कलाकार ः असे आणि तसे (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

लेखक असो की अभिनेता...मानधन हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो; पण पोटापाण्याचा प्रश्न अन्य मार्गानं सुटलेला असेल तर हे लोक मानधनाच्या बाबतीत दिलदारीही दाखवू शकतात. -फर्ग्युसन कॉलेजच्या सन 1915 च्या स्नेहसंमेलनासंदर्भातला हा किस्सा. इंग्लिशमधून काव्यरचना करणाऱ्या विख्यात कवयित्री सरोजिनी नायडू या स्नेहसंमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. त्या संमेलनात एक विचित्र प्रसंग ओढवला होता. कॉलेजच्या तत्कालीन प्रथेनुसार बीएच्या परीक्षेत सर्वाधिक गुण आणि वरचा क्रमांक मिळणाऱ्या विद्यार्थ्याला "फेलो' म्हणून निवडलं जाई. या फेलोवर स्नेहसंमेलन आयोजित करण्याची आणि त्यासंबंधित सगळे आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी असे. सन 1915 च्या या स्नेहसंमेलनाची जबाबदारी चंद्रात्रेय नावाच्या विद्यार्थ्यावर होती. त्यानुसार चंद्रात्रेय यांनी संमेलनाचं आयोजन आणि तिकीटविक्री केली; पण संमेलन सुरू होण्याच्या आधी थोडा वेळ ते काही कामासाठी बाहेर गेलेले असताना कुणीतरी वसतिगृहातल्या त्यांच्या खोलीचं कुलूप तोडून तिथली तिकीटविक्रीची रक्कम पळवली. हे समजल्यावर चंद्रात्रेय यांना धक्का बसला. त्यांची शुद्ध हरपली व ते कोसळले. ते शुद्धीवर आल्यानंतर वसतिगृहाचे रेक्‍टर प्रा. कानिटकर आले. त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. विद्यार्थिमित्र म्हणाले ः "चोरीला गेलेल्या रकमेची भरपाई आपण सर्वजण वर्गणी काढून करू.' नायडू यांच्या कानावर हा प्रकार गेला. त्यांनी चंद्रात्रेय यांना बोलावून घेतलं आणि स्वतःच्या काव्यसंग्रहाच्या अडीचशे प्रती देऊन सांगितलं ः "या विकून त्यातून मिळणारे पैसे घ्या आणि चोरीला गेलेल्या रकमेची भरपाई करा.' स्वयंसेवकांनी त्या प्रती विकल्या. चोरीला गेलेल्या रकमेची अशा रीतीनं भरपाई झाली.
***

"मनोरा' नावाचं एक मासिक पुण्यातून प्रकाशित होत असे. पंडित अनंत कुलकर्णी त्याचे संपादक होते. ना. सी. फडके त्यात नियमित लेखन करत. मानधनाबाबत विचारल्यावर ते संपादकांना म्हणाले ः ""तुझं मासिक ज्या दिवशी खरोखर फायदा द्यायला लागेल त्या वेळी मी नक्कीच मानधन घेईन. तोपर्यंत थांब. पुढं सन 1961 मध्ये पानशेतचं धरण फुटून पुण्यात महापूर आला. त्या पुरात "कुलकर्णी ग्रंथागार'चं गोदाम पाण्याखाली गेलं व इतरही बाबींचं मोठं नुकसान झालं. या प्रसंगी सांत्वन करताना फडके म्हणाले ः ""या प्रसंगी मी आर्थिक मदत करायला हवी, ती करू शकत नाही; पण निराळ्या तऱ्हेनं मदत देऊ शकतो. माझा एखादा कथासंग्रह प्रसिद्ध कर. त्याची संपूर्ण रॉयल्टी (12000 रुपये) मी सोडून देईन.'' डिसेंबर 1961 मध्ये कुलकर्णी यांनी फडके यांचा "लव्हेंडर' हा कथासंग्रह थाटात प्रकाशित केला. वितरण करताना मुखपृष्ठावर लव्हेंडर अत्तर चोपडून आणि पुस्तकाची प्रत्येक प्रत बटरपेपरमध्ये गुंडाळून वाचकांना दिली. बालगंधर्वांच्या नाटकांच्या प्रयोगात अत्तराचे दिवे जाळले जात असत, त्याची आठवण करून देणारा हा किस्सा. "लव्हेंडर' या पुस्तकाची रॉयल्टी 12000 रुपये असल्याचा वर उल्लेख आहे; पण कुलकर्णी यांनीच त्या काळात प्रकाशित केलेल्या एका अतिशय दर्जेदार कथाकाराच्या दोन कथासंग्रहांच्या संदर्भात केलेला करार मात्र अचंब्यात पाडतो. त्या कथाकाराला प्रत्येक कथासंग्रहाच्या प्रत्येक आवृत्तीसाठी फक्त दोनशे रुपये मानधन मिळालं होतं. प्रत्येक लेखकाचं (किंवा त्याच्या पुस्तकाचं) नशीब वेगवेगळं असतं ते असं! फडके यांच्या दिलदारीचं वर्णन करताना त्यांच्या याच प्रकाशकांनी एके ठिकाणी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. "अखेरचे बंड' ही फडके यांची कादंबरी अतिशय गाजेल असं वाटत असल्यानं त्यांनी ती मागितली होती; पण फडके यांनी मानधनात कोणतीही वेळेची सवलत द्यायला नकार दिला व त्यामुळे "अखेरचे बंड' अन्य प्रकाशकांकडं गेली. यावर टिप्पणी करताना कुलकर्णी यांनी म्हटलं आहे ः "फडके यांच्या पंचावन्न पुस्तकांचा प्रकाशक "अखेरचे बंड' मिळवण्यात अखेर अयशस्वी झाला! माझे-अप्पांचे इतके जवळचे संबंध; पण अप्पा असे का वागले हे कोडं मात्र मला उलगडलं नाही!'
***

रवींद्र पिंगे यांचं एक आवडतं वाक्‍य आठवतं. एखाद्या नवख्या साहित्यप्रेमीनं हौसेपोटी नियतकालिक किंवा दिवाळी अंक काढायचं ठरवलं तर ते आवर्जून लेखनसहकार्य करत. मानधनाची चौकशी केली तर म्हणत ः -"मानधन को मारो गोली'. कुसुमाग्रजांची कविता छापणाऱ्या अनेकांना त्यांचं पांढरं पोस्टकार्ड स्मरत असेल. कविता छापण्याची परवानगी देताना खाली एक वाक्‍य असे ः "मानधन काही नाही'. कुसुमाग्रजांची आणखी एक छोटीशी आठवण. त्यांना पोस्टानं पत्र पाठवताना पाकिटावर "वि. वा. शिरवाडकर, नाशिक' एवढं लिहिलं तरी पत्र वेळेवर आणि हमखास पोचत असे. हे भाग्य यापूर्वी किंवा नंतर कुण्या मराठी साहित्यिकाला लाभलं असेल असं वाटत नाही.
***

"गंधर्व नाटक मंडळी'तले ऑर्गनवादक हरिभाऊ देशपांडे "संगीत विद्याहरण' या नाटकात शुक्राचार्याची भूमिका करत. त्यांची नाईट (मानधन) येणे होती. पुण्याच्या "भानुविलास'मध्ये प्रयोग होता. हरिभाऊंचा मेकअप करून झाला होता; पण आधीची नाईट वसूल झाल्याशिवाय रंगमंचावर येण्यास त्यांनी नकार दिला. तेव्हा कंत्राटदारानं थिएटरबाहेर बोर्ड लावला ः "हरिभाऊंची तब्येत बिघडल्यानं आजचा प्रयोग रद्द करत आहोत.' हे समजल्यावर हरिभाऊ रंगलेल्या अवस्थेत थेट बाहेर आले आणि जमलेल्या प्रेक्षकांना सांगू लागले ः "माझी प्रकृती उत्तम आहे; पण माझी नाईट मिळाली नाही. ती मिळाल्याशिवाय मी काम करणार नाही.' एवढं करूनही त्यांची नाईट वसूल झाली नाही ती नाहीच. लेखक-संपादक विजय हरी वाडेकर यांच्या कीर्तनकार वडिलांचं सन 1979 मध्ये देहावसान झालं, त्या वेळी प्रथम स्मृतिदिनी हरिभाऊंचं ऑर्गनवादन आयोजित केलेलं आठवतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com