'अफगाणिस्तानच्या प्रगती व शांततेसाठी भारताची गरज'

विजय नाईक
रविवार, 19 मे 2019

दाऊदझाय यांनी दिल्लीला भेट देऊन अमेरिका-तालिबान व अफगाणिस्तान दरम्यान चाललेल्या वाटाघाटींचा तपशील भारतीय नेत्यांना दिला. ते परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना भेटले.

"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन हेलिकॉप्टर्स दिली आहेत. आणखी दोन हेलिकॉप्टर्सची मागणी आम्ही केली आहे. भारताने अफगाणिस्तानातील वैमानिकांना प्रशिक्षण द्यावे, असाही आग्रह आम्ही धरला आहे," असे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी अहमदझाय यांचे खास राजदूत व "हाय पीस कौन्सिल"चे मुख्याधिकारी महंमद उमर दाऊदझाय यांनी काल (17 मे) रोजी येथे सांगितले. 

दाऊदझाय यांनी दिल्लीला भेट देऊन अमेरिका-तालिबान व अफगाणिस्तान दरम्यान चाललेल्या वाटाघाटींचा तपशील भारतीय नेत्यांना दिला. ते परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना भेटले. "इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स"मध्ये झालेल्या परिसंवादात ते म्हणाले, की अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वाटाघाटी चालू असल्या, तरी ""ती प्रस्थापित झाल्यावरच अमेरिकन सैन्यमाघार होईल,"" असे अमेरिकेने तालिबान नेत्यांना स्पष्ट केले आहे. ""वाटाघाटी सुरु झाल्यावर सहा महिन्यात सैन्यमाघार करावी,"" ही तालिबानची मागणी अमेरिकेने फेटाळून लावली. "तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. अफगाणिस्ताच्या घटनेच्या अंतर्गत विद्यमान सरकार व तालिबान यांच्यात संयुक्तपणे सरकार चालविण्यासाठी समझोता झाला व तालिबानने शस्त्रत्याग केला, तरच स्थितीत लाक्षणिक बदल होईल," असे त्यांना वाटते. आंतरराष्ट्रीयपातळीवर गेली 17 वर्षे चालू असलेल्या वाटघाटीतून अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवाय, रशियाने गेल्या ऑगस्टमध्ये मॉस्कोत आमंत्रित केलेल्या दुसऱ्या फेरीवर अमेरिकेने बहिष्कार घातल्याने त्या पुढे ढकलण्यात आल्या. 

""अफगाणिस्तानात होणाऱ्या दहशतवादी घटनांमागे पाकिस्तानातील हक्कानी गट, अफगाणिस्तानस्थित अल कैदा, तालिबान, दाएश (आयसीस) व अनेक दहशतवादी गट असून, आयसीसच्या दहशतवाद्यांची संख्या सुमारे 4 हजार असावी. गेली चाळीस वर्ष चाललेल्या युद्धाचा शेवट व्हावा, यासाठी प्रयत्न चालू असले, तरी विद्यमान तरूण पिढीने आजवरच्या जीवनात केवळ युद्ध व दहशतवाद पाहिला. निदान पुढील पिढीला त्यापासून मुक्तता मिळाली पाहिजे,"" असे दाऊदझाय वाटते. अमेरिकेने तालिबानला वाटाघाटीसाठी प्रोत्साहित केल्याने तालिबानची प्रतिष्ठा काही प्रमाणात वाढली, तथापि, त्यांच्यातील नेते पारंपारिक पद्धतीने काम करतात, तर आयसीसमध्ये विद्यार्थी व प्राध्यापक व "अकादमीशियन" यांचा भरणा असल्याने त्यांचा प्रभाव व आकर्षण अधिक आहे. 

शांतिवार्तेतील चार प्रमुख मुद्यांत अमेरिकेची सैन्य माघारी, तालिबानचे दहशवाद्यांशी असलेले संबंध, युद्धबंदी व अफगाणिस्तानच्या अंतर्गत गटांच्या वाटाघाटी यांचा समावेश आहे. अमेरिकेतर्फे राजदूत झालमे खालिलझाद तालिबानबरोबर वाटाघाटी करीत असून, 25 फेब्बुवारी 2019 रोजी दोहा येथे झालेल्या चर्चेत कतारचे परराष्ट्र मंत्री मुलताक बिन मजिद अल कहथानिथे, तालिबानचे उपप्रमुख मुल्ला अब्दुल घनी बरादर यांनी भाग घेतला. 2010 पासून मुल्ला बरादर पाकिस्तानात कैदेत होते. त्यांना राजदूत खालिलझाद यांच्या विनंतीवरून गेल्या ऑक्‍टोबरमध्ये सोडण्यात आले होते. दाऊदझाय म्हणाले, वाटाघाटींचा नेमका तपशील आम्हाला मिळाला नाही. तालिबानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शेरमहंमद अब्बास स्तानेकझाय करीत आहेत. 

अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जात असलेले प्रांत मोडकळीस आले आहेत. सरकारी लष्कराचे वर्चस्व वाढले असून गेल्या वर्षात तालिबानतर्फे होणारे संभाव्य 102 हल्ले लष्कराने मोडून काढले. तालिबानच्या कब्जातील केवळ चार जिल्ह्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यात काय चालले आहे. तिथे अल कैदा, आयसिस आहे, काय आदींची माहिती मिळत नाही. तालिबानने लोया जिर्गावर बहिष्कार टाकला. तथापि, तिचे महत्व कमी होणार नाही. कारण देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा असतो, तत्पूर्वी लोया जिर्गामध्ये त्याविषयी विचारविनिमय होतो. ही प्रथा सोळाव्या शतकापासून देशात असून, 1747 मध्ये लोया जिर्गाचे पहिले सम्मेलन झाले होते. माजी अध्यक्ष कै नजिबुल्ला यांनी 1986 मध्ये आमंत्रित केलेल्या लोया जिर्गाला तब्बल दोन हजार प्रतिनिधी उपस्थित होते. 

"तालिबानबरोबर वाटाघाटी कराव्या की नाही, याबाबत मत आजमावण्यासाठी अध्यक्ष घनी यांनी आमंत्रित केलेल्या लोया जिर्गा बैठकीला अफगाणिस्तानातील प्रांतांचे तब्बल तीन हजार प्रतिनिधी उपस्थित होते," "अशी माहिती देऊन दाऊदझाय म्हणाले, की अफगाणिस्तानच्या राजकारणात महिलांना बरेच महत्व आहे. लोया जिर्गाला त्यांची उपस्थिती एकूण प्रतिनिधींच्या 30.5 टक्के होती. आमच्या देशासाठी भारतासारखी लोकशाही महत्वाची आहे. त्यादृष्टीने काबुलमध्ये भारताने बांधलेले संसद भवन आमच्यादृष्टीने लोकशाहीची प्रातिनिधिक वास्तू होय. 

अफगाणिस्तानातील अध्यक्षीय निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत, याबाबत विचारता, दाऊदझाय म्हणाले, की विद्यमान अक्ष्यक्ष अश्रफ घनी यांची मुदत 29 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात येत आहे. 28 सप्टेंबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. सध्या घनी यांच्या नेतृत्वाखाली संमिश्र सरकार आहे. 

"या परिस्थितीत समाधानाची बाब म्हणजे, अमेरिका व इराण यांचे मतभेद व वैमनस्य शिगेला पाहोचले असले, तरी दोन्ही देश अफगाणिस्तानात परिस्थिती सुधारावी यासाठी सक्रीय आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Naik writes about Indian help to Afghanistan