टिळक, रंगारी : वादाशिवाय उत्सवाला रंगत येत नाही ?

विनायक लिमये
रविवार, 13 ऑगस्ट 2017

गणोशोत्सव सार्वजिनकरित्या साजरा करून त्यातून लोकसंग्रह करता येईल हे लोकमान्य टिळकांनी ओळखले होते, त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जगजागरणासाठी त्याचा वापर केला ही त्यांची हुशारी त्या काळाच्या पातळीवर योग्यच होती. आज त्याला आजच्या काळाचे संदर्भ लावून कोण मोठे, कोण लहान याचा वाद घालणे अत्यंत चुकीचे आहे. या वादात राजकारण करणे हाच त्या उत्सवाचा आणि भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक यांचा अपमान करणारे आहे. उतावीळ अनुयायी काहीवेळा आपल्याच नेत्याचा कसा पराभव करतात हेच या वादातील अनेक मंडळींच्या वर्तनावरून दिसत आहे

गणरायाचा उत्सव आणि साहित्य संमेलन हे सध्या एका बाबतीत साम्य दाखवत आहेत. कुठला तरी वाद झाल्याशिवाय या दोन्ही उत्सवांना रंगत येत नाही असा सध्याचा काळ आहे. सध्या पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा सव्वाशेवा वाढदिवस महापालिकेच्यावतीने साजरा केला जात आहे. या सोहळ्याचा लोगो करण्याच्या मुद्यावरून सध्या विद्वानाच्या या नगरीत मोठा गदारोळ उडाला आहे. या सोहळ्याच्या लोगोमधून लोकमान्य टिळकांचे छायाचित्र काढून तिथे गणपतीचा फोटो लावल्याबद्दल अनेकांचा आक्षेप आहे. पुण्यातील भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाची सुरवात केली यात शंकाच नाही मात्र त्यावरून लोकमान्यांचे गणेशोत्सवातले योगदान नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. भाऊ रंगारी यांनी या उत्सवाची सुरवात केली यात शंकाच नाही त्याबद्दल त्यांना श्रेय दिलेच पाहिजे पण असे श्रेय देताना टिळक यांनी या उत्सवाचा देशात राष्ट्रीयत्वाची ज्योत पेटवण्यासाठी उपयोग केला हे नाकारून चालणार नाही. टिळक आणि भाऊ रंगारी एकमेकांचे उत्तम सहकारी होते व ते एकमेकांचा प्रचंड आदर करत होते हे त्यांच्या आजच्या समर्थकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. 

मुळात गेल्या काही दिवसापासून हा वाद विचित्र पद्धतीने सुरू आहे. पुण्यातील भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाने गणपतीचे पुजन सार्वजनिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे जनकत्व आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. लोकमान्य टिळक यांनी हा उत्सव सार्वजनिक रित्या सुरू केला आणि ब्रिटीश सत्तेविरुद्ध लोकांना एकत्र करण्यासाठी त्याचा वापर केला हा दावा त्यांना चुकीचा वाटतो. त्यासाठी त्यांनी काही पुरावे दिले आहेत. पुणे महापालिकेचे विद्यमान पदाधिकारी आणि महापौर मुक्ता टिळक यांनी या वादासंदर्भात अत्यंत खुबीने मार्ग काढला त्यांनी लोगोत गणपतीचे चित्र असेल व सोहळ्यात दोघांच्याही प्रतिमाचा वापर केला जाईल असा निर्णय घेतला. 

या निर्णयामुळे कोणाचाही उपमर्द होण्याचा प्रश्‍न नव्हता, पण पुण्यातील काही विद्वान मंडळींना हा वाद इतक्‍या लवकर सुटावा असे वाटत नसावे किंवा मुळात इतक्‍या सोप्या पद्धतीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यातून मार्ग काढावा हेच मुळात रुचले नसावे. त्यामुळे अनेक तथाकथित टिळक भक्तांनी छाती पिटून घेऊन हा टिळकांचा अपमान आहे असा जयघोष करायला सुरवात केली. कॉंग्रेस आणि शिवसेनेने पक्षीय पातळीवरून या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत गणेशोत्सव आणि त्यातला सगळा रोषणाईचा भाग यांवर सतत टीका करणाऱ्या तथाकथित समाजसुधारकांनी तर याला हा भाजपचा डाव आहे आणि टिळक कॉंग्रेसचे होते त्यामुळे भाजपने टिळकांचा फोटो लोगोत घेतला नाही अशी टीका करायला सुरवात केली. खरेतर यात कुठल्याही पक्षाचा संबंध नव्हता पण ज्यात त्यात राजकारण करू पाहणाऱ्या मंडळीना अचानक टिळकांची भक्ती इतकी प्रिय वाटायला लागली की प्रश्‍न पडावा, अरे हे आजपर्यंत कुठे होते हे सगळे ? असे वाटावे. 

मुळात लोगोत टिळकांचे छायाचित्र नाही यासाठी आक्षेप घेणे चुकीचे आहे. लोगोत त्यांचे छायाचित्र नसले म्हणून त्यांचे काम कमी होत नाही किंवा त्यांचा अपमान तर मुळीच होत नाही. गेल्या पन्नास वर्षात राज्य आणि देशपातळीवर लोकमान्य टिळक यांची उपेक्षा विविध पद्धतीने केली गेली तेव्हा हे टिळकभक्त कुठे होते ? आज दुर्दैवाने टिळकांच्या गणेशोत्सवाच्या संकल्पनेबाबत जातीय नजरेतून पाहिले जात आहे. त्याचा युक्तीवाद कधीच करता येणार नाही, त्याच्या बाजुने किंवा विरोधात बोलणे ेहाच टिळकांचा पराभव ठरेल. 

मुळात गणेशोत्सव हा लोकापर्यंत नेला कुणी हा खरा मुद्दा आहे, त्याचे श्रेय टिळकांना देण्यात कुणाला काही त्रास व्हायचे कारण नाही. 
मात्र उत्सवाचे कर्ते कोण ? यावरून विनाकारण वाद पेटवला जात आहे. या वादाच्या आगीत अनेक जण आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत हे चुकीचे आहे. काहीजण या वादाच्या निमित्ताने टिळकांची जात काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल गणेशच त्यांना सुबुद्धी देवो असे म्हणावेसे वाटते. मात्र या मुद्यावरून पुण्यात सध्या जी टिळकभक्तीची लाट आली आहे त्यामागे टिळकप्रेम किती आणि त्यावरून कुणाला आपापला अजेंडा कसा रेटायचा आहे या प्रश्‍नांच्या उत्तरातच या वादाची मुळे दडली आहेत. 

गणोशोत्सव सार्वजिनकरित्या साजरा करून त्यातून लोकसंग्रह करत येईल हे टिळकांनी ओळखले होते, त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जगजागरणासाठी त्याचा वापर केला ही त्यांची हुशारी त्या काळाच्या पातळीवर योग्यच होती. आज त्याला आजच्या काळाचे संदर्भ लावून कोण मोठे, कोण लहान याचा वाद घालणे अत्यंत चुकीचे आहे. या वादात राजकारण करणे हाच त्या उत्सवाचा आणि भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक यांचा अपमान करणारे आहे. उतावीळ अनुयायी काहीवेळा आपल्याच नेत्याचा कसा पराभव करतात हेच या वादातील अनेक मंडळींच्या वर्तनावरून दिसत आहे.

Web Title: vinayak limaye writes about lokmanya tilak ganesh festival