निसर्गाच्या कुशीत वसलेले डोंगरांवरचे गाव

अनिकेत आमटे संचालक, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा
Saturday, 19 September 2020

डोंगरावर राहणाऱ्या आदिवासी बांधवाना बडा माडिया म्हणतात. उत्तम निसर्ग सौंदर्याने नटलेला हा प्रदेश आहे. बारमाही इंदस/राजीरप्पा नावाचा सुरेख धबधबा आहे. डोंगरावर असलेल्या प्रत्येक गावाच्या जवळून वाहणारा छोटा नाला/झरा आहे. जो १२ महिने वाहत असतो.

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा गावाच्या पुढे ७ किलोमीटर पोदेवाडा आणि दुसऱ्या बाजूला ७ किलोमीटरवर पिरमलभट्टी अशा दोन अतिशय दुर्गम गावांना जून २०२० मध्ये भेट दिली. बिनागुंडा साधारण तालुका मुख्यालयापासून ३६ किलोमीटर लांब आहे. लाहेरी गावापासून पुढे १८ किलोमीटर डोंगरांवर ही गावे आहेत. लाहेरीपर्यंत रस्ता आहे. पण सध्या खड्डे पडले आहेत. पुढे गुंडेनूर गावच्या आधी एक मोठा नाला आहे. एकदा पाऊस सुरु झाला की पुढील सर्व गावांचा संपर्क जगाशी ४-५ महिने तुटतो. लाहेरी नंतरचा प्रवास चालतच करावा लागतो ५ महिने. १८ किलोमीटर उंच डोंगर चढून गेल्यावर बिनागुंडा गाव लागत. पावसाळ्यात आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त. मृत्यू कधी आणि कशाने ओढवेल काहीच सांगता येत नाही. मलेरिया खूप. सर्प दंश आहेच. आणि घनदाट अरण्य असल्याने त्या भागात अस्वलाचे हल्ले खूपदा होत असतात.

डोंगरावर राहणाऱ्या आदिवासी बांधवाना बडा माडिया म्हणतात. उत्तम निसर्ग सौंदर्याने नटलेला हा प्रदेश आहे. बारमाही इंदस/राजीरप्पा नावाचा सुरेख धबधबा आहे. डोंगरावर असलेल्या प्रत्येक गावाच्या जवळून वाहणारा छोटा नाला/झरा आहे. जो १२ महिने वाहत असतो. अंघोळ आणि पिण्याचे पाणी यासाठी याच नाल्याचे पाणी वापरले जाते. बिनागुंड्यात हॅन्डपंपची सोय सरकारने केली आहे. त्यावर सोलर पंप बसविला आहे. पण मेंटेनन्स नसल्याने पाईपलाईन फुटलेली आणि नळ तुटलेले आढळले. गावातील एकाला प्लम्बिंगचे ट्रेनिंग देऊन या समस्येवर मार्ग काढता येऊ शकतो. दुरुस्तीकरीता लागणारे साहित्य आणि जास्तीचे स्पेअर पार्ट्स त्या ट्रेन केलेल्या व्यक्तीकडे देऊन ठेवता येतील.

डोंगरमाथ्यावर असणाऱ्या या गावांमध्ये गोरगा नावाची झाडे भरपूर आहेत. ताड/माड सारखेच दिसणारे हे वृक्ष असते. याचे ताडी सारखे पेय निघत असते. सपाट प्रदेशात राहणारे आदिवासी बांधव बरेचदा गोर्गा पेयाच्या बदल्यात डोंगरावर राहणाऱ्या आदिवासींना तांदूळ देत असतात. डोंगरावर सपाट जागा फार कमी आहे. त्यामुळे वर भाताचे पीक फारसे घेता येत नाही. डोंगरावर जंगल कापून त्या ठिकाणी कोसरी नावाचे पीक घेतले जाते. कमी पाण्यावर होणारे कोसरी हे पीक राजगिऱ्यासारखे आहे. शिजवून मीठ टाकून खाल्ले जाते. किंवा खीर सुद्धा करता येते.

आदिवासी बांधवांच्या प्रत्येक गावात गोटुल असते. सर्व गावातील गोटुल अतिशय स्वच्छ आहेत. गोटुल म्हणजे लाकूड फाटे आणि मातीने बांधलेली सुबक मोठी आणि चारही बाजूने उघडी असलेली झोपडी असते. तिला छान बांबू अथवा लाकडाचे कुंपण असते. खालची जमीन मातीने सारवलेली असते. गावाची वाद्ये, भांडी कुंडी आणि इतर सार्वजनिक सामुग्री तिथे ठेवली असतात. कुलूप नसले तरी गोटुल मध्ये चोरी कधीच होत नाही. गोटुल हे सार्वजनिक असते. त्या ठिकाणी गावाची सभा होत असते. सर्व आदिवासी उत्सव (पंडुम) गोटुलमध्ये साजरे केले जातात. बऱ्याच तरुण -तरुणीची लग्न सुद्धा त्या ठिकाणी ठरतात.

काही गावात कोंबड्यांच्या पिल्लांसोबत मोराची पिल्ले खेळताना दिसली. डुक्कर, बकऱ्या गुरं ढोरं या सगळ्यांसाठी स्वतंत्र जागा आणि घरे आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व गावकरी स्वतःच्या घराची डागडुजी करीत होते. अनेक घरांच्या छपरावर आता कौल आहेत. पूर्वी सर्व घरे गवताने शाकारलेली असायची. त्यामुळे दरवर्षी गवत बदलावे लागायचे. आणि घरात साप विंचवाचे प्रमाण पण खूप असायचे. पावसाळ्यात घरात गवतातून पाणी गळायचे. कौलं आल्याने या समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाल्या आहेत.

आम्ही प्रकल्पातर्फे पोदेवाडा आणि पिरमलभट्टी गावातील आदिवासी स्त्रियांना साड्या, लहान मुलांना कपडे आणि मच्छरदाणीचे वाटप केले. खरूज या त्वचा रोगावर औषधे नेऊन दिली. हा लागट रोग आहे. आणि अनेक लहान मुलांना झालेला गेल्या भेटीत दिसले होते. स्वच्छता पाळा. अंघोळ करा. नीट कपडे धुवून वापरा. असे आमच्या कार्यकर्त्याने त्यांचे माडिया भाषेत प्रबोधन केले. या दोन्ही गावची वाट अतिशय कठीण आहे. दोन्ही गावे हे डेड एन्ड आहेत. पुढे २ तास चालत दाट जंगलातून आणि डोंगर पार करून गेलात की मग छत्तीसगड मधील गाव लागतं.

१४-१६ घरांची ही गावे आहेत. येथील विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून आदिवासी बांधवांचे आमच्या शिक्षकांनी प्रबोधन केले. अनेक जणांचा जन्म दाखला नाही. आधार नाही. अगदीच वेगळे जग. रस्ते, लाईट, मोबाईल वगैर कधीच पोहोचू शकणार नाही अशी बिकट परिस्थिती. ऊंच डोंगरांवर गावे. आम्ही गावात आलो याचा आनंद होता त्यांच्या चेहेऱ्यावर. कारण त्यांच्या गावात वर्षातून एक-दोनदाच कोणीतरी बाहेरून येत असते. आमच्या शिक्षकांनी बिनागुंड्याला गोटुलमध्ये विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. शिक्षणाची गोडी टिकून रहावी यासाठी प्रयत्न सुरू होते जून ३० पर्यंत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होऊन आता ६ महिने झालेत. या भागातील काही विद्यार्थी लोक बिरादरी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थी पदवीधारक झाले आहेत. नोकरी सुद्धा लागली आहे. अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो.

कधीकाळी पिरमलभट्टी गावात सरकारने हातपंप केला होता. तो अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. या दुर्गम गावात पोहोचताना गाडीचे हाल झालेत. बैलगाडी जाईल असा रस्ता असल्याने अनेक वेळा गाडीला खाली दगड लागलेत. अनेक ओढ्यातून गाडी न्यावी लागली. हे ओढे/ नाले १२ महिने वाहणारे आहेत.

भामरागड प्रकल्पाचे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आयएएस आहेत. काही महिनेच झालेत त्यांना या भागात रुजू होऊन. संवेदनशील आहेत. तरुण आहेत. ते पण आमच्या सोबत आले होते. तेथील परिस्थिती अनुभवली. अडीअडचणी समजल्या त्यांना. नक्कीच काहीतरी प्रयत्न करतील ते, अशी आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villages in Bhamaragad