हाँगकाँग : शांघाय आणि चीन 

विजय नाईक
Tuesday, 27 August 2019

चीनची अर्थव्यवस्था खुली होण्यापूर्वी चीनमध्ये उत्पादित झालेल्या मालाची निर्यात दीडशे एक वर्षे प्रामुख्याने हाँगकाँगहून होत असे. म्हणूनच हाँगकाँगला "वन कन्ट्री टू सिस्टीम्स" हे परिमाण लावण्यात आले होते. चीनमध्ये साम्यवाद, तर हाँगकाँगमध्ये खुली भांडवलशाही, असे चित्र होते.

11 ऑगस्टला पहाटे कॅथे पॅसिफिकच्या विमानाने हाँगकाँगमार्गे बीजिंगला निघालो, त्या दिवशी सकाळी दिल्लीच्या "हिंदुस्तान टाईम्स"ने ठळक बातमी छापली होती, की हाँगकाँगच्या विमानतळावर तणाव असून, तिथं सावळा गोंधळ आहे. आदल्या दिवशी शांघायमध्ये "लेकीमा" वादळ आले, आणि शांघाय व बीजिंगहून तब्बल 3200 उड्डाणे रद्द करण्यात आली. बीजिंगमध्ये भारत- चीन दरम्यान होणाऱ्या उच्च पातळीवरील वाटाघाटी व पत्रकारांचे व्यासपीठ या कार्यक्रमांसाठी "सकाळ" चा प्रतिनिधी म्हणून हा दौरा मी केला. 

हाँगकाँगला पोहोचलो, तेव्हा सुदैवाने चीन सरकार व हाँगकाँगच्या सीईओ कॅरी लॅम यांच्याविरूद्ध चाललेल्या प्रक्षोभक निदर्शकांनी हाँगकाँग विमानतळाच्या आत प्रवेश केलेला नव्हता. विमान गाठण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मात्र बराच त्रास झाला. तेथील सरकार विरोधी व सरकारला पाठिंबा देणाऱ्या लाखो लोकांची दोन वेगवेगळी निदर्शने झाल्याने हाँगकाँगच्या जनतेत फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, हे स्पष्ट झाले. हाँगकाँग हे चीनचे जगातील एक उत्तम वित्तीय केंद्र. अत्याधुनिक शांघायला उभारून दिडशे वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या हाँगकाँगला चीनने शह दिला. 2047 मध्ये करारानुसार हाँगकाँगवरील सारे हक्क चीन सरकारच्या हाती जाणार आहेत. त्यानंतर हाँगकाँगचे तिबेट होणार की शिंजियांग, हे आज सांगता येत नाही. परंतु, त्याची पूर्ण कल्पना असल्याने हाँगकाँगमध्ये लोकशाही व व्यक्ति स्वातंत्र्याच्या मागणीवरून तेथील लाखो युवकांनी जिवावर उदार होऊन गेली तीन चार वर्षे आंदोलन चालविले आहे. हाँगकाँगवासियाने हाँगकाँगमध्ये वा बाहेर काही गुन्हा केल्यास त्याला चीनच्या स्वाधीन करायचे, या स्वरूपाचा कायदा चीनने केला. त्याला झालेल्या जोरदार विरोधाने तो अलीकडे निलंबित करण्यात आला. हाँगकाँगच्या "लोकशाहीला विरोध करणाऱ्या कॅरी लॅम यांना त्वरीत माघारी जाण्यास सांगावे व कायदा रद्द करावा" अशी जोरदार मागणी निदर्शक करीत असून, अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अद्याप काही प्रतिसाद दिलेला नाही. मात्र तेथे पोलीस व निदर्शक यात रोज चकमकी होत आहेत. अश्रुधुराच्या नळकांड्या, रबरी बुलेट्‌सचा सर्रास वापर होत आहे. तथापि, तीस वर्षांपूर्वी बीजिंगच्या तियानमेन चौकात स्वतंत्रतावादी निदर्शकांवर जसे रणगाडे, तोफा व गोळ्यांचा मारा चीनी सैन्याने केला होता, तसे पाऊल चीनने अद्याप उचलेले नाही. "ते उचलले जाणारच नाही, असेही सांगता येत नाही. हाँगकाँगच्या अस्थिरतेला अमेरिका जबाबदार आहे. अमेरिका हस्तक्षेप करीत आहे," असा उघड आरोप चीनने केलाय. 

चीनची अर्थव्यवस्था खुली होण्यापूर्वी चीनमध्ये उत्पादित झालेल्या मालाची निर्यात दीडशे एक वर्षे प्रामुख्याने हाँगकाँगहून होत असे. म्हणूनच हाँगकाँगला "वन कन्ट्री टू सिस्टीम्स" हे परिमाण लावण्यात आले होते. चीनमध्ये साम्यवाद, तर हाँगकाँगमध्ये खुली भांडवलशाही, असे चित्र होते. ते चित्र अस्तेअस्ते चीनला बदलायचे असून, हाँगकाँगला पूर्णपणे साम्यवादी शासनप्रणालीकडे न्यावयाचे आहे. त्या उद्देशाने चीनने 2017 मध्ये कॅरी लॅम यांची सीईओपदी नेमणूक केली. कठोर शासक म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यांनी एकामागून एक बंधने हाँगकाँगच्या जनतेवर लादायला सुरूवात केली. हाँगकाँगमध्ये आज असलेली अस्थिरता, हा त्याचाच परिपाक होय. या अस्थिरतेचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. चीनी नेत्यांना त्याची काळजी वाटत आहे. अमेरिका खालोखाल चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्याचे वर्णन भारताप्रमाणे विकसनशील देश म्हणून होत असले, तरी प्रत्यक्षात चीन सर्वबाबतीत अमेरिकेची बरोबरी करू लागला आहे. काही वर्षात चीनला जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हावायाचे आहे. गेल्या दोन तीन वर्षात चीनच्या अर्थव्यवस्थेची गती धीमी झाली असून, हाँगकाँगमधील अस्थिरता चालू राहिल्यास त्याचा परिणाम चीनच्या एकूण आर्थिक स्थितीवर होईल. एकीकडे अमेरिका व चीन यांच्यात सुरू असलेले व्यापार युद्ध व दुसरीकडे हाँगकाँगमध्ये निर्माण झालेली अस्थिरता, अशा दुहेरी कात्रीत चीन अडकलाय. 

या परिस्थितीत शांघायला अनन्य साधारण महत्व न आले, तरच नवल. शांघाय हा आधुनिक चीनचा आधुनिक चेहरा. मुंबई व शांघाय या सिस्टर सिटीज्‌ आहेत. शांघायचा फेरफटका मारताना, न्यूयॉर्कच्या तोडीचे हे शहर असल्याची, किंबहुना न्यू यॉर्कला शांघायने मागे टाकल्याची जाणीव पदोपदी होते. न्यू यॉर्कमध्ये अपर मॅनहॅटन, मिडल मॅनहॅटन व लोअर मॅनहॅटन असे उत्तुंग इमारतीचे तीन विभाग आहेत. तथापि, शांघायमध्ये असे किमान वीस ते पंचवीस मॅनहॅटनस्‌ पाहावयास मिळतात. रात्री हुआंगपुआ नदीच्या दुतर्फा उत्तुंग व अत्याधुनिक स्थापत्याचे नमूने असलेल्या असंख्य इमारती पाहताना न्यू यॉर्कच्या हडसन नदीतील बोटीतून तर आपण प्रवास करीत नाही, असा भास होतो. शांघायच्या "पुडॉंग" परिसरात चीनने केवळ दहा वर्षात प्रति सिंगापूर बांधले. न्यू यॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीच्या हुबेहूब जिन माओ टॉवर, तसेच गगनाला भिडणारे शांघाय टॉवर, शांघाय वर्ल्ड फायनॅन्शियल सेन्टर, ओरिएन्टल पर्ल टॉवर व शिमाओ इंटरनॅशनल प्लाझा या इमारती आकर्षून घेतात. गेल्या काही वर्षात शांघायला माझी ही तिसरी भेट होती. प्रत्येक भेटीत काही ना काही बदल शहरात दिसत होता. भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईला शांघाय बनविण्याचे वक्तव्य केले होते. परंतु, ते प्रत्यक्षात यावयास किमान अजून किमान पंचवीस ते तीस वर्ष लागतील. चीनमधील शिस्त, पायाभूत रचना निर्माण करण्याचा झपाटा, शहरांविषयी आत्मियता व ती स्वच्छ ठेवण्याचा निर्धार, यांची आपल्याकडे पूर्ण वानवा आहे. 

अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या शांघायमधील ओरिएन्टल पर्ल टॉवर हे न्यू यॉर्क मधील वर्ल्ड ट्रेड टॉवरसारखे होय. अर्थात दोन्ही टॉवर्सचे स्थापत्य वेगवेगळे. परंतु, वर्ल्ड ट्रेड टॉवर प्रमाणे शेवटच्या मजल्यावर फिरणारे रेस्टॉरन्ट व काचेची गोलाकार गॅलरी असून, त्यातून चीनच्या निरनिराळ्या प्रांतांच्या दिशा दाखविणारे बाण व दुर्बिणी आहेत. न्यू यॉर्कच्या जुन्या टॉवरमधील रचनेसारखी ही रचना आहे. वर्ल्ड ट्रेड सेन्टर हे हडसन नदीच्या सान्निध्यात व पर्ल टॉवर हे हुआंपू (पर्ल) नदीच्या तीरावर आहे. शांघायमधील मेट्रो सेवा जगातील सर्वात मोठी असून तिचा विस्तार 800 कि.मी आहे. त्यातून रोज एक कोटी लोक प्रवास करतात. बीजिंग, शांघाय व अन्य शहरातून सार्वजनिक वाहतुकीवर अधिकाधिक भर देण्यात येत असून, खाजगी वाहन खरेदीवर विशिष्ट बंधने आहेत. मोटार खरेदी करण्यापूर्वी तिची नंबर प्लेट खरेदी करावी लागते. ती आपल्याला हवी तेव्हा मिळत नाही. तिचा लिलाव केला जातो. तुमचा नंबर आला, की ती तुम्हाला मिळणार. त्यानंतरच तुम्ही मोटार खरेदी करू शकता. ब्रिक्‍स बॅंकेचे अध्यक्ष के.व्ही. कामत यांची भेट घेता ते म्हणाले, की बॅंकेच्या नव्या इमारतीसाठी सातशे गाड्यांची व्यवस्था होईल, इतके पार्किंग असावे, असे मी जेव्हा शांघाय महानगरपालिकेला कळविले, तेव्हा त्यांच्या भुवया वर झाल्या. त्यांनी विचारणा केली, की इतक्‍या गाड्या हव्या कशाला. ते म्हणाले, ""त्यांचेही म्हणणे काही बाबतीत योग्य होते. कारण, आजवर बॅंकेच्या व्यवस्थापकीय मंडळातील केवळ एका सदस्याने गाडी घेतली आहे. येथील उच्च पदस्थ देखील सार्वजनिक मेट्रो, बस, अथवा सायकलींचा वापर करू लागलेत. गेल्या वर्षी महानगरपालिकेने पादचारी व सायकल वापरणाऱ्या लोकांसाठी नदीकिनाऱ्यावर चाळीस कि.मीचा रस्ता बांधला." 

2001 मध्ये मी चीनला गेलो होतो, तेव्हा बीजिंग व शांघायमध्ये प्रदूषण इतके होते, की पसरलेल्या दाट धुक्‍यात इमारती अंधुक दिसायच्या. वाहने सावकाश चालायची. प्रत्येक नागरीक "ब्लू स्काय इंडेक्‍स" पाहून घराबाहेर पडायचा. गेल्या काही वर्षात चीन सरकारने प्रयत्नपूर्वक प्रदूषणावर उपाय करून शहरे प्रदूषणमुक्त केली. त्यापासून दिल्ली, मुंबई व अन्य शहरांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. कामत यांनी असेही सांगितले, की मुंबईतील मिठी नदीच्या प्रदूषणाबाबत आपण गेली अनेक वर्षे चर्चा करतोय, परंतु अद्याप मार्ग सापडलेला नाही, की पावसाळ्यात येणाऱ्या तिच्या पुरावर उपाय शोधलेला नाही. हीच स्थिती शांघायमधील एका नदीची होती. तिला स्वच्छ करण्यात आले आहे. नदीतीरावर घरे बांधणाऱ्या लोकांना तेथून हलविण्यात आले. त्याबद्दल मोबदलाही देण्यात आला. भारतातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी चीनकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. गंगा व यमुना या नद्यांना स्वच्छ करण्यासाठी आजवर कोट्यावधी रूपये खर्च झाले, परंतु, त्या प्रदूषण मुक्त झाल्या नाही. या संदर्भात भारताला ब्रिटन, जर्मनी व युरोपातील अन्य देशाच्या तंत्रज्ञानाचाही उपयोग होऊ शकेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Naik writes about HongKong and China