगदी काहीशे वर्षांपूर्वी आणले; मात्र इथे लोखंड आणि लाकूड यांच्या जोडणीचे फाळ पंधराव्या शतकापासून वापरात असल्याचं दिसतं. एकाच पाभरीत नांगरण्याऐवजी जास्त कमी ताकद वापरून तिफणीने नांगरट शक्य झाली.

आता या व्यवसायाला प्रचंड आधुनिक स्वरूप आलं आहे; तरीही हौसेने सुतारकाम करणाऱ्या अनेक कार्यशाळा गावांमध्ये पाहायला मिळतात. सरकारतर्फे वा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून जुनं टर्निंग (लेथ) शिकवण्यासाठी, हातानं मशागत करण्यासाठी तसंच सुतारकाम करण्यासाठी शालेय मुलांना व तरुणांना प्रवृत्त केलं जातं.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com