'अनुपम' पर्यावरणतज्ज्ञ

'अनुपम' पर्यावरणतज्ज्ञ

अनुपम मिश्र यांचं लेखन, त्यांची वाणी, त्यांची निसर्गविषयक भूमिका, त्यांचा भारतीय परंपरेबाबतचा दृष्टिकोन, समाजाशी स्वतःला सहज जोडून घेण्याची मानसिकता, अत्यंत निष्ठेनं आणि शांतवृत्तीनं अखंड काम करत राहण्याचा स्वभाव या सगळ्यांमध्ये त्यांची स्वतःची अशी एक स्वयंस्फूर्तता आणि जबरदस्त अंतःप्रेरणा होती. पत्रकार, लेखक, गांधीवादी विचारवंत, पर्यावरणतज्ज्ञ या सगळ्या भूमिकाही त्यांच्यात अशा एकवटल्या होत्या, की या सगळ्या सकस रसायनातून आकाराला आला होता तो अतिशय साधा, निगर्वी, ज्ञानी आणि जमिनीवर पाय असणारा एक नितळ माणूसच!
 

अनुपम मिश्रांशी माझा थेट संपर्क कधी आला नाही. दोन वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एक कार्यक्रमात त्यांची ओळख झाली होती इतकंच. पण तीही अगदी चुटपुटती भेट होती. अर्थात वीस-बावीस वर्षांपूर्वी ‘आज भी खरे है तालाब’ आणि ‘राजस्थान की रजत बूँदे’ ही त्यांची दोन्ही पुस्तकं वाचली होती, त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती आणि त्याच वेळी एका वेगळ्याच अंतरऊर्मीनं मी त्यांच्याशी जोडले गेले होते. पर्यावरणविषयक चळवळींमध्ये मी प्रत्यक्ष उतरले नसले, तरी माझ्या परीनं या विषयाचा अभ्यास आणि लेखन या गोष्टी चालू राहिल्या. त्यामुळं नंतरही त्यांच्याविषयी, त्यांच्या जलसंधारणाच्या क्षेत्रातल्या कामाविषयी जमेल तेवढं वाचत राहिले मी. आणि कळत-नकळत त्यांच्या लेखनाचा, त्यांच्या लेखनशैलीचा आणि पर्यावरणाच्या प्रश्नांकडं, विशेषतः पाण्याच्या प्रश्नाकडं पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीचा एक खोल ठसा माझ्या मनावर उमटत राहिला.

अनुपम मिश्र गेल्यावर (निधन : १९ डिसेंबर) आज त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या कामाचा विचार मी पुन्हा एकदा करते आहे आणि काही गोष्टी ठळकपणे जाणवताहेत. अनुपमजींचा जन्म वर्ध्याचा; या अर्थी ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते, असं मी म्हणणार नाही. एक तर त्यांचं वास्तव्य आणि कार्यक्षेत्र हे प्रामुख्यानं उत्तर भारतात राहिलं. शिवाय कुठल्याच अंगानं असे कप्पे करण्याजोगं अनुपम मिश्रांचं व्यक्तिमत्त्व नव्हतं. त्यांचे वडील भवानीप्रसाद मिश्र हे हिंदीतले उत्तम कवी आणि लेखक होते. लेखन आणि गांधीविचारांचा वारसा त्यांना घरातून मिळाला, असंही मी म्हणणार नाही. कारण त्यांचं लेखन, त्यांची वाणी, त्यांची निसर्गविषयक भूमिका, त्यांचा भारतीय परंपरेबाबतचा दृष्टिकोन, समाजाशी स्वतःला सहज जोडून घेण्याची त्यांची मानसिकता, त्यांचा विलक्षण सेवाभाव आणि कुठल्याही आविर्भावाशिवाय, अत्यंत निष्ठेनं आणि शांतवृत्तीनं अखंड काम करत राहण्याचा त्यांचा स्वभाव या सगळ्यामध्ये अनुपमजींची स्वतःची अशी एक स्वयंस्फूर्तता आणि जबरदस्त अंतःप्रेरणा होती. पत्रकार, लेखक, गांधीवादी विचारवंत, पर्यावरणतज्ज्ञ या सगळ्या भूमिकाही त्यांच्यात अशा एकवटल्या होत्या, की या सगळ्या सकस रसायनातून आकाराला आला होता तो अतिशय साधा, निगर्वी, ज्ञानी आणि जमिनीवर पाय असणारा एक नितळ माणूसच!

एका हिंदी दैनिकात त्यांनी सुरवातीचा काही काळ काम केलं; पण त्यांच्यासाठी ही नोकरी नव्हती. विनम्र सेवकाच्या भूमिकेतूनच ते पत्रकारिता करत राहिले. लोकशाहीचा चौथा स्तंभ या वृत्तपत्रांच्या भूमिकेला पूरक अशारीतीनं, स्वतः क्षेत्रांत जाऊन, अभ्यास करून ते वार्तांकन करायचे. वार्तांकनाची त्यांची शैलीही अतिशय संयत आणि खुसखुशीत अशी होती. खरं तर हिंदी पत्रकारितेला त्यांचं हे मोठं योगदानच होतं. मात्र, पत्रकारितेतलं ग्लॅमर आणि पैसा या गोष्टी अनुपमजींना बांधून ठेवू शकणार नव्हत्या. त्यामुळं लगेचच त्यांनी मुक्तपत्रकारितेची वाट धरली आणि सोबत गांधी शांती प्रतिष्ठानच्या प्रकाशनांची जबाबदारीही स्वीकारली. तेव्हापासून अगदी शेवटपर्यंत ते या संस्थेशी वेगवेगळ्या भूमिकांमधून जोडलेले राहिले.

पत्रकारिता, लेखन आणि पर्यावरणतज्ज्ञ या अनुपमजींच्या भूमिका परस्परांत कायम मिसळलेल्या राहिल्या. भारतीय पर्यावरणवादाचं ठळक प्रतीक मानलं जाणाऱ्या ‘चिपको’ आंदोलनाला चामोलीतून बाहेर काढलं ते अनुपमजींनीच. आपल्या वार्तांकनाद्वारे त्यांनी दिल्लीतल्या राज्यकर्त्यांना या आंदोलनाची जाणीव करून दिली. एक प्रकारे या आंदोलनाला त्यांनीच दिशा दिली. त्यांच्या या लेखनामुळं भारतीय पर्यावरणाच्या प्रश्नांची जाणीव प्रथमच देशातल्या सर्वसामान्य माणसाला झाली आणि या आंदोलनाची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. भारतीय पर्यावरण चळवळीचा आत्मविश्वास यामुळं कित्येक पटींनी वाढला आणि तिला नैतिक बळ मिळालं. १९८०च्या दशकाच्या प्रारंभी राजस्थानातल्या कुरणांच्या संरक्षणासाठी चळवळ उभी करण्याच्या निमित्तानं अनुपमजींचा मरुभूमीशी जवळून संबंध आला. देवरायांप्रमाणेच देवाच्या नावानं राखलेल्या या कुरणांमध्ये चराईवर कडक निर्बंध असल्यामुळं ती पिढ्यान्‌पिढ्या टिकून राहिली होती. ती नष्ट होऊ नयेत, म्हणून स्थानिक लोकांना एकत्र आणण्यासाठी अनुपमजींनी पुढाकार घेतला होता. मरुभूमीशी त्यांचं घट्ट नातं जोडलं गेलं ते या निमित्तानं. १९८७च्या दुष्काळात या प्रदेशात त्यांनी पुष्कळ भटकंती केली. ज्या गावांनी आपल्या परंपरागत जलसंचय योजना टिकवल्या आहेत, तिथं दुष्काळाची तीव्र झळ लागलेली नाही; मात्र सरकारी पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असणाऱ्या गावांत फार बिकट स्थिती निर्माण झाली आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. अनेक गावांना भेटी दिल्यानंतर, तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर अनुपमजींच्या लक्षात आलं, की आधुनिक जलव्यवस्थापन पद्धतींविषयीच्या केवळ धोरणांमध्ये किंवा त्यांच्या अभियांत्रिकी बाजूमध्ये दोष नसून पाण्यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडित असलेली भारतीय भूमीवरची जी तत्त्वज्ञानात्मक जाणीव आहे, तिच्या अभावामुळं पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे; मग राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि भारतातल्या इतरही अनेक ठिकाणच्या असंख्य गावांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी पाहिलं, की पाणी साठवण्याच्या आणि त्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनेक पारंपरिक पद्धती काळाच्या कसोटीवर उतरल्या आहेत, त्यांनी हजारो वर्षं इथल्या जगण्याला आणि संस्कृतीला बळ दिलं आहे आणि इतकी वर्षं कुठल्याही सरकारी अथवा तांत्रिक पाठबळाची गरज त्यांना लागलेली नाही. या व्यवस्था त्या त्या ठिकाणच्या समूहांच्या जगण्याच्या, त्यांच्या आशा-आकांक्षांच्या आणि त्यांच्या धर्माच्या विणीचा एक आवश्‍यक धागा होऊन राहिलेल्या त्यांना दिसल्या. अनुपमजींनी या सगळ्या पारंपरिक जलव्यवस्थापन पद्धतींचं दस्तावेजीकरण केलं. त्यांच्या या संशोधन यात्रेतूनच ‘आज भी खरे है तालाब’ आणि ‘राजस्थान की रजत बुंदे’ ही पुस्तकं निर्माण झाली. या पुस्तकांचं संशोधनात्मक मूल्य आणि पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोताकडं पाहण्याचा दृष्टिकोन जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढीच त्यातली अतिशय प्रवाही आणि ललित सुंदर लेखनशैली लोभस आहे.

‘आज भी खरे है तालाब’चे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आणि या पुस्तकातून प्रेरणा घेऊन देशभरात ठिकठिकाणी हजारो तळी, तलाव, कुंडं पुनरुज्जीवित झाली; पण अनुपमजींच्या या कामाचं सर्वात मोठं यश म्हणजे पर्यावरण चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पाणी प्रश्नाकडं बघण्याची नवी दृष्टी मिळाली. खूप पैसे खर्च करून पाण्यासाठी नव्या अभियांत्रिकी योजना उभ्या करण्यापेक्षा वर्षानुवर्षं चालत आलेल्या परंपरागत जलसंचय यंत्रणा पुन्हा कार्यरत करण्याच्या आणि एकूणच पाणी प्रश्नावर स्थानिक परिस्थितीनुसार सोपे, कमी खर्चिक उपाय शोधण्याच्या विचारांना आणि अनेक प्रयोगांना या पुस्तकामुळं चालना मिळाली. या विचारानं प्रेरित झालेले अनेक तरुण कार्यकर्ते देशभरात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय झाले. गांधीवादावर नुसती भाषणं देण्यापेक्षा त्याच्या कक्षा रुंदावून एकविसाव्या शतकात त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याचं फार मोठं काम जलव्यवस्थापनाच्या परंपरागत पद्धतींच्या पुनरुज्जीवनाद्वारे अनुपम मिश्र यांनी केलं आहे. विद्रोह किंवा विरोधापेक्षा आयुष्यभर पुनर्रचनेवर त्यांनी दिलेला भरही गांधीविचार अधोरेखित करणाराच आहे. पारंपरिक ज्ञानाला आधुनिकतेच्या प्रकाशात उजळवणारी अनुपमजींची ही दृष्टी भारतीय निसर्ग-पर्यावरणाला आणि ग्रामीण समूहांनाही आश्वस्त करणारी आहे. काळाचा पदर भेदत आलेल्या लोकश्रद्धा अमूल्य नैसर्गिक संपत्तीचं संरक्षण-संवर्धन करत असतील, तर आज भारतीय निसर्ग वाचवण्यासाठी त्या श्रद्धा पुन्हा जागवल्या-जपल्या पाहिजेत, असं एका बाजूनं कार्यकर्त्यांना सांगताना त्यांनी दुसऱ्या बाजूनं स्थानिक समूहांच्या क्षमतांवर, त्यांच्याजवळच्या मौखिक ज्ञानावर आणि त्यांच्या भलेपणावर विश्वास ठेवत त्यांच्या हातातली पारंपरिकतेची काठी आणखी बळकट केली. त्यांचं जगणं सुस्थिर केलं.

‘पर्यावरणाच्या रक्षणासाठी पैशाची किंवा संस्थांची गरज नसते, लोकांच्या मनात त्यांच्या परंपरांविषयी विश्वास जागवणं आणि त्या परंपरा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं महत्त्वाचं आहे,’ असं अनुपम मिश्र यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. हे काम ते स्वतः आयुष्यभर करत राहिले. अनेक सरकारी समित्यांवर काम करण्यासाठी त्यांना बोलावणी आली; पण ती न स्वीकारता जलसंधारणाच्या व्रतासाठी त्यांनी स्वतःला कुठलाही अभिनिवेश न बाळगता आणि कोणताही गाजावाजा न करता वाहून घेतलं. ज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नसते, असं मानणाऱ्या अनुपमजींनी आपल्या आणि वडिलांच्या सगळ्या पुस्तकांचे कॉपीराइट्‌सही मुक्त केले होते.

‘भारताला शाश्वत भविष्याच्या दिशेनं जायचं असेल, तर पाणी हीच महत्त्वाची साधनसंपत्ती आहे आणि ती जपली पाहिजे,’ हा त्यांचा संदेश, त्यांचीच दृष्टी आत्मसात करून प्रत्यक्षात आणणं, हीच अनुपम मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com