आठवणी...साहित्याच्या, साहित्यिकांच्या (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
Sunday, 18 November 2018

मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर गमतीदार होतं. जोशी यांनी ‘सत्यकथा’ मासिकासाठी एकदाच कथालेखन केलं. नंतर त्यांनी कधीच ‘सत्यकथा’साठी लिहिलं नाही. याचं कारण काय, असं विचारल्यावर ते उत्तरले ः ‘‘सगळेजण म्हणत होते की ‘सत्यकथा’त वेगळ्या प्रकारचं लेखन लागतं, म्हणून एकदा गमतीनं तशी कथा लिहिली आणि त्यांना ती पसंत पडली. त्यांनी छापली. पुन्हा काही ते धाडस झालं नाही. एकदा श्री. पु.

मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर गमतीदार होतं. जोशी यांनी ‘सत्यकथा’ मासिकासाठी एकदाच कथालेखन केलं. नंतर त्यांनी कधीच ‘सत्यकथा’साठी लिहिलं नाही. याचं कारण काय, असं विचारल्यावर ते उत्तरले ः ‘‘सगळेजण म्हणत होते की ‘सत्यकथा’त वेगळ्या प्रकारचं लेखन लागतं, म्हणून एकदा गमतीनं तशी कथा लिहिली आणि त्यांना ती पसंत पडली. त्यांनी छापली. पुन्हा काही ते धाडस झालं नाही. एकदा श्री. पु. भागवतांनी विचारल्यावर त्यांनाही मी हेच सांगितलं, की बुवा तुमच्यासाठी म्हणून मुद्दाम कष्ट करून वेगळ्या प्रकारची अवघड कथा लिहिली आणि तुम्ही ती नापसंत केली तर त्या कथेचं काय करायचं हा प्रश्न उभा राहतो. म्हणून मग ‘सत्यकथा’साठी पुन्हा काही लिहिलं नाही’’.
***

पुण्यात एका प्रकाशन संस्थेनं दोन प्रसिद्ध लेखिकांचे दर्जेदार कथासंग्रह प्रकाशित केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक आणि कथाकार होते. कार्यक्रम अतिशय भव्य होता. आधी प्रकाशक आणि नंतर दोन्ही लेखिकांनी आपली मनोगतं व्यक्त केली. प्रकाशन झालं. शेवटी अध्यक्ष बोलायला उठले. दोन्ही लेखिकांची प्रकाशित होत असलेली पुस्तकं किंवा त्यांचं कोणतंही लेखन आपण वाचलेलं नसल्याची कबुली देऊन त्यांनी श्रोत्यांची चक्क माफी मागितली. ते म्हणाले ः ‘‘या दोघींचं कोणतंही लेखन मी वाचलेलं नाही. आज प्रकाशित झालेली पुस्तकं वाचायलादेखील मला वेळ मिळाला नाही. फार पूर्वी वाचलेला एका लेखिकेचा अम्लान कथासंग्रह मला अतिशय आवडतो. आज मी त्या पुस्तकावर बोलणार आहे.’’ आणि त्या पुस्तकावर ते तासभर भरभरून बोलले. व्यासपीठावरचे प्रकाशक, त्या दोन लेखिका आणि श्रोते... सगळे अवाक्‌!
***

सत्तरच्या दशकात जयप्रकाश वाळके नावाचे एक तरुण पुढारी अचानक आजारी पडल्यानं रुग्णालयात दाखल झाले होते आणि त्यांना रक्तदान करण्यासाठी व इतर मदत करण्यासाठी (त्यांच्या विरोधी पक्षात असूनही) प्रदीप रावत आणि इतर मित्र धावून गेल्याचं वाचलं होतं. जीवन किर्लोस्कर यांच्या समवेत मी जयप्रकाश यांना भेटलो. त्या वेळी मी एका साप्ताहिकात अर्धवेळ नोकरी करत होतो. जयप्रकाश म्हणाले ः ‘‘मी बरा झाल्यावर सवडीनं भेटायला ये. काहीतरी वेगळं करता येईल.’’ मात्र, जयप्रकाश त्या दुखण्यातून वाचले नाहीत. त्यांच्यावर ग. वा. बेहेरे यांनी अतिशय हृदयस्पर्शी मृत्युलेख लिहिला होता आणि एखादा कार्यकर्ता निर्व्यसनी आणि निरोगी असूनही कामाच्या तणावाखाली तरुण वयात मृत्यूला सामोरा जातो, याबद्दल अनेक वाचकांनी हळहळ व्यक्त केली होती.
***

एका मासिकाचे संपादक मानधनाच्या बाबतीत अतिशय चिक्कू म्हणून कुख्यात होते. मासिकात मजकूर किंवा चित्रं वापरली की त्याचं मानधन वर्षअखेरीस देण्याचा वायदा ते करत. एखाद्याची कथा जानेवारीच्या अंकात छापली की सांगत, आपला हिशेब जानेवारी टू डिसेंबर. डिसेंबरच्या शेवटी मानधन. एप्रिलच्या अंकात छापली की म्हणत, आपला हिशेब मार्च टू मार्च. त्या सुमारास नागपूरहून एक अवलिया व्यंग्यचित्रकार पुण्यात आला. त्यांच्या बोलण्यात तिकडचे हेल आणि शब्द असत. शबनम बॅगेत व्यंग्यचित्रं घेऊन ते अनेकांना भेटले. अनेकांना चित्रं देऊन सगळ्यांकडून लगेच रोख मानधन त्यांनी घेतलं. ‘आपण सगळी डील नगदी करतो,’ हे त्यांचं परवलीचं वाक्‍य होतं. आम्ही त्यांना उपरोक्त संपादकांकडं जायला सांगितलं आणि "नगदी पेमेंट' आणून दाखवा, असं आव्हान दिलं. चित्रकार सायंकाळच्या वेळी संपादकांकडं गेले. ऑफिस बंद व्हायची वेळ होती. त्यांनी संपादकांना व्यंग्यचित्रं दाखवली. तेव्हा दिवाळी अंकांची गडबड सुरू होती. संपादकांनी चित्रं पसंत करून मानधन ठरवलं आणि चित्रांचे ब्लॉक्‍स बनवण्यासाठी ती चित्रं नोकराबरोबर लगेच पाठवली. ब्लॉकमेकरकडं चित्रं देऊन नोकर परस्पर घरी जाणार होता. संपादकांनी चहा मागवला. चहा पिऊन चित्रकार छान रेलून गप्पा मारत बसले. पाच-दहा मिनिटं झाली तरी ते उठेनात. संपादक अस्वस्थ झाले. थोड्या वेळानं म्हणाले ः ‘‘आणखी काही काम आहे का?‘
‘‘पेमेंट’’.
‘‘ हिशेब आम्ही मार्च टू मार्च करतो. तुम्हाला एप्रिलमध्ये चेक मिळेल’’.
‘‘आपण सगळी डील फक्त नगदी करतो. क्रेडिट परवडत नाही. तुम्हाला नको असतील तर माझी चित्रं परत आणून द्या.’ संपादकांनी कुरकुरत जवळचे थोडे पैसे काढून दिले आणि ‘बाकीचे उद्या देतो’ म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑफिस उघडण्याच्या वेळेला चित्रकार दारात हजर होते. त्यांनी सगळं मानधन रोख वसूल केलं.
***

वरिष्ठांशी मतभेद झाल्यामुळे नोकरी जाणं, बढती टळणं किंवा अन्य आर्थिक नुकसान होत असेल तर लेखक वेगवेगळ्या मार्गांनी अभिव्यक्त होऊ शकतात. राजाराम कॉलेजात नोकरी करत असताना वरिष्ठांकडून झालेल्या त्रासाला आणि ब्रिटिश पोलिसांच्या-सैनिकांच्या कटकटींना ना. सी. फडके यांनी जिथल्या तिथं प्रत्युत्तर देऊन झुंज दिली आणि नंतर आत्मचरित्रात आपल्या विजयाच्या नोंदी केल्या. भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांमधला चांगदेव पाटील वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आपल्या मानसपित्याला झालेल्या त्रासांच्या नोंदी करतो आणि शिवाय मानसपित्याला अनेकांविषयी असलेला आकसदेखील व्यक्त करतो. ह. मो. मराठे यांनी प्रत्येक वेळेस नोकरी सुटल्यानंतर प्रदीर्घ लेख लिहून ‘तिथले दिवस’ नावनिशीवार चितारले. स. शि. भावे यांचं व्यवस्थापनाशी एकदा वाजलं तेव्हा पुण्या-मुंबईतल्या प्रत्येक दैनिकानं अग्रलेख लिहून त्यांची बाजू घेतली. दुसऱ्यांदा वाजलं तेव्हा फक्त बेहेऱ्यांनी त्यांची बाजू घेतली; पण भावे त्यानंतर कोलमडूनच पडले. प्रभाकर तामणे यांनी मात्र अशा प्रसंगावर ‘लाईफ मेम्बर’ नावाची अफलातून विनोदी कादंबरी लिहून कॉलेजची आणि शिक्षणसंस्थेची रेवडी उडवली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एका निवडणुकीत तामणे सरांच्या पॅनेलमध्ये मीही होतो. आमचं पॅनेल हरलं होतं. निकालाच्या रात्री त्यांच्या घरी सर्वजण जमलो. जायफळ घातलेली मस्त कॉफी केलेली होती आणि तामणे सर झकास हास्यविनोद करत होते. पराभव लीलया पचवलेला त्यांचा धीरोदात्त हसरा चेहरा अजून स्मरणात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay tarawade write article in saptarang