रणरागिणी हरपली 

विजय नाईक
Wednesday, 7 August 2019

संसदीय प्रथेनुसार, परदेश दौऱ्याहून आल्यानंतर पंतप्रधानाने तेथील झालेल्या भेटीगाठी, करारांबाबत संसदेत निवेदन करावयाचे असते. परंतु, मोदी यांनी ते काम स्वराज यांना दिले. त्यामुळे ते स्वराज यांना गौण मानतात, अशी टीकाटिप्पणी होत असे. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही होते. एकदा मोदी नेपाळच्या दौऱ्याहून परतले. त्याविषयीचे निवेदन करण्यास स्वराज राज्यसभेत बोलू लागल्या.

भारताच्या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे येथे हृदयविकाराने काल दुःखद निधन झालं. गेले चाळीस वर्ष राजकारण, समाजकारण व संसद गाजविणारी रणरागिणी हरपली. राजधानीत पत्रकारिता करताना असंख्य वेळा त्यांना भेटता आलं, त्यातून स्मितहास्य करीत हलक्‍या फुलक्‍या विनोदांची पखरण करणारं, तर कधी गंभीर विषयात बुडी मारणारं त्यांचं व्यक्तिमत्व ध्यानात राहिल.

हिंदी व इंग्रजीत अत्यंत अस्खलीत बोलणाऱ्या स्वराज यांनी निवडणुकांचे फड, संसदेतील वादविवाद गाजविले. तसेच, भाजपच्या प्रवक्तया, माहिती व नभोवाणी मंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून केलेलं कामकाज व संयुक्त राष्ट्र संघात केलेलं भारताचं प्रभावी प्रतिनिधित्व यांचा विसर पडणं शक्‍य नाही. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीचे सरकार असो, की नरेंद्र मोदी यांचे असो, त्यांच्या लोभस, पण करारी व हजरजबाबी व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या भोवती लोकप्रियतेचं एक वेगळं वलय निर्माण झालं होतं. मोदी यांनी परराष्ट्र खात्याची सर्व सूत्रे स्वतः ठेवूनही परराष्ट्र मंत्री म्हणून गेल्या पाच वर्षात त्यांनी देशाच्या व जागतिक पातळीवर एक वेगळा ठसा उमटविला. त्यांना सर्वोत्तम संसदपटूचा बहुमानही देण्यात आला होता. संसदेतील त्यांचं भाषण ऐकण्यासाठी पत्रकारकक्षेत एकच गर्दी होत असे. विरोधामध्ये असताना सत्तारूढ पक्षावर व सत्तारूढ पक्षात असताना विरोधी कॉंग्रेसवर त्या धारदार वक्‍यव्याने अक्षरशः तुटून पडत. त्यांच्या वक्तव्यात मुद्दे व विषयाची तर्कशुद्ध मांडणी असे. त्यामुळे मोदी यांनी परराष्ट्र खात्याच्या चर्चेला सामोरे जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. 

संसदीय प्रथेनुसार, परदेश दौऱ्याहून आल्यानंतर पंतप्रधानाने तेथील झालेल्या भेटीगाठी, करारांबाबत संसदेत निवेदन करावयाचे असते. परंतु, मोदी यांनी ते काम स्वराज यांना दिले. त्यामुळे ते स्वराज यांना गौण मानतात, अशी टीकाटिप्पणी होत असे. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही होते. एकदा मोदी नेपाळच्या दौऱ्याहून परतले. त्याविषयीचे निवेदन करण्यास स्वराज राज्यसभेत बोलू लागल्या. पाच मिनिटांनतर सभापतींनी त्यांना उरलेले निवेदन सभापटलावर ठेवण्यास सांगितले. तशा त्या नाराज झाल्या व चढत्या आवाजात म्हणाल्या, "" नाही, मला पूर्ण निवेदन करावयाचे आहे, असे सांगून त्यांनी वाचायला सुरूवात केली, ते सुमारे तीस ते पस्तीस मिनिटे त्या बोलत होत्या. वस्तुतः मोदी यांच्या नेपाळच्या भेटीविषयी सर्व वृत्तपत्रांतून भरपूर माहिती प्रसिद्ध झाली होती. स्वराज जे वाचत होत्या, त्यात बव्हंशी त्याचीच पुनरावृत्ती असल्याने निवेदन कंटाळवाणे झाले. तरी त्यांनी आपले म्हणणे सोडले नाही. 

त्या काहीशा हट्टी होत्या. त्याचे उदाहण म्हणजे, सोनिया गांधी यांना पंतप्रधानपद मिळू नये म्हणून, त्यांनी व उमा भारती यांनी स्वतःचे मुंडन करण्यचा व जमिनीवर झोपण्याचा इशारा दिला होता व त्यांनी तो बऱ्याच प्रमाणात अंमलात आणलाही. गेल्या पाच वर्षात स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे पूर्ण हिंदीकरण केले. गेली पासष्ठ वर्ष परराष्ट्र मंत्रालयात इंग्रजीचा प्रभाव होता. तो स्वराज यांच्या साह्याने मोदी यांनी पूर्णपणे घालविला. आता प्रवक्‍याला दोन्ही भाषेत बोलावे लागते. माजी प्रवक्ते विकास स्वरूप, गोपाळ बागले व विद्यमान प्रवक्ते रविश कुमार एकाच प्रश्‍नाचे उत्तर हिंदी व इंग्रजी भाषेतून देतात. मंत्रालयाच्या कामगिरीची पुस्तिकाही दोन्ही भाषातून प्रसिद्ध करण्यात आली. तथापि, मोदी यांनी स्वराज यांना कधीही आपल्याबरोबर परदेश दौऱ्यावर नेले नाही. दोघांचे दौरे स्वतंत्र असत. त्यातही स्वराज अत्यंत प्रभावी होत्या. त्यांच्यात माणुकीचा ओलावा होता, म्हणूनच परदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशात सुखरूप परत आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या अधिकाराचा व ट्‌विटरचा वापर केला. त्यामुळे, त्या अधिक लोकप्रिय झाल्या, इतक्‍या की त्यांना "रिपॅट्रिएशन मिनिस्टर" 

म्हटले जाऊ लागले. एकदा एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रात दाखविले होते, की परदेशदौऱ्याहून मोदींचे विमान पालम विमानतळावर उभे आहे. त्यातून मोदी बाहेर येतात, तेव्हा त्यांना स्वराज आठवण करून देत आहेत,""आपण मला परराष्ट्र मंत्री नेमले आहे, हे आपल्या ध्यानात आहे ना?"" म्हणजे, पंतप्रधांनांना परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी केवळ निरोप देणारे वा आगमन झाल्यावर स्वागत करणाऱ्या आपण शिष्टाचार मंत्री नव्हे, याची जाणीव त्यांना करून द्यावयाची होती. 

त्यांच्या कारकीर्दीत परदेशस्थ भारतीय विषयक खात्याचे विलीनीकरण परराष्ट्र मंत्रालयात करण्यात आले. जनरल व्ही.के. सिंग हे त्या खात्याचे मंत्री होते.त्याचे कारण देताना त्यांनी मंत्रालयाच्या कामकाजाचे सुसूत्रीकरण करण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. 

दर वर्षी डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्रालयातील बातम्या देणाऱ्या पत्रकारांना मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू भवनाच्या प्रशस्त हिरवळीवर त्या भोजनाला आमंत्रित करीत. भोजनाचा मेनू त्या स्वतः ठरवित. त्यात निरनिराळ्या राज्यातील खास चविष्ट पदार्थांचा समावेश असे. एकदा दिल्लीतील खास पदार्थ चिला (दाळीचे धिरडे) होता. पण त्याबरोबर चटणी नव्हती. तेव्हा मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांना तातडीने त्यांनी बोलावले आणि म्हटले, ""अरे अकबरुद्दीन भाई, चिला की चटणी कहा है?"" झाले, अकबरूद्दीन यांची धावपळ सुरू झाली. काही क्षणातच चटणी आली. मंत्री व प्रवक्ते यांच्यातील हा संवाद पाहून आम्हाला विस्मय वाटला. आमच्याकडे पाहात स्वराज म्हणाल्या,. मेनू संभाळण्याची जबाबदारी मी अकबरवर सोडली होती. असो, चटणी आली. नंतर, एकदा त्यांनी आम्हाला एका हॉटेलमध्ये भोजनास आमंत्रित केले. प्रसंग होता, अकबरुद्दीन यांना निरोप देण्याचा. पंतप्रधान मोदी यांनी त्यांची नेमणूक भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातील कायमच्या प्रतिनिधीपदी केली होती. प्रवक्ता ते संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचा कायमचा प्रतिनिधी, ही उडी फार मोठी होती. आजपर्यंत कोणत्याही प्रवक्‍त्याला इतके मोठे "प्रमोशन" मिळाले नव्हते. या प्रसंगी अकबरुद्दीन उभयता उपस्थित होते. 

अकबरुद्दीन यांचे अभिनंदन करून स्वराज म्हणाल्या, "तुम्हाला अकबरबाबत फारशी माहिती आहे की नाही, मला ठाऊक नाही. अलीकडे भारत आफ्रिका फोरमची परिषद झाली. तिच्या आयोजनाचे सारे कामाकाज आम्ही अकबरवर सोपविले होते. एकदा तर असे झाले, की काम करताना त्यांना तहान, भुकेची आठवणही राहिली नाही, आणि फायली पाहताना सायंकाळी ते एकाएकी कोसळले. आमची एकच धावपळ झाली. अखेर काही वेळाने ते शुद्धीवर आले. असे आहेत, अकबरुद्दीन. कार्यतत्परता व कामाला वाहून घेण्याची त्यांचा हा गूण मला व मोदींना आवडला. शिवाय, भारत व आफ्रिका फोरमच्या परिषदेत एकही अपप्रसंग घडला नाही व ती अत्यंत सुरळीतपणे पार पडली,याचे श्रेयही अकबरूद्दीन यांना जाते."" स्वराज यांच्या या वर्णनाने आमची करमणूक तर झालीच,परंतु, संयुक्त राष्ट्रसंघातील महत्वाच्या पदासाठी त्यांची निवड का करण्यात आली, याचेही गुपित ध्यानी आले.म 

मंत्रालयात असताना त्यांच्यावर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतनर त्या कामावरही रूजू झाल्या.वजन कमी झाले होते. पण आवाज खणखणीत होता. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुका आल्या, तेव्हा प्रचार न करण्याची, धुळीत न वावरण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. त्यानंतर त्या सार्वजनिक जीवनातून हळूहळू अलग झाल्या. विदिशा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास त्यांनी नकार दिला. भाजप भरघोस मतांनी निवडून आल्याचा आनंद त्यांना होता. मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला त्या उपस्थित राहिल्या. अगदी अखेरपर्यंत त्या सजग होत्या. काश्‍मीरविषयक विधेयक दोन्ही सभागृहात सम्मत झाल्याबाबत ट्‌विटरवरून त्यांनी मोदी व शहा याचे अभिनंदनही केले. त्यांच्या हयातीत काश्‍मीरविषयक त्यांचे व भाजपचे एक स्वप्न पुरे झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Naik writes about Sushma Swaraj