सुंदर मी होणार

Vidya-Surve-Borse
Vidya-Surve-Borse

‘आंतरराष्ट्रीय दिव्यांगदिन’ ता. तीन डिसेंबरला असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या दिवशी विविध कार्यक्रम होतील...भाषणं केली जातील...लेख लिहिले जातील...या भाषणांतले आणि लेखांतले शब्द कायमचे लक्षात ठेवले जावेत, ते कृतीत यावेत एवढीच अपेक्षा.

वर्गात भाषेबद्दल शिकवत होते. मूल भाषा कशी आत्मसात करतं? आपल्या भाषिक क्षमता, संभाषणक्षमता कशा विकसित होत जातात? इतरही पुष्कळ मुद्दे होते. लक्षात आलं की समोरच्या बाकावरच्या मुलीचे डोळे डबडबून आले आहेत...
‘‘काय झालं गं? काय झालं असं रडायला?’’ 
ती काहीच बोलेना. फक्त मुसमुसत राहिली. नंतर विश्वासात घेऊन तिला विचारलं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्यातली आई तिच्याशी आपुलकीनं बोलली तेव्हा ती मुलगी तिच्या ताईबद्दल आणि ताईच्या मूकबधीर मुलांबद्दल खूप कष्टी होऊन सांगत राहिली.
त्या मुलीला मी मायेनं समजून सांगितलं. तिला म्हणाले : ‘‘हे सगळं लिही. तू बघितलेलं, तुझ्या ताईनं सोसलेलं. सगळे थोडेच परिपूर्ण असतात? व्यंग्य, अपंगत्व, कमतरता...अशी सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना तुम्ही तिच्यावर मात कशी करता ते जास्त महत्त्वाचं असतंं. दुःखात तुम्ही एकमेकांसोबत आहात आणि सुखाची आस बाळगून आहात हेही खूपच महत्त्वाचं. एकमेकांसोबत कसं जगायचं ते अशी प्रतिकूल परिस्थितीच शिकवत असते.’’ 

तू धार है नदिया की, मै तेरा किनारा हूँ
तू मेरा सहारा है, मै तेरा सहारा हूँ
आँखों में समंदर है, आशाओं का पानी है

मला ‘शोर’ सिनेमा आठवू लागला. अपघातानंतर वाचाशक्ती गमावून बसलेला मुलगा. मुलाला बोलतं करून त्याच्या तोंडातून शब्द ऐकण्याची जिद्द असणारा आणि त्याच्या शस्त्रक्रियेसाठी पै पै करून रक्कम साठवणारा शंकर. मुलाचे शब्द ऐकायला मिळणार या अत्यानंदात घडलेल्या चुकीनं ठार बहिरे होणारे वडील. जगण्याचा कारुण्यपूर्ण, उदास पट डोळ्यांपुढं उभा राहिला. मुलाला वाचा येते त्या वेळी - त्याचे शब्द ऐकण्यासाठी एरवी सदैव आसुसलेले - वडीलच बहिरे व्हावेत! हा नियतीचा कुठला घाव म्हणावा...? 
पण गाणं तर सुरूच राहतं नं आयुष्याचं?
जीवनाचं आनंदगाणं असंच गाता आलं पाहिजे, सदैव. आपल्या काळजात जे व्हायोलिन आहे त्याचे सूर निनादतेच ठेवता आले पाहिजेत. आनंदातही अन् दुःखातही...
त्या मुलीनं दुसऱ्या दिवशी सात-आठ पानं लिहून आणली. तिचं अक्षर टपोरं आणि वळणदार होतं.  
ती म्हणाली : ‘‘बाबांना वाचून दाखवलं तर ते खूप रडले.’ ती पानं वाचून माझ्या डोळ्यांतही पाणी तरारलं. मूकबधीर भाच्यांबद्दल तिच्या मनातली सहवेदना, मुक्या भाच्यांचा चित्रकलेच्या स्पर्धेत आलेला पहिला क्रमांक आणि ‘आई’ हा शब्द आपल्या मुलांच्या तोंडून ऐकण्यासाठी आसुसलेली आई, म्हणजे तिची ताई. किती किती व्यक्तिरेखा माझ्या अवतीभवती फेर धरत आल्या होत्या.

हा प्रसंग घडला त्याला पाच-सहा वर्षं झाली. त्या वेळी मी चांदवडला आबड-लोढा महाविद्यालयात शिकवत असे. त्या महाविद्यालयात डॉ. एन. झेड. जैन यांच्यासारखे प्राचार्य होते. महावीर पारख यांच्यासारखी माणसं संस्थेच्या नियामक मंडळात होती. शेजारी रामदास महाले होते, सोनावणेबाई, संजूभाऊ आव्हाड होते. गावात डॉ. राजेंद्र मलोसेंसारखे लेखक होते. गाव निसर्गाच्या कृपेचा वरदहस्त लाभलेलं, माणसंही आपुलकीनं वागणारी आणि माया लावणारी. गावात तुरळक गर्दीचं उदासवाणं बसस्थानक होतं. महामार्गावर लोक वाहनाची वाट बघत घोळके करून उभे असत. तिथे मला एके दिवशी छकुलीची गोष्ट समजली. तिळ्यांमधली एकुलती एक बहीण. दोघं भाऊ सशक्त जन्मले.

मात्र, या पोरीच्या पदरी जन्मत:च दुबळेपण आणि मंदपण आलेलं. आजूबाजूची मुलं तिच्याशी खेळायची नाहीत, छकुलीची चिडचिड व्हायची. सभोवतालचं वागणं तिला कळायचं; पण व्यक्त करता यायचं नाही, मग तिचा राग अनावर व्हायचा. लोक आणि कुटुंबीयसुद्धा तिचा राग तेवढा लक्षात ठेवायचे. तिच्याशी समाजानं सदैव दुजाभाव केला. तिच्या शाळेतही तिच्यावर अत्याचार झाला. तिला प्रवास करणं आवडत असे; पण एसटीच्या गाड्या किंवा रेल्वेगाड्या तिच्या सोईनं तयार केल्या गेलेल्या नव्हत्या. शाळेत इतर दिव्यांग मुलं होतीच; पण त्यांना सहजपणे चढता-उतरता यावं यासाठी रॅम्प नव्हते, प्रसाधनगृहात योग्य कमोड नव्हते; किंबहुना प्रसाधनगृहं धडही नव्हती. समाजानं दुर्लक्ष केलेल्या लोकांसारखी छकुली लहानाची मोठी झाली. एके दिवशी ती मोडक्या-तोडक्या शब्दांत भडाभडा बोलत राहिली आणि नंतर कायमची अस्तंगत पावली. चौदा-पंधरा वर्षांची छकुली आणि तिचं बोलणं खूपदा आठवत राहतं. मनात खंत निर्माण करतं. तिच्या शब्दाशब्दात नाकारलं जाण्याची वेदना असते.

समाज आपल्या एका मोठ्या समूहाला समजून घेण्यात कमी पडला आहे, दिव्यांगाचे प्रश्न आपण अजूनही पुरेसे जाणून घेतलेले नाहीत हे पालक आणि शिक्षक म्हणून जाणवत राहतं.

आपल्या देशात आज अडीच कोटीपेक्षा अधिक दिव्यांग आहेत. त्यांना सहानुभूतीची नव्हे, तर सन्मानाची आवश्यकता आहे. मात्र, सन्मानाची वागणूक तर सोडाच; पण समाजानं माणुसकीच्या पातळीवरही त्यांचा संपूर्ण स्वीकार अद्याप केलेला नाही. ‘डोळे असूनही पाहता न येणं हे अंधत्वापेक्षाही जास्त घातक आहे,’ असं हेलन केलर म्हणत असत. त्यांच्या या उक्तीचं प्रत्यंतर जागोजागी येते. ‘द स्टोरी ऑफ माय लाईफ’ हे केलर यांचं पुस्तक वाचताना, संघर्ष म्हणजे काय, जिद्द म्हणजे काय हे खरोखरच उमगून येतं आणि हेही कळतं की ॲनी सलिवन यांच्यासारख्या शिक्षिका प्रत्येक दिव्यांगाला लाभायला हव्यात.

इरा सिंघल या आयएएस अधिकारी आहेत. त्यांची निवड खुल्या प्रवर्गातली आहे. समाजमाध्यमांतून शारीरिक व्यंग्याची खिल्ली उडवत गेल्या वर्षी कुण्या एकानं ‘कुबडी’ या शब्दानं त्यांचा उल्लेख केला. त्याला धडा शिकवण्याची भाषा न वापरता इरा यांनी ‘देशाची शिक्षणव्यवस्था मुळापासून अधिक चांगली करणं गरजेचं आहे,’ असं विधान केलं, तेव्हा इरा यांना मी मनोमन सलाम केला. दिव्यांगांविषयी लोकांची मानसिकता आणि दृष्टिकोन मुळापासून बदलण्याची आवश्यकता आहे. दृष्टी-श्रवण-वाचादोष असणं, अस्थिव्यंग्य असणं, मानसिक आजार असणं, अध्ययनअक्षमता, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्नता, बहुविकलांगता, बुटकेपणा, मतिमंदपणा, कंपवात, कुष्ठरोग, रक्ताचा कर्करोग असणं यांत त्या त्या बालकांचा कोणता गुन्हा आहे? स्वत:ला विकसित समजणारा सभ्य समाज अशा समाजघटकांचे प्रश्न आणि खडतर आयुष्य केव्हा समजून घेणार? मज्जासंस्था, चेतासंस्था, रक्तासंबंधी, अविकसित मांसपेशीविषयी जर एखाद्याला आजार असेल तर ‘माणूस’ म्हणून आमचं कर्तव्य काय आहे? कुणावर तरी ॲसिडहल्ला होतो आणि जन्मभराची वेदना त्या व्यक्तीच्या वाट्याला येते, त्या व्यक्तीविषयी आमच्या भावना काय असायला हव्यात?

आपलं आयुष्य व्हीलचेअरशीच बांधलेलं असलेली विराली मोदी, दृष्टी-वाचा आणि श्रवणदोष असणाऱ्या हेलन केलर, पॅराऑलिम्पिकमध्ये भालाफेकीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा देवेंद्र झाझडिया, कृष्णविवराचा रहस्यभेद करणारे व बिगबँगचा सिद्धान्त मांडणारे स्टीफन हॉकिंग्ज् यांच्या जीवनकहाण्या आम्ही जरूर वाचल्या पाहिजेत.

नाशिकमध्ये गोविंद त्र्यंबक दरेकर हे कवी होऊन गेले. कवी गोविंद या नावानं ते सुपरिचित आहेत. ‘स्वातंत्र्यशाहीर’ या उपाधीनं त्यांचा गौरव केला जातो. सावरकरबंधूंच्या ‘मित्रमेळा’ या संस्थेचे ते सक्रिय सभासद होते. कवी गोविंद यांचं मूळ गाव नगर जिल्ह्यातलं कण्हेर-पोखरी, बालवयात वडिलांबरोबर ते नाशिकला आले. त्यांचे वडील गवंडीकाम करत असत. गोविंद पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. सातव्या-आठव्या वर्षी गोविंद यांना मोठा ताप आला. त्या आजारपणात त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. कवी गोविंद यांनी लिहिलेल्या कवितांनी स्वातंत्र्यपूर्वकाळातली कविता तेजाळली आहे. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’, ‘कारागृहाचे भय काय त्याला?’ या त्यांच्या कविता वाचताना आजही स्फुरण येतं. ‘सुंदर मी होणार’ ही गोविंद यांची अप्रतिम कविता आहे. पुढं या कवितेच्या ओळींचा आधार घेऊन पु. ल. देशपांडे यांनी तीनअंकी नाटक लिहिलं.

जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार             
नव्या तनूचे, नव्या शक्तिचे पंख मला फुटणार
सुंदर मी होणार, सुंदर मी होणार...

ही कविता वाचकाला शारीरिक व्यंग्यावर मात करणारा दुर्दम्य आशावादही सांगते.
तीन डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांगदिन’ असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या दिवशी विविध कार्यक्रम होतील...भाषणं केली जातील...लेख लिहिले जातील...या भाषणांतले आणि लेखांतले शब्द कायमचे लक्षात ठेवले जावेत, ते कृतीत यावेत एवढीच अपेक्षा.

आपल्या आजूबाजूला अशी असंख्य मुलं आहेत, ज्यांच्या नजरेत केवळ अंधार आहे, तुम्ही त्यांच्यासाठी आपुलकीचा  प्रकाश होऊ शकता. ज्यांना पाय नाहीत त्यांच्या धावण्याची ऊर्जा होऊ शकता, वाचा नसलेल्यांचा शब्द आणि श्रवणदोष असणाऱ्यांचा कान होऊ शकता. तुम्ही पाहा, त्या दिवसापासून आकाशाचे रंग खास तुमच्यासाठी बदललेले असतील. तुम्ही ऐका, ही चराचर सृष्टी तुमच्या सुंदरतेचं गाणं गात असेल! 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com