Vijay Diwas: रशियाचे सहकार्य ठरले ‘निर्णायक’

बांगलादेश युद्धामधील एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे तत्कालीन सोव्हिएत संघाचे भारताबरोबरचे सहकार्याचे पर्व.
indira gandhi and richard nixon
indira gandhi and richard nixonSakal

- डॉ. राजन कोचर, मेजर जनरल (निवृत्त)

बांगलादेश युद्धामधील एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे तत्कालीन सोव्हिएत संघाचे भारताबरोबरचे सहकार्याचे पर्व. या सहकार्याच्या पर्वाने त्या युद्धालाही एक वळण मिळाले आणि नंतरही त्याचे विविध परिणाम दिसले. भारत-रशिया यांच्यातील या ऐतिहासिक संबंधांवर एक नजर...

भारत (India) आणि रशियाचे (Rasia) एकमेकांबरोबर सात दशकांपासून ऐतिहासिक संबंध (Relation) आहेत. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मॉस्कोला इसवीसन १९५५मध्ये भेट दिल्यानंतर तत्कालीन सोव्हिएत संघाबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांची पार्श्वभूमी तयार झाली. रशियन लष्करी (Russian Army) सामग्री आपल्या लष्करात दाखल करण्याबाबतच्या करारानंतर तर हे संबंध आणखी दृढ होत गेले. तत्कालीन सोव्हिएत संघाने मिग-२१ विमानांचे तंत्रज्ञान हस्तांतरित केल्यानंतर लष्करी सहकार्याची प्रक्रिया सुरू झाली. आज आपल्याकडे मूळच्या रशियाची असलेली मिग-२१, मिग-२३, सुखोई-३०, टी-७२ आणि टी-९० अशी फौजच आहे. आपण नुकतीच विकत घेतलेली रशियन एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा; तसेच एके-२०३ रायफलींचे उत्पादन करण्यासाठीचे संयुक्त सहकार्य यांनी तर या संबंधाला आणखी बळ दिले आहे. आपली अमेरिकेबरोबर जवळीक वाढल्याने रशियाबरोबरच्या संबंधांमधली मंदावलेली गती यामुळे आणखी सुधारली.

भारत-रशिया संबंधांची पायाभरणी

आपण इतिहासात डोकावून बघितले असता, रशिया हा कायम आपला विश्वासू सहकारी राहिला आहे. इसवीसन १९६५मध्ये भारताच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात रशियाने हस्तक्षेप केला होता आणि त्यामुळे त्याची परिणती युद्धविरामात झाली होती. तत्कालीन पूर्व पाकिस्तानने स्वतंत्र होऊन ‘बांगलादेश’ या देशाची स्थापना केली, तेव्हाही रशियाची भूमिका महत्त्वाची ठरली. साधारण त्याच काळात भारत-सोव्हिएत मैत्री आणि सहकार्य करारावर सही करून भारताने रशियाबरोबर महत्त्वाचे सहकार्यपर्व सुरू केले. हा करार ९ ऑगस्ट १९७१ रोजी झाला होता. भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाचे परराष्ट्रमंत्री अँद्रे ग्रोमिको यांनी करारावर सह्या केल्या होत्या. ‘युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानला पाठिंबा देऊ; तसेच चीनने युद्धात भाग घेतला तरी हस्तक्षेप करणार नाही,’ अशी अमेरिकेने घेतलेली भूमिका बघता हा करार महत्त्वपूर्ण होता.

भारत-रशिया मैत्रीचा परिणाम

हा करार भारत आणि रशिया या दोघांच्याही दृष्टीने ‘विन-विन सिच्युएशन’ होती. कारण उसुरी नदी सीमेलगत रशियाला चीनशी संघर्ष करावा लागतच होता. भारताने दुसऱ्या कुठल्याही देशाशी केलेला हा पहिलाच राजकीय करार होता. भारताने बांडुंगमध्ये सन १९५५मध्ये अतिशय ठामपणे स्वीकारलेल्या अलिप्ततावादाच्या पार्श्वभूमीवर हे एक महत्त्वाचे वळण होते. भारत-सोव्हिएत रशिया मैत्री आणि सहकार्य करार हा वॉशिंग्टन-बीजिंग-इस्लामाबाद यांच्यातल्या वाढत्या जवळीकीला जोरदार प्रत्युत्तर देणारा होता. या कराराने भारताच्या भू-राजकीय हित जपले; तसेच भू-एकात्मिकता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण केले. अमेरिका-चीन-पाकिस्तान यांच्या ‘युती’ला अशा प्रकारे प्रत्युत्तर दिल्याने या कराराने भारतीय उपखंडात शांतता आणि सुरक्षितता राहील, याचीही खबरदारी घेतली.

रशियाने दिलेले पाठबळ हे भारतीय लष्करासाठी दिलासादायक होते-कारण अमेरिकेच्या इशाऱ्यावरून जॉर्डन, इराण, तुर्कस्तान आणि फ्रान्स पाकिस्तानी लष्कराला मूकपणे लष्करी सामग्री पुरवत होते. संयुक्त अरब आमिरातीने लढाऊ विमानांचा काफिला पाठवला होता, तर इंडोनेशियाने पाकिस्तानी नौदलासमवेत लढण्यासाठी आपल्या युद्धनौका पाठवल्या होत्या. रशियाने भारताच्या बाजूने या संघर्षात उडी घेतल्यानंतर या ‘बहुदेशी’क युतीसमोर आव्हान उभे राहू शकले.

युद्धातील निर्णायक क्षण

भारत-पाकिस्तानमध्ये सन १९७१मध्ये झालेले युद्ध हे संरक्षणविश्लेषकांच्या मते, कोणत्याही देशाच्या लष्कराने या सहस्रकात मिळवलेल्या उत्तुंग विजयांपैकी एक आहे. या युद्धाची तुलना केवळ जनरल पौलसने स्टॅलिनगार्डमध्ये सन १९४३मध्ये पत्करलेल्या शरणागतीशीच होऊ शकते. संरक्षणविषयक आणि राजकीय धोरणांनी एकत्रितपणे केलेल्या कामाचा हा कळसाध्याय होता. रशियाने पाठबळ दिले नसते, तर या संपूर्ण संघर्षाला अशा प्रकारे वळण मिळाले नसते, हे मुद्दाम नमूद केले पाहिजे.

युद्धाच्या काळात जसजशा घटना घडत होत्या, तशी ब्रिटन आणि अमेरिकेने भारताला खिंडीत गाठण्यासारखी एक योजना आखली होती. त्यानुसार ब्रिटनने अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीलगत ब्रिटिश युद्धनौका तैनात केल्या होत्या आणि त्याच वेळी अमेरिकेने पूर्वेकडून बंगालच्या उपसागरात प्रवेश केला होता. समुद्र आणि भारताच्या फौजा यांच्या कचाट्यात सापडलेल्या पाकिस्तानी लष्कराची अशा प्रकारे ‘मुक्तता’ करण्याची अमेरिका-ब्रिटनची योजना होती.

मात्र, या योजनेला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने व्लादिवोस्तोकमधून १३ डिसेंबर १९७१ रोजी एक लढाऊ जहाजांचा ताफा पाठवला- ज्यात विनाशिका, पाणबुड्या आदींचाही समावेश होता. त्यामुळे ब्रिटन-अमेरिकेने आखलेल्या योजनेत रशियाने ऐनवेळी बदल करायला लावला. ब्रिटिश नौकांना मादागास्करकडे वळणे भाग पडले आणि अमेरिकेच्या नौकांना बंगालच्या उपसागराच्या दिशेने आगेकूच रोखावी लागली. चीनने हस्तक्षेप केलाच नाही-कारण रशिया सिंकिआंग भागात प्रत्युत्तर देईल अशी त्यांना भीती होती. त्यामुळे घटनाक्रमाला वेगळे वळण मिळाले.

युद्धविरामाचा आंतरराष्ट्रीय दबाव

दरम्यानच्या काळात, भारत-पाकिस्तान संघर्ष संपावा यासाठी अमेरिकेने रशियावर दबाव वाढवणे सुरू केले होते. अमेरिकेच्या वर्चस्वाखालील सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्रसंघात ५ डिसेंबर १९७१ युद्धबंदीबाबतचा ठराव आणला, त्यावेळी रशियाने नकाराधिकार वापरला. याचे आंतरराष्ट्रीय परिणाम होतील, अशा अमेरिकेच्या आक्रमक इशाऱ्यांना रशियाने भीक घातली नाही आणि भारतीय फौजांना पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये पाठबळ देणे सुरूच ठेवले.

रशियाचा उघड पाठिंबा असलेल्या पोलंडने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत १५ डिसेंबर १९७१ रोजी, भारत आणि पाकिस्तानने ताबडतोब युद्धबंदी करून, परस्परांच्या भूभागावरून सैन्य मागे घ्यावे, असा ठराव आणला. या ठरावाबाबतही रशियाने नकाराधिकार वापरला.

भारताने मात्र या काळात बरोबर संधी हेरली आणि पाकिस्तान लष्कराने शरणागती पत्करावी यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. ढाक्क्याला वेढा घातल्यानंतर भारताच्या प्रयत्नांची परिणती पाकिस्तानी लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी शरणागती पत्करण्यात झाली.

निष्कर्ष

भारत आणि तत्कालीन सोव्हिएत संघामध्ये १९७१ मध्ये झालेल्या कराराने उभय देशांतील दृढ सहकार्याचे नवे पर्व सुरू केले. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या बाजूने आणि भारताच्या विरुद्ध ठराव आणले, तेव्हा तीन वेळा रशियाने नकाराधिकार वापरला. भारताने दाखवून दिले, की सोव्हिएत संघाच्या साथीने वंचितांच्या मुक्तीसाठी आपली लढ्याची तयारी आहे- मग त्याचे आर्थिक परिणाम काहीही झाले तरी बेहत्तर! खऱ्या अर्थाने भारताच्या शौर्याचे दर्शन घडले. आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि रशिया जवळ येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारत-रशिया यांच्यातील संबंधांमध्ये हा निर्णायक क्षण ठरेल का?... लेट्स वेट अँड वॉच!

(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आणि लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com