- अजेय दळवी, ajeydalvi2@gmail.com
आविर्भावविरहित व्यक्तिमत्त्व असलेले चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावर जे. कृष्णमूर्ती, रमणमहर्षी, तसंच बौद्धदर्शन, जैनदर्शन आणि झेन तत्त्वज्ञान यांचा प्रभाव होता. जगभर पाश्चिमात्य चित्रतंत्राचा अनुनय सुरू असताना गायतोंडे मात्र पौर्वात्य दर्शनशास्त्राच्या आधारे, मौनातून साधणारी विचारशून्य शांतता त्यांच्या रंगलेपनाद्वारे कॅनव्हासवरच्या भावावकाशात साकारत होते. त्यांच्या चित्रांमधले आकार प्रस्थापित अर्थानं अनोळखी असले तरी त्यांमधले रंग आणि त्यांची हाताळणी देशीयतेचा सहज अनुभव देते. अशी चित्रं काढून ते त्या काळातली भारतीय अमूर्त चित्रशैली संपन्न करत होते.