आभाळाएवढ्या मनाचा माणूस

शेतकरी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून एम. एस. स्वामीनाथन २००५ मध्ये विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते थेट बांधावर आले होते.
MS Swaminathan
MS Swaminathansakal

प्रो. एम. एस. स्वामीनाथन विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना मी त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो. आभाळाएवढ्या कर्तृत्वाच्या या व्यक्तिमत्त्वाशी मी जोडला गेलो. अखेरपर्यंत त्यांचे प्रेम मला लाभले, त्याविषयी...

शेतकरी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून एम. एस. स्वामीनाथन २००५ मध्ये विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते थेट बांधावर आले होते. त्या वेळचे कृषी अधिकारी लोखंडे यांनी या दौऱ्यामध्ये उपस्थित राहण्याची मला विनंती केली.

यासोबत वर्धा शहरापासून जवळ असलेल्या वायफळ या माझ्या गावी शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित करण्याची विनंती केली. त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी स्वामीनाथन यांना थेट प्रश्न केले. हा संवाद खूप चांगला झाला. माझ्या गावी व्हिलेज नॉलेज केंद्र सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी मी वायफळमधील माझे घर केंद्र चालवण्यासाठी दिले. त्या काळात इंटरनेट गावागावात पोहोचले नव्हते.

त्यामुळे इस्रोची सॅटेलाईट डिश माझ्या घरावर बसवण्यात आली. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सॅटेलाईट लिंकने त्या केंद्राचे उद्‌घाटन केले आणि गावकऱ्यांना संबोधित केले. या केंद्रातून गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना संगणक शिकवण्याची व्यवस्था केली गेली. या केंद्राच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशीप देण्यात आल्या.

यापूर्वी मी प्रोफेसर स्वामीनाथन यांना कधीच भेटलो नव्हतो. उलट स्वामीनाथन यांनी केलेल्या ‘हरितक्रांती’च्या काही तत्त्वांबद्दल माझे मतभेद होते. त्यांच्यासोबत झालेल्या पहिल्याच बैठकीत मी माझे आक्षेपांचे मुद्दे उपस्थित केले.

‘हरितक्रांती’मध्ये तुम्ही शेतीचे उत्पन्न वाढवण्यावर जोर दिला; मात्र शेतकऱ्यांचे स्वत:चे उत्पन्न आजपर्यंत वाढले नाही, असे मी सांगितले. त्यावर शांतपणे ते म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे; मात्र त्या वेळी भारत अन्नधान्यासाठी अमेरिकेसह इतर देशांवर अवलंबून होता.

अमेरिकेचे अन्नधान्याचा साठा असलेले एक जहाज आले नाही, तर त्या वेळी देशात भंयकर समस्या उत्पन्न होत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत देश अन्नधान्यात स्वावलंबी झाला पाहिजे, ही संकल्पना ‘हरितक्रांती’मागची होती. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही, हा तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. देशाच्या ‘हरितक्रांती’चा प्रणेता माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचे मुद्दे समजून घेतो. एवढ्या खुल्या मनाचे ते होते.

या भेटीनंतर स्वामीनाथन फाऊंडेशनसोबत काम करण्याची विनंती त्यांनी मला केली. त्या माध्यमातून सरकारी योजना राबवल्या जात होत्या. सरकारच्या ध्येयधोरणाच्या विरोधात काम करणारा मी माणूस आहे. मग तुमच्यासोबत काम कसे करू शकतो? यावर हसून ते म्हणाले की, मला काहीच हरकत नाही. तुझे स्वातंत्र्य अबाधित राहील. मनाचा एवढा खुलेपणा त्यांच्याकडे होता. मी त्यांच्यासोबत जुळलो तो कायमचाच. त्यानंतर प्रो. स्वामीनाथन जेव्हाही विदर्भात येत, तेव्हा मला आवर्जुन बोलवत.

७ ऑगस्टला प्रो. स्वामीनाथन यांचा जन्मदिन असतो. त्यानिमित्त ७ ते ९ तारखेदरम्यान दरवर्षी चेन्नईमध्ये तीन दिवसांची कृषीसंदर्भातील परिषद व्हायची. प्रत्येक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मला न चुकता स्वामीनाथन यांचा फोन यायचा. त्यामध्ये एका विषयावर ते मला बोलायला लावायचे. या कार्यक्रमाच्या प्रेस नोटमध्ये मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा ते आवर्जुन समावेश करत. मी अनेकदा त्यांच्यापुढे उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांचा समावेश स्वामीनाथन आयोगाच्या अहवालात त्यांनी केला.

विदर्भात शेतकरी आत्महत्येची मोठी लाट आली होती. २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे वर्ध्याला आले होते. तेही माझे गाव वायफळला. पंतप्रधानांना इथे आणण्यामागे प्रो. स्वामीनाथन आणि ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा मोठा वाटा होता. या दौऱ्यानंतर देशात पहिली शेतकरी कर्जमाफीची योजना आणली गेली. कृषी मूल्य आयोगाच्या संरचनेतही बदल करण्यात आले. या भेटीत मी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमोर स्वामीनाथन यांच्यापुढे उपस्थित केलेले मुद्दे मांडले.

वर्षभरापूर्वी मी त्यांना चेन्नईत जाऊन भेटलो. तब्येत ढासळली होती. या काळातही त्यांची स्मरणशक्ती जागृत होती. मला पाहताच जवळ बोलावलं, विचारपूस केली. मुलीशी माझी ओळख करून देताना म्हणाले, सौम्या, हे विजय जावंधिया आहेत. त्यांनी आपल्यासाठी अगदी कमी वेळेत शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्यांच्या घरी आपले नॉलेज सेंटर सुरू होते.

वर्ध्यातील माझ्या वायफळ या गावातील एका रस्त्यासाठी प्रो. स्वामीनाथन यांनी त्यांच्या खासदार फंडातून २० लाख रुपये दिले. चेन्नईचा हा माणूस मात्र विदर्भाच्या एका साध्या माणसावर एवढा प्रेम करायचा. स्वामीनाथन यांच्या सहवासातून मला खूप काही शिकता आले. माझे जीवन समृद्ध झाले.

(लेखक शेतकरी नेते असून, कृषितज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com