महापालिकेची रंजक सहल

नीती व धोरणांचा अभ्यास करताना कुठल्याही ठिकाणी नव्याने भेट दिल्यानंतर मला त्या ठिकाणच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचा अंदाज घेऊन मग पर्यटन करणे सोपे जाते.
Britain
Britainsakal

- वैभव वाळुंज

नीती व धोरणांचा अभ्यास करताना कुठल्याही ठिकाणी नव्याने भेट दिल्यानंतर मला त्या ठिकाणच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचा अंदाज घेऊन मग पर्यटन करणे सोपे जाते. माझी हीच सवय ससेक्समध्ये आल्यानंतरही कायम ठेवली. शहरात पाऊल टाकल्यानंतर मी पहिल्यांदा भेट दिलेली जागा होती ब्रायटन शहराची महानगरपालिका व होव्ह शहरामधील सिटी हॉल. त्याबद्दल...

साधारणतः एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यानंतर आपण शक्यतो तेथील निसर्गरम्य ठिकाणांना किंवा पर्यटकांसाठी योग्य असणाऱ्या आणि दीर्घ कीर्ती पसरलेल्या मोठमोठ्या नावाच्या गोष्टींना भेट देतो. कधीकधी या सर्व गोष्टी वगळता काही ठिकाणं आपल्यासाठी फार वेगळ्या कारणांनी जवळची असतात.

तेव्हा प्रत्येकाने आपापल्या आवडीने आपले वैयक्तिक पर्यटन का करू नये? भेट देण्याची ‘प्लेसेस ऑफ इंटरेस्ट’ ठरवण्याचे काम आपण कुठल्याही ॲडव्हायझरला न देता याचा कार्यभार स्वतः सांभाळला तर अनेक नव्या गोष्टी आपल्यासमोर उलगडून येतात. अगदी रेडीमेड टूर पॅकेज न घेता आपण स्वतःची सहल स्वतः बनवू शकतो.

नीती व धोरणांचा अभ्यास करताना कुठल्याही ठिकाणी नव्याने भेट दिल्यानंतर मला त्या ठिकाणच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचा अंदाज घेऊन मग पर्यटन करणे सोपे जाते. माझी हीच सवय ससेक्समध्ये आल्यानंतरही कायम ठेवली. शहरात पाऊल टाकल्यानंतर मी पहिल्यांदा भेट दिलेली जागा होती ब्रायटन शहराची महानगरपालिका व होव्ह शहरामधील सिटी हॉल.

इंग्लंडमध्ये पाय ठेवण्याच्या पूर्वीच मी महानगरपालिकेने चालवलेल्या शाळेमध्ये स्कूल गव्हर्नर या पदावर काम करण्यासाठी अभ्यास सुरू केला होता. महानगरपालिका नेमके कसे काम करते आणि इथल्या व भारतातील महानगरपालिकेच्या कामांमध्ये काय सारखेपणा व तफावत असावी याची मला उत्सुकता होती.

सहसा नगरपालिका व परिषदांच्या प्रशासकीय इमारती बाहेरून रुक्ष, अनाकर्षक व सामान्यांना दूर लोटणाऱ्या असतात. ही बाब ब्रायटनमध्येही बऱ्याच अंशी दिसते, पण त्यातही एक युरोपीय चकचकीत शानशौकी आणण्याचा सुंदर अपयशी प्रयत्न दिसतो.

इथं पहिल्यांदा आल्यानंतर मी इंग्लंडमधील प्रसिद्ध नीलफलकांच्या मजकुरांचे व त्याच्या इतिहासाचे अवलोकन करण्याच्या भानगडीत पडलो. आल्याआल्या नगरपालिकेच्या भिंतीवर दिसलेल्या पहिल्या नीलफलकाने माझी चांगलीच भंबेरी उडाली. ‘ब्रायटन शहराचे मुख्य पोलिस अधिकारी हेन्री सोलोमन यांच्यावर आपल्या कार्यालयात असताना याच ठिकाणी जीवघेणा हल्ला करण्यात आला’ किंवा ‘इतिहासातील प्रसिद्ध बार्थोलोमू धान्याचे कोठार याच ठिकाणी जाळण्यात आले’, असे फलक माझ्या दृष्टीस पडले.

नवीन भेट देणाऱ्या पर्यटकांना सावधान म्हणण्याची, फारच वेगळी आकर्षक पाहुणचाराची पद्धत दिसते, असं म्हणून मी नगरपालिकेच्या उंच गॉथिक खांबांच्या आकाराला न्याहाळत आत गेलो. ही इमारत आधी शहरातील पोलिस अधिकाऱ्यांसाठी कार्यालय म्हणून वापरली जायची.

येथे अनेक पोलिस अधिकाऱ्यांना बसण्यासाठी, तसेच काम करण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या बनवल्या होत्या, हे कळाल्यानंतर मला या ठिकाणच्या हिंसक इतिहासाचा व गडबडगोंधळ का आहे, याचा खुलासा झाला. १९६० च्या दशकात इंग्लंडमधील वातावरण फार वेगळं होतं. त्यातही दक्षिण किनाऱ्यावर जर्मनी व सरबिया अशा अनेक देशांमधून आलेले नागरिक राहत असत.

याच काळात ब्रायटनमधील टोळी युद्धाला प्रारंभ झाला होता व शहरात धुडगूस घालणाऱ्या अनेक माफिया गँगस्टर लोकांचा उदय झाला. इथे मुस्लिमविरोधी, कम्युनिस्टविरोधी फॅसिस्ट टोळ्यांनीही आपला अड्डा बनवला होता. त्यामुळे ही भलीमोठी आणि पोलिस ठाण्यापेक्षा तुलनेने फारच सुंदर असणारी इमारत पोलिसांच्या हवाली करण्यात आली. मात्र कालांतराने या ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहाची निर्मिती करण्यात आली.

लुईस या गावी असणाऱ्या चर्चच्या धर्मशाळेला धान्य पुरवण्यासाठी इथे भले मोठे कोठार होते, पण येथील सत्ता डळमळीत झाल्यानंतर फ्रान्सवरून हल्ला करणाऱ्या लुटारू टोळ्यांनी इथे प्रचंड जाळपोळ केली. त्यानंतर या शहराच्या केंपटाऊन (ज्याला आम्ही गमतीने केंपमळा म्हणत असू) भागातील थॉमस रिड केंप नामक एका धनाढ्य व्यक्तीने एका मोठ्या ग्रीक पद्धतीच्या इमारतीत बदलून टाकले.

पांढऱ्या रंगात घडवलेली चार मजली इमारत आपल्या दर्शनी भागातल्या भव्य खांबांमुळे परिसरात उठून दिसते. थोड्याच दिवसांत अवैध व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाल्यानंतर शहरात पोलिस खात्याची निर्मिती करण्यात आली व त्यांनी या इमारतीत आपले कार्यालय सुरू केले; पण तरीही येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी होत असत.

या मोठ्या इमारतीची एक महत्त्वाची आठवण म्हणजे लहान मुलांचा व मोठ्यांचाही आवडता लेखक चार्ल्स डीकन्स याने आपल्या पुस्तकातील काही भागाचे या इमारतीच्या सभागृहात मुक्त वाचन केले होते, अशी नोंद इमारतीत आढळते. ज्याप्रमाणे आपण ऐसपैस जागी घर बांधून त्यासोबत शेजारी पडवी, पडघर, ओटे आणि अशाच इमारती वाढवत जातो त्याच पद्धतीने या इमारतीच्या आजूबाजूला पोलिस, नगरपालिका व न्यायालयांनी आपल्या लहान-मोठ्या खोल्या, कार्यालये वाढवत-वाढवत नेली व हळूहळू या जागेला प्रशासकीय नाक्याचे स्वरूप आले.

तरीही या इमारतीत गाण्याचे, नृत्याचे तसेच संगीताचे अनेक कार्यक्रम सुरू राहिले. इथली जागा पुरेनाशी झाल्यानंतर पोलिस व नगरपालिकांनी आपला कारभार हळूहळू इतर विभागांमध्ये न्यायला सुरुवात केली; मात्र तरीही इथल्या इमारतीच्या एकूण आठवणी जपून ठेवण्यासाठी पोलिसांनी इथे एक छोटेखानी म्युझियम उभारले.

शहरातल्या एकूण पोलिस कारवाया आणि त्याच अनुषंगाने घडणाऱ्या बेकायदेशीर घटनांचा आलेख या इमारतीत गेल्यानंतर आपल्यासमोर उलगडतो. आता ही जागा उग्र न राहता लोकांच्या नेहमीच्या येण्याजाण्यासाठी खुली करण्यात आली आहे. इमारतीच्या काही भागांना राहण्यायोग्य फ्लॅटमध्ये बदलण्यात आले आहे.

मोक्याच्या ठिकाणी असल्याने या जागेचा वापर करून अजून थोडा निधी का कमावू नये, असा अगदी व्यवहारिक विचार करत महानगरपालिकेने आपली इमारत वाढदिवस, लग्न समारंभ, सोहळे यासाठी भाड्यावर द्यायलाही सुरुवात केली. याच ठिकाणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांसाठी नगरसेवकांना, तसेच विविध प्रभागांतील जागरूक नागरिकांना बोलवण्यात येते. आपल्याप्रमाणे ग्रामसभा किंवा सर्वसाधारण सभांसारखी प्रचंड गर्दी असेल असा विचार करून इथे गेल्यानंतर माझी घोर निराशा झाली.

शहरात राहणारे व सध्या काहीच काम नाही म्हणून भविष्यातील पिढ्यांची चिंता करत बसलेले म्हातारे लोक मला या सभांमध्ये सापडले. इंग्लंडच्या तरुण पिढीने स्थानिक राजकारणाकडे जवळपास संपूर्ण पाठ फिरवल्याने इथे दिसणाऱ्या तरुण चेहऱ्यांमध्ये बहुतांश लोक भारत, बांगलादेश, आफ्रिका आणि कॅरिबियन बेटांवरून इथे आलेल्या पिढ्यांचे वारसदार होते, एवढीच काय ती जमेची बाब.

इंग्लंडच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम आता याच पिढ्यांच्या हातात आहे, असाच एकूण बैठकीचा अनौपचारिक सूर होता. काही प्रमाणात बुरसटलेल्या विचारांचे लोक असले तरीही या बदलाचे स्वागत करणारे लोकही तिथे मला भेटले. पण भारतात नगरसेवक किंवा इतर पदांना असते तशी भलीमोठी किंवा आव आणलेलीही प्रतिष्ठा या ठिकाणी नाही.

जवळपास नसलेल्या वा अशक्य झालेल्या भ्रष्टाचारामुळे अतिशय फुटकळ पगारावर काम करावे लागल्यामुळे अनेक नगरसेवक अर्धवेळ टॅक्सी चालवण्याचे किंवा हॉटेलमध्ये काम करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातही ब्रिटिश सरकारने स्थानिक नगरपालिकेचे एकूण बजेट मोठ्या प्रमाणात काटछाट करून कमी केल्यानंतर आता नगरपालिकांमध्ये भोंगळ कारभाराला पारावर उरला नाही, असे दिसले.

तरीही महापौर आणि सचिव तसेच मुख्याधिकारी आपला पारंपरिक इंग्रजी साहेबी बाज डौलदारपणे सांभाळत, आपल्या गळ्याभोवती राजेशाही पट्टे, मेडल्स आणि जुनाट दागिने घालून बसलेले असतात. आपल्याकडे जसे लोकानुनय दर्शवण्यासाठी फ्लेक्स लावतात तसेच इथल्या राजेशाहीमुळे एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकशाहीमध्येही मध्ययुगीन टोळीबाज परंपरेची चिन्हे अजूनही डौलाने मिरवली जातात, हे पाहून गंमत वाटली.

आपले भलेमोठे अलंकार व राजदंड सांभाळत बसलेल्या ज्येष्ठ, पण मनाने तरुण (म्हणवणाऱ्या) नगरसेवक व महापौरांशी व नेत्यांशी मला काही प्रमाणात चर्चा करता आली. भारतीय नोकरशाही या तुलनेत आपल्या कामाविषयी फारच सजग आणि काहीशी उग्र असल्याचे पाहून मला काहीशा मिश्र भावना मनात आल्या. पुढे आपण जाऊ त्या शहरात ही गंमत पाहायला, नगरपालिकेत जायचेच जायचे हे मी ठरवूनच टाकले.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com