मदतीचा 'विजय' रथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Chowgule help Famine of starving families during Corona period

मदतीचा 'विजय' रथ

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली होती. सारे जिथे होते, तिथेच अडकून पडले होते. अशा आणीबाणीच्या काळात नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हजारो टन सुका खाऊ, अन्न-धान्ये, कपडे, लहान मुलांना कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वर्षभर वाटप केले. कोविडच्या अगदी पहिल्या लाटेपासून ते अलिकडच्या काळापर्यंत चौगुले यांचे समाजकार्य सुरू होते. ऐरोली येथे लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या रेन्बो सर्कसमधील सर्व कलाकारांना चौगुले यांच्यातर्फे रोज जेवण दिले जात होते. अगदी सकाळचा नाश्ता, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापर्यंतची व्यवस्था केली. काही दिवसांनी या कलाकारांसमोर अंगावरील कपड्यांचा प्रश्न उभा राहिला. चौगुले यांनी या सर्व कलाकारांना लोकांचे जुने कपडे न देता, दुकानातून नवीन कपडे खरेदी करून दिले. या सर्कसमधील सर्वांच्या कोविड चाचण्या करून त्यांचा कोविडपासून बचावही केला. रेन्बो सर्कसमधील कलाकारांची अगदी वडिलांच्या मायेने सहा महिन्यांपेक्षा जास्त रोजचे जेवण, मुलांना खाऊ, पुस्तके, गोळ्या-औषधे, रुग्णालयातील उपचार अशा सर्व सुविधा देऊन पालकत्व स्वीकारले. २७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चौगुले यांनी रेन्बो सर्कसमधील १७० कलाकारांना ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत कपडे, जीवनावश्यक वस्तू आणि अन्न-धान्यांचे वाटप करण्यात आले. रेन्बो सर्कसमधील कलाकारांसोबत प्राणी आणि पक्ष्यांचेही संगोपन चौगुले यांनी मोठ्या मायेने केले. सर्कशीतील घोडे, विविध प्रजांतीचे पक्षी आदींकरिता अन्न-पाण्याची व्यवस्था चौगुले यांनी स्वतः केली.

कोविडच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकर उडाला. ऑक्सिजनच्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला. अनेकांना खाटांअभावी रग्णालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. अशा परिस्थितीत रहिवाशी संकुलांमध्ये असणाऱ्या सभागृहांचा चांगला वापर करण्याच्या उद्देशाने विजय चौगुले यांनी पहिले पाऊल टाकले. ऐरोलीतील यश गृहनिर्माण सहकारी सोसायटीत चौगुले यांच्या प्रयत्नांमुळे एका खाजगी रुग्णालयाच्या सहकार्याने देशातील पहिले कोविड केअर केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात सोसायटीतील ऐरोलीतील यश पॅराडाईस ही सोसायटी सर्वांसमोर आदर्श देणारी ठरली आहे. या सोसायटीच्या मिटिंग हॉलमध्ये २६ खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले होते. या रुग्णालयात १० आयसीयू खाटा, तर १६ खाटांना ऑक्सिजन देण्यात आले आहे. रुग्णांची सुश्रृशा करण्यासाठी सहा तज्ज्ञ डॉक्टर आणि १२ परिचारिका असे कर्मचारी नियुक्त केले. त्या केंद्राचे लोकार्पण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

चौगुले यांनी वडार समाजाच्या उद्धारासाठी नवी मुंबईत सानपाडा येथे देशातील पहिले भव्य वडार भवन उभारले आहे. या भवनाचे लोकार्पण राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडले. कोविडकाळात या भवनाचा महापालिकेला मोठा आधार मिळाला. चौगुले यांनी वडार भवन रुग्णालयातील डॉक्टर, महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी दिले होते. याठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

महापालिकेसोबत पोलिस खात्यालाही चौगुले यांनी मोठे सहकार्य केले. रस्त्यावर उन्हात बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना जेवणासोबत पाणी, खाऊची पाकिटे दिली. आरोग्य तपासणी केली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला सामोरे जात असताना सरकारने राबवलेल्या कोविड लसीकरण ऐरोली आणि दिघा परिसरातील झोपडपट्टीत घरोघरी पोहोचवण्यात चौगुले यांचा सिंहाचा वाटा आहे. चौगुले यांनी अपोलो, इंद्रावती आणि रिलायन्स या रुग्णालयांच्या सहकार्याने कोविड लसीकरण शिबिर राबवले. या शिबिरात लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या घटकांचा समावेश केला. यश पॅराडाईज सोसायटी, ऐरोली सेक्टर ९ आणि १० या परिसरात ज्येष्ठ नागरिक, रामनगर, ईश्वरनगर, चिंचपाडा आणि इलठाणपाडा येथे मोफत शिबिर राबवण्यात आले. झोपडपट्टीतील गोरगरीब जनतेला चौगुलेंमुळेच कोविड लसीकरणाचा लाभ घेता आला. चिंचपाडा येथे चौगुले यांच्या मदतीमधून ३० ऑगस्ट २०२१ ला १०० खाटांचे बाळासाहेब ठाकरे कोविड केंद्र सुरू करण्यात आले. हे केंद्र आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटा आणि अद्ययावत व्हेन्टीलेटरने सुसज्ज होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या समाजसेवेचे व्रत चौगुले यांनी अंगीकारले असून त्यांच्या समाजकार्याचा केंद्रबिंदू झोपडपट्टीबहुल भाग राहिला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार आजपर्यंत चौगुले यांनी समाजसेवा केली; परंतु कोविडकाळात हे सूत्र बाजूला ठेवून शंभर टक्के समाजसेवा यानुसारच कार्य केले.

कोविडकाळात थेट जनतेत उतरून समाजसेवा करताना चौगुले यांनाही कोविडची लागणी झाली. तब्बल १८ दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर लढवय्या बाण्याने चौगुले पुन्हा सक्रिय झाले. विजय चौगुले यांनी त्यांच्या समाजकार्याची सुरुवात दिघा, चिंचपाडा, ऐरोली येथील झोपडपट्टी भागातून केली. इलठाणपाडा येथे प्रबोधनकार ठाकरे नावाने सुरू केलेले विद्यालय ३० वर्षांनंतर आजही मोठ्या दिमाखात उभे आहे. चिंचपाडा येथे चंदाबाई लक्ष्मण चौगुले विद्यालयही समाजात गोर-गरीब विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करीत आहे. झोपडपट्टी भागातील जनतेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची वाट चौगुले यांनी खुली करून दिली. त्याचप्रमाणे शहरी भागातील मध्यमवर्गातील कुटुंबांनाही चौगुले यांचा मोठा आधार आहे. या नोकरदारवर्गातील कुटुंबांतील मुलांना आयसीएसई बोर्डाच्या शाळेचे शिक्षण परवडणाऱ्या दरात देण्यासाठी चौगुले यांनी ऐरोली येथे युरो स्कूलची स्थापना केली. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना येथे घडवले जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात अगदी देशपातळीवर नाव कमावले आहे.

चौगुले समाजकारण, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्राही कार्यरत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणून कामकाज पाहतात. १२ मार्चला चौगुले यांचा वाढदिवस असतो. हा दिवसही ते समाजोपयोगी कार्यक्रम करून साजरा करतात. नुकताच संपन्न झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ऐरोली सेक्टर ३ येथे इंद्रावती रुग्णालयातर्फे मोफत ॲन्जीयोग्राफी आणि ॲन्जियोप्लास्टी करण्यात आली. सुमारे ३४० पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो लोकांसाठी रुग्णवाहिका, ऑक्सिजनच्या खाटा, व्हेन्टीलेटर, रेमेडीसीवरचे इंजेक्शन अशा मौल्यवान सुविधा अटीतटीच्या काळात उपलब्ध करून दिल्या. शेकडो गरीब रुग्णांची रुग्णालयातील बिले भरली. काहींना सरकारी विभागातर्फे माफ करून दिले. कोविडकाळातील समाजसेवेसोबतच चौगुले यांच्या समाजकार्याचे दातृत्व याआधीदेखील विविध प्रसंगांतून अधोरेखीत झाले आहे.

तौत्के चक्रीवादळात कामावरून घरी परतणारे ऐरोलीतील रहिवाशी विशाल नारळकर यांच्या अंगावर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर विजय चौगुले यांनी विशाल यांच्या कुटुंबांला मोठा आधार दिला. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्यासोबत विशाल नारळकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली. तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि संगोपनाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारत मानवतेचे दर्शन घडवले. या समाजकार्यासोबतच चौगुले यांनी झोपडपट्टी परिसरात सेंद्रिय कचरा, टाकाऊ वस्तू, सांडपाणी आणि टाकाऊ वस्तू यावर आधारित विविध प्रकल्प राबवले. चिंचपाडा येथे त्यांच्या प्रयत्नांमधून उभ्या राहिलेल्या बायोगॅस प्रकल्पाची देशभरात चर्चा आहे. या प्रकल्पातून रोज ३०० युनिट वीजनिर्मिती होते. त्यावर झोपडपट्टीतील रस्त्यांवरचे सर्व दिवे प्रज्वलीत होतात. या प्रकल्पासाठी चौगुले यांनी महापालिकेकडून ४५ लाख, खासदार निधीतून ७० लाख आणि माईन्ड स्पेस या कंपनीच्या सीएसआर फंडातून ६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. विजय चौगुले यांनी कोविड आणि त्याआधीपासून सुरू केलेला मदतीचा ‘विजय’रथ समाजसेवेसाठी अविरत धावतो आहे.

कोरोनाकाळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबांची उपासमार झाली होती. अर्थचक्र ठप्प झाले. अशा आणीबाणीच्या काळात नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वर्षभर वाटप केले. ऐरोली येथे अडकून पडलेल्या रेन्बो सर्कसच्या कलाकारांनाही चौगुले यांनी आधार दिला. कोविडकाळात थेट जनतेत उतरून समाजसेवा करताना चौगुले यांनाही कोविडची लागण झाली. १८ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर लढवय्या बाण्याने चौगुले पुन्हा सक्रिय झाले.

- विजय चौगुले

Web Title: Vijay Chowgule Help Famine Of Starving Families During Corona Period

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top