वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी... (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

मराठी माणसानं पुस्तकं विकत घेऊन वाचावीत यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले आहेत. विविध प्रकाशकांनी-विक्रेत्यांनी पुस्तकप्रदर्शनं आयोजित करून वाचकांना किमतीत विविध सवलती दिल्या. काही प्रकाशकांनी निर्मितिमूल्यात तडजोड करून स्वस्त पुस्तकं बाजारात आणली. काही प्रकाशकांनी रिक्षाच्या पाठीमागं किंवा विविध चौकांत होर्डिंग्ज्‌ लावून पुस्तकांच्या जाहिराती करून वाचकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रकाशक रा. ज. देशमुख यांनी "ययाती' आणि इतर पुस्तकं (निर्मितिमूल्यात तडजोड न करता) वाचकांना सवलतीत देऊ केली होती. हा उपक्रम आद्य उपक्रम असावा.

शंकर सारडा यांनी संपादकपदी असताना व्यवस्थापनाच्या सहकार्यानं सन 1963 मध्ये एक योजना राबवली होती. आदल्या वर्षी म्हणजे सन 1962 मध्ये प्रकाशित झालेल्या ललित पुस्तकांपैकी 46 पुस्तकांची निवड करून वाचकांना ती 40 टक्के कमिशननं देऊ केली होती. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतल्या वाचकांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत वाचकांनी विकत घेतलेल्या पुस्तकांपैकी खालील पुस्तकांच्या नोंदींवरून त्या वेळच्या वाचकांची आवड-निवड समजते.
स्वामी (रणजीत देसाई) ः 1417 प्रती
रथचक्र (श्री. ना. पेंडसे) ः 876 प्रती
रायगडाला जेव्हा जाग येते (वसंत कानेटकर) ः 831 प्रती
मंतरलेले दिवस (ग. दि. माडगूळकर) ः 669 प्रती
काही मोहरा, काही मोती (काकासाहेब गाडगीळ) ः 620 प्रती
सारडा ज्या ज्या ठिकाणी संपादक होते त्या त्या ठिकाणी त्यांनी पुस्तकांना जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला. सर्वाधिक संख्येनं पुस्तकपरीक्षणं लिहिण्याचा विक्रम मराठीत कदाचित त्यांच्याच नावावर नोंदलेला असेल. वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी सातत्यानं आणि नियमित प्रयत्न ललित मासिकानं केले. दर वर्षी मे महिन्यात "साहित्यिक-गप्पा' आणि पुस्तकप्रदर्शनं आयोजित करणं, वाचकांना आणि वर्गणीदारांना पत्रं पाठवून त्यांची आवड जाणून घेणं व वाचकप्रिय पुस्तकं सवलतीत उपलब्ध करणं, बाजारात आलेल्या पुस्तकांची यादी दरमहा प्रकाशित करणं, पुस्तकांच्या जाहिरातींना सवलत देणं वगैरे अनेक उपक्रम "ललित'च्या नावावर असतील. याखेरीज जयवंत दळवी यांच्या "ठणठणपाळ'नं दोन दशकं नर्मविनोदाच्या माध्यमातून लेखकांना आणि पुस्तकांना प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याची कामगिरी पार पाडली. नवोदित लेखकांचं साहित्य निरपेक्षपणे वाचून सल्ला देणं, प्रसंगी प्रशस्तीपर चार ओळी लिहून देणं, प्रकाशक मिळवून देण्यास साह्य करणं अशी (लष्करच्या भाकरी भाजण्याची) कामं जयवंत दळवी, स. शि. भावे, रवींद्र पिंगे आणि शंकर सारडा हे चौघं अविरत करत राहिले. सभासदत्व घेतलेल्या वाचकांना "ग्रंथाली'नं छापील किमतीवर 50 टक्के सवलत देऊन स्वतःची पुस्तकं देऊ केली होती. एकदा पुण्यात वाचकदिंडी काढून तीत मान्यवर लेखक-कलाकारांना सहभागी करून घेतलं होतं. बाजीराव रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्यानं दिंडी लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज्‌च्या जवळ) गेली. ह. मो. मराठे, ग. वा. बेहेरे, चिंतामणी लागू, अमोल पालेकर, चित्रा पालेकर वगैरे अनेक मंडळी दिंडीत पायी सहभागी झाली होती. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. वाटेत साड्यांचं दुकान लागलं की महिला एक मजेदार घोषणा देत ः "नको अम्हाला साडी नवी, वाचायला पुस्तकं हवी हवी.'

लक्ष्मी रस्त्यानं चालत कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ आल्यावर पुढच्या रांगेतल्या लोकांनी मोठं रिंगण करून विविध घोषणा दिल्या. तेव्हा माझ्या डाव्या हाताला ह. मो. मराठे आणि उजव्या हाताला चित्रा पालेकर असल्याचं आठवतं. टिळक चौकात छोटी सभा झाली. दिंडीतल्या अनेकांचा सत्कार गुलाबाचं फूल देऊन करण्यात आला. ग. वा. बेहेरे यांना हाक मारली तेव्हा "कशाला?' असं पुटपुटत आणि आढेवेढे घेत ते पुढं आले आणि त्यांनी सत्कार आणि फूल स्वीकारलं. बेहेरे आणि "ग्रंथाली' यांचे मतभेद झाल्यावर बेहेरे यांनी "सोबत'मधून कडाडून टीका केली होती.
***

वाचनसंस्कृतीला लोकप्रतिनिधींनी हातभार लावला तर चांगली मदत होऊ शकते. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका नेत्यानं निवडक मराठी पुस्तकांची यादी छापली आणि आपल्या प्रभागातल्या नागरिकांना ती वाटून प्रत्येकाला यादीतलं एकेक पुस्तक निवडायला सांगितलं. हे पुस्तक त्या नेत्याकडून नागरिकांना सप्रेम भेट मिळणार होतं. बहुतांश नागरिकांनी जास्त पृष्ठसंख्या असलेल्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्यांना पसंती दिली. कवितांची पुस्तकं किंवा नवोदित लेखकांची पुस्तकं फार कुणी घेतली नाहीत; पण हा उपक्रम इतर अनेक नेत्यांनी आणि नगरसेवकांनी राबवला तर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पुस्तकं पोचतील आणि वाचनसंस्कृतीला हातभार लागेल. काही प्रकाशन संस्थांनी प्रताधिकारमुक्त जुन्या पुस्तकांच्या आवृत्त्या 50 ते 60 रुपयांना द्यायला आरंभ केला आहे आणि त्याला वाचकांचा प्रतिसाद मिळताना दिसतो. सोशल मीडियावर अनेक तरुण वाचनसंस्कृतीसाठी झटताना दिसतात. काही मित्र साखळीयोजना आखतात. यात एकानं मित्राला पुस्तक भेट पाठवायचं, दुसऱ्यानं तिसऱ्याला, तिसऱ्यानं पुढच्याला...अशी साखळी सुरू राहते. देवदत्त राजाध्यक्ष नावाच्या उत्साही तरुणानं सोव्हिएत रशियानं प्रकाशित केलेली विविध भाषांमधली (आता दुर्मिळ असलेली) अनेक पुस्तकं कष्टपूर्वक जमवून त्यांचा मौल्यवान संग्रह केला आहे. काही मित्र आवडलेल्या पुस्तकांवर लिहिण्याचे आणि चर्चांचे उपक्रम आयोजित करतात. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, नारायण धारप, सुहास शिरवळकर, संदीप खरे आदींच्या चाहत्यांनी फेसबुकवर आपापले गट किंवा पेजेस बनवली असून, तिथं या साहित्यिकांवर चर्चा करणं, पुस्तकांची आपापसात देवाण-घेवाण करणं असे उपक्रम सुरू असतात. हर्षल लोहोकरे नावाचा एक तरुण समविचारी मित्रांच्या सहकार्यानं फेसबुकवरचे वाचनप्रेमी शोधून त्यांच्यापर्यंत उत्तमोत्तम पुस्तकं मोफत पोचवत असतो. ही सगळी पिढी वाचनसंस्कृतीची ज्योत तेवत ठेवेल अशी खात्री वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com