समारोप (विजय तरवडे)

विजय तरवडे
रविवार, 30 डिसेंबर 2018

प्रथितयश साहित्यिकांविषयी रसिकांना निरपेक्ष आकर्षण असतं. नवोदित लेखकांना वाटणारं आकर्षण मात्र निरपेक्ष नसतं. प्रथितयश साहित्यिकांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या केवळ पायगुणामुळं आपणदेखील यशस्वी लेखक होऊ, असा त्यांचा भाबडा गैरसमज असू शकतो.

प्रथितयश साहित्यिकांविषयी रसिकांना निरपेक्ष आकर्षण असतं. नवोदित लेखकांना वाटणारं आकर्षण मात्र निरपेक्ष नसतं. प्रथितयश साहित्यिकांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या केवळ पायगुणामुळं आपणदेखील यशस्वी लेखक होऊ, असा त्यांचा भाबडा गैरसमज असू शकतो.

वस्तुतः कलेच्या प्रांतात आपली वाट आपल्यालाच शोधावी, तयार करावी लागते, आपल्यालाच वाटचाल करावी लागते. वाट चुकण्याचा धोका पत्करावा लागतो. निसर्गानं दिलेलं प्रतिभेचं देणं, आपण केलेले कष्ट आणि गुंतागुंतीचे योगायोग यातून जे पदरी पडेल ते स्वीकारावं लागतं. कुणी कुणाला रेडीमेड यश बहाल करू शकत नाही. प्रथितयश साहित्यिकांच्या ओळखीनं एखाद्या वेळी नाव छापून येण्यात मदत होण्यापलीकडं काही मिळू शकत नाही. नवोदितांना हे जितक्‍या लवकर समजेल तितकं चांगलं. 

सन १९७० ते २०१८ या कालखंडात मला अनेक मोठे साहित्यिक भेटले. अतिशय ख्यातनाम ज्येष्ठ कवी, ख्यातनाम कवयित्री-प्राध्यापिका, ज्येष्ठ समीक्षक हे माझे अगदी जवळचे आणि चांगल्या संबंधातले नातेवाईक असूनही माझी वाटचाल मला माझ्याच पावलांनी करावी लागली आहे.  

सॅम हास्किन्स हा गेल्या शतकातला गाजलेला छायाचित्रकार. त्याचा एक किस्सा आंतरजालावर आहे. सॅमला एकदा मेजवानीचं आमंत्रण आलं. तिथं गेल्यावर यजमानबाई त्याचं स्वागत करताना स्तुतीपर बोलण्याच्या ओघात म्हणाल्या ः ‘‘आम्हाला तुम्ही काढलेली छायाचित्रं खूप आवडतात. फार सुंदर असतात. तुमचा कॅमेरा खूप भारी असेल, नाही?’’ 

सॅम यावर काहीच बोलला नाही. मेजवानी संपली. पाहुणे परतू लागले. यजमानबाईंचा निरोप घेताना सॅम म्हणाला ः ‘‘जेवण फार छान होतं. अतिशय आवडलं. तुमची स्वयंपाकाची शेगडी फार भारी असेल, नाही?’’ यजमानबाई काय ते समजल्या. 

***

पुण्यातल्या नवी पेठेत कॅमेरादुरुस्तीचं एक दुकान होतं. दुकानाचे मालक अतिशय वृद्ध आणि ख्यातनाम कलाकार होते. एकदा मित्राबरोबर कॅमेरा दुरुस्त करायला गेल्यावर गप्पांच्या ओघात ते म्हणालेलं वाक्‍य आठवतंय. Machine is not important.  Man behind the machine is important.  

याच आशयाचा एक किस्सा मारिओ पुझो यांनी सांगितला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनीवर चढाई करताना रशियन सैन्यात तात्पुरती भरती झालेले अनेक शेतकरी, कामगार वगैरे जर्मनीत घुसले होते. त्यांनी त्यांच्या खेड्यात नळ पाहिले नव्हते. नळ आणि तोटी फिरवल्यावर येणारं पाणी पाहून ते चकित झाले आणि त्यांनी ते नळ व तोट्या उपसून नेल्या. घरी परतल्यावर ते नळ भिंतीला ठोकल्यावर तोटी फिरवली; पण पाणी आलं नाही. तेव्हा ते हताश झाले. हा किस्सा सांगून मारिओ पुझो म्हणतात ः ‘अमुक यशस्वी लेखकाचं फाउंटन पेन घेऊन आपण लेखन केलं म्हणजे यश मिळेल असं मुळीच नाही. चांगले शब्द हे उत्तम शाई आणि महागडं निब यांमधून उमटत नसतात, तर तुमच्या मेंदूनं हाताला दिलेल्या सूचनेबरहुकूम तुमचं पेन लिहीत जातं.’  ज्येष्ठ साहित्यक रवींद्र पिंगे यांचं निधन झाल्यावर त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्या वापरातलं फाउंटन पेन मागून घेतलं आणि ते फक्त आठवण म्हणून जपून ठेवलं. त्या पेननं काही लिहायचा प्रयत्न केला नाही. 

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे लिहायला बसत तेव्हा  त्यांच्या टेबलवर खूप पसारा असे. लिहिताना अधूनमधून तोंडात टाकण्यासाठी खाऱ्या शेंगदाण्यांची पुडी असे. हा किस्सा वाचून एखाद्यानं स्वतःच्या टेबलवर पसारा मांडला आणि जवळ खाऱ्या शेंगदाण्यांऐवजी अगदी काजू-पिस्त्यांची पुडी ठेवली तरी तेवढ्या भांडवलावर तो पुलंप्रमाणे मोठा साहित्यिक होणार नाही, हे समजून घ्यायला हवं.   

पिंगे आणि मी रत्नागिरीच्या साहित्य संमेलनात फिरत असताना एका अतिशय श्रीमंत व्यक्तीशी आमचा परिचय झाला. त्यांना साहित्यिक व्हायचं होतं आणि पिंगे यांचा आशीर्वाद हवा होता. आमच्या भेटीपूर्वी त्यांनी वाचकांच्या पत्रव्यवहाराव्यतिरिक्त काहीही लेखन केलेलं नव्हतं. संमेलनानंतर एका सभेसाठी पिंगे पुण्यात आले होते. तेव्हा त्यांना व मला या व्यक्तीकडून चहापानाचं आमंत्रण आलं. आम्ही गेल्यावर त्यांनी त्यांची अभ्यासिका दाखवली. इंटेरिअर डेकोरेटरकडून खास बनवून घेतलेली टेबल-खुर्ची, मॅपलिथो कागदांचं रिम, उंची बॉलपेन्स, पुस्तकांचं कपाट आणि एक खास वॉर्डरोब त्यांनी दाखवला. पिंगे यांना त्यांनी विनंती केली ः ‘वॉर्डरोबमधल्या प्रत्येक वस्त्राला स्पर्श करा, मग टेबलवर बसून समोरच्या प्रत्येक पेननं एका कागदावर संदेश लिहा.’ पिंगे यांनी तसं केलं. काही दिवसांनी एका दैनिकात शब्द टाकून त्यांना सदरलेखनाची संधीही दिली. त्या सदराच्या पुस्तकाचा भव्य सोहळा पिंगे यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडला. यानंतर अनेक प्रकाशकांना पैसे देऊन त्या व्यक्तीनं स्वतःची पुस्तकं प्रकाशित केली. विविध साहित्यिक संस्थांमधली अधिकारपदं मिळवली. मात्र, जेव्हा सगळं संपलं तेव्हा ती व्यक्ती अज्ञातवासात आणि काही काळ डिप्रेशनच्या अवस्थेत ढकलली गेली. अट्टहास करूनही आणि निसर्गदत्त देणग्यांसह पदरचं धन पणाला लावूनही लौकिकाचा अद्भुत स्पर्श तिला लाभू शकला नाही. निरोपाच्या वेळी हा किस्सा सांगण्याचा हेतू एवढाच की कलेच्या क्रूर विश्वात आयतं यश मिळण्याची अपेक्षा करू नये, शक्‍य तेवढे प्रयत्न करावेत आणि मिळेल ते स्वीकारून त्यात समाधानी असावं. जे मिळत नाही ते आपलं नसतंच! 

‘लघुचरित्र’मध्ये वर्षभर लघु-गुरू लोकांचे लघु किस्से सांगून वाचकांचं रंजन करण्याचा प्रयास मी केला. त्यात कुणाची फजिती जगजाहीर करण्याचा हेतू नव्हता. म्हणूनच अनेक ठिकाणी नावांचे उल्लेख टाळले होते आणि नावं ओळखता येऊ नयेत म्हणून तपशीलही बदलले होते. या सदरातला एकही किस्सा काल्पनिक नाही. 

प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार... 
 

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे)

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Vijay Tarawade writes about Marathi literature