लोकमान्य टिळकांची पत्रकारिता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lokmanya Tilak

लोकमान्य टिळकांची पत्रकारिता

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी व्यक्तिमत्त्व. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवीनच’हा दुर्दम्य आशावाद घेऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात केली ती टिळकांनी! पुण्यात शिकत असतानाच त्यांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोष धुमसत होता. तो त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला आणि ते ‘भारतीय असंतोषाचे जनक’ झाले. समाजातल्या तळागाळातल्या घटकांची बाजू त्यांनी घेतली म्हणून ते ‘तेल्या तांबोळ्यांचे पुढारी ’ झाले. त्यांची स्वातंत्र्याची चळवळ ही नियोजन बद्ध होती. स्वराज्याचे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा काढली, लोकांना संघटित करण्यासाठी गणेश –उत्सव आणि शिवाजी-उत्सव सुरू केले. लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘केसरी’ मराठा’ सारखी वृत्तपत्रे काढली.

बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या इतर काही सहकार्‍यांच्या मदतीने 1881 च्या जानेवारीत केसरी (मराठी)आणि मराठा (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे, सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हा त्यामागचा मूळ उद्देश होता. केसरीच्या पाहिल्याच अंकात ‘ रस्तोरस्ती रात्री दिवे लावलेले असल्याने व पोलिसांची गस्त सारखी फिरत असल्याने जो उपयोग होतो तोच ज्या त्या जागी वर्तमानपत्रकर्त्यांची लेखणी सदोदित चालू असल्याने होत असतो ’ अशा शब्दात केसरीचे धोरण स्पष्ट करण्यात आले होते. 1982 च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.1884 मध्ये केसरीचा खप 4200, 1897 च्या जुलै मध्ये तो 6900 पर्यन्त वाढला.1902 मध्ये ब्रह्मदेश (म्यानमार), सिलोन (श्रीलंका),आफ्रिका,अफगाणिस्तान या देशातही केसरी जात असे. सुरूवातीला केसरीचे संपादक आगरकर तर मराठाचे संपादक टिळक होते. 3 सप्टेंबर 1891 रोजी केसरी आणि मराठा या दोन्ही वर्तमानपत्रांचे संपादक म्हणून टिळकांनी स्वत:च्या नावाचे डिक्लरेशन केले. दरम्यानच्या काळात त्यांनी दारूबंदी, वंगभंग, बहिष्कार, प्लेग, दुष्काळ निवारण तसेच विविध शासकीय प्रश्नांसाठी आंदोलने, चळवळी केल्या. त्यात एक लढा वृत्तपत्र स्वातंत्र्याचाही होता. केसरी, मराठा सुरू झाल्यानंतर काही काळातच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या लिखाणामुळे टिळक आणि आगरकरांना चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली.

1896 चा दुष्काळ आणि त्या पाठोपाठ आलेली प्लेगची साथ, या दोन्ही प्रकरणात केसरीने महत्त्वाची भूमिका बजावली. केसरीत प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीशांविरुद्धच्या लेखांबाबत टिळकांना तीन वेळा राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जावे लागले. 1897 व 1908 च्या या दोन्ही खटल्यांना टिळकांचे केसरीतले लिखाण कारणीभूत ठरले तर 1916 चा खटला त्यांच्या भाषणांमुळे दाखल करण्यात आला होता. प्लेगाच्या प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रॅन्ड याच्या हाताखालील गोर्‍या अधिकार्‍यानी पुण्यात धुमाकूळ घातला त्यामुळे 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी रॅन्डचा खून केला. त्यासंदर्भात टिळकांनी ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ आणि ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे ’ असे अग्रलेख लिहिले. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेऊन खटला चालवण्यात आला. त्यात टिळकांना 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावर चार जुलै 1899 रोजी ‘ पुनश्च हरि:ओम !’ हा अग्रलेख लिहून टिळकांनी पुन्हा नव्या जोमाने स्वराज्यप्राप्तीच्या कामाला सुरुवात केली. ‘देशाचे दुर्दैव’ (12 मे 1908) आणि ‘हे उपाय टिकाऊ नाहीत ’(9 जून 1908) या अग्रलेखांमुळे टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला, त्यात टिळकांना सहा वर्षे काळे पाणी व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आपल्या वर्तमानपत्रात कोणता शब्द कशाप्रकारे छापून आला पाहिजे याबाबत त्यांनी खास पुस्तिका तयार केली होती त्या पुस्तिकेत जवळपास तीन-साडेतीन हजार शब्द होते. मराठी भाषेची लेखन पद्धती या विषयावर त्यांनी चार अग्रलेख लिहिले. प्रत्येक वर्तमानपत्राची भाषा त्या त्या संपादकाच्या भाषेवरुन ठरवली जाते. टिळकांची भाषा ही त्यांच्यासारखीच जहाल, लोकांच्या मनात घर करणारी होती. त्यांच्या अग्रलेखांची शीर्षके नजरेखालून घातली तरी याची प्रचिती येते. 1881 ते 1920 या काळात टिळकांनी सुमारे 513 अग्रलेख लिहिले.

पत्रकार,पंडित,राजकारणी आणि भविष्यदर्शि नेता अशा विविध भूमिकातून लोकमान्यांनी लेखन केले. राष्ट्रीय अभ्युदय आणि मानव जातीचे कल्याण या त्यांच्या राजकीय जीवनाच्या मुख्य प्रेरणा होत्या. दुष्काळ असो की प्लेग, त्या संकटांना तोंड देण्यासाठी त्यांनी आपल्या लेखांद्वारे जनतेत धैर्य निर्माण केले आणि गणेश- उत्सव, शिवाजी –उत्सव यांच्या द्वारा संघटना बांधली. त्यांनी सुरू केलेले असे उत्सव किंवा चालविलेल्या चळवळी एका विशिष्ट जातीसाठी नव्हत्या हे त्यांनी आपल्या लेखातून तर मांडलेच त्याहीपेक्षा अधिक ठाशीवपणे आपल्या कृतीतून दाखवून दिले.

शेतकर्‍यांची स्थिति, शेती सुधारणा, सारा पद्धती यावर त्यांनी ‘जमिनीची मालकी बुडाली’, ‘सावकार मेला कुणबिहि मेला!’, ‘फेरपहाणीचा जुलूम’ असे अनेक अग्रलेख लिहिले. ते म्हणत ‘ हिंदुस्थानातील शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा आहे. त्याच्यावरील मालीन्याचा पडदा दूर करता आला तरच हिंदुस्तानचा उद्धार होईल. या करिता शेतकरी आपला व आपण शेतकर्‍यांचे, असे आपणास वाटवयास हवे.’

‘देश सधन असो व निर्धन असो, जित असो व अजित असो, लोकसंख्येच्या मानाने हलक्या दर्जाचे म्हणजे काबाडकष्ट करून निर्वाह करणार्‍या लोकांची संख्या जास्त असावयाचीच. या करिता या समाजाची स्थिति सुधारली नाही तोपर्यंत देशस्थिती सुधारली, असे कधीही म्हणता येणार नाही.’ देश म्हणजे काय,लोक म्हणजे कोण हे लोकमान्यांनी आपल्या मनाशी निश्चित केले होते. देश म्हणजे शेतकरी, देश म्हणजे काबाडकष्ट करणारी जनता.खरा हिंदुस्थान म्हणजे खेड्यापाड्यात आहे आणि तेथे राष्ट्र निर्माण करायचे म्हणजे या खेड्यापाड्यात जागृती करायची अशी त्यांची धारणा होती. अर्थात गिरणी- कारखान्यात काम करणारा कामगारवर्गही त्यांना तेव्हडाच महत्त्वाचा वाटत असे. 1902-3 पासून टिळकांनी त्या वर्गातही राष्ट्रीय जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. म्हणूनच टिळकांना 1908 मध्ये झालेल्या शिक्षेच्या निषेधार्थ कामगारांनी संप पुकारला आणि सरकारी अत्याचारांना न जुमानता तो सहा दिवस चालू ठेवला.

जे हिन्दी राजकारण पूर्वी सरकारसन्मुख होते व बौद्धिक पातळीवरून चालत होते ते लोकमान्यांनी लोकांच्या बोलीत बोलून लोकाभिमुख केले आणि त्याला कृतीची जोड दिली म्हणून त्यांच्या वाणीला मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी सारे राष्ट्र उभे राहिले आणि लोकमान्य भारतातील ‘लोकयुगाचे निर्माते‘ ठरले.

- विद्याविलास पाठक

Web Title: Vidyavilas Pathak Writes About Lokmanya Tilak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..