‘कबड्डीचा आवाज खणखणीत...’

कबड्डी ही भारतीयांच्या हृदयात आहे. ती एक प्रकारे भारतीय संस्कृतीच आहे. कबड्डीचा जगभर प्रसार व्हावा ही भारतीयांची इच्छा. त्यासाठी आम्ही सारे प्रयत्न करत आहोत.
e prasad rao
e prasad raosakal
Summary

कबड्डी ही भारतीयांच्या हृदयात आहे. ती एक प्रकारे भारतीय संस्कृतीच आहे. कबड्डीचा जगभर प्रसार व्हावा ही भारतीयांची इच्छा. त्यासाठी आम्ही सारे प्रयत्न करत आहोत.

कबड्डी ही भारतीयांच्या हृदयात आहे. ती एक प्रकारे भारतीय संस्कृतीच आहे. कबड्डीचा जगभर प्रसार व्हावा ही भारतीयांची इच्छा. त्यासाठी आम्ही सारे प्रयत्न करत आहोत. अनेक राष्ट्रीय खेळाडू, ‘प्रो लीग’चे हीरो निवृत्तीनंतर कबड्डीच्या प्रसाराचं आणि प्रचाराचं काम करत आहेत. आजघडीला २० देशांत कबड्डी खेळली जाते. ती लवकरच ऑलिंपिकपर्यंत धडक देईल. ‘कबड्डी’चा आवाज खणखणीत येणार, त्यासाठी गावागावातून मंडळांच्या माध्यमातून कबड्डी वाढवण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करणार आहे...’ भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक ई. प्रसाद राव कबड्डीच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल आणि प्रगतीबाबत अभिमानानं बोलत होते.

कबड्डी मातीमधून मॅटवर नेणारे राव हे कबड्डीला आयुष्य वाहून घेतलेलं अवलिया व्यक्तिमत्त्व. कबड्डीसाठी द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारे ते पहिले. त्यांचं अवघं आयुष्य कबड्डीनं व्यापलेलं आहे. मैदानावर उत्तम कबड्डीपटू म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर उत्तम प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी अमिट ठसा उमटवला आहे.

कबड्डीचे अभ्यासक, कबड्डीचं तंत्र आणि नियम घडवणारे संशोधक, आशियाबाहेरही प्रत्येक देशानं कबड्डी खेळावी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे ध्येयवादी संयोजक...अशा विविध भूमिका ते लीलया पार पाडतात.

कतारमधील आशियाई स्पर्धेतील अनुभव कबड्डीला जगाच्या पटलावर आणण्यास कसा साह्यभूत ठरला हे सांगताना राव म्हणाले : ‘आम्ही कतारमध्ये आशियाई स्पर्धेसाठी गेलो होतो. तिथं कबड्डीच्या सामन्यांसाठी छोटी जागा मिळाली होती. स्पर्धाकालावधीही कमी होता; पण संधी मिळाल्याचा आनंद होता.

ही संधी साधण्यासाठी सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण मी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या हॉटेलांत जाऊन केलं. मी सोबत कबड्डीस्पर्धेचं मोठं पोस्टर घेऊन जात असे आणि तिथं चिकटवून बाहेर पडत असे. कतारमध्ये भारतीय सर्व क्षेत्रांत होते. त्यांच्या नजरेत ही पोस्टर्स भरली. प्रत्यक्ष सामने सुरू झाले आणि प्रेक्षकांची गर्दी वाढली.

जागा कमी पडू लागली. ही बातमी कतारच्या राजांपर्यंत गेली. त्यांना आश्चर्य वाटून त्यांनी स्वतः स्पर्धेला उपस्थिती लावली. गर्दी पाहून स्पर्धाकालावधी चार दिवसांवरून सहा दिवस केला. अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होता. कतारमधल्या कोणत्याही अंतिम सामन्याला झाली नव्हती एवढी गर्दी कबड्डीच्या त्या अंतिम सामन्याला झाली होती. पोस्टरच्या युक्तीनं कबड्डीचा प्रसार वाढला.’

पराभव वेदनादायी पण...

‘नेपाळमध्ये मंदिरात राहिलो, तिथंच जेवलो; पण कबड्डीसाठी झटलो,’ हे सांगताना कबड्डीसाठी काढलेल्या खस्ता राव यांच्या शब्दांतून व्यक्त झाल्या. राव म्हणाले : ‘मनप्रीतसिंग, नीर गुलिया, श्रीनिवास रेड्डी ही नव्या पिढीतील कितीतरी मंडळी आज कबड्डीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी झटत आहेत. परदेशात जाऊन तिथं भाषेसह अन्य प्रतिकूलतांना कबड्डीच्या प्रेमापोटी हे सर्वजण सामोरे जात आहेत, त्यावर तोडगा काढत आहेत, प्रत्येक अडचण सकारात्मकतेनं घेत आहेत. गेल्या वेळच्या आशियाई स्पर्धेत इराणविरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या पाच मिनिटांत आपण हरलो...तेव्हा भारतीय म्हणून हृदयात वेदना होती आणि ‘कबड्डी मोठी होत आहे,’ ही भावना मेंदूत होती. तो क्षण या साऱ्या प्रवासातला ‘एव्हरेस्ट’ होता.’

कबड्डीसाठी खर्च व्हायला हवा

‘परदेशात कबड्डीसाठी आपल्यापेक्षा अधिक मानधन, अधिक सुविधा मिळतात, यात शंका नाही. कोरियानं कबड्डी शिकणाऱ्यांना, सराव करणाऱ्यांना दीड लाखाचं मानधन देऊ केलं आहे. तिथं वीस जणांच्या संघासाठी जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जातात. आर्थिक शाश्वती मिळते; त्यामुळे खेळाडू झोकून देऊन खेळत राहतात. भारतात शिकण्यासाठी एवढं मानधन देणं शक्य नाही म्हणून ‘प्रो लीग’चा पर्याय दिला गेला. पहिल्या लिलावात खेळाडूला मिळालेली सर्वाधिक रक्कम होती वीस हजार रुपये. खेळाडू म्हणून विजेतेपदाची तीन-चार हजार रुपयांची रक्कम वाटून घेणाऱ्या आम्हा सर्वांना वीस हजार रुपये म्हणजे तेव्हा आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं! अलीकडे झालेल्या ‘प्रो लीग’साठी एका खेळाडूसाठी सर्वोच्च बोली लागली ती दीड कोटीवर. धुणी-भांडी करणाऱ्या महिलेचा मुलगा कबड्डीपटू होतो, घर बांधतो, २२ लाखांची गाडी घेतो हे क्षण कबड्डीमुळे आयुष्यात आले आहेत...यातूनच कबड्डीची क्षमता किती मोठी आहे हे दिसून येतं...’ राव हे कबड्डीच्या भविष्यातील प्रवासाविषयी अगदी ठामपणे व्यक्त होतात.

‘कबड्डीमध्ये दहा-बारा खेळांची महत्त्वपूर्ण अंगं सामावलेली आहेत,’ असा दावा भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक ई. प्रसाद राव करतात.

ते म्हणतात : ‘कबड्डी ही ताकद आहे, गती आहे, चाणाक्षपणा आहे, चपळाई आहे, बुद्धिकौशल्य आहे, प्रसंगावधान आहे, सामूहिक प्रयत्न आहे, भारतीय संस्कृतीचा भाग आहे... म्हणूनच कबड्डी जगभर खेळण्यात यावी. त्यासाठी काय करता येईल असा विचार करता, ती मॅटवर खेळण्याचा प्रयोग पुढं आला आणि तोच यशस्वी झाला व आज वीस देशांत कबड्डी खेळली जात आहे...ही आनंददायी गोष्ट आहे...कबड्डी मॅटवर आणताना टीका-टिपण्णी झाली; पण कोणताही बदल होत असताना असे विरोध होतच असतात...त्यामुळे आम्ही डगमगलो नाही.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com