वितरणातल्या गमती (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

मराठी पुस्तकविश्वाचा जीव तो केवढासा! कोणे एकेकाळी चांगल्या पुस्तकाची हजार प्रतींची आवृत्ती संपायला खूप वर्षं लागत असं म्हणतात; पण मी 1977 नंतरच्या बाजारपेठेचं जे निरीक्षण केलं त्यावरून "खूप वर्षं' हा शब्दप्रयोग अतिरंजित वाटतो. सन 1977 च्या सुमारास पुस्तकविक्रेते नवोदित लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या 300 प्रती विक्रीला ठेवून घेत आणि साधारणपणे वर्षभरात त्या प्रतींचे पैसे प्रकाशकाला मिळत. याचा अर्थ त्या काळी प्रथितयश लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या हजार प्रती एक किंवा दोन वर्षांत नक्की विकल्या जात असतील.

मराठी पुस्तकविश्वाचा जीव तो केवढासा! कोणे एकेकाळी चांगल्या पुस्तकाची हजार प्रतींची आवृत्ती संपायला खूप वर्षं लागत असं म्हणतात; पण मी 1977 नंतरच्या बाजारपेठेचं जे निरीक्षण केलं त्यावरून "खूप वर्षं' हा शब्दप्रयोग अतिरंजित वाटतो. सन 1977 च्या सुमारास पुस्तकविक्रेते नवोदित लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या 300 प्रती विक्रीला ठेवून घेत आणि साधारणपणे वर्षभरात त्या प्रतींचे पैसे प्रकाशकाला मिळत. याचा अर्थ त्या काळी प्रथितयश लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या हजार प्रती एक किंवा दोन वर्षांत नक्की विकल्या जात असतील.

पुस्तकांच्या छापील किमतीवर विक्रेत्याला 33 ते 40 टक्के कमिशन देण्याची प्रथा होती. नवं पुस्तक बाजारात आलं की पुण्यात काही दुकानदार प्रत्येकी पाच ते प्रत्येकी शंभर प्रती ठेवून घेत. पुण्यात "अभिनव', "उत्कर्ष', "उज्ज्वल', "भावे', "मॅजेस्टिक', "रसिक' हे बिनीचे दुकानदार होते. मुंबईतही अनेक विक्रेते होते. नव्या पुस्तकांच्या किमान 500 प्रती फक्त पुण्या-मुंबईतल्या दुकानातच विक्रीला ठेवल्या जात. इतर शहरांतही अनेक विक्रेते होते. पुण्यातले मिलिंद भिसे नावाचे गृहस्थ रोज डेक्कन क्वीननं पुणे-मुंबई-पुणे प्रवास करत असत. पुण्यातले अनेक प्रकाशक मुंबईला स्वतः न जाता भिसे यांच्यामार्फत मुंबईतल्या आयडियल बुक डेपो वगैरे विक्रेत्यांकडं पुस्तकं पाठवत. विक्रीची रक्कमदेखील भिसे यांच्यामार्फत मिळत असे.

मुंबईच्या दादर-गिरगाव भागातले "विक्रम वितरण', "पालेकर बुक सेलर्स', "बॉम्बे बुक डेपो', "सेंट्रल प्रकाशन' वगैरे विक्रेतेदेखील नवोदित लेखकांना कधी निराश करत नसत. किमान पाच-दहा प्रती तरी ठेवून घेत. यातील "सेंट्रल प्रकाशन'चे बुऱ्हाणपूरवाला अतिशय अगत्यशील गृहस्थ होते. प्रत्येक वेळी आवर्जून चहा देत. पुस्तकं ठेवून घेतल्यावर एका चिठ्ठीवर पुस्तकाचं नाव, प्रती, किंमत आणि खाली "33 टक्के ऑन सेल, पैसा बाकी' असं लिहून सही करून देत. तीन महिन्यांनी चिठ्ठी घेऊन गेलो की चिठ्ठीवर पैसे मिळाल्याची सही घेत आणि रोख रकमेसह चहाही देत. "सेंट्रल प्रकाशन'ची ज्येष्ठ वाचकांना सांगण्याजोगी आठवण म्हणजे, प्रत्येक हिंदी चित्रपटाच्या गाण्यांच्या "पद्यावल्या' त्यांनी प्रकाशित केल्या होत्या. न्यूजप्रिंट कागदावर ही आठपानी पद्यावली असे. पहिल्या पानावर चित्रपटातल्या एखाद्या दृश्‍याचा रंगीत फोटो, पान क्रमांक तीन ते आठ या भागात चित्रपटातली गाणी, पान क्रमांक दोनवर चित्रपटाची अर्धी कथा असे आणि तळाशी लिहिलेलं असे ः "आगे की कहानी पर्देपर देखिए।' गाण्यात एखादा शब्द सलग दोनदा आला तर तो छापायची पद्धत मजेदार होती. उदाहरणार्थ ः

"सारी सारी रात तेरी याद सताए' ही ओळ ते पुढीलप्रमाणे छापत असत ः सारी 2 रात तेरी याद सताए. पुण्यातल्या "भारत बुक सर्व्हिस'चे मालक गिरीश देशपांडे हे नवोदितांचे आधारस्तंभ होते. वर्षभर नेहमीच्या विक्रेत्यांकडं पुस्तकं ठेवून झाल्यावरदेखील अनेकदा नवोदित लेखकांच्या शंभर-दोनशे प्रती शिल्लक उरत. थोडं अधिक कमिशन घेऊन देशपांडे त्या प्रती रोखीनं खरेदी करत. त्यामुळे नवोदित लेखकांचा तोटा भरून यायला मदत होई.

बहुसंख्य छोटे प्रकाशक आर्थिक बळाअभावी आपलं गाव आणि त्याच्या आसपासच्या भागांतच पुस्तकं विकायला ठेवत. त्यामुळे छोट्या प्रकाशकांची चांगली पुस्तकंही महाराष्ट्रभर क्वचित पोचत. पुण्या-मुंबईतली पुस्तकं मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात जाऊ शकत नव्हती आणि तिकडची इकडं येऊ शकत नव्हती. नोकरी सांभाळून व्यवसाय करणाऱ्या पुण्यातल्या एका हौशी प्रकाशकमित्राला नोकरीत असताना ऑफिसच्या खर्चानं औरंगाबादला जायला मिळालं. त्यानं काही पुस्तकं तिकडं विकायला ठेवली. बहुतेक दुकानदारांनी पैसे लगेच दिले. मात्र, एका दुकानदारानं पैसे नंतर पाठवण्याचं आश्वासन दिलं. प्रकाशकाला नंतर काही ऑफिसच्या खर्चानं औरंगाबादला जाणं जमलं नाही. तो दुकानदाराला पोस्टकार्डं पाठवत राहिला; पण निष्पत्ती शून्य. मग त्याच्या सुपीक डोक्‍यात एक अभिनव कल्पना उगवली. त्यानं आंतर्देशीय पत्रं विकत आणली. प्रत्येक पत्रावर औरंगाबादच्या एकेका दुकानाचा पत्ता लिहिला आणि आतमध्ये मात्र पैसे देण्याचं टाळणाऱ्या दुकानदाराचं नाव लिहून त्याला पत्र लिहिलं की "माझे पैसे कृपया लवकरात लवकर पाठवा.' पत्रं बंद करून पोस्टात टाकली. शहरातल्या सर्व दुकानदारांना पत्रं मिळाली. त्यांना वाटलं की "त्या दुकानदाराला' लिहिलेलं पत्र चुकून आपल्याला आलं आहे. त्यांनी ती पत्रं त्या दुकानदाराला पोचवली. शहरभर आपली बदनामी झाल्याची भावना होऊन तो दुकानदार ओशाळला व त्यानं प्रकाशकाचे पैसे त्वरित पाठवून दिले.
सन 1980-81 पर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. नंतर सगळं चित्र पालटलं.

प्रकाशनक्षेत्रात एक गृहस्थ खूप मोठे भांडवल घेऊन उतरले आणि त्यांनी एकदम 70-80 टक्के कमिशनवर एकेका पुस्तकाची संपूर्ण आवृत्ती रोखीत विकत घ्यायला सुरवात केली. काही प्रकाशकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि संपूर्ण आवृत्ती जास्त कमिशनवर विकण्यासाठी पुस्तकांच्या छापील किमती वाढवल्या. काही प्रकाशकांनी कागदाचा दर्जा आणि इतर निर्मिती मूल्यांमध्ये तडजोडी केल्या. कमिशनचा गोंधळ इतका वाढत गेला की किती पानांच्या पुस्तकाची छापील किंमत किती असावी आणि वाचकानं ते किती रुपयांना मागावं हे समजेनासं झाले. सदर गृहस्थ नंतर प्रकाशनक्षेत्र सोडूनही गेले; पण कमिशनचा संभ्रम मात्र तसाच राहिला. काळ्या ढगांची रुपेरी कड इतकीच की कमिशन वाढल्यामुळं पुस्तकं महाराष्ट्रभर पाठवणं वितरकांना शक्‍य झाले असेल आणि लेखक जास्त वाचकांपर्यंत पोचला असेल, अशी आपण आशा करू शकतो.

Web Title: vijay tarawade write article in saptarang