साहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 16 डिसेंबर 2018

साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ राहिले.

साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ राहिले.

मात्र, अनेकदा माणसं नेत्यांकडं काहीतरी मागतात. ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागूल यांच्या "संपादकांच्या खुर्चीवर' या आत्मचरित्रपर पुस्तकात दिलेली काही उदाहरणं थक्क करतात. एका ज्येष्ठ संपादकांनी यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहून खासदारकी मागितली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेसाठीच्या शिष्टमंडळात स्वतःचा समावेश व्हावा म्हणून गळ घातली. "आपल्या मुलाचं लग्न जागेअभावी रखडलं आहे, त्याला मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर मिळवून द्यावं,' असं एका संपादकांनी पत्र लिहून सांगितलं. एका लेखकानं तर "पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं चरित्र लिहिण्याची मला "आज्ञा' द्या. तुम्ही "आज्ञा' दिल्यावरच मी चरित्र लिहायला घेईन,' अशी गळ घातली!

अर्थात याला काही सन्माननीय अपवाददेखील आहेत. या अपवादांमुळं साहित्यिक आणि राजकारणी यांच्यातला उभयपक्षी आदर वृद्धिंगत झाला, असं म्हणायला हवं. आणीबाणीनंतरच्या काळात यशवंतराव आणि पुलंची जाहीर खडाजंगी झाल्यावर काही जण कुजबुजत, की "पुलंची अनेक पत्रं यशवंतरावांकडं आहेत. ती प्रसिद्ध झाली तर पुलं अडचणीत येतील.' "पु. ल. एक साठवण' या पुस्तकाचं संपादन करत असताना जयवंत दळवी यांनी यशवंतरावांना या संदर्भात विचारलं होतं. त्यावर यशवंतरावांनी दिलेलं उत्तर ः ""पुलंचा आणि माझा स्नेह अनेक वर्षांचा आहे; पण त्याला पत्रव्यवहाराचा फुलोरा कधीच आला नाही. काही नैमित्तिक एक-दोन प्रसंग सोडले, तर पुलंची मला पत्रं आल्याचं स्मरत नाही. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना बालगंधर्वांच्या संदर्भात त्यांनी मला पत्र लिहिलं होतं. बालगंधर्वांना राज्य सरकारनं कृतज्ञतेनं मानधन द्यावं, अशी सूचना करणारं पहिलं पत्र पुलंकडून आलं होतं. मी ती सूचना मान्य करून योग्य ती कारवाई करण्यासाठी ते पत्र खात्याकडं पाठवलं.'' पुलंनी एक पत्र बालगंधर्वांना मदत करण्यासाठी लिहिलं; अर्थात स्वतःसाठी मात्र कधीही काही मागितलं नाही.

असेच आणखीन एक निःस्पृह साहित्यिक म्हणजे शरच्चंद्र वासुदेव चिरमुले. यशवंतराव चव्हाण हे चिरमुले यांच्या वडिलांचे विद्यार्थी; पण चिरमुले सर तो धागा पकडून त्यांना कोणतंही काम सांगायला गेले नाहीत. इंदूर इथं कुमार गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीचा समारंभ होता आणि त्या निमित्तानं यशवंतराव सर्किट हाऊसवर आलेले असताना तिथं सायंकाळी चहापानाच्या कार्यक्रमात चिरमुले सर आणि यशवंतरावजी यांची पहिली आणि एकमेव भेट घडली. चिरमुले यांनी वडिलांची ओळख सांगितल्यावर यशवंतराव गहिवरून उद्‌गारले ः ""त्यांना कोण विसरेल?'' त्यानंतर मग त्यांनी अनेक घरगुती आठवणी काढल्या. बापूंची आठवण निघाली. बापू म्हणजे चिरमुले यांचे धाकटे काका. बापू यशवंतरावांचे वर्गमित्र होते आणि मुंबईला चाकरमानी होते. बापूंनी नोकरीखातर डोंबिवली ते फोर्ट तीस वर्षं लोकलनं प्रवास केला; पण बालमित्राच्या ओळखीचा कधी फायदा करून घेण्याचं त्यांच्या मनातही आलं नाही.

गप्पा झाल्यावर एकाच गाडीतून कार्यक्रमाला जाताना गाडीत बसल्यावर चिरमुले म्हणाले ः ""यशवंतरावजी, देण्याघेण्याचा काहीही मतलब नसतो, तेव्हा जुनी माणसं भेटल्यावर फार बरं वाटतं. तुमच्या भेटीनं आज मला फार बरं वाटलं. आबांचं गुडविल मला अनेकदा मिळत गेलेलं आहे आणि वय वाढलं, की आपला नॉस्टाल्जियाही वाढत जातो.'' ""खरं आहे,'' यशवंतराव उद्‌गारले.

चिरमुले सरांच्याच दोन आठवणी सांगण्यासारख्या आहेत. संपादकांनी कथा मागितल्यावर ती देताना ते "कथेवर लेखकाचं संपूर्ण नाव प्रसिद्ध करावं,' असा आग्रह धरत. दिवाळी अंकासाठी त्यांच्याकडून कथा घेण्यासाठी एक मित्र जाणार होता. त्याच्याबरोबर मी गेलो. सरांनी कथेची हातानं लिहिलेली मूळ प्रत दिली आणि कार्बन प्रतीवर पोच घेऊन ती प्रत एका फाइलमध्ये ठेवली.

चिरमुले सरांप्रमाणंच ब्रिटनमधला कथाकार विल्यम सॉमरसेट मॉमचा देखील प्रकाशकांपाशी तसाच आग्रह असावा. कारण त्याच्या पुस्तकांवर "डब्ल्यू. सॉमरसेट मॉम' असं पूर्ण नाव प्रसिद्ध झालेलं दिसतं. मराठीत त्याचा उल्लेख सर्रास "सॉमरसेट मॉम' असा केला जातो. मात्र, केवळ "सॉमरसेट' या नावानं हाक मारलेलं त्याला आवडत नव्हतं, असं रॉबिन मॉम या त्याच्या पुतण्यानं एका पुस्तकात नमूद केलं आहे. गंमत अशी, की पुस्तकाचं नाव मात्र "सॉमरसेट ऍन्ड ऑल मॉम्स' असं आहे!
या पुस्तकातच मॉमची आणखी एक आठवण आहे. पूर्वायुष्यात मॉमनं वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला होता; पण त्यानं वैद्यकीय व्यवसाय कधीच केला नाही. उत्तरायुष्यात एकदा अपरात्री त्याला लक्षात आलं, की झोपेच्या गोळ्या संपल्या आहेत. अशा अवेळी डॉक्‍टरांना गाठणं कठीण होतं. तेव्हा पुतण्यानं सुचवलं, की "तुम्ही स्वतः डॉक्‍टर आहातच. तुम्ही प्रिस्क्रिप्शन लिहू शकता.' मग मॉमला हसू आलं. त्यानं प्रिस्क्रिप्शन लिहून पुतण्याला दिलं आणि गोळ्या मागवल्या. "डॉक्‍टर मॉम'नं उभ्या आयुष्यात लिहिलेलं हे बहुधा एकमेव प्रिस्क्रिप्शन असावं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay tarawade write article in saptarang