ओळख पुराणांची

नारद उत्तरले की पाचवा वेद मानली जाणारी इतिहास पुराणे आपल्याला ज्ञात आहेत
ved Puranas history  ancient texts ramayana mahabharat
ved Puranas history ancient texts ramayana mahabharat sakal

- विवेक देबरॉय

पुराणांची तोंडओळख करून देणारे हे नवे पुराण आजपासून सुरू करतोय. आपल्यापैकी अनेकांना पुराणे माहीत असतात. त्यातील कथाही पुन्हापुन्हा सांगितल्या जातात. तरीही अशी ओळख करून देणे आवश्यक वाटते.

शब्दार्थ सांगायचा तर पुराण म्हणजे जुने, प्राचीन. पुराणे हे प्राचीन ग्रंथ आहेत. बहुदा त्यांचा उल्लेख ‘इतिहास’ या शब्दाला जोडून होतो. इतिहास हा शब्द प्रथम केवळ ‘महाभारता’ ला उद्देशून वापरला गेला. नंतर त्यात रामायणाचाही अंतर्भाव झाला.

इतिहास-पुराण हे दोन्ही मिळून पाचवा वेद मानले जातात. कारण चारही वेदांचे सार त्यात लोकांना रुचेल अशा रुपबंधात आले आहे. छांदोग्य उपनिषदात एक कथा आहे. एकदा नारद मुनी ज्ञानप्राप्तीच्या हेतूने सनतकुमार नावाच्या ऋषीपाशी गेले.

कोणताही शहाणा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासून पाहिल्याशिवाय शिकवायला सुरुवात करत नाही. त्याप्रमाणे सनतकुमारांनीही तुला कोणकोणत्या गोष्टी माहीत आहेत असा प्रश्न नारदांना विचारला.

यावर नारद उत्तरले की पाचवा वेद मानली जाणारी इतिहास पुराणे आपल्याला ज्ञात आहेत. यातील ‘इतिहास’ म्हणजे रामायण-महाभारत हे ग्रंथ बहुतेकांच्या चांगल्याच परिचयाचे असल्याने या सदरात मी केवळ पुराणांवरच भर देऊ इच्छितो.

याचा अर्थ नारदांनी उल्लेख केलेली पुराणे म्हणजे आज आपल्यासमोर असलेले पुराणग्रंथच होत असे मुळीच म्हणता येणार नाही. यासंदर्भात, एक लोकधारणा आपण नीट ध्यानी घ्यायला हवी. दर द्वापारयुगात एक वेदव्यास अवतरतो.

तो वेदांची पडताळणी करून त्यांची पुनर्मांडणी करतो. त्यामुळेच तर वेदव्यास अशी उपाधी त्यास दिली गेली आहे. ब्रह्माच्या एका दिवसाला “कल्प” असे म्हणतात. एक कल्प उलटले की महाविनाश घडतो. ब्रह्माचा हा एक दिवस एक हजार महायुगांचा मिळून बनलेला असतो.

या एक हजार युगातच चौदा मन्वंतरे घडतात. प्रत्येक महायुग हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा चक्रातून जाते. सत्ययुग चार हजार वर्षांचे, त्रेतायुग तीन हजार वर्षांचे, द्वापारयुग दोन हजार वर्षांचे तर कलियुग एक हजार वर्षांचे असते.

याशिवाय यातील सत्य आणि त्रेता, त्रेता आणि द्वापार अशा प्रत्येक दोन युगात मध्यंतरीची काही वर्षे असतात. हा मधला काळ एकूण दोन हजार वर्षांचा असतो. त्यामुळे प्रत्येक महायुग एकंदर बारा हजार वर्षांचे असते आणि ब्रह्माच्या एका दिवसात अशी तब्बल एक हजार महायुगे असतात. मला वाटते बऱ्याच लोकांना हे कालमापन माहीत असावे.

परंतु मन्वंतरांनी मोजले जाणारे दुसरे समांतर कालमापन त्या मानाने कमी प्रमाणात ज्ञात असते. एकेका मनूच्या अधिपत्याखाली व्यतीत होणाऱ्या काळाला मन्वंतर म्हणतात. आणि ब्रह्माच्या एका दिवसात अशी चौदा मन्वंतरे घडतात.

म्हणजे ढोबळपणे सांगायचे तर एका मन्वंतरात ७१. ४ महायुगे असतात. सद्यकाळातील कल्प हे वराहकल्प किंवा श्वेतवराह कल्प म्हणून ओळखले जाते. आपण पूजेला बसतो तेव्हा पुरोहिताच्या तोंडून वराह कल्प आणि वैवस्वत मन्वंतर हे शब्द आपल्या कानीं पडतात. सध्या आपण वैवस्वत नावाच्या सातव्या मन्वंतरात आहोत.

दुसऱ्या भाषेत सांगायचं तर आपण सध्या अठ्ठाविसाव्या महायुगात आहोत. म्हणजे या चालू कल्पात आजवर सत्तावीस वेदव्यास होऊन गेलेले आहेत. त्या सर्वांच्या नावाचा उल्लेख पुराणात आहे. आपण वेदव्यास हे नाव ऐकतो तेव्हा सर्वसाधारणत: आपल्या डोळ्यासमोर पराशराचा पुत्र किंवा धृतराष्ट्र आणि पांडू यांचा पिता असलेला वेदव्यास येतो. वेदव्यास ही त्यांची उपाधी होती.

कृष्णद्वैपायन हे त्यांचे खरे नाव होते. ते रंगाने काळे होते आणि त्यांचा जन्म एका द्वीपावर झाला होता म्हणून त्यांचे नाव कृष्णद्वैपायन ठेवले गेले. सर्वसाधारण समजूत याच्या उलट आहे. त्याकाळात काहीच लिखित स्वरूपात नव्हते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सर्व काही मौखिक स्वरूपात संप्रेषित होई.

या संहिता थोड्याफार प्रमाणात निश्चित होण्यापूर्वीच्या काळात त्यांत काही भर पडत गेली. महाभारत कथांबरोबरच त्याला समांतर पुराणकथाही त्याच वेळी अस्तित्वात होत्या अशी दाट शक्यता गृहीत धरता येते. या दोन्ही कथा गुरूकडून शिष्याकडे मौखिक परंपरेने येत राहिल्या. तत्कालीन संहिता आज आपल्याला उपलब्ध संहितांशी तंतोतंत जुळणाऱ्याच कशा असतील?

महाभारत पुराणांअगोदर लिहिले गेलेले नाही. किंवा पुराणेही महाभारतापूर्वी लिहिली गेलेली नाहीत. त्यांची रचना समांतरपणे झालेली आहे. हां, आज आपल्यासमोर असलेली महाभारताची अंतिम संहिता, आज आपल्या समोर असलेल्या पुराणांच्या अंतिम संहितेपूर्वी लिहिलेली असू शकेल ही गोष्ट वेगळी.

एकूण पुराणे किती आहेत? काही प्रमुख पुराणे आहेत. त्यांना महापुराणे म्हणतात. काही कमी महत्त्वाची पुराणे आहेत. त्यांना उपपुराणे म्हणतात. दोन्ही प्रकारची प्रत्येकी अठरा पुराणे आहेत असे मानले जाते. या उपपुराणांची यादी देशातील प्रत्येक भागात काहीशी वेगळी वेगळी दिसते. महापुराणांची यादी मात्र आता जवळपास प्रमाणीकृत झालेली आहे.

तरीही थोडाफार बदल इकडे तिकडे दिसतो. ती अठरा महापुराणे पुढीलप्रमाणे: (१)अग्नी (१५४००); (२) भागवत (१८०००); (३) ब्रह्म (१००००); (४) ब्रह्माण्ड (१२०००); (५) ब्रह्मवैवर्त (१८०००); (६) गरुड (१९०००); (७) कूर्म (१७०००); (८) लिंग (११०००); (९) मार्कंडेय (९०००); (१०) मत्स्य (१४०००); (११) नारद (२५०००); (१२) पद्म (५५०००); (१३) शिव (२४०००); (१४) स्कंद (८११००); (१५) वामन (१००००); (१६) वराह (२४०००); (१७) वायू (२४०००); आणि (१८) विष्णू (२३०००). कंसातील आकडे त्या त्या पुराणातील श्लोकांची संख्या दर्शवतात. महाभारतात एकंदर १००,००० श्लोक असल्याचे मानले जाते. अठरा महापुराणात मिळून एकूण चार लाख श्लोक आहेत.

काही वेळा हरिवंश हा ग्रंथसुद्धा ढोबळमानाने पुराणात गणला जातो. पण तो ग्रंथ काही एखादे पुराण नाही. तो बराचसा महाभारताला जोडलेल्या परिशिष्टासारखा आहे. काही वेळा वायु ऐवजी १४ हजार ५०० श्लोक असलेल्या ‘भविष्य’ चा समावेश पुराणात केला जातो.

किंवा १८ हजार श्लोकयुक्त ‘नरसिंह’ ही रचना पुराण म्हणून नोंदली जाते आणि ब्रह्मांडपुराण किंवा गरुडपुराण हे पुराणांच्या यादीतून गाळले जाते. काही वेळा भागवत म्हणजे वैष्णव भागवत असे न समजता लोक त्याचा अर्थ देवी भागवत असा घेतात.

सर्व पुराणांची आणि त्यातील श्लोकांची संख्या मत्स्य पुराणात सर्वात चांगल्या पद्धतीने दिलेली आढळते. कदाचित सुरुवातीला व्यासांनी एकच पुराण रचले असावे. असे सांगितले जाते की त्यांनी पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतु या आपल्या चार शिष्यांना चार वेद शिकवले. तसेच सुत रोमहर्षन किंवा लोमहर्षन यांना पुराणे शिकवली.

सुत हे कथाकथनकार, भाट किंवा रथाचे सारथी असत. हा विशिष्ट सुत कथा सांगायचा तेव्हा हर्षभरित होऊन श्रोत्यांच्या अंगावर रोमांच येत. त्यावरूनच त्याचे नाव रोमहर्षन किंवा लोमहर्षन पडले होते. या रोमहर्षनाचा उग्रश्रव नावाचा मुलगा होता.

अनेकदा तोही विविध संहितांचे कथन करी. काळाच्या ओघात वेदव्यासाने रचलेल्या एकाच पुराण संहितेचा विस्तार होऊन तिची अठरा पुराणे झाली. या साऱ्या पुराणात नेमके आहे तरी काय याचा विचार आपण पुढील लेखात करू.

वेदांची पडताळणी करून त्यांची पुनर्मांडणी केल्यानंतर कृष्णद्वैपायन वेदव्यासांनी महाभारताची रचना केली. त्यानंतर त्यांनी पुराणे लिहिली. मघाशी, जी लोकधारणा आपण काळजीपूर्वक पाहिली पाहिजे असे मी म्हणालो ती हीच.

शुकदेवाचेच उदाहरण घ्या. तो वेदव्यासांचा मुलगा. महाभारतात सांगितले आहे की तो मूलतत्वाचा म्हणजेच निसर्गाचा भाग होऊन जातो. पण शुकदेवाने भागवत पुराणही सांगितले आहे. पुराणांची रचना महाभारतापूर्वी झाली होती असेही संदर्भ सापडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com