लेखक असलेले प्राध्यापक (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

नव्यानंच सुरू झालेल्या एका दैनिकात माझ्या मित्राला नोकरी मिळाली. त्यानं मालकांना सांगून वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी प्रभाकर तामणे सरांना बोलावलं. सभेचं वार्तांकन मला करायला मिळणार होतं. बातमी पहिल्या पानावर येणार होती आणि मथळ्याखाली "विजय तरवडे यांजकडून' अशी बायलाइन असणार होती. मी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सरांकडं गेलो. भाषणातले मुद्दे विचारले. माझी कल्पना ऐकून सर जाम खूश झाले आणि अगडबंब हसले. आम्ही दोघांनी मिळून बातमी आधीच व्यवस्थित लिहून काढली....

फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिल्या वर्गात असताना प्रसिद्ध लेखक बाळ गाडगीळ आम्हाला अर्थशास्त्र शिकवीत. मात्र, आपल्याला शिकवणारी ही व्यक्ती मराठीतली थोर विनोदी लेखक आहे, हे आम्हाला बरेच दिवस समजलं नाही. कारण, गाडगीळ सरांचं भारदस्त साहेबी व्यक्तिमत्त्व. उंची कापडाचा हाफ बुशशर्ट, शर्टच्या खिशात पेन, पॅंट आणि शूज असा पेहराव. चेहरा कायम कडक गंभीर. वर्गात ते कधीही मराठीत बोलत नसत. विनोद वगैरेचं तर नावच नको. कधीकधी अचानक हजेरी घेत. गैरहजर मुलांना दंड ठोठावत. एकदा तास संपल्यावर मी त्यांना दोन कठीण शब्दांचे अर्थ मराठीत विचारले. त्यांनी शब्दकोशात बघायला सांगितलं.

गाडगीळ सरांच्या नेमकं उलट व्यक्तिमत्त्व असलेले कमलाकर परचुरेदेखील अर्थशास्त्र शिकवत. परचुरे सर सूटबूट आणि हॅट घालून आले, तरी साहेबी न वाटता आपल्या मातीतले वाटत. वर्गात अधूनमधून मराठीतदेखील बोलत. हास्यविनोद करत. आम्ही कॉलेज सोडल्यावर काही वर्षांनी प्रा. स. शि. भावे फर्ग्युसनमध्ये अवतरले. त्यांनी फर्ग्युसनमधल्या "साहित्य सहकार' संस्थेचा एक विशेष कार्यक्रम सी-नाईनच्या वर्गात आयोजित केला. "साहित्य सहकार'चे सदस्य असलेल्या माजी विद्यार्थ्यांनादेखील आमंत्रित केलं. एकूण वीसेक जण उपस्थित असू. या सभेत भावे सरांनी स्वतःच्या काही कविता वाचल्या. प्रा. वि. रा. करंदीकर सरांनी पुलंच्या काही आठवणी सांगितल्या. गाडगीळ सरांनी "माझ्या आजीचा फोटो' ही विनोदी कथा वाचून दाखवली. कथा विनोदी आहे, हे लगेच लक्षात आलं; पण जवळपास अर्धा तास झालेल्या वाचनात श्रोते एकदाही हसले नाहीत. भावे सरांनी स्वतःच्या काही कविता वाचल्या. नंतर उत्तम जेवण होतं. नंतर अनेक दिवस मी दिवाळी अंकात गाडगीळ सरांचं नाव दिसलं, की पान उलटून पुढं जायचो; पण एका लेखात त्यांनी केलेली धमाल कमेंट मित्रानं दाखवली. त्या काळी ललित आणि दीपावली हे दोन दिवाळी अंक अतिशय उशिरा- कधी कधी दिवाळीच्या शेवटच्या दिवशी- बाजारात येत. त्यावर गाडगीळ सरांनी टिप्पणी केली होती. अनंत चतुर्दशीला विसर्जनाची मिरवणूक असते. त्यावेळी विद्युत रोषणाई केलेली मंडळं आपलं वाहन मुद्दाम रात्री उशिरा मिरवणुकीत आणतात. गाडगीळ सरांनी उपरोक्त दिवाळी अंकांना त्या उशिरा येणाऱ्या मंडळांची उपमा दिली होती. काही दिवसांनी लक्षात आलं, की गाडगीळ सरांचं अभिवाचन किंवा वक्तृत्व निष्प्रभ असलं, तरी त्यांचं विनोदी लेखन अतिशय फर्मास आहे. नंतर त्यांची अनेक पुस्तकं मी आवडीनं वाचली. भालबा केळकर सर "हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन सायन्स' शिकवत. त्यांचा तास शेवटचा असे. शिकवताना खूप हातवारे आणि मुद्राभिनय करत. हास्यविनोदांचं त्यांना वावडं नव्हतं. नाट्यसृष्टीशी त्यांचं असलेलं नातं आम्हाला ठाऊक होतं; पण ते किती मोठ्या स्थानावर आहेत, याची तेव्हा कल्पना नव्हती.

तिमाही परीक्षेत त्यांच्या पेपरमध्ये विविध प्राण्यांची उपासना करणाऱ्या मानववंशांबाबत प्रश्न आला होता. मी त्याचं अतिसुलभ उत्तर लिहिलं. "वाघ-सिंहांची उपासना करणाऱ्या भक्तांना वाघ-सिंहांनी खाल्लं आणि गायी, माकडं, घोडे शाकाहारी असल्यानं त्यांची उपासना करणारे वंश शिल्लक राहिले,' असं उत्तर मी माझ्या मोडक्‍यातोडक्‍या इंग्लिशमध्ये ठोकून दिलं होतं. वर्गात पेपर वाटताना सरांनी माझा पेपर सर्वात खाली ठेवला. माझं उत्तर त्यांनी साभिनय वाचून दाखवलं आणि वर्गभर हशा पिकला. नंतर त्यांनी जाहीर केलं ः ""हा पेपर कोणाचा आहे, हे मी सांगणार नाही. स्टाफरूममध्ये पेपर देईन.'' मी जाऊन पेपर घेऊन आलो. त्यांनी प्रेमानं सुचवलं, की मी एखादं इंग्लिश वर्तमानपत्र नियमित वाचावं आणि पॉकेट डिक्‍शनरी बाळगावी. एकदा त्यांनी तास संपल्यावर विचारलं ः ""मराठी समजणारे कोणकोण आहेत?'' आम्ही हात वर केले. ""ज्यांना रस असेल, त्यांनी लगेच "बालगंधर्व'मध्ये यावं, असं त्यांनी सांगितलं. "जोशी काय बोलतील' या नाटकाचा प्रयोग होता. सरांनी तो आम्हाला मोफत दाखवला.

प्रभाकर तामणे आमच्या कॉलेजमध्ये नव्हते; पण कधीकधी आम्हाला आकाशवाणीच्या "युववाणी' कार्यक्रमात कथा-कविता वाचायची संधी मिळे. त्यात ते सूत्रसंचालन करत. प्रथितयश लेखकांच्या भन्नाट नकला करीत. कारण ठाऊक नाही; पण खानोलकर हे त्यांचं आवडतं टार्गेट होतं. खानोलकरांना मी कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही. जे पाहिलं ते तामणे सरांच्या नकलांमध्ये. नव्यानंच सुरू झालेल्या एका दैनिकात माझ्या मित्राला नोकरी मिळाली. त्यानं मालकांना सांगून वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी तामणे सरांना बोलावलं. सभेचं वार्तांकन मला करायला मिळणार होतं. बातमी पहिल्या पानावर येणार होती आणि मथळ्याखाली "विजय तरवडे यांजकडून' अशी बायलाइन असणार होती. मी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सरांकडं गेलो. भाषणातले मुद्दे विचारले. माझी कल्पना ऐकून सर जाम खूश झाले आणि अगडबंब हसले. आम्ही दोघांनी मिळून बातमी आधीच व्यवस्थित लिहून काढली. जाड ठशातला मजकूर मार्कर पेननं दर्शवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सरांचं भाषण सुरू झाल्यावर पंधरा मिनिटांनी मी तिथून निघालो नि प्रेसमध्ये जाऊन बातमी कंपोजला दिली. अपेक्षेनुसार बातमी माझ्या नावासह झोकात छापून आली.
तामणे सरांच्या मिश्‍कील स्वभावाचे आणखीन पैलू नंतर केव्हातरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com