वर्णभेद कुठल्या वळणावर जाणार?

पहिल्या-वहिल्या भाषणात ऋषी सुनक यांनी यूकेच्या सरहद्दी अजून सुरक्षित बनवण्याची, निर्वासितांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्याच्या धोरणाची भलामण केली आहे.
rishi sunak
rishi sunaksakal
Summary

पहिल्या-वहिल्या भाषणात ऋषी सुनक यांनी यूकेच्या सरहद्दी अजून सुरक्षित बनवण्याची, निर्वासितांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्याच्या धोरणाची भलामण केली आहे.

- वैभव वाळुंज

पहिल्या-वहिल्या भाषणात ऋषी सुनक यांनी यूकेच्या सरहद्दी अजून सुरक्षित बनवण्याची, निर्वासितांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्याच्या धोरणाची भलामण केली आहे. या विषयावर आपण पक्के ब्रिटिश आहोत, हे सिद्घ करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे कदाचित आधीच्या सरकारांच्या काळात भारतीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती वाढण्याऐवजी घटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वर्णभेद वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.

आपल्या पिढीबाबत झालेले अपघात आपल्या मुलांची भाग्यध्येये बनतील...’ हा संवाद आहे इंग्लंडमधील स्थलांतरित कुटुंबावर बेतलेल्या ‘व्हाईट टिथ’ या कादंबरीत भांबावलेल्या परिस्थितीत असलेल्या पात्राचा. प्रवासी भारतीयांनी उराशी बाळगलेले ध्येय ऋषी सुनक यांच्या रूपाने वास्तवात येत आहे. आपल्यावर राज्य केलेल्या साहेबांच्या देशावर आता एका भारतीयाचं राज्य असणार आहे, हा सरळसोट निर्वसाहतीकरण झाल्याचा अनुभव पूर्वाश्रमी अपमानित झालेल्या नागरिकांना सुखावणारा आहे. मात्र हा बदल किती अर्थाने तिसऱ्या जगातील सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा असणार आहे?

विविध देशांमध्ये मोठमोठी पदे भूषविलेल्या भारतीयांच्या तिथे असण्याने वर्णभेदाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देऊ केली आहे. यातील बव्हंशी उदाहरणे ही परक्या भूमीवर नव्या जगाच्या व संधींच्या शोधात गेलेल्या पिढ्यांची मुलं होती. आपल्या व्यापारउदिमासाठी वंशवादाशी लढायचे आहे, या हेतूने पूर्व आफ्रिकेच्या बंदरांभोवती शेकडो वर्षांपासून राहणाऱ्या आणि त्यानंतर आपल्या वारशाचे बिऱ्हाड घेऊन रातोरात पलायन करावे लागलेल्या प्रवासी भारतीयांची एक समांतर परंपरा व पिढी तेव्हापासून अस्तित्वात आहे. सुनक हे त्या व्यापारीवर्गाचे प्रतिनिधी आहेत. ते गांधीजींच्या धोरणातील दरिद्रीनारायणाचे प्रतिनिधी नसून, ज्यांनी गांधीजींना आफ्रिकेत बोलावले त्या जागतिकीकरणाचे बारसे जेवलेल्या वर्गाचे प्रतिनिधी आहेत.

इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून नागरिकांचे लोंढे येथे येऊन राहिले. ‘अमेरिकन ड्रीम’च्या पूर्वसुरींच्या पंगतीत देशोदेशीच्या अर्थव्यवस्थांमधून एकत्रित झालेल्या स्वप्नाळू पिढ्यांनी आपापला वाटा दिला. या पिढ्या, आपापले देश व जन्मभूमी सोडून गेलेले प्रवासी लोक आपल्या आर्थिक व्यवहाराबाबत सावध असतात. सतत नवनव्या संधीच्या शोधात असतात. त्यासाठीच त्यांनी आपली नैसर्गिक भूमी त्यागलेली असते. परक्या देशाला एका पिढीच्या काळात आपले बनवून त्या समाजाशी सौहार्दाने राहण्यात त्यांची दमछाक होत असते. आपल्या तिसऱ्या जगातील नागरिकांचे विरत चाललेले पारंपरिक कापड फक्त ओळखीपुरते त्यांच्यासोबत असते. ऑक्सफर्ड आणि स्टॅनफर्ड अशा तत्कालीन भांडवली अर्थकारणाच्या अर्ध्वर्यू असणाऱ्या संस्थांमधून शिकलेल्या सुनक यांनी या दोन्ही ओळखींचा पुरेपूर वापर केला आहे. राजकारणामध्ये तुलनेने उशिरा पदार्पण केल्यानंतरही त्यांनी ब्रेक्झिटचं समर्थन, स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याविषयी सावध भूमिका घेऊन हुजूर पक्षाच्या धुरिणांवर आपली छाप पाडली. त्याच वेळी, आपले गव्हाळ असणे, हिंदू परंपरांचा उच्चरवाने संदर्भ सांगणे आणि त्याद्वारे दक्षिण आशियाई मतदारांमध्ये लोकप्रियता टिकवून धरण्याची दुहेरी कसरत सुनक यांनी लीलया करून दाखवली. वंशात्मक पातळीवर संवेदनशील झालेल्या पाश्चात्त्य जगात व्यापारीवर्गातील उदारमतवादी असण्याच्या आणि त्याच वेळी विविधतेचं प्रतीक बनण्याच्या शर्यतीत ते यशस्वी झाले आहेत.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका इतिहासातील वंशात्मक दृष्टीने सर्वाधिक वैविध्यपूर्ण होत्या. अवघ्या दहा वर्षांत श्‍वेतवर्णीयेतर खासदारांचे प्रमाण अडीच टक्क्यांवरून १२ टक्के इतके वाढले आहे. संसदेच्या या सत्रात जवळपास ५२ खासदार हे श्‍वेतवर्णीयेतर किंवा इतर वंशांचे आहेत यावरून इथल्या वाढत्या विविधतेचा अंदाज यावा. नागरिकांनीही या बदलांचे स्वागत केले आहे. फक्त सत्ताधारी नव्हे, तर विरोधी बाकांवरही झारा सुलतानासारखे खासदार मुख्य चेहरा बनले आहेत. या वैविध्यपूर्ण संस्कृतीला सामावून घेईल, असा चेहरा पंतप्रधानपदावर येणे ही काळाची गरज होती. विकसनशील, विशेषतः आशियाई देशांतून येणाऱ्या राजकारण्यांनी वर्षानुवर्षे इंग्लंडमध्ये हे काम उत्तमरीत्या बजावले आहे. दादाभाई नौरोजी यांनी अगदी १८९२ मध्ये इंग्लंडमधून निवडणूक जिंकल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासात भारतीय व दक्षिण आशियाई नेत्यांनी आपला स्वतःचा वेगळा मतदारवर्ग निर्माण केला आहे. म्हणूनच जगातील जवळपास ३०० भाषा बोलल्या जाणाऱ्या लंडन शहरात २०१६ पासून सादिक खान हे आशियाई वंशाचे माजी खासदार महापौरपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

अर्थात याचा फायदा या लोकांच्या मुख्य भूमीला किती झाला, याचा कानोसा घेतला, तर उत्तर नकारात्मकच येते. ज्याप्रमाणे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अनेक आफ्रिकन देशांना विकासाची अपेक्षा होती. त्यामुळे आफ्रिकी राष्ट्रवाद व अभिमान रुजण्यास मदत झाली खरी; मात्र संसाधने व विविध तंत्रज्ञानाच्या प्रसाराबद्दल ती अपेक्षा फोलच ठरली. सध्या सुनक यांच्या मंत्रिमंडळात गृहसचिव असणाऱ्या भारतीय वंशाच्या सुइला ब्रेव्हमन यांनी तर काही दिवसांपूर्वी भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत जाणाऱ्या लोंढ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात स्वतः सुनक यांनी यूकेच्या सरहद्दी अजून सुरक्षित बनवण्याची, पोलिससंख्या वाढवण्याची आणि निर्वासितांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्याच्या धोरणाची भलामण केली आहे. या विषयावर मौन पाळणाऱ्या अनेक खासदारांना सुनक यांनी प्रश्न विचारून आपण पक्के ब्रिटिश आहोत आणि हुजूर पक्षाच्या ‘ब्रिटिशांसाठी ब्रिटन’ धोरणाचे पुरस्कर्ते आहोत, हे सिद्घ करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे कदाचित इतर सरकारांच्या काळात भारतीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती वाढण्याऐवजी घटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वर्णभेद वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.

निवडून आलेले बव्हंशी आशियाई खासदार हे अगदी शेवटच्या मिनिटाच्या नामांकनातून पक्षाला सुरक्षित वाटणाऱ्या मतदासंघातून होते. त्यामुळे एकीकडे देशाला शक्यतो श्वेत आणि ‘ब्रिटिश’ ठेवावे या भावनेतून झालेली ब्रेक्झिट आता गोष्टी बदलू शकते. भारत आणि युके हे त्यानंतरच्या काळात व्यापारी तत्त्वावर एकमेकांच्या कधी नव्हे, इतके जवळ आले आहेत. या देशांमध्ये होऊ घातलेल्या व अनेक तज्ज्ञांच्या भुवया उंचावणाऱ्या व्यापारी करारावर सुनक यांच्या निवडीचा सकारात्मक परिणाम व्हावा, अशी दोन्हीकडील नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, मागच्या दोन पंतप्रधानांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या देशांतर्गत व पक्षांतर्गत अशा दोन्ही विरोधकांना शांत करण्यात सुनक कितपत यशस्वी ठरतात, यावर ही समीकरणे अवलंबून असतील. वाढत्या वीजबिलांचा सामना करणाऱ्या वर्गाला दिलासा देणे, मात्र त्याच वेळी संसदेला घेराव घालणाऱ्या पर्यावरणप्रेमी जनतेला शाश्वत ऊर्जेचे दिलेले आश्वासन पाळणे, अशा रस्सीखेच धोरणांतून मार्ग काढणे हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान आहे.

सुनक यांच्या निमित्ताने आर्थिक यश हेच राजकीय यशाचे गमक ठरण्याचा भ्रामक आणि भयानक फॉर्म्युला काही अंशी का होईना, मागे पडला आहे. अर्थात उदार अर्थशास्त्रींचे आवडते नेतृत्व म्हणून सुनक यशस्वी ठरतीलही, पण एकेकाळी ‘मला मजूर वर्गातील एकही मित्र नाही’ हे अभिमानाने सांगणाऱ्या व्यक्तीकडून आपण अवास्तव अपेक्षा ठेवत आहोत का, याचा विचार व्हायला हवा. अर्थातच, ब्रिटनमधील राजकारणदेखील प्रतिमांचे राजकारण बनले आहे. आपल्या नोकराची गाडी पेट्रोल पंपावर नेऊन स्वतःला साधे दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा अनुभव सुनक यांच्या पाठीशी आहे. आता खुशवंत सिंग यांच्या गोष्टींमधल्या वरून गव्हाळ आणि आतून पांढरे असणाऱ्या ‘नारळी भारतीयत्वाची’ खरी कसोटी लागणार आहे.

(लेखक सध्या यूके सरकारच्या वतीने ‘गव्हर्नन्स आणि धोरणनिर्मिती’ या विषयात आयडीएस येथे पदव्युत्तर संशोधन करत आहेत. यापूर्वी त्यांनी संसदेत तसेच निती आयोगात फेलो म्हणून काम केले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com