जगा राणीव दे प्रकाशाची... (विद्या सुर्वे-बोरसे )

diwali-light
diwali-light

लहानपणची दिवाळी वेगळीच असायची. साधीसुधी. दुसरा फटाके वाजवत असे, तेव्हा जणू आपणच वाजवत आहोत असं वाटायचं. त्या दिवसांत ‘मी’पणा कुठंच नव्हता. आकाशकंदील घरी तयार होई, गावातली मावशी पणत्या घरपोच आणून देई. कुणी एकजण येऊन पूजेची वेळ सांगून जाई, नवे कपडे सर्वांचे सारखेच असत. घरांची अंगणं आणि मनं दोन्ही सुंदर आणि स्वागतशील असत. छोट्या छोट्या आनंदांनी आमचं जीवन ओतप्रोत भरलेलं होतं. समाधानी होतं.

दिवाळी आली की निरनिराळे गंध जाणवू लागत. फटाक्यांचा वास, नव्या कपड्यांचा वास, पूजेसाठी आणलेल्या नव्या वहीचा वास, घराच्या भिंतीला दिलेल्या रंगांचा वास, शेणाच्या सड्याचा आणि सारवणाचा वास...असे अनेक गंध आणि या सगळ्यावर कडी करणारा सुवासिक उटण्याचा गंध...पण दिवाळी येण्याची चाहूल लागायची ती फराळाच्या सुवासानं.

दिवाळी यायला चार-सहा दिवसांचा अवकाश असायचा तेव्हाच तळणाचे, भाजणीचे गंध घराघरातून दरवळू लागायचे. खरं तर घरात आई आणि गल्लीतल्या इतर मावश्या त्याही अगोदर या कामासाठी स्वतःला जुंपून घेत. रवा हवा तसा मळून घेणं, वेगवेगळे पदार्थ आंबवणं, भिजवणं आणि काय काय चाललेलं असायचं आणि मग घाई-गडबडीच्या दिवसांतल्या एखाद्या ठरलेल्या दुपारी चार-सहा जणी मिळून जमत, फराळ तयार करण्याचा कार्यक्रम सुरू होत असे. वेगवेगळ्या प्रकारचा तिखट, साधा चिवडा, चकल्या, अनारसे, शेव, शंकरपाळी आणि सांजोऱ्या...

सांजोऱ्या तयार करण्याचं एक कसबच असे. मी शाळकरी मुलगी होती तेव्हापासून सांजोऱ्या तयार करताना असणारी कुशलता आणि एकाग्रता मला खिळवून ठेवत आली आहे. दोन्ही पदर एकावर एक येतील याची काळजी घेणं, बाजूंवर चक्री हळुवारपणे फिरवणं, आतला रवा आणि इतर पदार्थ बाहेर येणार नाहीत, दोन पदरांमध्ये जागा राहणार नाही याची दक्षता घेणं महत्त्वाचं आणि मग सांजोऱ्यांना हळुवारपणे कढईत सोडलं जाई. विशिष्ट पद्धतीनं तळून सांजोरी तेलकट होणार नाही याची काळजी घ्यावी लागे. नंतर दिवसभर इकडून तिकडून आलं की सांजोऱ्यांवर ताव मारला जाई. दिवाळीला घरी येणाऱ्या प्रत्येकाला इतर फराळासोबत सांजोरी मिळायचीच, अगदी फराळ करून पोट भरलेलं असेल तरी दह्या-दुधासोबत सांजोरी घ्यावीच लागे. सांजोरीला नकार कुणी देत नसे.

दिवाळीची अजून एक गंमत असे. वर्षभर सडा घालून खुलणारं अंगण आम्ही शेणानं छान सारवून घेत असू. आपलं अंगण इतर अंगणापेक्षा नीट सारवलेलं आहे हे बघताना किती अभिमान वाटायचा. सारवण्यासाठी शेण हवं असायचं, मग चांगलं शेण भरपूर मिळावं म्हणून सगळ्यांच्या अगोदर वेचायला पळावं लागायचं. आपल्याला हवं तेवढं शेण जमा होईपर्यंत निव्वळ धावाधाव चाललेली असायची. कधी कधी रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे आम्ही मुली शेणासाठी गुप्तांच्या किंवा परदेशींच्या गोठ्यात शिरकाव करत असू, आपल्या अगोदर कुणी शेण पळवू नये आणि आपल्याला भरपूर शेण मिळावं यासाठी केवढी धडपड सुरू असे. ‘शेणाला गेलेल्या पोरी’ हा चंद्रशेखर कांबळे यांचा कवितासंग्रह अलीकडेच वाचनात आला, तेव्हाही बालपणीच्या त्या निसटून गेलेल्या दिवसांची आठवण झाली. शेण घेऊन येणं, ते पाण्यात टाकणं, अंगणाचा कोपरा न् कोपरा भिजेल असा सडा घालणं आणि रांगोळी घालण्याच्या जागेवर छानशी ओटी तयार करून ती मातीनं, गेरूनं गुळगुळीत करून सारवून घेणं असे लहान मुला-मुलींचे उपद्व्याप दिवाळीच्या दिवसांत सुरू असत. सारवून घेतलेलं अंगण पुन्हा नवा गंध देऊन जाई. गल्लीत खूप वहिन्या होत्या आणि सगळ्या जणी खूप छान होत्या. मग त्यांच्याकडून रांगोळी काढून घेण्यासाठी, नव्या डिझाईनसाठी त्यांची विनवणी होई. त्याही आनंदानं रांगोळीत जीव ओतून चैतन्य आणायच्या आणि मग रांगोळी घालून अधिकच देखणं झालेलं अंगण पुनःपुन्हा पाहण्यात आणि गाई-गुरांपासून रांगोळीचं रक्षण करण्यात सगळा दिवस जाई. आपली रांगोळी कुणी विस्कटणार नाही यासाठी अनिता, रेखा, सीमा आणि मी फार दक्ष असायचो. परकर-पोलक्यातली ती दिवाळी फुलांसारखी सुगंधी असे. चंद्रात्रेवहिनींची रांगोळी तर दृष्ट लागेल इतकी सुंदर असायची. साक्रीची ती आमची गल्ली छानच होती. गल्ली हेच एक कुटुंब होतं.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मध्येच एके दिवशी सटाण्याहून मामा येई, त्याच्यापाशी आजीचा निरोप असे आणि मग त्या गोकुळात भाकर-कुटका ओवाळून आम्हा लेकी-बाळींचं स्वागत होई. आजी सुंदर होती. तिच्याकडे पाहताना मला महालक्ष्मीची आठवण येई. ती भल्या थोरल्या घराचा सगळा कारभार पाहत असे. त्या घरात दिवाळीच्या काळात पाच-पन्नास माणसांचा गोतावळा वास्तव्य करी. भल्या पहाटे अंथरूण सोडणं आणि सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करून तयार होणं हा आजोळचा  महत्त्वाचा नियम होता. दिवाळीपहाटेच्या अंधाराला, उजेडाला, घाई-गडबडीला एक नाद असतो. घराच्या आवारातच आड होता. त्यात पोहरा पडल्याचा छपाक असा आवाज...दोरीनं तो वर ओढून घेतला जात असताना हिंदकळण्याचा, पाण्याची धार आडातल्या पाण्यावर पडण्याचा...बांधीव आडाच्या बाजूच्या दगडांना पोहरा घासल्याचा आवाज...मग अंगणातल्या बंबात पोहरा ओतला जाई. त्याखाली ढणढणती आग, पाणी लवकर लवकर तापत जाई, तोवर आजी अंगाला उटणं लावून एकेकाची न्हाणीघरात पाठवणी करी. दिवाळीची पहाट, उटण्याचा सुवास, फटफटत जाणारं आकाश हे सारं एकरूप होत जाई. एक लय तयार होई. नव्या कपड्यांची, ओवाळणीची, लगबगीची, फटाक्यांची आणि शेवयांच्या भाताची...

दूध-तूप घातलेल्या शेवयांना पुन्हा एक निराळा, किंचितशा भुकेचा वास असायचा. स्वयंपाकघरात भलं थोरलं लाकडी कपाट होतं, मोठी लोखंडी संदूक बसेल एवढं मोठं कपाट. त्यात दिवाळीचा फराळ ठेवलेला असे, त्याला कुलूपही असे, मग ते कुलूप उघडलं जाई, आतले जिन्नस बाहेर येत आणि मग खाद्यपदार्थांमध्ये आम्हा मुलांना निरनिराळे आकार दिसू लागत. कुणाला घोडा, कुणाला ससा, कुणाला वाघ, तर कुणाला उंट. सगळी मज्जा असे. कुलपात ठेवल्यामुळं मांजरीपासून फराळाचा बचाव केला जाई हे खरंच; पण तो पुरवून पुरवून वापरावा लागे, भेटीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला तो मायेनं वाढला जाई. दिवाळीच्या दिवसांत घरी-दारी येणारा प्रत्येक जण तोंड गोड करूनच जात असे. उपाशी कुणी राहणार नाही याची आजी स्वत:हून काळजी घेई.

दिवाळीचे ते दिवस फटाक्यांचे तर होतेच. मी हातात घेऊन लवंगी फटाके उडवत असे. समोरच्या नागरे मावशींच्या घरी मोठ्या दादाकडून फटाक्यांची लड पेटवली जात असे. भुईचक्र, भुईनळे, सुरसुरी, लाईट आणि नागगोळी. नागगोळी धूर करत जळत जात असे किंवा रॉकेट झूं sss  असा आवाज करून आकाशात झेप घेई. दिवाळीचे ते दिवस न विसरता येणारे आहेत. त्या रॉकेटबरोबर आमची स्वप्नं आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत. आई शिक्षिका होती, वडील बँकेत अधिकारी होते, घरी कशाची कमतरता नव्हती. सुखवस्तू कुटुंब होतं आणि आनंदी होतं. तिथं विषाद नव्हता. फार मोठ्या आकांक्षा नव्हत्या. आजूबाजूचे सगळेच एकाच स्तरातले होते, भेदरेषा ठळक नव्हती. भेद कळतही नव्हता. दुसरा फटाके वाजवत असे, तेव्हा जणू आपणच वाजवत आहोत असं वाटायचं. त्या दिवसांत ‘मी’पणा कुठंच नव्हता. आकाशकंदील घरी तयार होई, गावातली मावशी पणत्या घरपोच आणून देई. कुणी एकजण येऊन पूजेची वेळ सांगून जाई, नवे कपडे सर्वांचे सारखेच असत. घरांची अंगणं आणि मनं दोन्ही सुंदर आणि स्वागतशील असत. छोट्या छोट्या आनंदांनी आमचं जीवन ओतप्रोत भरलेलं होतं. समाधानी होतं.

मी वर्तमान पाहते, ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण यांचं वर्तमान...अस्वागतशील वर्तमान...चकचकीत आणि बेगडी वर्तमान...पैसे असणाऱ्यांचं अस्तित्व असणारं वर्तमान...फ्लॅटमध्ये बंदिस्त झालेलं आणि दोन दिवसांच्या आउटिंगपुरतं मर्यादित झालेलं वर्तमान...हजारो फटाक्यांचे आवाज एकत्र ऐकवून नंतर काही काळ काहीही ऐकू येणार नाही याची तजवीज करणारं वर्तमान...नवे कपडे रोज आहेत, रोज नवी मिठाई आहे, गिफ्ट आहेत. कपड्यांचा आनंद ब्रँडवर ठरतो. मिठाईचं मोल दुकानाच्या नावावरून ठरतं, गिफ्टमध्ये भविष्यातले फायदे-तोटे यांची गणितं लपलेली. ही रोषणाई खरी नाही, ही झगमग बाजारू आहे. तिथं पणत्यांचा अंधार भेदणारा उजेड नाही, समईचा स्निग्ध प्रकाश नाही, दिव्यांमधून झरझरणारी ऊब नाही. वर्तमानाची दिवाळी दिव्यांशिवायची आहे की काय असा प्रश्न पडावा अशी आहे.

आपलं आयुष्य भौतिक गोष्टींनी नव्हे, तर छोट्या छोट्या सुखांनी समृद्ध होत असतं. आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या, मायेच्या माणसांनी संपन्नता आपल्या जीवनात प्रवेश करत असते. या दिवाळीनं बालकांच्या, पालकांच्या, आपल्या सर्वांच्या आयुष्यातलं वर्तमान बदलावं, जीवनात सुगंधाचं अत्तर ओतावं, सुख-समृद्धी आणि संपन्नता प्रत्येकाच्या जीवनात ओसंडून वाहावी यासाठी दिवाळी आपल्या दारी यावी. आपण स्वत: प्रकाशित व्हावं, इतरांनाही प्रकाशित करावं.

सूर्ये अधिष्ठिली प्राची।
जगा राणीव दे प्रकाशाची।
तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची।
दिवाळी करी।।

ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांची प्रार्थना निदान या दिवाळीला तरी साक्षात् व्हावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com