लेखक, प्रकाशक आणि कृतज्ञता (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

साहित्यविषयक उत्तम जाण असलेले एक यशस्वी प्रकाशक आणि वितरक गेल्या शतकात होऊन गेले. त्यांनी उत्तमोत्तम असे शेकडो ग्रंथ प्रकाशित केले. इतर प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं वितरित केली. अडीअडचणीत सापडलेल्या लेखकांना-प्रकाशकांना निरपेक्षपणे मदत केली. त्यांचे पैशांचे व्यवहार चोख होते. स्वभावानं ते आतिथ्यशील होते. आल्या-गेल्याला प्रेमानं उत्तम खाऊ-पिऊ घालत. लेखक, छोटे-मोठे प्रकाशक, वाचक आणि एकूणच साहित्यिक वर्तुळात ते लोकप्रिय होते. एके दिवशी अचानक त्यांचं हृदयविकाराच्या झटक्‍यानं निधन झालं आणि सर्वत्र खळबळ उडाली. त्यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी लोटली. गर्दीत वाचक, लेखक, विक्रेते, प्रकाशक असे त्या क्षेत्रातले सर्व प्रकारचे लोक होते. गर्दीतल्या जवळपास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर केवळ औपचारिक भाव नव्हते, तर खरोखर झालेलं दु:ख त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होतं. आम्ही सगळेजण शेवटपर्यंत चालत गेलो. परत येताना एक चमत्कारिक प्रसंग पाहिला. त्यांच्या दुकानातले काही नोकर रस्त्याच्या कडेला उभे होते. एकजण हलक्‍या आवाजात म्हणाला : ‘‘शेठ नेमके पगाराच्या आदल्या दिवशीच गेले राव. आता पगार मागतापण येणार नाही’’.

त्यावर एक सहकारी उत्तरला : ‘‘तुला लागले तर मी देईन शंभरेक रुपये. दुपारून देतो’’. तिथं न रेंगाळता मी पुढं सरकलो...पण मनात आलं, कुणाचं काय, तर कुणाचं काय.
***

आणखी एका अशाच आतिथ्यशील प्रकाशकाच्या निधनानंतर सर्व दैनिकांच्या रविवारच्या पुरवण्यांमध्ये त्यांच्यावर मृत्युलेख आले. लेखकांनी भरभरून लिहिताना नकळत त्यांच्या आतिथ्यशीलतेवर जास्त भर दिला. त्यांनी अमुक प्रसंगी कसं छान जेवण दिलं होतं...तमुक हॉटेलात कसं जेवायला नेलं होतं...एकदा आयत्या वेळी आणि आडवेळी घरी गेल्यावर कसा घाईघाईनं सुग्रास स्वयंपाक करून घातला...वगैरे वगैरे. या वर्णनांचा त्या लेखांमध्ये अंमळ अतिरेकच झाला होता. तेव्हा वाचकांनी "वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरात पत्रं लिहून पुढीलप्रमाणे भावना व्यक्त केली : हे सगळे मृत्युलेख भविष्यात कुण्या अभ्यासकानं वाचले तर तत्कालीन महाराष्ट्रात मराठी लेखकांना, छोट्या प्रकाशकांना आणि दुकानदारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती की काय, असा प्रश्न त्या अभ्यासकाला पडेल.' ही घटना त्या काळात घडून गेली ती गेली. आजच्या काळात घडली असती तर सोशल मीडियावर उलटसुलट ट्रोलिंग नक्की झालं असतं. चांगल्या माणसावर लिहिलेल्या वाईट मृत्युलेखांचा परिणाम!
***

वाचकांच्या काळजाला हात घालणारे प्रादेशिक, ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक साहित्याचे एक दर्जेदार लेखक आठवतात. हे केवळ उत्तम लेखकच नव्हते, तर उत्तम वक्ते आणि गायकदेखील होते. त्यांचं आणि त्यांच्या प्रकाशकाचं नातं अतूट होतं. प्रकाशकाचं अकस्मात निधन झाल्यावर त्यांना दु:ख होणं साहजिक होतं. ते दु:ख त्यांनी त्यांच्या शैलीदार भाषेतल्या मृत्युलेखाद्वारे व्यक्त केलं. त्यानंतर त्यांना दूरदर्शनवर मुलाखतीसाठी बोलावणं आलं. त्यांनी तिथंदेखील प्रभावी भाषेत श्रद्धांजली वाहिली. प्रकाशकाचं नाव घेत ते म्हणाले:’’-x x x राव माझा बहिश्‍चर प्राण होते. आमच्या दोघांत अद्वैत होतं. त्यांच्या निधनानं माझ्यातला एक अंश निवर्तला आहे, वगैरे...’’
श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी सूत्रसंचालकाला त्वरित पृच्छा केली : ‘माझ्या मानधनाचा चेक तयार आहे का?’ त्या वेळी कॅमेरा बंद व्हायला किंचित उशीर झाला आणि त्यांचं हे व्यावहारिक बोलणंदेखील प्रेक्षकांना-श्रोत्यांना दिसलं-ऐकू आलं.
***

सन 2000 च्या सुमारास एका प्रकाशकाच्या घरी झालेल्या मेजवानीत एक तरुण भेटला. त्याला प्रकाशनव्यवसाय सुरू करायचा होता. राजकीय विषयावरच्या पुस्तकांबाबत त्यानं सल्ला विचारल्यावरून मी त्याला महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बायोडेटासदृश चरित्रं प्रकाशित करण्यास सुचवलं. त्याच्या इच्छेनुसार काही चरित्रलेखन करून दिलं. या घटनेनंतर वर्तमानपत्रात थेट एका मंत्र्याच्या हस्ते चरित्रमालेच्या प्रकाशन समारंभाची बातमीच आली. चरित्रलेखन करणाऱ्या एकाही लेखकाचा चेहरा बातमीसोबतच्या छायाचित्रात नव्हता. कारण, एकाही लेखकाला प्रकाशकानं बोलावलंच नव्हतं. अर्थातच मानधनदेखील दिलं नव्हतं. ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्यांनाही व्यासपीठावर एकही लेखक नसणं खटकलं नाही. लेखकांच्या ओळखीचा सोपान करून प्रकाशकानं आपले गाडे असे मार्गाला लावले आणि पुन्हा काही तो कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा साहित्यिक वर्तुळात दिसला नाही. प्रकाशक आणि लेखक यांच्यातल्या अहि-नकुलवत्‌ नात्याचा हा अद्भुत आविष्कारच म्हणायला हवा.
***

विदर्भातल्या एका लेखकाचा आचार्य अत्रे यांच्या काळातला किस्सा रमेश मंत्री यांच्या पुस्तकात वाचलेला आठवतो. एका साहित्यिकाचं निधन झाल्यावर या लेखकानं मृत्युलेख लिहून ‘मराठा’ दैनिकाला पाठवला. तो छापून आल्यावर रीतसर मानधनाचा चेक लेखकाकडं रवाना झाल्यावर लेखकानं तो चेक परत पाठवून म्हटलं होतं : ‘सदरहू साहित्यिक माझे जवळचे स्नेही होते आणि त्यांच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. अशा जवळच्या व्यक्तीवर लिहिलेल्या लेखाचं मानधन घेणं उचित वाटत नाही...’ मात्र, काही दिवसांनी त्यांनी पुन्हा पत्र पाठवलं. त्यात म्हटलं होतं : ‘आता मी दु:खातून सावरलो आहे, मृत्युलेखाचं मानधन घेणं उचित आहे, अशी माझी भावना झाली आहे. तरी कृपया मानधन पाठवावं ही विनंती’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com