गांधी - मोदी ते फांदी... एक 'सैराट'पण 

विजय बुवा 
गुरुवार, 19 जानेवारी 2017

कुठल्या गोष्टीला किती डोक्‍यावर घ्यायचं, याचं भान समाज माध्यमांना येतंय आणि हे चांगलं लक्षण मानावं लागेल. चार 'शहाण्या' डोक्‍यांच्या एकत्र असण्याने वा एकत्र येऊन केलेल्या कृतीमुळे एखाद्या गोष्टीची 'वाट' लागण्याचीच शक्‍यता जास्त असते. विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या सोशल मीडियाच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. किंबहुना विखुरलेपण हेच या माध्यमाचं खरं बलस्थान आहे. ट्‌विटरवर एखाद्याचे कितीही लाख फॉलोअर असले, तरी त्या अफाट संख्याबळाला नमवण्याची वा किमान जेरीला आणण्याची ताकद केवळ नैतिक बळावर उभ्या राहिलेले काही मोजके नेटिझन्सही इथं दाखवू शकतात. गांधी-मोदी अन्‌ अलीकडच्या तुटलेल्या फांदीच्या प्रकरणात हेच सिद्ध झालं... सत्तेसाठी वा स्पर्धेपोटी उगाच 'सैराट' झालेल्यांनी वेळेवर भानावर यावं, हाच यातला खरा 'संदेश'... तो ज्याला लवकर समजला, तोच इथं वाचू शकतो; अन्यथा मुक्तपणे अभिव्यक्त होण्याच्या या सशक्त माध्यमात कुणाच्याही चुकीला माफी नाही..! 

'डाटा'चा मोफत वाटा मिळूनही एखाद्या सकारात्मक, प्रेरणादायी व्हीडीओ अथवा माहितीपेक्षा नोटाबंदी अन्‌ तिच्या समर्थन- विरोधाच्या नि राजकीय उण्यादुण्यांच्या क्‍लिप सोशल मीडियात जोमानं शेअर होत राहतात... त्यांचा अतिरेक होतो नि कधी कधी किळसही वाटू लागते... अशा गढूळलेल्या पाच इंची स्क्रिनवर एखादा जुना मित्र आपल्या आवडीचं गाणं अथवा गझल अलगद सरकवतो अन्‌ सगळं कसं अगदी नितळ वाटू लागतं... भोवतीच्या अस्वस्थ वर्तमानातूनही नवे अर्थ गवसू लागतात... नाशकातील सन्मित्र डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी परवा अशीच एक फेवरिट गझल पाठवली. मोहसिन नक्वी यांची नि गुलाम अलींनी गायलेली ही गझल 'आवारगी'ला, प्रचलित भाषेत सांगायचं तर सैराटपणाला संबोधून लिहिलेली... 

ये दिल ये पागल दिल मेरा क्‍यू बुझ गया आवारगी 
इस दश्‍त में इक शहर था वो क्‍या हुआ आवारगी... 

इथपासून ते 

हम लोग तो उकता गये... अपनी सुना आवारगी 

असं उद्विग्नपणे विचारत 'त्या' बेशक्‍ल बेभानपणाला भिडणारी, थेट प्रश्‍न करणारी. तशी ही गझल आधी अनेकदा ऐकलेली. पण, खूप दिवसानंतर ती ऐकताना तिच्यातल्या प्रत्येक शब्दाचे नवे अर्थ हाती येऊ लागले... अवतीभवतीच्या घटनांचे संदर्भही त्यांच्याशी जुळू लागले... 

आजकाल देशातला माहोल इतका बदललाय की कुणी राजकारण अन्‌ अर्थकारणाशिवाय दुसऱ्या कशावर फारसा बोलत नाही. नोटाबंदी नि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं प्रभावित झालेलं सामान्य जनजीवन अजूनही फारसं पूर्वपदावर आलेलं नाही. त्यातच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका नि महाराष्ट्रात सुरू झालेल्या जिल्हा परिषद- महापालिकांच्या रणधुमाळीने माध्यमांचा परीघ व्यापला आहे. अशा धांदलीतही समाजमन पुरतं ढवळून काढणाऱ्या काही ना काही घटना रोज घडताहेत. म्हटल्या तर टाळता येणाऱ्या... म्हटल्या तर अटळ..! पण, इथं तेवढा विचार करायला कुणाला वेळ नाही अन्‌ असलाच तर तो करण्याचं कारणही नाही. कदाचित कुणी थांबवत नाही वा तसा प्रयत्न करीत नाही, म्हणून मग अशा घटनाही घडत राहतात. सरकार 'आपल्या'साठी की आपल्या स्वतःसाठी, असे प्रश्‍न त्यातून उभे राहू लागतात... एखादी व्यवस्था अनियंत्रित, असंवेदनशील नि असंयमी अशी जन्माला आली असेल, तर या प्रश्‍नांचा गुंता तयार होतो. अतर्क्‍य निर्णय नि अवास्तव कृतीमधून आकाराला येणाऱ्या अनपेक्षित घटनांची एक मालिका अव्याहत सुरू राहते. विशेष म्हणजे, या घटनाक्रमात कितीही अन्‌ कसलेही प्रश्‍न निर्माण झाले, तरी त्यांचे उत्तर विचारण्याची सोय नसते. अनिर्बंध अशा ताकदीतून उभी राहिलेली ही व्यवस्था आपणच साऱ्यांचे तारणहार असल्याचा शिक्का स्वतःवर मारून घेते. या शिक्‍क्‍याला समाजाने मान्यता दिली, की ती कळत नकळत बेभान होऊ लागते... 

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधींच्या जागी पंतप्रधान मोदींची छबी झळकल्याची घटनाही याच प्रकारातली. ती लक्षात येताच पहिली प्रतिक्रिया खादी आयोगातूनच उमटली. तिथल्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आत्मक्‍लेश केला नि एकूणच हा प्रकार जगासमोर आला. मग सरकार अन्‌ विशेषतः मोदी विरोधकांना आयते कोलित मिळाले. त्यांनी टीकेची झोड उठवली. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी ट्‌विटरवरुन मोदींना उद्देशून केलेली 'हाथ में चरखा... दिल में नथुराम' ही टिप्पणी काहींच्या इतकी जिव्हारी लागली, की तुषार यांच्याविरुद्ध ट्‌विटस्‌चा भडिमार झाला. एकीकडे असा राडा सुरू असताना सामान्य लोकांमधून उमटलेल्या प्रतिक्रिया अधिक तीव्र, नेमक्‍या अन्‌ बोलक्‍या होत्या. शिवाय, मार्मिक भाष्य नि शेलक्‍या उदाहरणांतूनही लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजींच्या जागी मोदींचे मॉर्फ केलेले फोटो, कार्टून अशा विविध माध्यमांतून उपरोधाचं शस्त्रही वापरलं गेलं. पण, खादीचं सूत काचू लागलं तरी सरकारमधून कुणी काही बोलेना... कुणी तोकडं समर्थन करण्याचा प्रयत्न केलाच, तर सोशल मीडिया त्याचाही लगोलग समचार घेत होता. त्यामुळं या प्रकारावर मोदी अन्‌ सरकारचा बचाव करता करता भाजपच्या सोशल मीडियातल्या आर्मीच्याही नाकी नऊ आले... 

ग्रॅन्ड गांधींना चरख्यावरुन उठवून तिथं बसवले गेलेल्या 'ब्रॅन्ड मोदीं'बाबत माध्यमांनी नेमकं भाष्य केलं, तर समाज माध्यमे स्वाभाविकपणे तुटून पडली. या प्रकरणात तसे अनेक संदेश दडले आहेत. राजकारणातल्या पंडितांनी त्यांचे त्यांना गवसलेले अर्थही मांडले. त्यापेक्षाही लोकांच्या टीकात्मक प्रतिक्रियांमध्ये दडलेला 'संदेश' खरं तर सत्ताधाऱ्यांना अंतर्मुख करणारा होता. पण, तो लक्षात कोण घेतो? जिथं आज कुणालाच कुणाचं ऐकायचं नाही, अशी स्थिती आहे, तिथं विखुरलेल्या पडसादांची कदर कोण आणि कशाला करेल..? अवतीभवती कमालीची आत्मकेंद्री, आपमतलबी अन्‌ अहंमन्य व्यवस्था तयार झाल्यावर सामाजिकता, संवेदनशीलता नि सर्वमान्यता या आदर्श तत्वांना कुणी विचारत नाही. आजकाल तर अशा व्यवस्थांमुळे जगभरातील जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. एकीकडे या बेभानपणाला सीमा नसल्याचा प्रत्यय येतो, तसा संयमीपणाला मर्यादा नसल्याचाही अनुभव ठायीठायी येतो. कुणी किती सैराट व्हावं नि कुणी किती धैर्य एकवटावं, हे ज्याच्या त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक अन्‌ झालंच तर आर्थिक बळावर अवलंबून असतं. पण, एका कुणाकडं अनिर्बंध ताकद एकवटली की साहजिकच त्यातून एक तर चांगलं घडतं किंवा वाईट... अशी अफाट शक्ती सत्तास्थानी असेल, तर तो देश जगात अग्रेसर होतो वा अराजकाकडे जातो... म्हणजे बळाच्या निरंकुश वापरातून होणारे परिणाम दोनच स्वरुपाचे असू शकतात... चांगला अथवा वाईट ! त्याशिवाय अन्य काही घडू शकत नाही अन्‌ जगाच्या इतिहासात तशी उदाहरणेही नाहीत. सत्ताबळाचा वापर करताना चांगल्या इराद्याने येणारा झपाटलेपणा नि केवळ वाईट करण्याच्या हेतूने आलेला बेलगामपणा यामध्ये राज्यकर्त्यांनी कळत नकळत वा जाणीवपूर्वक गल्लत केली की देशात आणीबाणीची स्थिती निर्माण होते. आणीबाणी राजकीय असते, तशी आर्थिक अन्‌ व्यापक अर्थाने सामाजिकही असते. आपल्याला जी गोष्ट झपाटलेपणाची वाटते, तिच्यात बेलगामपणाचा अंश कधी मिसळला गेला, हे लोकांना अनेकदा कळतही नाही. आणि या मिश्रणातून तयार होणारा राजकीय 'गुणविशेष' बेभान, मोकाट व्यवस्थेचं प्रतीक बनतो. कुणी त्याला 'आवारगी' मानतो, तर कुणाला तो 'सैराट'पणा वाटतो... 

भान सुटण्याला तसं कसलंच बंधन नसतं. एकूणच साऱ्या समाजव्यवस्थेचं भान हरपलंय, असं वाटतं तेव्हा त्यातील प्रत्येक घटक काही ना काही प्रमाणात बेभान झाला असल्याचं जणू गृहित धरलेलं असतं. माध्यमे हाही या समाजव्यवस्थेचाच एक भाग. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या या क्षेत्रालाच आरसा दाखवण्याची वेळ अलीकडे वारंवार येते आहे. विशेषतः वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत अशा घटना नेहमीच घडतात. त्यातूनच आधीच सुकून जीव गेलेल्या एखाद्या झाडाच्या फांदीचं 'ब्रेक' होणंही 'ब्रेकिंग न्यूज'ठरते ! मग चॅनलने बातमी दाखवली म्हणजे काहीतरी आक्रितच घडलं असणार, या धारणेत कायम वावरणारा तमाम मराठी प्रेक्षक 'त्या' फांदीच्या तुटण्यानं आर्ची अन्‌ परशापेक्षाही कासावीस होतो..! सतत वेगळं, नवं अन्‌ सगळ्यात आधी देण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमुळं माध्यमांमध्ये आलेलं हे 'सैराट'पण दिवसरात्र जागा असलेला सोशल मीडिया जराही खपवून घेत नाही. तो पटलेल्या गोष्टींना डोक्‍यावर घेतो अन्‌ न पटलेल्या गोष्टींना उचलून पटकतो. त्याला चरख्यावरुन गांधी उठलेले अन्‌ मोदी बसलेले जसे चालत नाहीत, तसे आपणच डोक्‍यावर घेतलेल्या सिनेमातल्या झाडाची फांदी तुटल्याची बातमी 'ब्रेकिंग न्यूज' म्हणूनही चालत नाही. परिणामी अशा प्रकारांवर ट्रोलिंग करीत; उपरोध, उपहासातून टर उडवत वेळच्या वेळी 'जागा' दाखवण्याचं काम तो चोख बजावतो. 'सैराट'ला लोकांनी डोक्‍यावर घेतलं, याचा अर्थ त्यात काही सेकंद दिसलेल्या राठ झाडाच्या फांदीलाही ते मस्तकी लावतील, असं वाटणं हाच मुळात बालिशपणा. वास्तविक अशा 'बातम्या' पत्रकारांपर्यंत पोहोचवणाऱ्यांचा एक तर मीडियाच्या एकूणच 'आकलना'वर गाढ विश्‍वास असावा अथवा मीडियाला हातोहात खेळवण्याचं कसब तरी त्यांनी साधलं असावं. त्याशिवाय अशा गोष्टी लाईव्ह मीडियाच्या प्राईम बुलेटिनमध्ये 'ब्रेक' होणार नाहीत. पण, एखाद्या चॅनलने काहीही दाखवलं, तरी चालवून घेण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. सोशल मीडिया त्यांचा वेळीच अन्‌ हवा तसा समाचार घेऊन चुकीच्या गोष्टींना पायबंद घालण्याची तत्परता दाखवतो आहे. अशा फांदी तुटल्याच्या घटना मोठी बातमी होऊन प्रेक्षकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न झाला, तरी फेसबुक, ट्‌विटरवरुन त्याच फांदीच्या तुकड्यांची मोळी बांधून संबंधित माध्यमाच्याच डोक्‍यावर ठेवण्याइतकी सजगता नि सामर्थ्य या मीडियामध्ये येऊ लागलंय... 

एका अर्थानं कुठल्या गोष्टीला किती डोक्‍यावर घ्यायचं, याचं भान समाज माध्यमांना येतंय आणि हे अधिक चांगलं लक्षण मानावं लागेल. चार 'शहाण्या' डोक्‍यांच्या एकत्र असण्याने वा एकत्र येऊन केलेल्या कृतीमुळे एखाद्या गोष्टीची 'वाट' लागण्याचीच शक्‍यता जास्त असते. विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या सोशल मीडियाच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. किंबहुना विखुरलेपण हेच या माध्यमाचं खरं बलस्थान आहे. ट्‌विटरवर एखाद्याचे कितीही लाख फॉलोअर असले, तरी त्या अफाट संख्याबळाला नमवण्याची वा किमान जेरीला आणण्याची ताकद केवळ नैतिक बळावर उभ्या राहिलेले काही मोजके नेटिझन्सही इथं दाखवू शकतात. बेभान होऊन समाजाच्या सद्‌सद्विवेकावर स्वार होणाऱ्या बेशक्‍ल 'आवारगी'ला भिडण्याचं, थेट प्रश्‍न विचारण्याचं 'नेट' या सोशल सिटिझन्समध्ये नक्कीच आलं आहे. गांधी-मोदी अन्‌ अलीकडच्या तुटलेल्या फांदीच्या प्रकरणात हेच सिद्ध झालं... सत्तेसाठी वा स्पर्धेपोटी उगाच 'सैराट' झालेल्यांनी वेळेवर भानावर यावं, हाच यातला खरा 'संदेश'... तो ज्याला लवकर समजला, तोच इथं वाचू शकतो; अन्यथा मुक्तपणे अभिव्यक्त होण्याच्या या सशक्त माध्यमात कुणाच्याही चुकीला माफी नाही..! 

Web Title: Vijay Buwa writes about Narendra Modi and Mahatma Gandhi