esakal | कळ्या पुन्हा फुलवू...
sakal

बोलून बातमी शोधा

Child

कळ्या पुन्हा फुलवू...

sakal_logo
By
डॉ. विद्याधर बापट,मानसोपचारतज्ज्ञ

सध्या अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली आहे. मुलांच्या शाळा बंद, ऑनलाइन शाळा, परीक्षा, वर्क फ्रॉम होम एकूणच सामाजिक आणि वैयक्तिक जीवन विस्कळित होऊन गेले आहे. सगळं अचानक घडलंय. विचित्र सावट आलंय. आताची ही परिस्थिती कठीण आहे, पण त्याला खंबीरपणे आणि शांतपणे तोंड आपण द्यायला हवं. तेच मुलांना शिकवायला हवं. त्यासाठी विज्ञानाने सुचविलेल्या सर्व स्वच्छतेच्या आणि सामाजिक शिस्तीच्या सूचनांचे पालन तर करायलाच हवं. मन स्वस्थ ठेऊन, हिंमत न हरता संकटांवर मात करण्याची क्षमता (Adversity Quotient) कशी विकसित करायची, हे मुलांना शिकवण्याची हीच वेळ आहे. या काळात मानसिक स्वास्थ्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. मनाच्या स्वस्थतेचा आणि शरीर स्वस्थ असण्याचा, प्रतिकार शक्ती उत्तम राहण्याचा खूप जवळचा संबंध आहे. नेमक्या याच काळात मुलांच्या मन:स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला हवं. कारण, वाढत्या वयातील मुलांचे अस्वस्थतेच्या आजारांचे, नैराश्याचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. म्हणूनच हा विषय आजच्या घडीला समजून घेऊया.

मुलं एकटी बनत चाललीयेत. हवं तसं बाहेर जाऊन खेळता येत नाही. शाळेत जाता येत नाही. मित्रांबरोबर धमाल करता येत नाही. आणि हे सगळं कदाचित कधीच पुन्हा करता येणार नाही, अशी एक छुपी भीती काही मुलांना वाटतेय. मुळात लॉकडाउन किंवा कोरोनामुळे आलेली बंधन ही सगळ्याच समाजावर आली आहेत, ही वस्तुस्थिती असली; तरी त्यांचं मन हे समजून घेत नाहीय. ही सगळी बंधन माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लादली गेली आहेत, असं त्यांना वाटतंय.

भावनिक आधार महत्त्वाचा

वाढत्या वयातील मुलांचे अस्वस्थतेच्या आजारांचे, नैराश्याचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. त्याचा काही कारणानं नुसताच मूड गेला आहे की, हा अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे, यातील फरक ओळखावयास हवा. हे फक्त तज्ज्ञ व्यक्तीच करू शकते. पौगंडावस्थेतील अस्वस्थता व नैराश्य दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. त्यामुळे जरा दुर्लक्ष केलं, की सगळं काही आपोआप ठीक होईल, वयाचा दोष असेल...अशा गैरसमजुतीत न राहणे चांगले. ताबडतोब तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे. मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले. सर्वप्रथम अतिशय विश्वासात घेऊन, प्रेमाने आपल्या पाल्याशी बोला. विश्वासाचे वातावरण तयार करा. आवश्यक वाटल्यास तत्काळ तज्ज्ञांची मदत घ्या.

पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुःखी दिसतीलच असंही नसतं. त्यामुळे त्यांच्या नैराश्याच्या आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकते. बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणाही दिसू शकतो. मुलांची ही शिक्षणाची महत्त्वाची पायाभरणीची वर्षे असतात. पण, याच काळात अभ्यासातील एकाग्रता कमी होण्याची, तसेच ऊर्जा पातळी कमी होण्याची भीती असते. गुणांची घसरण सुरू होते. मग आत्मविश्वास कमी होऊ लागतो. एकूणच पूर्वीच्या हुशार असणाऱ्या मुलाची गुणवत्ता घसरायला लागते. आता याचं पर्यवसान म्हणून अस्वस्थपणा व चिडचिड वाढते. अपराधीपणाची व आपण निरुपयोगी असल्याची भावना येतो.

उत्साहाचा अभाव वाढतो. त्याला कोणत्याही गोष्टीत स्वारस्य उरत नाही. एकाग्रतेचा अभाव, अति हळवे होणे, लहानसहान गोष्टीवरून रडणे, विलक्षण कंटाळा, लहानसहान गोष्टीवरून आक्रमक होणे सुरू होते. जेवण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल होतो. घरातल्यांपासून लांब लांब एकटं एकटं खोलीत राहण्याची प्रवृत्ती वाढते. अति टीव्ही बघणे किंवा संगणकीय गेम खेळणे वाढते. टीका अजिबात सहन होत नाही. कशानेही सतत दुखावले जाणे, शारीरिक तपासण्यांमध्ये काहीही दोष न आढळूनही डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी वाटत राहणे सुरू होते. या काळात स्वतःला इजा करून घेण्याचा किंवा आत्महत्येचा विचार मुलांच्या मनात कित्येकदा येत राहतो. या काळात त्यांना सांभाळायला हवे.

या वयात अस्वस्थता निर्माण करणारं किंवा नैराश्य वाढवणारे मुख्य कारण मेंदूतील रासायनिक बदलात असतं. आनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश, आई- वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, घरातील तणावाचे वातावरण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का या सर्वातून निर्माण होणारा ताण, एकतर्फी प्रेमातले अपयश, आयुष्यातील यशाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, झपाट्याने बदलणारी सामाजिक परिस्थिती, नकारात्मक व्यक्तिमत्त्व, गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी, लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग व आघात या पैकी काहीही या आजाराला या वयात निमंत्रण देणारं ठरतं. या आजारातून बाहेर येण्यासाठी आवश्यक औषधोपचार, समुपदेशन, विशिष्ट मानसोपचार पद्धती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाला पालकांकडून व शिक्षकांकडून मिळणारा भावनिक आधार महत्त्वाचा आहे.

संकटाचे संधीत रूपांतर

सध्याच्या काळात मुलांना प्रेम, आधार देणं महत्त्वाचं. भोवतालच्या परिस्थितीचं आकलन त्यांना करून द्यावं. ही परिस्थिती निश्चित लवकरच बदलेल, हे त्यांना सांगायला हवं. मानव जातीवर अशी संकटे पूर्वी येऊन गेली आहेत. पुन्हा सर्व व्यवस्थित झालं आहे, हा विश्वास त्यांना द्यायला हवा. परिस्थितीचा विनाअट स्वीकार करण्याची त्यांची एकदा तयारी झाली, की त्यांना शांत होण्याची कला शिकता येईल. यात mindfulness ची तंत्रे, काही साक्षीभाव निर्माण करणारी, मनातल्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करण्यासाठीची तंत्रे शिकता येतील. हे जमायला लागलं की सकारात्मक विचारसरणीसाठीचं प्रोग्रॅमिंग करता येईल. कुठल्याही संकटात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता (Adversity Quotient) कशी विकसित करायची, हे शिकता येईल आणि हीच गोष्ट त्यांना यशस्वी जीवनासाठी उपयुक्त ठरेल. वेळेवर काळजी घेतली; तर आपण कोमेजणाऱ्या कळ्यांना पुन्हा फुलवू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य जगायला मदत करू शकतो. त्यांना तुमच्याबद्दल विश्वास द्या. तुमचा आधाराचा हात त्यांच्या हाती द्या.

(लेखक मनोविकारतज्ज्ञ असून मुद्रित माध्यमांमध्ये जनजागृतीपर लेखन करत असतात.)