Dasara 2021 : दुर्जनांवरील विजयाचा दिवस

विजयादशमीचा दिवस हा सज्जनशक्तीच्या विजयाचा दिवस आहे. रावण हे दुर्जनशक्तीचे, तर श्रीराम हे सज्जनशक्तीचे प्रतीक होय.
shriram
shriram sakal media

विजयादशमीचा दिवस हा सज्जनशक्तीच्या विजयाचा दिवस आहे. रावण हे दुर्जनशक्तीचे, तर श्रीराम हे सज्जनशक्तीचे प्रतीक होय. सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाशी भयंकर युद्ध करून प्रभू श्रीरामांनी याच दिवशी रावणाचा वध करून सीतेची मुक्तता केली. मात्र रणांगणावरील पराक्रमाखेरीज श्रीरामांमध्ये इतर अनेक अद्‌भुत गुण आहेत.

-डॉ. गिरीश आफळे

महर्षी वाल्मीकी विरचित रामायण या ऐतिहासिक महाकाव्यात मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांची व सीता या त्यांच्या पत्नीची जीवनकथा आहे. धाकटा भाऊ भरत आणि राम यांच्यात एक अद्‌भुत संघर्ष घडलाय! तो राज्य बळकावण्यासाठी नाही, तर राज्य त्यागण्यासाठी! जगाच्या इतिहासात असा संघर्ष फक्त रामायणातच पाहायला मिळतो. कैकयी जेव्हा रामाने वनवासात जाण्याचा वर मागते, तेव्हा दशरथच रामाला म्हणतो की, ‘‘रामा, तू मलाच कैदेत टाक आणि अयोध्येचा राजा हो.’’ अर्थात, श्रीराम नकारच देतात! पित्याची इच्छा पुरी करण्यासाठी श्रीराम वनवासाला निघाले आहेत. सोबत जणू त्यांचा बहिश्चर प्राणच असलेला लक्ष्मण आणि पत्नी सीता हे दोघे आहेत.

इकडे ध्यानी-मनी-स्वप्नी नसताना श्रीरामांच्या हातून जे राज्य गेले, तेच राज्य भरताला नशिबी आपसूक चालत आले होते. राज्याभिषेकाच्या प्रसंगी भरत आणि शत्रुघ्न हे भरताच्या आजोळी गेले असल्यामुळे उपस्थित नव्हते. भरत अयोध्येला परत आल्यावर क्रुद्ध व दु:खी झालाय आणि त्याने माता कैकयीची निंदा करून म्हटले, ‘‘तुझ्या पापाचे पायश्चित्त मी घेईन. रामाला राज्यावर बसवीन आणि मी स्वत: वनवास पत्करीन.’’ साक्षात गुरू वशिष्ठांनीही ‘‘पित्याच्या आज्ञेला मान देऊन तू राज्याभिषेक करवून घे,’’ असे भरताला स्पष्ट सांगितले होते. उलट भरत वशिष्ठ ऋषींना म्हणतो, ‘‘श्रीरामचंद्रांचे राज्य घेऊन मीही पापाचरण करीन तर संसारात इक्ष्वाकु कुलाचा कलंक समजला जाईन.’’ असे म्हणून भरत चित्रकूटाकडे श्रीरामांना परत आणण्यासाठी निघतो. नंतर श्रीराम आणि भरत यांची ती हृद्य भेट झालीय. ‘‘अयोध्येचे राज्य स्वीकारण्यास तयार व्हा,’’ म्हणून भरत पाया पडून विनंती करतोय. परंतु श्रीराम आपले वचन मोडून त्यासाठी तयार झाले नाहीत. ते भरताला म्हणतात, ‘‘हे भरता, चंद्रापासून त्याची प्रभा अलग होईल, हिमालय बर्फाचा त्याग करेल किंवा समुद्र आपल्या सीमेस उल्लंघून जाईल; पण मी पित्याची आज्ञा मोडू शकणार नाही.’’ (अयोध्याकाण्ड /सर्ग ११२ /श्लोक-१८) शेवटी भरताने श्रीरामांच्या पादुका घेतल्या आणि त्याच सिंहासनावर स्थापून, रामाप्रमाणेच वल्कले नेसून, जमिनीवर निजून व फळे-कंदमुळे खात खात अयोध्येजवळ नंदिग्राम या ठिकाणी राहून कारभार केला. श्रीरामचंद्रांनी राज्य गेल्याची घटना एका क्षणात स्वीकारली आणि भरतानेही अचानक राज्य मिळाल्याची घटना एका क्षणात नाकारली! मग या दोघांत जास्त श्रेष्ठ कोण?... रामायण घडून किमान पाच-सात हजार वर्षे झाली आहेत. राज्य नाकारण्यासाठी दोन भावांत झालेल्या संघर्षाचे उदाहरण जगाच्या इतिहासात रामायण सोडून अन्यत्र कोठे आहे का?

श्रीरामांना राज्य सोडून वनात जावे लागणार आहे, हे कळताच लक्ष्मणाच्या डोळ्यांत अश्रू नव्हे तर अंगार फुलतात. तो श्रीरामांच्या विरोधकांचा धनुष्य-बाणाने समाचार घ्यायलाच निघतो. श्रीराम त्याला शांत करून म्हणतात, ‘‘हे लक्ष्मण, मित्र वा बांधव यांचा नाश करून जी संपत्ती मिळणार असेल ती मी कधीही घेणार नाही. धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची माझी साधना अथवा पृथ्वीदेखील मला तुमच्यासाठी हवी आहे, हे मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो. बंधूंमध्ये सदैव एकता नांदावी व तुम्ही सुखी असावे, एवढ्याचसाठी केवळ मी राज्याची इच्छा करेन. आपत्तीत पुत्रांनी पित्याला मारावे किंवा आपल्या प्राणासारख्या प्रिय बंधूवर कोणी प्राणघातक वार करावा का?’’ (अयोध्या/९७/५, ६,१६) श्रीराम ‘मैं नहीं तू।’ याच भावनेने वावरत आहेत. जे काही करायचे ते दुसऱ्यासाठी! याउलट राक्षसांचे आहे... जे काही करायचे ते स्वतःसाठी! दोन संस्कृतींमधील हा महत्त्वाचा भेद आहे!

धर्मपरता व धैर्य

श्रीरामांनी पित्याचे व स्वतःचे वचन पाळण्याकरता काटेकोरपणा दाखवला, हे बघण्यासारखे आहे. गंगा नदी ओलांडण्यापूर्वी श्रीरामांना त्यांचा मित्र निषादराज गुह भेटतो. श्रीराम गुहाने दिलेले उत्तमोत्तम खाद्यपदार्थ नाकारतात; मी फक्त फळे व कंदमुळेच खाणार असे सांगतात. त्याचप्रमाणे रात्रीची झोप मऊ गाद्यांवर नाही, तर तृणशय्येवरच घेतात. त्याचप्रमाणे लंकेहून परत येताना बिभीषणाला राज्याभिषेकाची वेळ येते, तेव्हा नगरात येऊन श्रीरामांच्या हस्ते आपल्याला राज्याभिषेक व्हावा, अशी विनंती बिभीषण करतो. श्रीराम ती विनंती नाकारतात! का?... तर, नगरात येणे म्हणजे आपल्या वनवासाच्या प्रतिज्ञेचा भंग करणे असे होईल! हीच गोष्ट सुग्रीवाला राज्याभिषेकाची वेळ येते तेव्हा घडते. कारण, कष्किंधा नगरीत जाणे म्हणजे आपल्या वनवासाच्या प्रतिज्ञेचा भंग होईल! ‘रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए’ असे म्हटले जाते ते याचमुळे.

समरसतेचे अग्रदूत

निषादराज गुह हा श्रीरामांचा अंतःकरणापासूनचा मित्र होता; तर भिल्ल समाजाच्या शबरीची बोरे श्रीरामांनी प्रेमाने खाल्ली. लंकाविजयानंतर श्रीरामांनी राक्षसांचे लंकेचे राज्य बळकावले नाही, तर ते बिभीषणालाच देऊ केले. श्रीराम आता अयोध्येकडे यायला निघाले आहेत. भरताची आठवण आल्यास काही विशेष नाही. पण त्यांना भरताबरोबरच निषादराज गुहाची आठवण प्रकर्षाने येतेय. वनवासातून परत आल्याची वार्ता प्रथम निषादराज गुहालाच देण्याची आज्ञा ते हनुमंताला देतात व म्हणतात, ‘‘मी माझ्यावर जितके प्रेम करत असेन तितकेच गुहावर करतो.’’

श्रीरामांनी या प्रवासात भारताची दक्षिण ते उत्तर या दिशा त्याचप्रमाणे, वानर, गृध्र, अस्वल या समाजांना जोडले. इतकेच काय पण विचारांनी राक्षस असलेल्यांमधील सत्त्वगुणी बिभीषणालाच गादीवर बसवून आचार-विचारांमधील समरसता सहज साधली. रामराज्यात जास्तीत जास्त महत्त्व नीतिमत्तेला होते. आपल्या स्वराज्याचे रूपांतर रामराज्यात व्हावे, असे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते. या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने मर्यादापुरुषोत्तम असे परमेश्वर तर आहेतच, शिवाय राष्ट्रपुरुषही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com