तबल्याची साथ पूरक हवी; मारक नको! (विजय घाटे)

विजय घाटे
रविवार, 29 एप्रिल 2018

'हा कार्यक्रम मुळात माझा नाही', हे तबलासाथ करताना आधी लक्षात ठेवावं लागतं. ज्यांना तुम्ही साथ करत असता, त्या कलाकाराचे विचार खुलवण्याचं काम आपल्याकडं आहे, याचं भान बाळगावं लागतं. कलाकाराचे विचार माझ्या साथीनं जर खुंटले तर ती साथ योग्य होणार नाही. कारण, मैफल खुलली तरच श्रोत्यांना खऱ्या संगीताचा आनंद मिळणार असतो.

'हा कार्यक्रम मुळात माझा नाही', हे तबलासाथ करताना आधी लक्षात ठेवावं लागतं. ज्यांना तुम्ही साथ करत असता, त्या कलाकाराचे विचार खुलवण्याचं काम आपल्याकडं आहे, याचं भान बाळगावं लागतं. कलाकाराचे विचार माझ्या साथीनं जर खुंटले तर ती साथ योग्य होणार नाही. कारण, मैफल खुलली तरच श्रोत्यांना खऱ्या संगीताचा आनंद मिळणार असतो.

माझा जन्म मध्य प्रदेशातल्या जबलपूरचा. माझ्या आई-वडिलांना (जयंत ऊर्फ बाळ घाटे आणि विजया) संगीताची आवड होतीच. मी लहान असताना आई घरातली कामं करताना गाणं म्हणायची. मी तिच्या त्या गाण्याला काहीतरी योग्य प्रतिसाद देतो आहे, याची जाणीव सर्वप्रथम तिलाच झाली. मी त्या वेळी
साडेतीन वर्षांचा होतो, असं आता माझी आई सांगते. "मी पतंग, मी दोरा' हे ते जुनं गाणं होतं. माझी ही आवड लक्षात घेऊन, वडिलांनी मला "स्वे' साबणाचे प्लास्टिकचे दोन डबे वाजवायला दिले. माझे मामा (अरुण वकील) व्हायोलिन चांगलं वाजवायचे. ते मूळचे नागपूरचे; परंतु नंतर ते सर्वजण जबलपूरला आले. थोड्याच दिवसांत वडिलांनी मला तबला आणला.

"सावन का महीना, पवन करे शोर' या गाण्यात सुरवातीला ठेका नाही. जेव्हा गाणं सुरू होतं, तेव्हा केहरवातला एक प्रकार सुरू होतो. तो ठेका मी बरोबर धरायचो. या गाण्याला मामा व्हायोलिन वाजवायचे, आई गाणं म्हणायची. असा हा साधारणतः दहा मिनिटांचा मनोरंजनाचा कार्यक्रम अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्तानं होऊ लागला! यासाठी मला छोटी छोटी बक्षिसंही मिळू लागली. याच दरम्यान पंडित विनायकबुवा पटवर्धन जबलपूरला आले. मी चार-पाच वर्षांचा होतो. त्यांच्यासमोर वडिलांनी मला एक झलक म्हणून काहीतरी वाजवायला सांगितलं. बुवा माझ्या वडिलांना म्हणाले : ""देवानं याला नक्की काहीतरी दिलेलं आहे. या मुलाला योग्य शिक्षण द्या.''
मग मी पुढं भातखंडे संगीत विद्यालयात दाखल झालो. तिथं मी पंडित किरण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतविशारद झालो.

मी 12 वर्षांचा असताना जबलपूरला सलग तीन दिवस उस्ताद झाकीर हुसेन नावाचं मोठं वादळ आलं होतं! आयटीसी संगीतसंमेलनात पहिल्या दिवशी
ब्रिजभूषण काबरा (गिटार), दुसऱ्या दिवशी इंद्रनील भट्टाचार्य (सतार), तिसऱ्या दिवशी पंडित पी. व्ही. जोग (व्हायोलिन) यांचं वादन होतं आणि या तिघांना तबलासाथ होती उस्ताद झाकीर हुसेन यांची. ते तीन दिवस मी जे तबलावादन ऐकलं, ते मी शब्दांत सांगूच शकत नाही! या घटनेपर्यंत मला तबल्याची फार अशी गोडी नव्हती. एक मजा म्हणून व परीक्षेपुरतं माझं वादन मर्यादित होतं. झाकीर हुसेन यांच्या तबल्याचा माझ्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला. इतका की, मी तबला शिकण्याचा ध्यासच घेतला. यामुळं मला भोपाळला पाठवण्यात आलं. तिथं माझे मामा आकाशवाणी केंद्रावर होते. तिथं दोन वर्षं पंडित सामताप्रसाद, पंडित किसनमहाराज, उस्ताद शफात अहमद, उस्ताद लतीफ अहमद खॉं अशा अनेक मोठ्या वादकांचं वादन ऐकण्याची संधी मला मिळाली. एकदा तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर (गुरुजी) यांचा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना साथ केलेला तबला मी ऐकला. का कुणास ठाऊक, हे तबलावादन काहीतरी वेगळं असल्याची मला प्रकर्षानं जाणीव झाली. यानंतर मी अकरावी मॅट्रिकमध्ये असताना मामा आजारी पडल्यामुळं परत जबलपूरला आलो. याच दरम्यान मला "नॅशनल टॅलेंट रिसर्च'ची शिष्यवृत्ती मिळाली व मी मुंबईला जाण्याचं स्वप्न पाहू लागलो. पंडित अजय पोहनकर हे मूळचे जबलपूरचे. माझ्यासाठी त्यांनी वडिलांना सुरेशदादांचं, अर्थात गुरुजींचं नाव सुचवलं. त्यांचं तबलावादन आपण पूर्वी ऐकल्याचं स्मरण मला त्याच क्षणी झालं. वडिलांनी मला गुरुजींकडं नेलं. त्या वेळी ते म्हणाले : ""पहिले सहा महिने पाहू या कशी प्रगती होते ते, अन्यथा परत जबलपूरला पाठवून देऊ.''

गुरुकृपेनं ते सहा महिने अजूनही सुरू आहेत ! गुरुजींना म्हणजेच सुरेशदादांना लयीची दुर्मिळ अशी तालीम रामनाड ईश्वरनजी यांच्याकडून मिळाली होती. गुरुजींनी तबल्यात अनेक नवनवीन विचार आणले. गुरुजींमुळं माझी तबल्यातली गोडी वाढत होती. त्यांनी तबल्याचा नाद तोच ठेवून पलट्याची (बोल) भाषाच बदलली. ही खरं तर जादूई गोष्ट म्हणावी लागेल. त्यांच्यावर दिल्लीचा प्रभाव अधिक होता. अनेक बुजुर्ग उस्तादांबरोबर त्यांची ऊठ-बस होती. तबल्याच्या भाषेचे संस्कार करताना तासन्‌तास फक्त एकाच कायद्याची तालीम चालायची. आजूबाजूच्या वातावरणात ते कायद्याचे बोल अक्षरशः मुरायचे. तबलाकायद्याच्या पलीकडचे विचार गुरुजी मांडायचे. प्रत्येक कलाकाराला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची असल्यास, त्याला आपली स्वतंत्र शैलीदेखील निर्माण करावी लागते. गुरुजींकडून मिळालेल्या अनेक विचारांतून मी माझे स्वतंत्र सांगीतिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला. गुरुजींच्या विचारांची खोली मोठी आहे. मुळात तबलावादन करताना तो ढोलकीसारखा किंवा नगाऱ्यासारखा वाजून चालत नाही. मी जे स्वतंत्र सांगीतिक विचार मांडण्याचा प्रयत्न करायचो ते विचार अनेकदा गुरुजींना पसंतदेखील पडायचे नाहीत. याच दरम्यान विविध गायकांना आणि वादकांना झाकीर हुसेन हरतऱ्हेची तबलासाथ कशी करतात, हे मी लक्षपूर्वक ऐकायचो. झाकीर हुसेन गणिती विश्‍लेषण करून कधी काही सांगत नाहीत. ते सगळं समजून घ्यावं लागतं. गुरुजींशिवाय झाकीर हुसेन यांनी मला थेट मार्गदर्शन केलं. या दोन व्यक्ती माझ्या खऱ्या अर्थानं गुरू आहेत. माझी तबलावादनाची कारकीर्द उस्ताद शाहीद परवेझ (सतार) यांनी मला संधी दिल्यानं सुरू झाली. प्रारंभी जवळजवळ 15 वर्षं मी त्यांना साथ केली. आम्हा दोघांच्यात गुरू-शिष्य असं नातं नव्हतं; परंतु त्यांनी मला अनेक नवीन दृष्टिकोन दिले व अनेक मार्ग दाखवले.

अनेकदा आपण एखाद्या कलाकाराबरोबर साथीचा सराव केलेला नसतो. अशा वेळी गायक-कलाकार जेव्हा विलंबित ख्याल सुरू करतो, तेव्हा समेचा "धिन' किंवा "धा' कलाकारानं सुरू केलेल्या मुखड्यातून जी लय सुरू झालेली असते, त्याला अनुसरूनच दुसरा "धिन' अचूक वेळेवर द्यावा लागतो, तरच कलाकार व श्रोते "क्‍या बात है' अशी दाद देतात. सोलो तबलावादन हे मुख्यत्वेकरून पूर्वनियोजित असतं. मात्र, साथ करताना कलाकाराला अपेक्षित लय आपल्याकडून मिळाल्यानंतर एकदा आपल्या प्रदेशात आल्यावर तुमचं तंत्र जर खूप प्रगत असेल, तर वादनात "उपज' येऊ शकते. "पाठांतर ते उपज' हा प्रवास खूप मोठा आहे. तो योग्य पद्धतीनं गुरूकडून समजून घ्यावा लागतो. त्याची रीतसर तालीम घ्यावी लागते. नियोजित लय मिळालेली नसतानादेखील अनुभवाच्या जोरावर पेशकारीपासून पुढं वादन निभावणं ही कलाकाराची साधना असते.

तंत्र हातात व डोक्‍यात एकाच वेळी कोरताना आवर्तन सांभाळण्याची कसरत जमावी लागते. झाकीर हुसेन यांनी तबलावादनात खूप मोठा बदल घडवून आणला. या बदलाचा अभ्यास करताना मला असं वाटायचं, की तबलासाथ करण्यासाठी विविध फ्रेजेसचादेखील रियाज आपण करायला हवा. कारण, एखाद्या वाद्याला साथ करत असताना पूर्णपणे तबलाकायद्याचा उपयोग केल्यास साथ सुसंगत होत नाही. उदाहरणार्थ म्हणून एक अगदी छोटा कायदा पाहू या. "धाती धागे नाधा तिरकिट, धाती धागे तिंना किन, ताती ताके नाता तिरकिट, धाती धागे धींना गीन' या कायद्यातली "धाती धागे तिंना किन' (कायद्यातली दुसरी ओळ) ही एक फ्रेज म्हणून वेगळी बाहेर काढावी लागते. अशा रीतीनं अनेक कायद्यांच्या रचनांमधून योग्य फ्रेजेसची निवड करून त्यांचा स्वतंत्र रियाज करावा लागतो.

सोलोवादन हे अर्थातच एकट्याचं आणि स्वतंत्र असतं. साथसंगत करताना कलाकाराबरोबर एकत्र सराव करण्याची गरज बहुदा नसते. मात्र, नृत्याच्या साथीसाठी एकत्र सराव करणं गरजेचं असतं, असं माझं प्रांजळ मत आहे. साथ करण्यासाठी मुळात खूप खूप ऐकायला हवं. पुढं जाणं प्रत्येकाच्या हातात असतंच असं नाही. मात्र, पुढील विचार करण्यासाठी या ऐकण्याचा निश्‍चित उपयोग होतो. याचबरोबर केवळ मनोरंजनाऐवजी अभ्यासासाठीसुद्धा ऐकायला हवं. हे सगळं करत असताना आपल्याला येणाऱ्या कॉम्प्लिमेंट्‌सकडं जितकं दुर्लक्ष करू शकाल तेवढं आयुष्य सुसंगत होतं! अर्थात खास कॉम्प्लिमेंट्‌सचा अभ्यासपूर्ण विचार करणं तितकंच गरजेचं असतं. माझ्या कारकीर्दीत मी सुरवातीला पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा यांना तबलासाथ केली. तेव्हा मी स्वतःवर भलताच खूश होतो. एक वय असतं व "मौका मिला है तो...' अशा विचारानं आपण घेतलेली मेहनत सादर करण्याची उत्सुकता असते. याच्या एकत्रित परिणामानं मोठ्या कलाकाराला प्रथमच साथ करताना वादन नैसर्गिकरीत्या जरा जोरकसच होत असतं. असे प्रसंग प्रत्येकाच्या बाबतीत घडतात. मला वाटलं, मी फारच छान वाजवलं; परंतु नंतर दोघांकडूनही मला
तबलासाथीसाठी आमंत्रणच आलं नाही. असं काय झालं असावं, याचा मी खूप खूप विचार आणि अभ्यास केला. काही दिवसांनी मला पंडित शिवकुमार शर्मा यांनी दुसऱ्यांदा संधी दिली.

वादनानंतर पंडितजी मला म्हणाले : "आज वेलकम चेंज हुवा है!' याचा गर्भितार्थ मी जाणला होता. पंडित हरिप्रसाद चौरसियांनीदेखील नंतर मला दुसऱ्यांदा संधी दिली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंडितजी म्हणाले : "आज मेरे साथ विजयजी है । बहुत अच्छा बजाते है... '
मला काहीच कळलं नाही. कारण, ही तारीफ माझ्यासाठी 'आउट ऑफ बॉक्‍स' होती! प्रत्यक्ष वादन करताना माझ्याकडं बघून पंडितजी म्हणाले : "मैं ने आज आप की बहुत तारीफ की है, थोडा सॉफ्ट बजा दो।'' याचा अर्थ साथीचा व्हॉल्यूम आपल्याला समजला पाहिजे. व्हॉल्यूम म्हणजे आवाजाची तीव्रता नव्हे! रुद्रवीणा, मेंडोलिन, सतार, बासरी, संतूर, सारंगी अशा विविध वाद्यांना त्यांचा त्यांचा असा एक नैसर्गिक नाद असतो. तो नाद तबला-साथीदाराला जुळवून घेता आला पाहिजे. शिवाय, गुरुतुल्य कलाकारांना साथ करताना त्यांचे बारीकसारीक इशारेसुद्धा आपल्याला चटकन समजले पाहिजेत. असंच सुरवातीला एकदा पंडित जसराज यांना साथ करताना, त्यांनी गायन चालू असताना मध्येच मांडीवर एक थाप दिली. मला वाटलं, पंडितजींनी मला दाद दिली. थोड्या वेळानं थोडी जोरात थाप दिली, नंतर जरा अजून जोरात थाप दिली. तेव्हा त्यांनी मला इशारा दिला होता, की "तुझा तबला जरा चढा वाजतो आहे तो खाली आण!' या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या असतात. त्या कुणी शिकवत नसतं.
मन:स्थितीवर वादन अवलंबून नसतं. म्हणजे मी खूप आनंदी असेन तर खूप चांगलं वाजवीन व उदास असेन तर खराब वाजवीन असं नसतं; परंतु स्वभावाचा मात्र परिणाम वादनावर होत असतो. "स्वभाव' हा शब्द मी इथं खूप व्यापक अर्थानं योजला आहे. स्वभाव हा जसा आहे तसाच असतो, तो नैसर्गिक असतो. उस्ताद अल्लारखा यांच्या वादनात गणिती आणि भाषेचे विचार अत्यंत अभ्यासपूर्ण असायचे, जे यापूर्वी झालेलं नव्हतं; परंतु त्यांचं वादन क्‍लिष्ट मात्र नव्हतं. वादनात क्‍लिष्टता निर्माण करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांचा स्वभावच खूप निरागस होता. पंडित किसनमहाराज कधी चुकीची गोष्ट वादनात खपवून घ्यायचे नाहीत. हा त्यांचा स्वभाव होता. पंडित सामताप्रसाद यांचा स्वभाव अजून वेगळा होता. काही वेळा खूप चांगल्या गोष्टीसुद्धा श्रोत्यांपर्यंत पोचू शकत नाहीत. हासुद्धा एक स्वभावाचा परिणाम असतो!

तबला हे साथीचं वाद्य आहे. तुम्ही कोणत्याही कलाकाराला जर साथ करणार असाल, तर तुमची वृत्ती आधी साथीची असली पाहिजे. आवडत्या संगीतालाच मी साथ करेन, असं शक्‍य नसतं. तुमच्या नावडत्या संगीतालादेखील तुम्हाला साथ करावी लागते. यासाठी विविध गायकांचं, वादकांचं, तसंच विविध घराण्यांचं संगीत खूप ऐकावं लागतं. ते तुम्हाला परिचित व्हावं लागतं. सततच्या ऐकण्यानं एकदा का ते संगीत परिचित झालं की त्याची गोडी निर्माण होते. यामुळंच साथ चांगली होऊ शकते.
"हा कार्यक्रम मुळात माझा नाही', हे तबलासाथ करताना आधी लक्षात ठेवावं लागतं. ज्यांना तुम्ही साथ करत असता, त्या कलाकाराचे विचार खुलवण्याचं काम आपल्याकडं आहे, याचं भान ठेवावं लागतं. कलाकाराचे विचार माझ्या साथीनं जर खुंटले तर ती साथ योग्य होणार नाही. कारण, मैफल खुलली तरच श्रोत्यांना खऱ्या संगीताचा आनंद मिळणार असतो.

दर्जेदार श्रोत्यांची संख्या वाढणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण, काही श्रोते ठराविक कलाकारांचंच गायन-वादन ऐकण्यासाठी जात असतात. मग त्याच कलाकारांची पुनरावृत्ती होत राहते. यात अशा कलाकारांचं मोठेपण नक्कीच असतं, यात शंका नाही; मात्र जर नवीन कलाकारांचं गायन-वादन ऐकण्याची श्रोत्यांची क्षमता वाढली तर ते आधी नवीन कलाकाराचं गायन-वादन ऐकायला जातील व त्यांच्या कलेत काही नावीन्य आढळल्यास दाददेखील देतील. मी कोणत्या कोणत्या देशांत जाऊन आलो किंवा मायदेशात कुठं कुठं मैफली केल्या, या चर्चेऐवजी "मी नवीन सांगीतिक विचार कोणता मांडला,' यावर कलाकारांनी चर्चा करायला हवी. गुरुकुलांची संख्या सध्या वाढते आहे; मग कलाकारच कार्यक्रमांचे आयोजन करतात! तेच तेच कलाकार तिथं सातत्यानं कला सादर करताना दिसतात. विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं हा कलाकाराचा उद्देश नसावा, तर कलेची साधना करणं हाच कलाकाराचा मुख्य उद्देश असायला हवा.
(शब्दांकन : रवींद्र मिराशी)

Web Title: vijay ghate write article in saptarang