सौंदर्याची व्याख्याच नको 

वनिता खरात saptrang@esakal.com
Sunday, 10 January 2021

भूमिका
एका फोटोशुटमळे प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात चर्चेत आली. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली. का केलं तिनं हे फोटो शूट ? आणि यामागची संकल्पना काय होती? सौंदर्याबाबतच्या रुढ कल्पनांना फाटा देणाऱ्या या फोटो शूटबद्दल थेट तिची भूमिका

आपल्याला लहानपणापासून परीचं आकर्षक चित्र दाखवून मनात तसेच डोक्‍यात लहानपणापासून सौंदर्याची एक विशिष्ठ व्याख्या घट्ट रुजवली आहे. परंतु सौंदर्य नक्की कशात आहे, हे सांगितलंच गेलं नाही. नग्नता हा शुद्ध फॉर्म आहे. सौंदर्याची व्याख्या बदलणं आणि बॉडीची पॉझिटिव्हिटी सांगण्यासाठीच फोटोशूट केले.

कलाकार म्हणून वेगवेगळी आव्हानं स्वीकारायला मला स्वतःला खूप आवडतं आणि हे फोटो शूट करण्यामागं त्यांची भूमिका खूप चांगली होती. त्यातील संकल्पना, विचार खूप चांगला होता. म्हणून हे फोटो शूट करावंसं वाटलं. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे यांची ही संकल्पना आहे. एका ‘कॅटलॉग’ साठी हे फोटो शूट करण्यात आले. जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ भरत दाभोळकरही यात सहभागी आहेत. समाजात जी सौंदर्याची व्याख्या आहे, ती कुठतरी ब्रेक झाली पाहिजे, ही यामागची मुख्य संकल्पना आहे. ती मला मनापासून पटल्यानं हे फोटो शूट केले आहे. या शूटच्यावेळी मला कोणतीच अडचण आली नाही. फोटो शूटबाबत घरच्यांना सांगितले, त्यावेळी ते काय बोलतील याची मला थोडीशी भीती वाटली होती. कारण मी मध्यमवर्गीय म्हणजे चाळीतील मुलगी आहे. परंतु मी या शूटसंबंधी सांगितल्यावर आई-बाबांनी अत्यंत शांतपणे त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘ काही हरकत नाही, हा तुझ्या कामाचा भाग असू शकतो. फोटो दाखविल्यावरही तितक्‍याच शांतपणानं त्यांनी त्यांची मत व्यक्त केली.‘‘ छान फोटो आला आहे, त्याच्या मागचा विचार खूप चांगला आहे,’’ असं आईनं सांगितल्यावर मला कशाचीच चिंता राहिली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे फोटो प्रसिद्ध होण्यापूर्वी कसलीही विशिष्ट स्वरुपाची प्रतिक्रिया मी अपेक्षित धरली नव्हती. कारण मलाही माहीत नव्हतं काय प्रतिक्रिया येतील. या शूटबद्दल नकारात्मक की सकारात्मक प्रतिक्रिया आणि त्या कशा येतील याबद्दल मला काहीच अंदाज नव्हता. परंतु सकारात्मक प्रतिक्रियाच इतक्‍या आल्या की नकारात्मक प्रतिक्रियांचा मी विचारच करू शकले नाही. फोटो शूट मागची संकल्पना त्यामागचा जो ठाम विचार होता, तो मला इतका आवडला होता की, काहीही प्रतिक्रिया आली तरी मी ते केल्याचं मला सर्वाधिक समाधान होतं. 

या फोटो शूटच्या प्रसिद्धीनंतरच्या प्रतिक्रिया खूपच मजेदार आणि सकारात्मक होत्या. खरंतर अशा सकारात्मक प्रतिक्रिया येतील हे देखील मला अपेक्षित नव्हतं. आमच्या मनोरंजन इंडस्ट्रीतील मोठमोठ्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली. सर्वसामान्य लोकांनी मला खास संदेश पाठवून सांगितले की तुम्ही हे उत्तम पाऊल उचलले आहे. आणि यामध्ये पुरुषवर्ग जास्त संख्येने आहे, हे मी आवर्जून नमूद करू इच्छिते. खूप जणांनी मला संदेश पाठवून, तर काहींनी थेट फोन करून उत्तम केल्याचं सांगितलं. हे सगळं करताना, ऐकताना असं वाटतं की आपण जिथं राहतो तिथं बदल घडत आहेत. तेच मला अपेक्षित होतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मनोरंजनाच्या क्षेत्रात जेंडरबाबत दिखाऊपणाचा अनुभव मला तरी अजून आलेला नाही. माझा तरी अनुभव खूपच चांगला होता. त्या अनुभवाच्या जोरावरच मी हे सगळे करू शकले. किंबहुना त्यामुळं वेगळं करण्याचा आत्मविश्‍वास माझ्यामध्ये निर्माण झाला. जेंडरबायसचे काही तुरळक अनुभव असतील परंतु ते सर्वच क्षेत्रात असतात. बदल सगळीकडेच घडत आहेत. त्यात पुरुषांनी आणि महिलांनीही मला संदेश पाठवले आहेत हे संदेश म्हणजे बदल घडविणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधी आहेत असं मला वाटते. 

विनोदाच्या क्षेत्रात आपण काम करताना महिलांशी निगडित विनोदांवर माझं असं मत आहे की महिला म्हणून आपण स्वतःला का वेगळं करून घेत आहोत. विनोद सर्वांवरच होतात. आणि झाले नाहीत तर आपण हसत हसत कसं जगणार आणि हसविण्याचा धंदा आहे आमचा. त्यामुळं अभिनय करताना किंवा एखादे स्कीट सादर करताना आम्ही त्याकडे सकारात्मक म्हणजे कलेच्या दृष्टीनंच पाहतो आणि ते तेवढ्या पुरतेच मर्यादित असते. ते केवळ विनोद म्हणून स्वीकारणं जास्त गरजेचं आहे. अर्थात शारीरिक बाबींवर विनोद योग्यच नाहीत. ती मी बाजूला ठेवलेली गोष्ट आहे. 

मुळात सौंदर्याची ठरावीक व्याख्याच का असावी ? सौंदर्य नजरेतलं असावं असं मला वाटतं. सौंदर्याची ठराविक व्याख्या करून आपण त्याला मर्यादित करतो. मुळात एखाद्या गोष्टीची व्याख्या केली की त्याला मर्यादा येतात. सौंदर्य कशातही दिसू शकते. त्याची व्याख्या नसावी. 

अभिनय आणि सौंदर्य यामध्ये ‘आणि’ आहे ना, तो काढून टाकून अभिनयातलं सौंदर्य बघावं असं मला वाटते. सौंदर्य आणि अभिनय वेगळा असं नसावं. आपण ‘सो कॉल्ड'' सुंदरता म्हणतो, ते काही नसतानाही अनेकांनी अभिनयातून सौंदर्य दाखविले. त्यांच्या अभिनयातील सुंदरता आपल्याला आवडते म्हणून तो कलाकार आपल्याला आवडतो. त्यामुळे अभिनयातील सौंदर्य असावे असे मला वाटते.  आपल्या शरीराचे आपल्याला कौतुक वाटायलाच पाहिजे. याला आपण बॉडी पॉझिटिव्हिटी म्हणू शकतो. महिला आणि पुरुष हे दोनच वर्ग आपल्या समाजात नाहीत. आपल्याकडे तिसरा वर्गही आहे, त्या वर्गाला आपल्यामध्ये सामील करणे आवश्‍यक आहे. त्या वर्गालाही आपल्या शरीराचे कौतुक वाटणे गरजेचे आहे. आणि ते निश्‍चितच वाटत असेल असे मला वाटते. 

महिलांच्या शरीराकडं पाहण्याच्या समाजाच्या दृष्टीबद्दल मी माझ्या फोटोवरूनच उदाहरण देते. माझ्या फोटोकडं सुंदरतेनं पाहणारा वर्गही आहे आणि आणि त्यात फक्त नग्न शरीर म्हणून पाहणारा वर्गही आहे. परंतु मला असं वाटतं की त्याच्यातलं सौंदर्य बघणारा वर्ग आहे, तो खूप जास्त आहे. हा आपल्या समाजातला बदल आहे. हेच समाजाचं बदलतं रूप आहे आणि ते काळानुरूप बदलत राहील असं मला वाटतं.
(शब्दांकन : आशिष तागडे )

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanita Kharat Writes about Beauty definition