प्रदूषणाच्या विळख्यात राजधानी 

pollution
pollution

दिल्लीवर वायू प्रदूषणांचं संकट कोसळय. ग्रामीण भागातील बळीराजा जसा पर्जन्यासाठी ढगांकडे डोळे लावून बसतो, तसे दिल्लीकर शुद्ध हवेच्या श्‍वासासाठी आकाशाकडे पाहात आहेत. गेले दहा दिवस इथं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही. सकाळी धुकंमिश्रित प्रदूषित हवेचं इतकं दाट कांबळं राजधानीवर पसरलेलं असतं, की त्याला घाबरून दिल्ली सरकरानं काल 'आरोग्य आणिबाणी' घोषित केली.

4 नोव्हेंबरपासून आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहतुकीची सुरू केलेली ऑड-अँड-इव्हन ही योजना 15 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. दरम्यान पुढील दोन दिवसांसाठी दिल्ली, नोयडा व गुडगावमधील शाळांना सुटी देण्यात आली आहे. प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांचे मथळे पहा - द टाईम्स ऑफ इंडिया "ऍटमॉस"फियर" (हवेचे भय)दिल्ली व्हिक्‍टिम ऑफ सिक चोक."द इंडियन एक्‍सप्रेस " कॅपिटल एअर क्रॉसेस सिव्हियर लिमिट, पीएमओ स्टेप्स इन, सेन्टर टू मॉनिटर". द हिंदुस्तान टाईम्स -" कॅपिटल पनिशमेन्ट", द हिंदू - "दिल्ली चोक्‍स ऍज एअर पोलूजन लेव्हल्स हिट ए थ्री इयर हाय."" 

पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशातील शेतकरी हजारो एकरात शेतात पसरलेलं तृण जाळत असल्याने त्यातून निघणाऱ्या धुराचं काळं सावट दिल्लाकरांच्या डोक्‍यावर पसरलय. दिल्लीच्या अलीपूर भागात आज सकाळी हवेतील "पार्टीक्‍युलेट मॅटरचं (पीएम)" प्रमाण 999 होतं. ते अतिशय धोकादायक होतं. सुरक्षित श्‍वासासाठी ते प्रमाण केवळ 50 असावं लागत. मी मयूर विहार या उपनगरात राहातो. तेथे सकाळी पीएमचं प्रमाण 400 म्हणजे श्‍वसनास अयोग्य होतं. दुपारी 12 वाजायच्या सुमारास ते 300 झालं. दुपारी 2 वाजता ते 287 व रात्री साडे दहा वाजता 251 झालं. त्यानंतर ते पुन्हा वाढत गेलं. नोव्हेंबरच्या सुरूवातीलाच ही गंभीर स्थिती, तर अख्खा नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या थंडीच्या महिन्यात काय होणार, याचा विचार करूनच दिल्लीकरांना धडकी भरलीय. 

आमच्या "समाचार सोसायटी"राहाणारे "प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया"चे ज्येष्ठ निवृत्त पत्रकार जयराज रोज सकाळी सोसायटीतील बागेत व्यायाम करायचे. परंतु दोन महिन्यातच त्यांना श्‍वसनाचा त्रास व्हायला लागला. पुढे तो इतका वाढला, की चार पावले चालता येईना. येथील प्रसिद्ध पटेल चेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये तपासणी करण्यासाठी ते गेले, तेव्हा डॉक्‍टरांनी त्यांना विचाराता त्यांनी ""दोन महिने सकाळी बागेत व्यायाम करीत होतो,"" असे सांगताच, त्यांच्या दुखण्याचे निदान झाले. पहाटेपासून हवेत तरंगणाऱ्या विषारी धुलीकणांनी त्यांच्या फुफ्फुसांत एकच गर्दी केल्याने त्यांना इन्फेक्‍शन झाले होते. पुढे काही महिन्यातच त्यांचे निव्वळ प्रदूषणामुळे निधन झाले. प्रदूषणाने काय होऊ शकते, याचे हे दुःखद उदाहरण. म्हणजे नोव्हेबर ते जानेवारी या महिन्यात सकाळी मोकळ्या हवेत व्यायाम करणे, चालणे सोडून द्यावे लागते. अथवा तोंडावर मास्क (संरक्षक पडदा) लावून वावरले, तरच तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. 

केंद्रात भाजप व दिल्लीत आम आदमी पक्ष एकमेकाविरोधी सरकारं असल्यानं दोघेही प्रदूषणाबाबत परस्परांना दोष देण्यात गुंतलेत. तृण जाळण्याच प्रमाण कमी व्हावं, यासाठी केंद्र सरकराने काही एक पावलं टाकली नाही. ""ही स्थिती निर्माण होईल. ती टाळण्यासाठी दिल्ली, पंजाब,हरियाना व उत्तर प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची वा मुख्य सचिवांची तातडीने बैठक बोलाविण्यात यावी," पर्यावरण विषयक संस्थांनी दिलेली सूचना कुणाही पाळली नाही. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर परिस्थितीवर तोडगा शोधण्याऐवजी केजरीवाल यांच्यावर टीका करीत आहेत, की आप सरकारने आपल्या कामगिरीच्या जाहिरातीवर 1500 कोटी रू. खर्च केले. त्याच्या उत्तरात केजरीवाल यांनी जाहिरातीवर केवळ 40 कोटी रू. खर्च झाल्याचे सांगितले. 

या गंभीर परिस्थितीत माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी आणखी एक तमाशा केला. ऑड-अँड-इव्हनचा नियम असताना त्यांनी (इव्हन नंबरचा दिवस असताना) स्वतःची ऑड क्रमांकाची इनोव्हा गाडी काढली व नियमाला धाब्यावर बसविले. त्यावर लिहिले होते, ""ऑड-इव्हन एक नाटक है." नियम भंग केल्याने चार हजार रू. दंड त्यांनी भरला. परंतु, उद्धटपणा करीत, "महात्मा गांधींनी मीठाचा सत्याग्रह केला होता व कायद्याचं उल्लंघन केलं होत," असं न पटणारं कारण दिलं. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यावर येऊन ठेपल्याने भाजपने आप सरकारला या न त्या कारणासाठी कोंडीत पकडायचं ठरवलय. त्या दृष्टीने रोज पावले टाकली जात आहेत. आप सरकारवर टीका करण्यात केंद्रीय मंत्र्यांची शर्यत लागली आहे. दिल्लीतील वाढतं प्रदूषण हे त्यांना कारण मिळालय. अर्थात राजधानीतील प्रदूषण हे गेल्या पाच वर्षात वाढंल असून, त्याला "केवळ आम आदमी सरकार जबाबदार आहे," अशी टीका करून भाजप मोकळा झालाय. 

दिल्लीची लोकसंख्या 1.90 कोटी, तर वाहनांची संख्या 1 कोटी झाली असून, त्यापैकी 70 लाख स्कूटर्स, मोटरसायकल्स आहेत. 5.7 लाख वाहनं (ट्रक्‍स इ) अन्य राज्यातून रोज दिल्लीत प्रवेश करतात व तेवढ्याच वाहनांची दिल्लीत प्रतिवर्ष नोंदणी होत आहे. दिल्लीतील मेट्रोतून सुमारे तीस लाख लोक रोज प्रवास करतात. तरीही वाढणारा वाहनसंख्या व अन्य राज्यातून येणाऱ्या ट्रक्‍स, टेम्पो आदी वाहनांच्या डीझेल वापरामुळे प्रदूषणाची समस्या दर हिवाळ्यात अधिक गंभीर होत चालली आहे. गेल्या वर्षी दिल्लीला "जगातील सर्वात प्रदूषित शहर" अशी उपाधि मिळाली होती. याआधी दिल्लीला "क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया" व "रेप कॅपिटल ऑफ इंडिया," असे म्हटले जाऊ लागले. काही वर्षापूर्वी नोव्हेंबर ते जानेवारी हे महिने थंडीचे पण अगदी हवेहवेसे असणारे महिने असायचे. पाहुण्यांनी यावे, ते याच महिन्यात असेही बोलले जायचे. परंतु, आता असं सांगण्याची सोय उरलेली नाही. दिल्लीला राजकारणानं आधीच प्रदूषित केलय. त्यात वरील गोष्टींची भर पडल्यानं येत्या काही वर्षात राजधानी राहाण्यायोग्य उरेल काय, असाही प्रश्‍न येथील नागरिकांना पडलाय. वेळीच पावले टाकण्याचे भान कुणालाही उरलेले नाही. त्याचा दोष काही प्रमाणात येथील नागरिकांनाही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com