
- वैभव वाळुंज
रणजीत गुहा यांचं लेखन आणि अभय खाखा यांच्या कवितांच्या सोबतीने माझ्या मनात ससेक्स विद्यापीठाचं नाव पहिल्यांदा रुजलं. एकाच परंपरेचे पाईक असणाऱ्या या दोन अभ्यासकांमुळे इंग्लंडचा अनोळखी कोपरा माझ्यासाठी परका राहिला नाही.
रणजीत गुहा हे इतिहासकारांच्या यादीतील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक. जगभरात वसाहतवादाने पिडल्या गेलेल्या विविध देशांमधील पर्यायी इतिहास लिहिण्याच्या प्रयत्नांची सुरुवात गुहा यांनी ससेक्समधून केली. जात, शेतकरी, आदिवासी आणि स्वतःच्या लेखनाचा वारसा नसलेल्या समाजाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न गुहा यांनी केला. जगभर त्यांच्या इतिहास लेखनाची पद्धती प्रसिद्ध झाली.
ब्रिटिशांनी आणि स्थानिक वसाहतवाद्यांनी पिडलेल्या जनतेला आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी करण्याचं अमोघ शस्त्र गुहा यांनी देऊ केलं. त्यांच्या कामातून सबाल्टन अर्थात निम्नवर्गीय किंवा निम्नस्तरीय इतिहासाची नवी शाखा तयार झाली. अंतोनियो ग्रामशीसारख्या काही तत्त्वज्ञांनी अशा स्वरूपाचं लेखन केलं असलं, तरी भारतीय संदर्भात त्याचा नवा अर्थ लावण्याचं काम गुहा यांनी केलं.
त्यासाठी त्यांना कुठल्याच तत्त्वज्ञानाचा आधार नव्हता. म्हणून आजही नववसाहतवादी व अतिवादी अभ्यासकांना गुहा यांचं लेखन त्यांच्या प्रतिगामी मार्गामध्ये मोठा अडसर वाटतो. एका अर्थाने डोक्यावर उभ्या असणाऱ्या इतिहासाला सरळ करून शोषितांच्या अस्तित्वाची वाट गुहांनी मोकळी करून दिली आणि अभय खाखांनी त्या इतिहासाला चालना दिली.
गुहा ससेक्समध्ये असताना जगभरातील अनेक विद्यार्थ्यांचा प्रवाह विद्यापीठाकडे वळला आणि अनेक जण आयुष्यभर येथेच राहिले. आजही त्यांच्या विद्यार्थ्यांमधील कित्येक प्राध्यापक इथेच इतिहास लेखनावर संशोधन करत आहेत. त्यांची पत्नी मेख्तहिल्ड हिच्याशी पहिली भेट ससेक्समध्येच झाली होती. आपल्या नव्या अभ्यासात कोणतीही कसूर न सोडणाऱ्या गुहा यांना विद्यापीठात तत्कालीन अधिष्ठाता डेव्हिड पीकॉक यांनी विरोध केला होता.
मात्र, त्याला कठोर उत्तर देताना गुहा यांनी कोणतीही भीड बाळगली नाही. ‘तुम्ही विद्यापीठाचे डीन असाल की स्वतः देव; पण तिसऱ्या जगातून येणारा एक अभ्यासक म्हणून आमच्या खंडांवर अत्याचार करणाऱ्या कुणीही आम्हाला इतिहासाचे धडे देणं मला आवडणार नाही’ असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. याच काळात ससेक्समध्ये शिकणाऱ्या होमी भाभा यांनी त्यांच्या अनेक आठवणी लिहून ठेवल्या आहेत.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील इतिहासकार डी. डी. कोसंबी यांच्या लेखनाला बंगाली भाषेत घेऊन जाण्याचं काम आपल्या विविध मुलाखतींमधून गुहा यांनी केलं. ससेक्समध्ये असताना त्यांनी अमूर्त चित्रकला काढण्याचाही प्रयत्न केला होता हे फार कमी जणांना माहीत आहे. गुहा आणि भारतातील आदिवासी इतिहासाच्या अशा व अनेक गोष्टी त्यांच्या स्मरणार्थ विद्यापीठात भरलेल्या श्रद्धांजली सभेत सांगितल्या गेल्या होत्या.
त्याच्यापुढे जात गुहा यांच्यामागोमाग खाखा यांनी आपल्या अभ्यासातून आणि संशोधनातून भारतातील आदिवासींची बाजू मांडायला सुरुवात केली. २०२० मध्ये झालेल्या सीएए आंदोलनात खाखा नावाच्या माणसाने पहिल्यांदा आपल्या कविता समोर मांडल्या. हे असं आडनाव, त्यात त्याचं ‘xaxa’ असं स्पेलिंग मला नवलाईचं वाटलं होतं. एव्हाना त्यांनी एकलव्य या आदिवासी पात्रावर चित्रपट काढायचं ठरवलं होतं. तेव्हा त्याविषयी मी लिहिलंही होतं.
खाखांनी ससेक्समध्ये येणं ही एक नवलाईची गोष्ट होती. एव्हाना सरकारी स्कॉलरशिप मिळाल्यानंतर ते कुठेही शिकू शकले असते. लंडनसारख्या महानगरातही त्यांना राहता आलं असतं; परंतु त्यांनी आपल्यासमोर मोठा दृष्टिकोन ठेवून या विद्यापीठाची निवड केली असावी, असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे या विद्यापीठाला असलेला रणजीत गुहा यांचा वारसा.
रणजीत गुहा ससेक्स विद्यापीठात कामाला होते आणि इथेच त्यांनी वसाहतवाद विरोधी तत्त्वज्ञानाची पायाभरणी केली. आज चलती असलेल्या हिंदू वसाहतवाद विरोधापेक्षा सापेक्ष व विवेकी मांडणीतून दलित आदिवासी गटांच्या उत्थानासाठी अभिप्रेत असणारा वसाहतवाद विरोध तत्त्वज्ञानाची पायाभरणी त्यांनी केली. त्यातूनच गायत्री स्पिव्हाक, एडवर्ड सैद, उमर खालिद, गणेश देवी इत्यादी अनेक अभ्यासक प्रेरणा घेऊन प्रसिद्धीस आले.
खाखा यांना या वारशाची जाणीव होती म्हणूनच त्यांनी ससेक्सची निवड केली असावी, असं मला वाटतं. ससेक्समध्ये असताना त्यांनी केलेल्या संशोधनातून पुढील काळात आदिवासी हक्कांसाठी लढणारे अनेक कार्यकर्ते तयार झाले. गुहा यांनी ज्या समूहांची बाजू मांडली, त्यातून स्वतः आलेल्या खाखा यांनी ‘निम्नस्तरीय लोकांचा आवाज’ आपल्या स्वतःच्या मांडणीत रचायला सुरुवात केली.
‘मी पेशाने समाजशास्त्रज्ञ आहे आणि मनाने आदिवासी कार्यकर्ता’ असं म्हणणाऱ्या अभय खाखा यांनी इतिहासाची उलटतपासणी करायला सुरुवात केली. शिष्यवृत्तीवर विद्यापीठात शिकण्यासाठी जाताना गणेश देवी यांनी खाखा यांची मुलाखत घेतली होती. ‘बिगरआदिवासी लोकांनी आमच्याविषयी नेमकं काय लिहून ठेवलं आहे, याची चाचपणी करण्यासाठी मला इंग्लंडला जायचं आहे,’ असं उत्तर त्यांनी या मुलाखतीत दिलं होतं.
प्रत्यक्षात आपल्या इतिहास लेखनात गुहा यांनी हेच काम केलं होतं. ससेक्स आणि इतर भागातील इंग्रज अधिकाऱ्यांच्या भारतातील वास्तव्यामध्ये केलेल्या नोंदी शोधून त्याच्या आधारावर आदिवासी समूहांचा इतिहास लिहिण्यात ते वाकबगार होते. गुहांचा हाच वारसा खाखांच्या रूपाने पुढे चालू राहिला. विद्यापीठात असताना त्यांनी जगातील विविध आदिवासी चळवळींचा अभ्यास केला, असं त्यांच्यासोबत शिकणारे लोक सांगतात.
परत आल्यानंतर अभय खाखा यांच्या मनामध्ये नवी ऊर्मी दिसत होती आणि त्यांनी आदिवासी हक्कांसाठी नव्या जोमाने लढा उभारला, असं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विविध व्यक्तीही सांगतात. संशोधकांमधील आदिवासी आणि आदिवासींमधील संशोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाखांच्या अकाली मृत्यूने चळवळीचे आणि संशोधनाचं झालेलं नुकसान केवळ कल्पनातीत आहे.
गुहा आणि खाखा यांच्या प्रेरणेतून अन् त्यांच्या लिखाणाच्या अभ्यासातून मला ससेक्समध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचा आधार घेत मला माझा अभ्यास व संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न मला करता आला. अर्थात, त्यांची परंपरा जपण्यामध्ये विद्यापीठाला तितकंसं यश आलं नाही, असं खेदाने म्हणावं लागतं.
काही कार्यक्रमांमध्ये त्यांची आठवण काढली जात असली तरी विद्यार्थ्यांना या परंपरेशी अवगत करून देण्यात भारतीय आणि इंग्लिश मंडळी कमी पडली आहेत, हे खरंच. गुहा यांचे लेखन आणि खाखा यांच्या कविता, तसेच या दोघांचं ससेक्समधील काम भारतीय भाषांमध्ये आल्यास त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. भारतातही त्यांच्या वारशाची दखल घेतली जात नाही आणि आज एका विशिष्ट विचारधारेच्या अभ्यासकांकडून त्यांना अकादमिक लेखनातही शिवीगाळ केली जाते व त्यांचा वारसा डावलण्याचा प्रयत्न केला जातो, हा आपला करंटेपणाच म्हणावा लागेल.
vaiwalunj@gmail.com
(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.