मुद्रण आणि वितरण (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

लहानपणी म्हणजे सन 1960-61 च्या दरम्यान मी इयत्ता दुसरीत असतानापासून पुण्यात प्रसिद्ध होणारं "भोंगा' नावाचं एक सायंदैनिक मला आठवतं. मात्र, त्याचे संपादक-मालक यांची माहिती कुठंही मिळत नाही. "फेसबुक'वर चौकशी केली तेव्हा, त्यांचं नाव स. आ. जकाते आहे, अशी माहिती पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी दिली. "भोंगा'विषयीच्या काही आठवणी आहेत. संध्याकाळी दिवेलागणीनंतर आम्ही अंगणात गप्पा मारत बसायचो. त्या वेळी गांधीटोपी आणि स्वच्छ पांढरे कपडे घातलेला एक सायकलस्वार रस्त्यावरून "भोंगा! भोंगा!' अशी आरोळी देत जाई. दैनिकाच्या नावाची आरोळी दिल्यावर तो मुख्य बातमीची हेडलाईन ओरडून सांगत असे. बातमी खळबळजनक असे; त्यामुळं गिऱ्हाइकं लगेच त्याच्या मागं धावत. सायकलवर बांधलेल्या अंकांची विक्री तो एकेका चौकात थांबून करत असे. अंकाची किंमत काही वेळा एक आणा असायची एवढं आठवतं. "भोंगा'तल्या बातम्या खळबळजनक असल्या तरी सामाजिकदृष्ट्या धोक्‍याच्या नसत. कारण, "भोंगा'मुळं कुठं दंगल झाली, कुणाची बदनामी झाली किंवा "भोंगा'वर पोलिसांची कारवाई झाली, असं स्मरत नाही. "भोंगा'च्या बातम्या लोक मनोरंजन म्हणून वाचून विसरून जात असावेत.

सन 1961 मध्ये प्रचंड पाऊस झाला होता. त्यानंतर पानशेतचं धरण फुटून पुण्यावर आलेल्या महापुराच्या आपत्तीविषयी बहुतेकांना ठाऊक आहेच. एके रात्री केव्हातरी "भोंगा'विक्रेता "धरण पूर्ण भरले...धरणाला धोका' असं काहीसं ओरडत गेला.
आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर उंबराचं झाड होतं. तिथं बांधलेल्या आडव्या कट्ट्यावर बसलेली मोठी माणसं "भोंगा'चा हा इशारा ऐकून खो खो हसली होती; पण काही दिवसांनी खरोखरच धरण फुटलं. महापूर आला.

त्या काळी वर्तमानपत्रात चित्रपटसृष्टीतल्या बातम्यांना किंवा गॉसिपवजा मजकुराला स्थान नसे; पण पुण्यात "संगम' चित्रपट आला तेव्हा "भोंगा'विक्रेता सिनेमातल्या नायक-नायिकेबाबत गॉसिप असलेली हेडलाईन ओरडत गेलेला आठवतो. सायकलवर हिंडून आणि हेडलाईन ओरडून सांगत दैनिक खपवणारा हा पहिला वितरक असावा. महापुराचा मराठी लेखकांनी घेतलेला किरकोळ फायदा सांगतो. चंद्रकांत काकोडकरांनी त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रणयरम्य कथा लिहिली आणि महापुरानंतर मरण पावलेल्यांच्या आत्म्यांना नारायण धारप यांनी आपल्या कथेत आणलं. यानंतर वीसेक वर्षांनी पुण्यात एका नेत्यानं हौस म्हणून चारपानी दैनिक सुरू केलं. त्यात जाहिराती अजिबात नसत. छपाईचा आकडादेखील कमी होता. मुख्य संपादक सत्तरहून अधिक वर्षांचे होते. ते वेतन घेत नसत. रोज सकाळी वेळेवर येऊन एक अग्रलेख आणि आणि एक मोठा लेख लिहून काढत. मी संध्याकाळी हौसेनं तिथं जाऊन मित्राशी गप्पा मारत बसायचो. संध्याकाळी कुणीतरी जाऊन "पीटीआय'च्या बातम्यांचे कागद आणत असे. संपादकांनी खुणा करून दिलेल्या बातम्यांचं भाषांतर हा मित्र करत असे. त्याला एखादा इंग्लिश शब्द समजला नाही तर मी मदत करायचो. बाळू चिपळूणकर नावाचा मुलगा संध्याकाळी येऊन एका कोपऱ्यात निजायचा. पहाटे उठून अंकांचे गठ्ठे घेऊन सायकलवरून हिंडून विकायचा. तोदेखील मुख्य हेडलाईन ओरडत जाई. चिपळूणकरचं आणि मित्राचं एकदा भांडण झालं. मित्रानं मुद्दाम जोडाक्षरांनी खच्चून भरलेली आठकॉलमी हेडलाईन दिली. चिपळूणकरला त्या दिवशी अंक विकताना खूप त्रास झाला! या मित्रानं एकदा मलाही हिसका दाखवला. माझ्या लग्नाची निमंत्रणपत्रिका मी त्याला दिली होती. लग्न लोणावळ्यात परगावी असल्यानं तो लग्नाला येणार नव्हता. मात्र, "लग्नाची बातमी छापून येईल', असं त्यानं मला सांगितलं होतं. लग्न झाल्यावर मी दुसऱ्या दिवशी आणि पुढचे काही दिवस त्यादृष्टीनं अंक पाहिला; पण बातमी प्रसिद्ध झालेली मला आढळली नाही. नंतर प्रत्यक्ष भेटीत मित्राला याविषयी विचारलं तेव्हा त्यानं दिलगिरी व्यक्त करत सांगितलं, की तुझ्या लग्नाची बातमी लग्नाच्या आधीच छापून आली आहे!

त्या काळी अंकांची अक्षरजुळणी व छपाई जुन्या पद्धतीनं होई. म्हणजे धातूच्या खिळ्यांची अक्षरं वापरून कॉलम बनवले जात. एका संध्याकाळी हा मित्र बातम्यांचं भाषांतर करत असताना कंपोज खात्यातल्या माणसानं ओरडून बातम्या लिहिणाऱ्यांना सूचना दिली ः "बातम्यांमध्ये "र' हे अक्षर नको..."र' अक्षराचे खिळे संपले आहेत...!'

बावीस वेळा "बा'
अक्षरं (फॉंट) संपल्याविषयीची ही आणखी एक गंमत...डाव्या विचारांचे एक साथी स्वतःचं साप्ताहिक चालवत असत. साप्ताहिक तोट्यात चाललं होतं. तो तोटा भरून काढण्यासाठी साथी पुस्तकछपाईची किंवा अन्य छपाईची कामं घेत. त्यांच्याकडं असलेली अक्षरं खास "मौज फौंड्री'तली असल्यानं त्यांना दर्जेदार छपाईची कामं मिळत. एकदा त्यांच्याकडं कुण्या बुवांचं जंगी चरित्र छापायला आलं. चरित्र चांगलं हजारभर पानांचं होतं. बुवांचे भक्त हौशी असल्यानं छपाईला प्रायोजक मिळाले होते. मात्र, छपाई त्वरेनं करणं आवश्‍यक होतं म्हणून साथींनी "मौज'चा फॉंट नव्यानं भरला. ऐनवेळी अक्षरं कमी पडू नयेत याची खबरदारी घेतली. पुस्तकाची अक्षरजुळणी सुरू झाल्यावर लक्षात आलं की "बा' हे अक्षर कमी पडत आहे. कारण, पुस्तकात पानोपानी सतत बुवांचं नामस्मरण होतं आणि बुवांच्या नावापुढं "बाबा' ही उपाधीसुद्धा होती. आख्खं पुस्तक तीन-चार टप्प्यांत एकदम कंपोज करून वेगवेगळ्या छापखान्यांतून मुद्रण करून घ्यायचा बेत होता. दरम्यान, एकदा पेरूगेट पोलीस चौकीपाशी साथी भेटले. ""काय म्हणतेय छपाई?'' अशी मी आस्थेनं चौकशी केली तेव्हा ते म्हणाले ः ""काय सांगू विजयराव, या पुस्तकासाठी बावीस किलो "बा' आणावा लागला! प्रत्येक पानावर पंधरा-वीस वेळा "बाबा' हा शब्द येतोय हो...
त्यांचं उत्तर ऐकून मी हसलो आणि नंतर तेदेखील हसले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com