Vijayanagar Empire Women
esakal
रोहित वाळिंबे - rohit.walimbe@esakal.com
इतिहासलेखनात राजे, युद्ध, राजकीय घडामोडी, साम्राज्यांचा विस्तार आणि सत्तासंघर्ष यांना नेहमीच मध्यवर्ती स्थान मिळाले आहे. मात्र स्त्रियांचे जीवन, त्यांचे सामाजिक स्थान, आर्थिक योगदान, शिक्षण, कला, राजकारण, युद्धातील सहभाग आणि सांस्कृतिक योगदान यांचा तुलनेने कमी विचार झालेला दिसतो. याच दुर्लक्षित अंगावर प्रकाश टाकणारे डॉ. अस्मि ता हवालदार लिखित ‘विजयनगर साम्राज्यातील स्त्रिया’ हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.
हे पुस्तक केवळ स्त्रियांच्या इतिहासाचे वर्णन करणारे पुस्तक नसून विजयनगरच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा वेगळा पट वाचकांसमोर उभा करणारे आहे. मुखपृष्ठावर विजयनगरच्या शिल्पकलेतील स्त्रीप्रतिमा आणि भित्तिचित्रांचा वापर करण्यात आला आहे.
विजयनगर साम्राज्याच्या इतिहासात स्त्री कोणकोणत्या भूमिकांमध्ये दिसते, याचा शोध हे पुस्तक घेते. राण्या, राजस्त्रिया या भूमिकांपलीकडे जाऊन अंगरक्षक, वीरांगना, व्यापारी स्त्रिया, कलाकार, देवदासी, कौटुंबिक स्त्रिया, कष्टकरी आणि शेतकरी अशा समाजाच्या विविध स्तरांतील स्त्रियांचा विचार पुस्तकात केला आहे. पुस्तकाची रचना विषयानुरूप विस्तृत आहे. केवळ राजघराण्यातील स्त्रियांपुरता पुस्तकाचा विषय मर्यादित नसून स्त्रीजीवनाच्या पैलूंचा विचार केला आहे.