संसदेतला नेमस्त आवाज

ghulam-nabi-azad
ghulam-nabi-azad

संसदेतील चार दशकांचा प्रदीर्घ कार्यकाळ संपवून  काँग्रेसचे ७२ वर्षीय ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते घुलाम नबी आझाद यांचे ९ फेब्रुवारीला शेवटचे भाषण झाले, ते राज्यसभेतून १५ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. राज्यसभेतल्या निरोपाचे भाषण करताना आझाद व उत्तरादाखल केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. दहशतवाद्यांचा हल्ल्यात ठार झालेल्या गुजराती यात्रेकरूंची भीषण घटना दोघांना आठवली, अन् दोघाच्यांही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. २००५ ते २००८ दरम्यान आझाद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ही भीषण घटना घडली. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळचे दूरध्वनीवरील एकमेकांचे संभाषण दोघांना आठवले. संसदेचे अर्थसंकल्पीय सुरू झाल्यापासून सत्तारूढ व विरोधकात जे दैनंदिन रणकंदन चालू आहे, ते पाहता, निरोपाचा हा प्रसंग आगळावेगळा ठरला. 

आझाद हा काँग्रेसचा संसदेतील नेमस्त, उमदा आवाज होता. त्यांच्या भाषणात आरडाओरड, आक्रस्ताळेपणा नसे. जे बोलत ते पोटतिडकीने, संयम राखून. सत्तारूढ पक्षावर घणाघाती हल्लाही ते संसदीय परंपरेची विशिष्ट मर्यादा राखून करीत. अधूनमधून शेरोशायरीची पखरण असे. त्यामुळे संतप्त वातावरण हलके होत असे. किंबहुना, या गुणांमुळे ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंहराव व डॉ मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात त्यांचे विश्वासू बनले. केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये रालोआचे सरकार आले, तेव्हाही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील पक्ष व विरोधी पक्ष म्हणून नेते निवडले ते आझाद यांना. वयाच्या ३२ वर्षी इंदिरा गांधी यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले. त्यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही संभाळली होती.

सत्तेचाळीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अऩेक चढ उतार पाहिले. गेल्या काही  महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांपैकी ते एक बनले. निवृत्तीनंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोचणारी गोष्ट बोलून दाखविताना ते म्हणाले, की चोवीस - पंचवीस वर्षांपासून काँग्रेसमध्ये ब्लॉक लेव्हलच्या निवडणुका झालेल्याच नाहीत. पक्षाचे पुनरूत्थान करायचे असेल, तर त्या झाल्या पाहिजेत. पक्षांतर्गत निवडणुकांतून निव़डून आलेला अध्यक्ष आम्हाला हवा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी व आपल्यात काही तणाव नाही, असे भले आझाद म्हणोत, परंतु, अलीकडील काळात वरील मुद्यांवरूनच त्यांच्यातील मतभेद पुढे आले. 

जम्मू काश्मीरचे विभाजन झाल्याने व तेथे विधानसभा नसल्याने निदान काही काळ तरी जम्मू काश्मीरचे प्रतिनिधित्व संसदेमध्ये असणार नाही. परंतु, अजूनही राजकारणाचा मार्ग आझाद यांनी सोडलेला नाही. ते पुन्हा सक्रिय होऊ शकतात. आझाद यांची प्रशंसा करताना मोदी यांनी, आपले दरवाजे खुले असल्याचे त्यांना सांगितले. अर्धशतक काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर भाजपचा मार्ग ते स्वीकारणार काय, याचा अंदाज आज वर्तविणे शक्य नाही. इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रासह अऩेक राज्यात काँग्रेसची सरकारे होती. त्यावेळी काँग्रेसने अन्य राज्यातील काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रावर थोपविण्याचे तंत्र अवलंबिले होते. कारण, महाराष्ट्रातील सुरक्षित मतदारसंघातून ते निवडून येण्याची खात्री होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काँग्रेसच्या या दादागिरीबाबत सतत आक्षेप घेत होते. त्याची फिकीर इंदिरा गांधी, राजीव गांधी व नरसिंह राव यांनी केली नाही. इंदिरा गांधी यांनी सातव्या लोकसभेत आझादांना वाशिम (विदर्भ) मतदार  संघातून लोकसभेची उमेदवारी दिली. काँग्रेसचे माजी नेते विश्वजित पृथ्वीजित सिंग (मूळचे पंजाबचे) यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली. माजी पंतप्रधान नरसिंह राव (मूळचे आंध्र प्रदेशचे) यांचा विदर्भातील रामटेक हा मतदार संघ ठरलेला होता. 

१९९० ते १९९६ दरम्यानही आझाद राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे ते स्नेही. त्यामुळे, महाराष्ट्र व देशातील राजकारणाचे वारे कोणत्या दिशेला वाहते आहे, याबाबत ते पवार व अऩ्य नेत्यांबरोबर सल्लामसलत करीत. संसदीय कामकाज मंत्री हा सत्तारूढ पक्षाचा असला, तरी त्यानं सत्तारूढ पक्षाप्रमाणेच आपण विरोधी पक्षांचेही आहोत, असे वागले पाहिजे, असे ते म्हणतात. कारण, त्याच्यावर सरकार व विरोधी पक्ष यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी असते. संसदीय कामकाज मंत्री असताना आपण तब्बल चोवीस विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधून होतो, असे ते सांगतात.     

नरसिंह राव यांनी त्यांच्यावर आरोग्य मंत्रालयाचा भार सोपविला होता. त्या काळात त्यांनी राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य मोहिमेचा विस्तार केला. तसेच, शहरातील झोपडपट्टीवासीयांसाठी सुधारणा केल्या. परंतु, त्या दिवसात त्यांचं एक विधान बहुचर्चित झालं. वीज व टीव्हीचं मनोरंजन नसल्यानं ग्रामीण भागातील लोक करमणूक म्हणून प्रजोत्पादनाकडे अधिक वळतील. त्यांच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य होतं. परंतु, ते आरोग्यमंत्री असेतोवर वीज व टीव्हीच जाळं बऱ्या प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचलं होतं. त्यात ग्रामस्थ व मुलंबाळंही रमू लागली होती. काँग्रेस श्रेष्ठींच्या त्यांच्या एकनिष्ठतेकडे पाहता आम्ही मजेने त्यांना गुलाम नही आझाद, असं म्हणायचो. त्यालाही ते हसून दाद देत.

राज्यसभेचा निरोप घेताना त्यांचे शब्द सूचक होते, मिलते रहेंगे, नही आएगी याद तो बसरो नही, लेकिन जब आएगी, बहुत याद आएगी.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com