युद्धाचा भडका उडाला, तर... 

North Korea
North Korea

उत्तर कोरिया व अमेरिका यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्‍या देणे सुरूच ठेवल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोन देशांदरम्यान खरेच अणुयुद्धाला तोंड फुटल्यास काय होईल? संभाव्य युद्धासाठी दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे याचा ऊहापोह आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चालू आहे. 

उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यात गेले काही महिने जबरदस्त शब्द व धमकीयुद्ध सुरू आहे. त्याची चर्चा सर्वत्र असून, त्याची परिणती अणुयुद्धात होणार काय, ही चिंता जगाला भेडसावू लागली आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र प्रगतीमुळे अमेरिकेच्या कोणत्याही भागात अण्वस्त्र डागण्याची क्षमता प्राप्त केली आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी अमेरिकेला युद्धाची धमकी दिली आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला बेचिराख करण्याचा इशारा दिला आहे. या संभाव्य युद्धाचे काय परिणाम होतील? किम जोंग उन यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आवर घालू शकतील काय? युद्ध छेडल्यास त्याचे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरिया, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तसेच पूर्व व दक्षिण पूर्व आशियातील देशांवर कोणते गंभीर परिणाम होतील, आदी प्रश्‍नांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊहापोह चालू आहे. अंदाज बांधले जात आहेत. अमेरिकेत ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर "डूम्स डे क्‍लॉक' (विनाशाची वेळ दर्शविणारे घड्याळ) मध्यरात्री (काळरात्र)कडे सरकण्यास केवळ अडीच मिनिटे उरली आहेत, असे दर्शविते. 1947मध्ये नोबेल पारितोषिकाच्या चौदा मानकऱ्यांनी ते तयार केले होते. 

जगातील कोणत्याही देशांदरम्यान पारंपरिक युद्ध झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम प्रत्येक देशाला कोणत्या न कोणत्या रूपात भोगावे लागतात. बहुतेक युद्धांचा परिणाम खनिज तेलांच्या किमती गगनाला भिडण्यात होतो आणि बहुतेक देशांचे कंबरडे मोडते. आपल्या देशाचे उदाहरण घेतल्यास इराक, लीबिया, आखाती देश येथील युद्धांचा फटका नोकऱ्या शोधण्यासाठी तेथे गेलेल्या लाखो भारतीयांना बसला. त्यांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारला शिकस्त करावी लागली. अजूनही त्यातून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. इराकमध्ये अडकलेल्या चाळीस भारतीय कामगारांचा गेली दोन वर्षे पत्ता लागलेला नाही. सीरियातील युद्धामुळे लाखो लोकांनी जीव वाचविण्यासाठी तेथून पलायन केले. निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे तुर्कस्तान व तमाम युरोप त्रस्त झाला. जर्मनीत अध्यक्ष अँजेला मर्केल यांचे पद जाताजाता वाचले. "इसिस'च्या दहशतवादाचे लोण जगातील अनेक देशांत पसरले, ते वेगळेच. भारतीय उपखंडाला युद्धाचा इतिहास असल्याने पाकिस्तान व चीनबाबत आपल्याला सतत दक्ष राहावे लागते. दुसरीकडे, अण्वस्त्रनिर्मितीला जोरदार विरोध करणारे दक्षिण कोरिया व जपान यांना किम जोंग उन याने युद्ध लादल्यास आपले काय होणार, ही चिंता सतावतेय. अण्वस्त्रनिर्मिती झटपट होत नसल्याने त्यांना अमेरिकेच्या सुरक्षाछत्राखाली राहण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे चोरट्या मार्गाने अण्वस्त्रे मिळविण्याचे प्रयत्न "इसिस'ने सोडलेले नाहीत. 

सतरा डिसेंबर रोजी सिडनीमध्ये 59 वर्षीय चो हान छान या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर आरोप आहे, की तो उत्तर कोरियाला क्षेपणास्त्राची उपकरणे व जागतिक काळ्या बाजारात कोळसा विकण्याच्या तयारीत होता. यात इंडोनेशिया, व्हिएतनाम व काही अन्य देशांतील व्यक्ती, संघटनांचाही हात असल्याचा संशय आहे. चोई गेली तीस वर्षे ऑस्ट्रेलियात राहात असून, तो मूळचा दक्षिण कोरियाचा आहे. तो उत्तर कोरियाशी संपर्क साधून होता. सर्वसंहारक शस्त्रास्त्रांबाबत संयुक्त राष्ट्रसंघ व ऑस्ट्रेलियातील कायद्यांचे उल्लंघन केल्याने त्याला अटक झाली. त्यातून आणखी काय निष्पन्न होते, ते लवकरच प्रकाशात येईल. 

उत्तर कोरिया व अमेरिका दरम्यान अणुयुद्ध झाल्यास काय होईल? दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे? काय अंदाज बांधले आहेत, याची माहिती दिली आहे, वॉशिंग्टनस्थित पत्रकार टोबी हार्नडेन यांनी. लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या "द संडे टाईम्स'मध्ये तीन डिसेंबर रोजी त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्यानुसार, "पेन्टेगॉनमधील एका अधिकाऱ्याच्या मते, उत्तर व दक्षिण कोरियातील हजारो लोक मृत्युमुखी पडतील. जग अस्थिर होईल. अलीकडे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचे वर्णन "न्यूक्‍लियर डेमन' असे केले असून, "त्यांना अणुयुद्धाची खुमखुमी आली आहे,' असा आरोप केला आहे. दक्षिण कोरिया व अमेरिका यांचे प्रचंड युद्धसराव झाले. चीनने जोंग उन यांना लगाम घातला नाही, तर युद्धामुळे जोंग उन नेस्तनाबूत होईल. उत्तर कोरियाचे अंदाजे पन्नास लाख निर्वासित चीनमध्ये घुसतील. त्यांना आश्रय देण्याची जबाबदारी चीनवर येईल.

अमेरिकेची विमाने व क्षेपणास्त्रे प्रामुख्याने उत्तर कोरियातील क्षेपणास्त्र डागण्याची कार्यालये व क्षेपणास्त्रस्थळे (बंकर) नष्ट करतील. उत्तर कोरियाला नष्ट करण्यासाठी जोंग उन सीमेवरील लष्कराचा वापर करील. त्यामुळे ठार होणाऱ्या दक्षिण कोरियन लोकांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी असेल, असे लष्करी विश्‍लेषकांचे मत आहे. दक्षिण कोरियातील सरकार पडले, तर "संयुक्त कोरिया'ची उभारणी करण्यास वॉशिंग्टन व सोल सिद्ध होतील. काही विश्‍लेषकांना वाटते की ट्रम्प यांना युद्ध आकर्षक वाटत असले, तरी कोरियन द्वीपकल्पातील गुंतागुतीचे राजकारण व परिस्थितीचे त्यांना नीटसे आकलन नाही. इराकमध्ये अमेरिकेची जी स्थिती झाली, तशी इथे होण्याची शक्‍यता टाळता येणार नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील एका माजी ज्येष्ठ अधिकाऱ्याला वाटते, की कोणतेही पाऊल उचलण्याआधी जपान, दक्षिण कोरिया, तैवान, ऑस्ट्रेलिया या मित्रराष्ट्रांवर काय संकटे कोसळतील, याचा विचार ट्रम्प यांनी केला पाहिजे. कारण, दुसऱ्या महायुद्धात संहार झाला, त्यापेक्षाही अधिक संहार विद्यमान पिढीला अनुभवण्याचे अरिष्ट कोसळेल. 

या चर्चेच्या मधेच, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासेर खान जानजुवा यांनी गेल्या आठवड्यात भारताविरुद्ध अण्वस्त्रयुद्धाचा इशारा द्यावा, हा योगायोग समजायचा काय, की चीनशी हातमिळवणी करीत दक्षिण आशियाला अस्थिर करण्याचा पाकिस्तान व चीनचा संयुक्त डाव समजायचा? ""चीनच्या साह्याने पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या "सीपेक कॉरिडॉर' प्रकल्प हाणून पाडण्यासाठी भारत व अमेरिका यांनी हातमिळवणी केली आहे,'' असा आरोप त्यांनी केला आहे. त्यात अर्थातच तथ्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com