रणातील हिमनग अन्‌ बर्फाखालची धग...

Narendra Modi Amit Shah
Narendra Modi Amit Shah

निसर्गाची शक्ती अफाट आहे अन्‌ तो त्याची प्रचिती वेळोवेळी देतही असतो. माणूसही याच निसर्गाचा ताकदवान घटक. अन्य सजीवांच्या तुलनेत जास्तच "शहाण'पण लाभलेला. निसर्गाप्रमाणेच अनेक गुणधर्म त्याच्यातही ठासून भरले आहेत. प्रेम-द्वेष, राग-लोभ, मद-मोह इ. इ... या गुण-अवगुणांसह त्याचं व्यक्तिमत्व घडतं नि ते घेऊनच तो समाजात वावरत असतो. अवतीभवतीच्या साऱ्या बऱ्या-वाईट गोष्टी, घटना-घडामोडी त्याच्यातील या अंगभूत गुणांवर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम करीत असतात. निसर्गात जसे बाह्य प्रभावाने अनेक बदल होतात, अगदी तसेच भावनिक, बौद्धिक, वैचारिक, सामाजिक असे कितीतरी बदल माणसातही होतात. निसर्गातील बदलांतून अनेक विपरित गोष्टी घडतात; पण वाळू नि गवताळ रणात हिमनग दिसू लागला अन्‌ बर्फाच्या थराखाली धग धुमसू लागली, असं कधी घडत नाही... सभोवतालच्या अस्वस्थ वर्तमानाने माणसामध्ये होत असलेल्या अंतर्बाह्य बदलातून गुजरात नि हिमाचलच्या राजकीय पृष्ठभूमीवर मात्र असा अनोखा "करिष्मा'पाहायला मिळतो आहे... 

अखिल भारतासमोर गेल्या दीड-दोन महिन्यांत गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांशिवाय फार मोठा "मुद्दा' नव्हता. ओखी वादळ नि इव्हान्का ट्रम्प यांच्या येण्या-जाण्यापलीकडे चर्चेचा तसा मोठा विषयही नव्हता. या दोन राज्यांतील निवडणुकांनीच माध्यमे, समाजमाध्यमांमध्ये नि पर्यायाने सर्वसामान्यांभोवती फेर धरला होता. दावे- प्रतिदावे, टीका- प्रतिटीका, आरोप- प्रत्यारोपांच्या धुळवडीनंतर आता या दोन्ही राज्यांचा निकाल समोर आला आहे. गुजरातेत भाजपला पुन्हा सत्ता मिळाली, तर हिमाचलात कॉंग्रेसने ती या पक्षाला दिली... 

गुजरातमध्ये शंभरी पार करता करता भाजपची जी दमछाक झाली, त्यावरुन या पक्षाने सत्ता "मिळवली" म्हणण्यापेक्षा त्यांना ती "मिळाली' असेच म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह देशभरातील बहुतांश ज्येष्ठ नेते भाजपने या कुरूक्षेत्रावर उतरवले. खरे तर, पंतप्रधान म्हणून जगभरात उंचावलेली आणि भाजपनेही आणखीन मोठी केलेली मोदींची प्रतिमा पाहता ते "न धरि शस्त्र करी' म्हणत भाजपच्या प्रचाररथाचे केवळ सारथ्य करतील नि शहांना युक्तीच्या चार गोष्टी सांगतील, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र मोदींना थेट युद्धात तर उतरावे लागलेच; शिवाय त्यांच्या या प्रतिमेला शोभणार नाहीत, अशी "शस्त्रे'ही वापरावी लागली. पाटीदार समाजाचे आंदोलन, त्यातून हार्दिक पटेल नावाच्या तरुण नेत्याचा झालेला उदय, नोटाबंदी नि "जीएसटी'च्या फटक्‍यात कंबरडे मोडलेला गुजरातेतील व्यापार-उदीम, सर्वसामान्यांची दोन्ही सरकारांकडून झालेली निराशा अन्‌ या सगळ्यांतून तयार झालेले नकारात्मक वातावरण कॉंग्रेसला नवसंजीवनी देणारे ठरले. राहुल गांधी यांच्या "राष्ट्रीय' नेतृत्वाचे लॉन्चिंग याच निवडणुकीने केले आणि या पक्षाच्या "पुरोगामी धार्मिकते'च्या रणनीतीला काही प्रमाणात यशही आले. बावीस वर्षांच्या सत्तेनंतर स्वाभाविकपणे प्रस्थापित सरकारविरोधात लाट येते, असे घटलेल्या जागांबाबत भाजप नेते म्हणू शकतील. पण, प्रश्‍न ढळत चाललेल्या विश्‍वासाचा अन्‌ संपत चालेल्या संयमाचा आहे. राहुल गांधींनी हवा दिलेला "जीएसटी'चा मुद्दा या निवडणुकीत अडचणीत आणू शकतो, हे ध्यानात येताच दीड- पावणेदोनशे वस्तूंवरचा कर 28 वरुन 18 टक्‍क्‍यांवर आणण्यात आला. अमर्याद शक्तीमुळे मानवी स्वभावात येणाऱ्या ताठरपणालाही अस्तित्वासाठी लवचिक होण्यास भाग पाडणारे असे प्रसंग यानिमित्ताने अनुभवायला आले... 

भाजपने 2002 चा अपवाद वगळता त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका केवळ "विकास' याच मुद्यावर लढवल्या आणि जिंकल्या. या दहा वर्षांच्या काळात विकासाच्या "गुजरात मॉडेल'चा जन्म झाला. पुढे केंद्रात आणि अन्य काही राज्यांत सत्ता मिळवताना पक्षाने या "मॉडेल'चा पुरेपूर उपयोग केला. त्यामुळे भाजप केवळ विकासाचे राजकारण करतो, हे ठसवण्यात पक्षाला यश येऊ लागले. यावेळी मात्र गुजरातच्या रणभूमीवर विकासाच्या राजकारणाची ही ढाल गळून पडली नि शत्रू जे शस्त्र उपसेल, तशाच शस्त्राने लढण्याची, समोरचा रथावरुन "खाली' उतरला की त्याच्या "पातळी'वर येण्याची वेळ मोदी- शहांसह भाजपच्या नेत्यांवर आली. दुसरीकडे, राहुल गांधींनी धार्मिकस्थळांवर माथा टेकवीत "सौम्य हिंदुत्वा'चा शंख फुंकला. परिणामी राजकीयच नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक अन्‌ भावनिक मुद्यांवर भाजपची चक्रव्यूहात अडकल्यागत चहुबाजूने कोंडी झाली. त्यातून हा पक्ष बाहेर पडू वा सावरू शकला असता, तर गेल्या वेळच्या इतकी नसली, तरी किमान तीन अंकी संख्या तरी गाठता आली असती. आपल्याच भूमीवर मोठा संघर्ष करुन भाजपने सत्तेचे हे महाभारत जिंकले असले, तरी गुजरातमधील तमाम सर्वसामान्य आप्तस्वकियांच्या मनोभूमीवर या पक्षाचे स्थान निःसंदेह आक्रसले आहे... 

निसर्गाचं अलौकिक वरदान लाभलेल्या, देवभूमी हिमाचलातील निकाल मात्र भाजपला दिलासा देणारा आहे. तिथल्या स्थानिक डोंगरी, कांगडी, किन्नौरी, चंबेली लोकांइतकीच तिबेटी मते तिथल्या निवडणुकीत निर्णायक ठरतात. अर्थात या सर्व भाषिक वा जातीसमूहांचे शिक्षण आणि रोजगारासारखे काही प्रश्‍न सारखेच आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांत आलटून पालटून कॉंग्रेस- भाजपची सरकारे आली नि गेली, पण मूलभूत गरजा अन्‌ पर्यटनवाढीसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांची या संपन्न प्रदेशाला लागलेली तहान अजूनही भागलेली नाही. कॉंग्रेसच्या मावळत्या सरकारला तर भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पुरते घेरले होते. मुख्यमंत्री वीरभद्रसिंह आणि त्यांच्या पत्नीला बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी "सीबीआय'ने अटक केली. अर्थात या प्रकरणातही केंद्रातील मोदी सरकारने "सीबीआय'चा वापर वीरभद्रसिंहांच्या आणि पर्यायाने कॉंग्रेसच्या खच्चीकरणासाठी केल्याचा आरोप झाला. मात्र, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपातील तथ्य दडून राहिले नाही. वीरभद्रसिंहांवर भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई होऊनही या निवडणुकीत कॉंग्रेसकडे त्यांच्याशिवाय "चेहरा' नव्हता, ही खरे तर लाज काढणारी गोष्ट! 82 वर्षांच्या या नेत्यालाच पुन्हा हिमाचलवर लादण्याचा प्रयत्न सोशल मीडियातील सक्रियतेमुळे सजग झालेल्या हिमाचली तरुणांना रुचणे शक्‍य नव्हते. त्यातूनच कॉंग्रेसच्या बाबतीत सामान्य मतदारांची मनोभूमिका बदलत गेली आणि त्या पक्षावरच्या नाराजीतून त्यांनी भाजपला मतदान केले. त्यांचा कौल भाजप नेत्यांच्या वा नेतृत्वाच्या बाजूने असता तर या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल आणि प्रदेशाध्यक्ष सतपालसिंग सत्ती यांचा पराभव झाला नसता आणि तो वीरभद्रसिंह यांच्या विरोधात असता, तर ते स्वतः आणि त्यांचे पुत्र विक्रमादित्यसिंह विजयी झाले नसते... 

गुजरातमध्ये भाजपला टक्कर दिलेल्या कॉंग्रेसने हिमाचल मात्र जणू त्या पक्षालाच आंदण दिले. "निवडणुकीत पक्षाने योग्य प्रचार यंत्रणा राबवली नाही,' ही वीरभद्रसिंहांची निकालानंतरची प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या एकूणच स्थितीचे आकलन होण्यास पुरेशी आहे. इकडे बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार शोधण्याची वेळ भाजपवर आली आहे. नेता निवडून आलेल्या कॉंग्रेसची सत्ता गेलीय अन्‌ सत्ता आलेल्या भाजपकडे नेता नाही. म्हणजे वीरभद्रसिंहांच्या भ्रष्टाचाराची कॉंग्रेसला शिक्षा मिळालीय नि भाजपला त्यांच्या प्रभावाची! सिमला- मंडीच्या पहाडी घाटरस्त्यांपेक्षाही निसरडी, बेभरवशाची अन्‌ तितकीच धोकादायक चढ- उताराची वाट आता भाजपच्या वाट्याला आली आहे. तर, सामान्य लोकांच्या हितापेक्षा स्वार्थासाठी सत्ता वापरणाऱ्या वीरभद्रसिंहांसह कॉंग्रेसलाही हिमाचलने धडा दिला आहे. भाजप प्रभावाच्या बर्फवृष्टीतही भ्रष्टाचाराच्या दुलईखाली सत्तेची उब अनुभवणाऱ्या कॉंग्रेसला या बर्फाखालच्या धगीची जाणीव निकालानंतर झाली असेल... 

हिमाचल असो की गुजरात; निसर्ग बदलतो तसा त्याचाच भाग असलेल्या मानवी भावभावनांमध्येही बदल होतो, हे सूत्र मान्य केले की या दोन्ही ठिकाणच्या निकालांचा अन्वयार्थ गवसू लागतो. त्या त्या ठिकाणच्या बदलत्या सामाजिक संदर्भांचा परिणाम तिथल्या सर्वसामान्य माणसाची मानसिकता बदलण्यात झाला आणि त्यातूनच त्याच्या "मता'मध्ये परिवर्तन झाले. हिमाचलात भ्रष्टाचाराच्या नि थंड कारभाराच्या बर्फाखाली धुमसणाऱ्या आशा- आकांक्षांच्या 'धगी'चा अंदाज कॉंग्रेसला आला नाही. त्यामुळे हाती उरलेल्या मोजक्‍या राज्यांपैकी एका राज्याची सत्ता गमावण्याची वेळ त्या पक्षावर आली. तशीच काहीशी गत गुजरात जिंकूनही भाजपची झाली आहे. तिथल्या हक्काच्या नि 'गृहित' धरलेल्या जनमताच्या रणात भाजपसमोर उगवलेला स्वतःच्या पीछेहाटीचा नि कॉंग्रेसच्या प्रगतीचा आकडा हे एखाद्या अकल्पित हिमनगाचे टोक असू शकते आणि ते दिसणे हाच मोठा इशारा आहे. भाजपला तो कळला नाही वा त्याने तो अलीकडच्या सवयीप्रमाणे (जु)मानला नाही, तर मन आणि मत परिवर्तनाच्या पूर्ण हिमनगाचे दर्शन या पक्षाला कदाचित 2019 मध्येच होईल. 'महाभारत' जिंकूनही 'द्वारका'  पाण्याखाली जाताना पाहण्याची वेळ आल्याचा तो स्पष्ट संकेतही असेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com