खोडसाळ पत्रांचं इतिहासातील पान
खोडसाळ पत्रांचं इतिहासातील पानsakal

खोडसाळ पत्रांचं इतिहासातील पान

इतिहासाची नोंदणी करून त्याचे जतन करण्याची परंपरा इंग्लंडमध्ये असली तरीही त्यातील अनेक अशा गोष्टी लोकांच्या विस्मरणात जातात ज्या कधी काळी राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनल्या होत्या.

इतिहासाची नोंदणी करून त्याचे जतन करण्याची परंपरा इंग्लंडमध्ये असली तरीही त्यातील अनेक अशा गोष्टी लोकांच्या विस्मरणात जातात ज्या कधी काळी राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनल्या होत्या. काहीतरी निमित्त बनतं आणि अशा गोष्टी पुन्हा चर्चेला येतात आणि त्यातून माणसांचा वेगळाच इतिहास आपल्याला दिसून येतो. ‘विकड लिटल लेटर्स’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून ससेक्समधील खेड्यांतील अशी एक गोष्ट पुन्हा गावामध्ये चर्चेला आली. ससेक्समध्ये व्यक्ती आणि वल्ली या दोघांनाही तोटा नसला तरी इतिहासातून समोर आलेलं हे पान अनेक अर्थाने माणसांच्या परस्पर वागणुकीचं द्योतक बनलं आहे.

१९२० मध्ये पहिलं महायुद्ध संपल्यानंतर ससेक्सच्या काही गावांत पत्रांचा सुळसुळाट सुरू होतो. पत्रं लिहिणं हा उद्योग प्रेमाचा असला तरी त्या घटनेच्या बाबतीत मात्र ती बाब उलटपक्षी होती आणि त्याचं कारण म्हणजे त्या पत्रांमध्ये असणारा मजकूर. पश्चिम ससेक्स भागातील लिटलहॅमटन गावात काही लोकांना निनावी पत्रं मिळायला लागली. निनावी पत्रांमागे सहसा प्रेमभावनेची किंवा फसवणुकीची परंपरा असते; परंतु ही पत्रं त्याला अपवाद होती. आश्चर्याची बाब म्हणजे या पत्रांमध्ये चक्क तुंबळ शिवीगाळ करणारा आणि लोकांना वाचूनच शिसारी येईल, अशा भाषेतील मजकूर लिहिलेला असे.

गावातील सर्व ग्रामस्थ जवळपास एकमेकांना ओळखत आणि प्रत्येकाला एकमेकांच्या काही गोष्टी माहीत असत. त्यातल्या त्यात या पत्रांमधून अशाच सर्व गोष्टी फार वाईट पद्धतीने टोचून लिहिल्या जाऊ लागल्या. या पत्रांची भाषा इतकी अपमानजनक आणि त्या काळाच्या दृष्टीने असंसदीय व टोकाची वाटत होती, की त्यांची कीर्ती लवकरच देशभर पोचली. सहसा पबमध्ये मद्यपान करून भांडणं झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या शिव्याही त्याच्यापुढे सौम्य वाटतील, इतक्या भयानक भाषेत ही पत्रं लिहिली जात होती. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि अजूनही देशामध्ये जुने-पुराने कायदे लागू असण्याचा हा काळ होता.

जर एखाद्याची बायको आजारपणामुळे निधन पावली असेल तर त्याला तिच्या बहिणीशी लग्न करण्याचा अधिकार होता किंवा सामाजिक ठिकाणी अश्लील वर्तन करणं हा गुन्हा मानला जात होता. वर्तमानपत्रं आणि इतर माध्यमांवर कठोर बंदी व शासनाची करडी नजर असे. वसाहतवाद हा आपल्या टोकाला जाऊन पोचला होता. अशा काळात अगदी छोट्याशा गावातही या पद्धतीचा मजकूर घरोघरी पोहोचणं हे अपमानजनक समजलं जाऊ लागलं. त्यातून गावाच्या प्रतिमेवर तसंच पत्र हाती पडलेल्या लोकांमध्ये व लहान मुलांवर वाईट परिणाम होत असल्याची चर्चा झाली; मात्र त्याहीपेक्षा जास्त म्हणजे आंबटशौकीन लोकांनी व सहसा सामाजिक ठिकाणी अशा भाषेचा प्रयोग करता येत नसल्यामुळे देशभरातील सामान्यांनीही या विषयात मोठा रस घ्यायला सुरुवात केली.

त्या विषयीची इत्थंभूत माहिती आणि रसभरीत वर्णनं वृत्तपत्रांमध्ये येऊ लागली आणि लंडनसहित इतर शहरांमध्ये लोक हा विषय चवीने चघळू लागले. त्याचाच परिणाम म्हणून पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. असं झाल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध करायला सुरुवात केली आणि संशयाची सुई गेली ती म्हणजे रोज गुडलिंग्स या गावातील शिव्या देण्यासाठी व आपल्या बेधडक भाषेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या २८ वर्षीय महिलेकडे. गावामध्ये बोलायला सर्वात कठोर आणि पुरुषही हात जोडतील अशा जोरदार आवेशात थेट तोंडावर पाणउतारा करण्याच्या तिच्या शैलीमुळे पोलिसांचा संशय तिच्यावर गेला.

तिचं अनेकदा आपल्या नवऱ्याशी भांडण होत असे आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्यातूनच तिच्या तापट स्वभावाची कल्पना होती. गावातील काही लोकांनी रोज हिच्याविरुद्ध विविध कारणांनी पोलिसांमध्ये वेळोवेळी तक्रारीही केल्या होत्या. त्रास देणाऱ्या गावातील लहान मुलांना काठीने बदडणं, परस बागेमध्ये एकमेकांची झाडं तुडवणं अशा फुटकळ कारणांवरून तिच्या शेजारी राहणाऱ्या एडिथ या महिलेबरोबर बाचाबाची होऊ लागली आणि प्रकरणं पोलिसांपर्यंत व कोर्टातही जाऊ लागली. त्यानंतर अचानक एडिथ हिला आणि गावातील इतर लोकांना शिव्यांनी बरबटलेली पत्रं यायला सुरुवात झाली व त्याच्या शेवटी रोज हिच्या नावाची ‘आर’ आणि ‘जी’ ही आद्याक्षरं लिहिलेली असत.

अगदी तिला कोणीही भेटायला आलेली नवीन व्यक्तीही काही दिवसांतच आपल्या पत्त्यावर आलेलं तिचं पत्र पाहून थक्क होत असे. मात्र, रोज हिने आपण अशी पत्रं लिहीत नसल्याचा दावा केला होता म्हणून ही घटना अधिकच प्रसिद्ध झाली. आपल्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी मुद्दाम आपल्या नावाने शिवीगाळ करणारी पत्रं लिहून गावभर वाटत आहे, असा तिचा आरोप होता व त्याच्या न्यायालयीन चौकशीलाही सुरुवात झाली. ब्रायटनच्या शेजारी असणाऱ्या लुईस गावामध्ये याचा खटला भरला गेला. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी लंडनहून स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या विशेष पथकाला पाठवण्यात आलं. मात्र, त्यांनाही या घटनेचा पुरेपूर छडा लावण्यात यश आलं नाही.

शेवटी तिथे नव्यानेच काम करण्यासाठी आलेल्या एका महिला पोलिसाने युक्ती लढवली आणि गावांमधील पोस्टावर पाळत ठेवली, तसेच गावातून दिली जाणारी तिकिटं अदृश्य शाईने त्या त्या व्यक्तीचे नाव लिहून वाटण्यात आली व त्यातूनच खरा अपराधी कोण होता हे समजलं... ज्या महिलेला पहिलं पत्र गेलं होतं ती एडिथ स्वतःच या प्रकरणात आरोपी होती! त्यासाठी तिला एका वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली व हा पत्रांचा सुळसुळाट शेवटी थांबला. आजही ही पत्रं इथल्या संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात व तीच नव्या चित्रपटातही वापरण्यात आली आहेत.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com